अभियांत्रिकीची पदवी आहे, कौशल्य मात्र नाही.. Print

दत्तात्रय आंबुलकर ,सोमवार, २४ सप्टेंबर  २०१२
alt

देशांतर्गत पदवीधर अभियंत्यांची वाढती संख्या व या वाढत्या संख्येच्या तुलनेत मर्यादित स्वरूपात त्यांना उपलब्ध होणाऱ्या वा होऊ घातलेल्या रोजगार संधी हा प्रश्न नव्यानेच व नव्या स्वरूपात ऐरणीवर आला असून, त्यामुळे अभियांत्रिकी वा तंत्रज्ञान महाविद्यालये व पदवीधर अभियंत्यांना रोजगार देणाऱ्या कंपन्या या उभयतांपुढे एक नवेच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
देशात आज दरवर्षी अभियांत्रिकीची पदवी घेणाऱ्यांपैकी अधिकांश जण हे त्यांच्या क्षेत्रात नोकरी वा रोजगारासाठी पात्र ठरत नाहीत ही एक वस्तुस्थिती आहे. असे होण्याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे नव्याने रुजू होणाऱ्या इंजिनीअर्सच्या संदर्भात कंपन्यांच्या गरजा व संबंधित विद्यापीठ वा इंजिनीअरिंग महाविद्यालयात प्रचलित अभ्यासक्रमाद्वारे दिले जाणारे शिक्षण यामध्ये असणारी तफावत यामध्ये सातत्याने वाढ होत असल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. त्यातच भर पडली आहे ती इंजिनीअरिंगच्या अभ्यासक्रमाला अद्ययावत न करण्याची.
तसे पाहता नव्याने उत्तीर्ण होणाऱ्या पदवीधर इंजिनीअर्सची रोजगार प्रवणता वा कार्यक्षमता हा मुद्दा यापूर्वी पण मर्यादित स्वरूपात का होईना, पण चर्चिल्या गेला आहे. यासंदर्भात ‘पीअर्सन’ व ‘एज्युकाँप’ यांच्या संयुक्तवतीने ‘पर्पल लीप’तर्फे नव्यानेच करण्यात आलेल्या सर्वेक्षणात असे आढळून आले आहे की, नव्यानेच उत्तीर्ण होणाऱ्या पदवीधर अभियंत्यांपैकी केवळ १२ टक्के अभियंतेच प्रत्यक्ष नोकरी-रोजगारासाठी सक्षम असतात तर अधिकांश म्हणजेच सुमारे ५२ टक्के पदवीधर इंजिनीअर्सना काही प्रशिक्षणानंतर रोजगारक्षम बनविले जाऊ शकते. याचाच सरळ अर्थ म्हणजे नव्याने उत्तीर्ण होणाऱ्या पदवीधर इंजिनीअर्सपैकी ३६ टक्के म्हणजेच लक्षणीय संख्या आणि टक्केवारीतील अभियांत्रिकीचे पदवीधारक नोकरी- रोजगारासाठी पात्र नसतात व हीच बाब आज सर्वच संबंधितांसाठी चिंताजनक ठरली आहे.
‘पर्पल लीप’द्वारा पदवीधर इंजिनीअर्सच्या राष्ट्रीय स्तरावर व व्यापक स्वरूपात प्रथमच करण्यात आलेल्या या सर्वेक्षणात देशांतर्गत १३ राज्यातील १९८ अभियांत्रिकी महाविद्यालयातील पदवी परीक्षेत ६० टक्के वा त्याहून अधिक गुण मिळविणाऱ्या ३४,००० पदवीधर अभियंत्यांचा समावेश करण्यात आला होता हे यासंदर्भात उल्लेखनीय आहे.
या सर्वेक्षणासाठी संबंधित विद्यार्थ्यांसाठी बनविण्यात आलेल्या विशेष रोजगार क्षमता चाचणीत प्रामुख्याने असे आढळून आले की, सर्वसाधारणपणे पदवीधर अभियंचे संवादक्षमता कौशल्यामध्ये कमी पडतात, असा समज वा धारणा असली तरी प्रत्यक्षात विषयाच्या मुळात जाऊन संबंधित विषयाचे आकलन करणे ही अभियांत्रिकी क्षेत्रासाठी आवश्यक वा अनिवार्य असणारी बाब ही नव्याने उत्तीर्ण होणाऱ्या अभियंत्याच्या रोजगारक्षमतेच्या संदर्भात सर्वात मोठी समस्या आहे.
या समस्येचे विश्लेषण करताना असे नमूद करावेसे वाटते  की, गेल्या २० वर्षांत देशात सर्वत्र अभियांत्रिकी महाविद्यालये मोठय़ा संख्येत व फार मोठय़ा प्रमाणात उघडण्यात आली असून, या अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या वाढत्या संख्येनुरूप वाढत्या प्रमाणावर शिक्षित प्रशिक्षित प्राध्यापक उपलब्ध नसणे ही या संदर्भात सर्वात मोठी समस्या निर्माण झाली आहे.
