ग्रेट आयडियाज् - धाडसी मून-वॉकर : नील आर्मस्ट्राँग Print

अनघा दिघे ,सोमवार, २४ सप्टेंबर  २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

‘ह्युस्टन, ट्रॅन्क्विलिटी बेस हीअर. द ईगल हॅज् लॅण्डेड’ - २० जुल १९६९ रोजी अपोलो ११ चे ल्युनार मोडय़ुल ईगल हे अमेरिकन अंतराळ यान चंद्रावर उतरल्यानंतर दुपारी चार वाजून १७ मिनिटांनी सर्वप्रथम पृथ्वीवर प्रक्षेपित झालेले अंतराळवीर नील आर्मस्ट्राँग यांचे हे उद्गार आहेत. चंद्रावर उतरल्यावर त्यांनी म्हटले, ‘एका व्यक्तीचे हे छोटे पाऊल आहे, परंतु मानवांच्या इतिहासाच्या संदर्भात ही एक उत्तुंग अशी झेप आहे.’
५ ऑगस्ट १९३० रोजी नील अ‍ॅलडन आर्मस्ट्राँग यांचा जन्म झाला. अलीकडेच २५ ऑगस्ट २०१२ रोजी त्यांचा मृत्यू झाला. सुरुवातीला टेस्ट पायलट आणि एक अंतराळवीर असणाऱ्या नील आर्मस्ट्राँग यांची २० जुल १९६९ रोजी निघणाऱ्या अपोलो ११ या अमेरिकेच्या चांद्रयान माहिमेमध्ये कमांडर म्हणून निवड झाली आणि एक वैयक्तिक किंवा सामूहिक नाही तर अखिल मानवजातीच्या इतिहासामध्ये अप्रूप वाटावे असे सोन्याचे पान लिहिले गेले. मानवी आकांक्षा, संशोधन आणि अतुलनीय धाडसाचे ते एक अविस्मरणीय उड्डाण होते. ‘अपोलो ११’ मोहिमेमध्ये बझ अ‍ॅल्ड्रीन हे नील आर्मस्ट्राँगचे सहकारी अंतराळवीर होते. चंद्रावर उतरणारे हे दोघे पहिले मानव.. तर नील आर्मस्ट्राँग हे चंद्रावर प्रत्यक्ष चाललेले पहिले धाडसवीर ठरले!
आज या महान अंतराळवीराचा जीवात्मा प्रगाढ शांतीच्या एका निराळ्याच उन्नत अशा ‘ट्रॅन्क्विलीटी बेस’वर असेल. परंतु त्यांचे विचार हे आजही मानवजातीला प्रेरक आणि उद्बोधक असेच आहेत.
‘माझा जन्म आणि सारे बालपण हे अमेरिकेच्या ओहियो या शहरामध्ये व्यतीत झाले. ही जागा डायटनच्या ६० मल उत्तरेला आहे. जितकी माझी स्मृती मागे जाते, तिथपासूनच विमानाचा शोध लावणाऱ्या राईट बंधूंची यशोगाथा ही माझ्या चिरकाल स्मरणात राहिली आहे. स्काय ग्लायडर्स आणि सेल प्लेनस् (sail planes)) ही अद्भुत म्हणावीत अशीच फ्लाईंग मशिन्स आहेत. परिपूर्ण पक्षी होण्याच्या जवळात जवळ नेणारी एक सुंदर यंत्रणा ती तुम्हाला देतात.
संशोधन म्हणजे नवीन ज्ञानाची निर्मिती होय. भूगर्भशास्त्रज्ञांचे एक सुज्ञपणाचे परिमाण आहे : पत्थरांच्या स्मृतीगर्भात सर्व काही लिहून ठेवलले असते. जे तुम्हाला माहीत नाही, जे तुमच्या आकलनाच्या पलीकडील आहे, ते समजून घेण्याचा प्रयत्न करणे हाच संशोधन या संकल्पनेचा अर्थ आहे.
अधिसूचन आणि भाकिते यावर अजूनही विज्ञानाने मात केलेली नाही. पुढील (आगामी) वर्षांसाठी खूप जास्त भाकिते आपण करून ठेवतो आणि तेच पुढील १० वर्षांसाठी केलेले भाकीत मात्र अत्यल्प प्रमाणात असते.’
 २००५ रोजी युनिव्हर्सटिी ऑफ साऊथर्न कॅलिफोíनया येथील विद्यार्थ्यांना उद्देशून ते म्हणाले, ‘तुम्ही सहजतेने तर्कशास्त्राचा वापर कराल, अशी आशा मी करतो. परंतु एक अट आहे बरे. अत्यंत योग्य उत्तराकडे अपरिहार्यपणे हे तर्कशास्त्र तुम्हाला नेईल, अशी खात्री बाळगून स्वत:चीच प्रतारणा मात्र करू नका. आश्चर्यकारक अद्भुताच्या निर्मितीमागे काही गूढ हे असतेच आणि मानवाच्या आकलन करून घेण्याच्या सहज उर्मीचा पाया म्हणजे हे अद्भुत असते.
