रुपांतरण : संघर्षांशी सामना Print

गौरी खेर ,सोमवार, २४ सप्टेंबर  २०१२
alt

‘नव्याची नवलाई तीन दिवस’ ही म्हण आपल्या कामाच्या बाबतीतही लागू आहे. नव्या नोकरीच्या वातावरणात रुजू होताना जे नावीन्य आपण अनुभवतो, ते काही काळातच ओसरायला लागतं. काहींना तर ‘स्थिर’ व्हायला खूपच वेळ लागतो. आपल्या मतांपेक्षा भिन्न मतं, अनेक प्रकारची व्यक्तिमत्त्वं, एकच काम करायच्या निरनिराळ्या तऱ्हा, यामुळे अनेकदा कार्यालयीन संघर्षांना तोंड द्यावं लागतं. यातून व्यावसायिक नात्यातले तणाव उद्भवतात आणि हे तणाव ऑफिसमध्ये अनेकदा अनेक रूपांत प्रकट होतात.

अबोला/टाळाटाळ : यातील सर्वात मोठा धोका हा संवाद तुटणे हा आहे. सहकाऱ्यांमधील वितुष्टामुळे महत्त्वाचे निरोप/ माहिती एकमेकांपर्यंत पोहोचतच नाही आणि याचा अनिष्ट परिणाम हा कामावर होतो. सुरू झालेला अबोला फार काळ टिकणारा नसला आणि निर्माण झालेला तणाव हा टोकाचा नसला तर ठीक, मात्र हा तणाव वारंवार येत राहिला तर ती गोष्ट कामावर आणि त्या सहकाऱ्यांसाठीही घातक ठरू शकते.
स्पर्धा : ‘माझं खरं की तुझं’ हे सिद्ध करताना एक प्रकारे नकारात्मक स्पर्धा सुरू होते. ‘काही वाट्टेल ते झालं तरी चालेल, पण दाखवून देईन,’ हा बाणा दाखवताना मानसिक शांतता, नीती व नाती आणि मूल्ये अशा अनेक गोष्टींचा बळी जातो.
कंपूशाही : वरिष्ठांच्या तंटय़ात अनेक कंपू बनतात. तंटय़ाशी काहीही देणं-घेणं नसलेले कनिष्ठही यात खेचले जातात आणि यात त्यांची विनाकारण ओढाताण होते. दीर्घकाळ टिकणाऱ्या तंटय़ामुळे, कामाचे वातावरणही बिघडते.
तडजोड : तंटा शमवताना अनेकदा  तडजोडीच्या वेळीसुद्धा ‘तू तू मै मै’ सुरू राहतं आणि तडजोड करतानाही आपापल्या अटी पुढे सारतात. एखाद्याने आपलं ऐकावं, असं वाटत असेल तर दुसरा लगेचच ‘अमुक केलं तर तुला तमुक करावं लागेल,’ असा सूर लावतो. अशी परिस्थिती काही वेळा निभावून न्यावी लागते. यात  ‘मला मिळाले नाही तरी चालेल, पण त्याला मिळायला नको’ अशी भावना जोपासली तर कोणाच्याच मनाजोगे होत नाही. यामुळे सहकाऱ्यांमधील नाते तुटायला वेळ लागत नाही आणि प्रतिस्पध्यार्ंच्या कामावरचा विश्वास उडायला लागतो.
सहकाऱ्यांमध्ये तंटे होण्याची अनेक करणे असू शकतात-
दोन पिढय़ांमधील तणाव - विविध वयोगटातील कर्मचारी एकत्र येतात, तेव्हा हे तंटे होण्याची शक्यता खूपच असते. विशीतले, चाळिशीतले आणि साठी गाठणारे, निवृत्ती जवळ आलेले कर्मचारी हे सर्व एकत्र काम करताना प्रत्येकाची कामाची पद्धत आणि काम करण्याविषयीच्या भावना भिन्न असतात. मग त्या काही असो- ऑफिसला घातलेले कपडे, ई-मेल लिहिताना वापरली जाणारी भाषा, वेतनाची अपेक्षा, काम करण्याची तऱ्हा, सहकाऱ्यांशी औपचारिक वर्तन या सगळ्या बाबतीत भिन्न पिढय़ांमधील अंतरांमुळे खटके उडतात.