या मुद्दय़ाला दुजोरा देताना संगणक सेवा क्षेत्रातील प्रमुख कंपनी असणाऱ्या ‘कॉक्निझंट’चे चीफ पीपल ऑफिसर शंकर श्रीनिवासन नमूद करतात की, इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी वा तत्सम संस्था वा महाविद्यालयातून पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संदर्भात आकलन क्षमता व विश्लेषण शक्ती या बाबींची कमतरता दिसून येत नसल्याने इंजिनीअरिंग महाविद्यालयांची वाढती संख्या, त्यानुषंगाने विद्यार्थ्यांच्या संख्येमध्ये दरवर्षी होणारी वाढ यांच्या तुलनेत तज्ज्ञ प्राध्यापकांची सतत जाणवणारी कमतरता हा मुद्दा कळीचाच नव्हे तर कळकळीचासुद्धा ठरतो.
प्रशिक्षित व तज्ज्ञ प्राध्यापकांची कमतरता हा मुद्दा ‘कँपस् ते कॉर्पोरेट’ म्हणजेच अभियांत्रिकी वा तंत्रज्ञानविषयक शैक्षणिक संस्थांपासून पदवीधर अभियंत्यांची निवड करणाऱ्या कॉर्पोरेट कंपन्यांपर्यंत म्हणजे उभय क्षेत्रात आता चर्चेचा विषय झाल्याचे पण या निमित्ताने स्पष्ट झाले आहे. आज उद्योगांना
अभियंत्यांनी त्यांच्याशी संबंधित तांत्रिक क्षेत्रात केवळ जाणकारच नव्हे तर अव्वल असण्याच्याच जोडीला त्यांना उद्योग-व्यवसायाची आर्थिक बाजू, व्यापार धंद्याचे त्रराशिक, कामाच्या ठिकाणची कार्यसंस्कृती म्हणजेच प्रचलित कामाच्या पद्धती व स्वत:प्रमाणेच इतरांमध्येसुद्धा बदल घडवून आणण्याची क्षमता या बाबी आता केवळ मूलभूतच नव्हे तर आवश्यक बाब ठरली आहे.
या सर्वेक्षणाच्या निमित्ताने आपल्याकडील अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील प्रचलित अभ्यासक्रम व त्याची सद्य:स्थितीतील उपयुक्तता यावरसुद्धा व्यापक चर्चा झाली आहे. त्यानुसार प्रामुख्याने असे आढळून आले आहे की, इंजिनीअरिंग पदवीचा प्रचलित अभ्यासक्रम हा सर्वसाधारणपणे प्रचलित वा पूर्वापार स्वरूपातच चालत आलेला असून त्यामध्ये विशेषत: कार्य-कौशल्यावर आधारित व उद्योग-धंद्यांच्या वाढत्या गरजांना पूरक अशी वाढ करणे केवळ अनिवार्यच नसून ही बाब म्हणजे काळाची गरज ठरली आहे.
याच प्रयत्नांचा पुढील टप्पा म्हणून पदवीधर इंजिनीअर्सची निवड- नेमणूक करणाऱ्या कॉर्पोरेट कंपन्यांनी विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षणतज्ज्ञ व शैक्षणिक धोरण ठरविणाऱ्या व्यक्ती- संस्था वा यंत्रणेसह काम करणे गरजेचे असून, या घटकांनीसुद्धा उद्योगाच्या बदलत्या व वाढत्या गरजा जाणून- समजून लक्षात घेऊन त्यानुसार परस्पर पूरक प्रयत्न करणेच खऱ्या अर्थाने गरजेचे आहे.
या संदर्भात विविध क्षेत्रातील काही प्रमुख कंपन्यांनी इंजिनीअरिंग वा तंत्रज्ञान संस्थांशी अधिकाधिक ताळमेळ साधून आपल्या नेमक्या अपेक्षा व गरजांनुरूप पदवीधर इंजिनीअर्स मिळावेत यासाठी ठरवून व योजनापूर्वक प्रयत्न सुरू केले आहेत. उद्योगांच्या या अपेक्षा व पुढाकार प्रयत्नांनुरूप बऱ्याच शैक्षणिक संस्थांनीसुद्धा केवळ पुढाकारच व घेता प्रसंगी चाकोरीबाहेरील प्रयत्नसुद्धा सुरू केले आहेत.
या संदर्भात प्रमुख उदाहरण म्हणून लखनऊच्या बाबू बनारसीदास तंत्रज्ञान संस्थेचे देण्यात येईल. या इंजिनीअरिंग संस्थेने संबंधित उद्योगांच्या नव्याने पदवीधर होणाऱ्या इंजिनीअर्सकडून नेमक्या काय अपेक्षा आहेत त्यांचा विशेष अभ्यास करून त्या दृष्टीने आपल्या विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक अभ्यासक्रमांच्या जोडीलाच कौशल्य- पात्रतेची पण जोड देण्यासाठी त्यांचा समावेश आपल्या संस्थेच्या इंजिनीअरिंग पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षांच्या अभ्यासक्रमातच केला असून, त्याचे सकारात्मक व फायदेशीर परिणाम विद्यार्थी- संस्था व उद्योग या सर्वानाच होत असल्याचे फलदायी चित्र पण यानिमित्ताने तयार झाले आहे. गरज आहे ती अशा प्रयत्नांना अधिकाधिक व्यापक आणि प्रभावी करण्याची.