फटाक्याच्या सुरनळीसारख्या लगेच पेटून संपणाऱ्या एखाद्याच धिटुकल्या कामासाठी कुणी आपल्याला ओळखावे, असे आपल्यातल्या बऱ्याच जणांना वाटत नाही, तर सातत्याने नियमितरीत्या ध्यास घेऊन सदैव घेतलेल्या कठोर परिश्रमांसाठी आपली ओळख व्हावी, अशीच आपल्यातील बहुतेक जणांची इच्छा असते.
मला वाटते की, आपण चंद्रावर जात आहोत. कारण आव्हाने स्वीकारणे आणि आव्हानांवर मात करणे हा मानवी स्वभाव आहे. मानवाच्या खोल अंतस्थ आत्म्याचा तो प्रधान धर्मच आहे म्हणा ना.. जसा सॉलोमन मासा हा मूळ गोडय़ा पाण्यातला असल्याने अथांग सागर पार करून मूळ ठिकाणीच प्रजननाच्या कार्यासाठी येतो, तशाच रीतीने, असे काही अचाट कर्तृत्व ही आपलीदेखील सहज ऊर्मी आहे.’ अपोलो ११ मोहिमेसंदर्भातील पत्रकार परिषदेमध्ये नील आर्मस्ट्राँग यांनी असे मत मांडले.
अंतराळ यानातून पृथ्वीकडे पाहण्याचा त्यांचा अनुभव हृद्य आहे. एकदमच माझ्या असे लक्षात आले, ‘समोर दिसत असलेला तो छोटासा, सुंदरसा आणि निळसरसा वाटाण्याचा दाणा म्हणजे पृथ्वी आहे. एक डोळा बंद करून माझ्या नजरेच्या फर्लागाच्या टप्प्यांत मध्येच मी माझा अंगठा घातला. तेव्हा पृथ्वी दिसेनाशी झाली. मला महाकाय अवाढव्य असे काहीच वाटले नाही तर त्यापेक्षा अगदी उलटे, म्हणजे मला अगदीच क:पदार्थ नगण्यरीत्या सूक्ष्म असल्यासारखे वाटले.
मानवजात ही काही अनंत काळ केवळ आणि केवळ याच ग्रहाशी (पृथ्वीशी) बांधलेली राहणार नाही, त्यापेक्षाही फार दूरवरच्या गोष्टी या आपल्या दृष्टिपथामध्ये असून मानवासमोर उपलब्ध असणाऱ्या सुसंधी आणि पर्याय हे अमर्याद आहेत. याचे प्रात्यक्षिक दाखवून दिल्यामुळेच अपोलो ११ मोहिमेचे माहात्म्य आणि मौलिकत्त्व हे वादातीत आहे.’
दुसऱ्या एका प्रकल्पाचे विश्लेषण करताना त्यांची विचक्षणता दिसून येते. ते म्हणाले, ‘हा प्रकल्प महागडा असेलही. या कामासाठी खूप सारी ऊर्जा आणि गुंतागुंतीचे अंतराळ यान लागेल, हे मला मान्य आहे. तऱ्हेतऱ्हेचे जटिल प्रश्न तुमच्यासमोर असले तरीदेखील मी असे म्हणेन की, ते प्रश्न इतके काही जटिल व कूटप्रश्न नाहीत. इतक्यादेखील बहुसंख्येने तुमच्यासमोर प्रश्न नाहीत जितक्या जटिल आणि कूटप्रश्नांना १९६१ सालातील ‘अपोलो स्पेस प्रोग्राम’च्या वेळी आम्ही तोंड दिले आणि ते सोडवले. फाजील आत्मविश्वास न करण्यासाठी खरेच आम्ही फार सतर्क राहून विशेष प्रयत्न केले. कारण जेव्हा तुमचा फाजील आत्मविश्वास आणि गर्व बळावतो तेव्हाच तुम्हाला चपराक बसते, आघात होतो आणि चिंतेच्या रट्टय़ाखाली तुम्ही भरडले जाता.
चालत राहण्यामध्ये एखाद्या वैमानिकाचा कुठलाही खास आनंद दडलेला नसतो. वैमानिक आकाश भरारी घेणेच पसंत करतात. त्यांचा सारा अभिमान हा (यानातून बाहेर पडण्यापेक्षा जास्त) परग्रहावर उत्तमरीत्या यान उतरण्यामध्ये असतो. आम्ही यशस्वी झालो आहोत, हे पाहिल्यावर माझ्या आनंदाला पारावार उरला नाही. यशाच्या त्या अभिनव शिखरावर मी हर्षोल्हासित,उन्मादित आणि फारच उत्साहित झालो होतो. एका गोष्टीचा मला खेद वाटतो की, अभिनव मोहिमेच्या या कामासाठी माझा प्रचंड वेळ आणि भरपूर प्रवास खर्ची पडला आहे.
चंद्रावर सर्वप्रथम पाऊल ठेवण्यासाठी माझी काही निवड केलेली नव्हती. त्या उड्डाणाचा नियंत्रक आणि अधिकारी म्हणून माझी निवड झाली होती. परिस्थितीवशात् त्या विशिष्ट भूमिकेमध्ये माझा शिरकाव झाला. कोणीही तसे आधीपासूनच ठरवलेले नव्हते.. अथांग सूर्यमालांच्या विविध प्रतलांमध्ये मानवी धाडसाला अगणित संभाव्य शक्यतांना अढळ स्थान देणाऱ्या या अभूतपूर्व अंतराळवीरास मन:पूर्वक श्रद्धांजली.