प्रक्रियेसंबंधातील संघर्ष : कार्यपद्धती कशी असावी, यावरून होणारे तंटे, त्याचं प्रमाण आणि स्वरूप लक्षात घेतलं तर अशा प्रकारचे तंटे मिटविण्यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन मार्ग शोधणे योग्य राहते.
भूमिकेसंबंधातील संघर्ष : आपली कामाची भूमिका परस्परांना छेद जाणारे नाही, हे खात्री करून घेतल्यास, संघर्षांला वेळ येत नाही. सहकाऱ्यांच्या कार्य भूमिकेत ( job description) जेव्हा स्पष्टता नसते, तेव्हा प्रत्येकाला  ‘हे काम माझे नाही,’ असे वाटते. अशा कर्मचाऱ्यांच्या संघातील सदस्यांना त्रास अधिक असतो -‘याचं ऐकू का त्याचं?’ अशी कात्रीत सापडल्यासारखी त्यांची अवस्था होते.
दोन व्यक्तींमधील संघर्ष: दोन किंवा अधिक व्यक्तिमत्त्वांच्या ‘तारा न जुळल्यामुळे’ होणारे तंटे/तणाव. कधी कधी काहींच्या स्वभाव दोषामुळेही होऊ शकतात. यावर उपाय म्हणजे प्रत्येक व्यक्तीने पूर्वग्रह न ठेवता वागणे.
हे तणाव-तंटे दूर ठेवण्यासाठी किंवा मिटविण्यासाठी आपण काही गोष्टी जातीने आत्मसात करायला हव्यात:
० आग्रही असावे; आक्रमक नको- आपली बाजू शांतपणे दुसऱ्यांसमोर मांडावी. आवाज आणि पारा चढायची शक्यता वाटल्यास थोडा ‘टाइम आउट’ घ्यावा. डोकं शांत झाल्यावर तंटय़ाकडे बघायचा दृष्टिकोन बदलू शकतो.
० तंटय़ाचे मूळ शोधून काढा: ‘कोण मुळे’ पेक्षा ‘कशा मुळे’ विचारल्याने उत्तर लवकर सापडू शकेल.
० भावनात्मक होऊ नये : समस्येकडे जरा तटस्थपणे बघितल्याने नक्की काय स्थिती आहे, ते पटकन लक्षात येतं.
० मन मोठं असणं - आपली चूक आहे, हे कबूल करायला मन खूप मोठं लागतंच, पण त्याहून मोठं मन माफी स्वीकारायला लागतं ( accepting an apology gracefully)- ‘‘मग, मला माहीतच होतं, माझंच बरोबर आहे’’ असं म्हणणं म्हणजे त्या माफीवर पाणी फिरवण्यासारखंच आहे.
० मध्यस्थी: गहिरे आणि चिघळत जाणाऱ्या समस्यांसाठी हा एक शेवटचा तोडगा आहे, पण जी व्यक्ती मध्यस्थी करते, त्याच्यावर मात्र बिकट परिस्थिती ओढवू शकते. दोन्ही पक्षांना मध्यस्थावर विश्वास असणं अगदी गरजेचं आहे -नाही तर निर्णय समोरच्याच्या बाजूने लागेल, हे आधीपासूनच दुसरा पक्ष गृहीत धरतो. असा दृष्टिकोन बाळगला तर बोलणी फिस्कटण्याची शक्यता वाढते.
काही कंपन्यांमध्ये असे आढळून आले आहे की, टोकाला जाणारे तंटे/ वाद/ तणाव जर सकारात्मकरीत्या, नि:पक्षपणे आणि वेळेतच मिटविले, तर भविष्यात पुन्हा ते डोकं वर काढण्याची वेळही क्वचितच ओढवते. एक मुख्य फायदा होतो तो म्हणजे आपल्या कामाच्या वातावरणात नक्की काय होतंय, याचा आढावा घेणं सोपं होतं, आणि त्यातील भिन्नता अंगीकारण्यास (acceptance of diversity) प्रोत्साहन मिळतं.