स्टाफ सिलेक्शन कमिशन परीक्षा : फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियासाठी स्पर्धापरीक्षा Print

संजय मोरे ,सोमवार, २४ सप्टेंबर  २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

जागतिकीकरणाच्या या युगात सर्वच क्षेत्रांत स्पर्धा आहे, तर मग फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया तरी कशी मागे राहील. स्पर्धेच्या या जगात अधिकाधिक ज्ञान मिळविण्याची दुर्दम्य इच्छाच उपयोगी पडणार आहे. त्यामुळेच जे विद्यार्थी चौकसपणे सर्व बाबींचा विचार करतील तेच आघाडीवर राहणार आहेत. पदवी अभ्यासाबरोबरच विविध अभ्यासक्रम, व्यवस्थापन अभ्यासक्रम, अकाउंटस् असे विविध अभ्यासक्रम नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांनी पूर्ण करायला हवेत. अशा अभ्यासक्रमांमुळे नोकरीच्या विविध संधी प्राप्त होतात. त्याचप्रमाणे आपल्याला आवड असलेल्या क्षेत्रात काम करण्याची संधीदेखील उपलब्ध होते.
नुकतीच फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये विविध पदांसाठी होणाऱ्या भरती प्रक्रियेसाठीची स्पर्धा परीक्षा ही स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत घेण्यात येते. हीच संधी पदवीधरांसाठी स्पर्धा परीक्षेद्वारे उपलब्ध झालेली आहे.
परीक्षेचा अभ्यासक्रम, निवडप्रक्रिया व तयारी :
फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियातर्फे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. लेखी परीक्षेसाठी दोन प्रश्नपुस्तिका असून पहिल्या प्रश्नपुस्तिकेत बुद्धिमापन चाचणी, संख्यात्मक अभियोग्यता चाचणी, जनरल अवेअरनेस व इंग्रजी हे चार विषय असून प्रत्येक घटकात ५० प्रश्न प्रत्येक घटकासाठी ५० गुण अशा प्रकारे २०० गुणांची ही परीक्षा असणार आहे.
बुद्धिमापन चाचणी : या घटकात शाब्दिक बुद्धिमापन चाचणी व अशाब्दिक बुद्धिमापन चाचणी असे दोन घटक पडतात. अशाब्दिक बुद्धिमापन चाचणी या घटकात आकृत्यांची मालिका पूर्ण करणे, वेगळी आकृती शोधणे, समान संबंध असणारी आकृती पर्यायातून निवडणे, लपलेली आकृती शोधणे, आकृतीची पाण्यातील तसेच आरशातील प्रतिमा शोधणे.
शाब्दिक बुद्धिमापन चाचणी : या घटकात संख्यामालिका, वर्णमालिका, आकृतीतील गाळलेल्या जागी पर्यायातील योग्य संख्या अथवा वर्ण निवडणे, कंसातील संख्या अथवा वर्ण पर्यायातून निवडणे, वेगळा घटक पर्यायातून निवडणे, मालिकेचे सूत्र शोधणे, अक्षरांची लयबद्ध रचना तसेच अंकांची लयबद्ध रचना पूर्ण करणे, सांकेतिक भाषा या घटकावर प्रश्न, दिशाविषयक प्रश्न, वेन-आकृत्यांवर आधारित प्रश्न, कालमापन, घडय़ाळावरील प्रश्न, आकृत्यांची संख्या ओळखणे, बैठक व रांगेतील प्रश्न, निर्णयक्षमता तपासणारे प्रश्न, तुलनात्मक प्रश्न, इनपुट-आउटपुट यावर आधारित प्रश्न, माहितीचे पृथ:क्करण अशा प्रश्नांचा यात समावेश केलेला असतो.
सामान्य अध्ययन : सामान्य अध्ययन या घटकात एकूण ५० प्रश्नांचा समावेश असतो. यात इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, विज्ञान व तंत्रज्ञान, अर्थशास्त्र या घटकांवरील प्रश्न विचारले जातात. इतिहास या घटकात स्वातंत्र्य चळवळीचा लढा, प्राचीन, मध्ययुगीन, तसेच आधुनिक इतिहासावर आधारित प्रश्न विचारले जातात. भूगोल या घटकात भारताचा राजकीय, प्राकृतिक तसेच आर्थिक भूगोल तसेच हवा व हवामान, वातावरण, पृथ्वी व जग यांच्याशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य विज्ञान या घटकात विज्ञान व तंत्रज्ञान, विज्ञानातील मूलभूत संकल्पना, जैविक तंत्रज्ञान, आरोग्यशास्त्र, पर्यावरणातील विज्ञान या सर्व बाबींचा विचार केला जातो. याशिवाय चालू घडामोडीवर आधारित प्रश्न विचारले जातात. चालू घडामोडी या घटकात दैनंदिन जीवनातील सामाजिक, आर्थिक, भौगोलिक व राजकीय घडामोडींचा समावेश होतो. राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय घडामोडींवर प्रश्न विचारले जातात, कला, क्रीडा, सांस्कृतिक, साहित्य व पुरस्कार या घटकांवरदेखील प्रश्न विचारले जातात.
इंग्रजी भाषा : यात प्रामुख्याने व्याकरणावर आधारित प्रश्न विचारले जातात. समानार्थी व विरुद्धार्थी शब्द, वाक्यातील चूक ओळखणे, काळ व त्याची रूपे, अ‍ॅक्टिव्ह व्हॉइस व पॅसिव्ह व्हॉइस, अनेक शब्दांबद्दल एक शब्द, चुकीची स्पेलिंग शोधणे, दिलेल्या शब्दांपैकी योग्य शब्द शोधणे अशा प्रश्नांचा यात समावेश केलेला असतो.
संख्यात्मक अभियोग्यता चाचणी : या घटकात संख्या व संख्याप्रणाली, शतमान-शेकडेवारी, गुणोत्तर-प्रमाण, भागीदारी, लसावि व मसावि, नफा-तोटा, सरासरी, काळ-काम व वेग, अंतर-वेग व वेळ, मिश्रणावर आधारित प्रश्न, बोट व प्रवाहावरील प्रश्न, तसेच डाटा अ‍ॅनेलिसिस म्हणजेच आलेखावर आधारित प्रश्नांचा यात समावेश केलेला असतो.
या लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना दुसऱ्या परीक्षेसाठी बोलाविण्यात येईल. दुसऱ्या प्रश्नपुस्तिकेत संख्यात्मक चाचणी व इंग्रजी हे दोन घटक असून संख्यात्मक चाचणीसाठी ५० गुण तर इंग्रजीसाठी १०० गुण ठेवण्यात आलेले आहेत.
अशा प्रकारचा या परीक्षेचा अभ्यासक्रम असून ही परीक्षा वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरूपाची आहे. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना या परीक्षांत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन उपयोगी पडते. या परीक्षांचा अभ्यास दररोज सहा-सात तास करणे आवश्यक आहे. अभ्यासात सातत्य, तसेच नियोजनबद्ध अभ्यास फार उपयोगी पडतो. परीक्षेतील सर्व प्रश्न सोडविता यावेत, या दृष्टीने सराव आवश्यक आहे. म्हणूनच योग्य दिशेने तंत्रपूर्ण अभ्यास करून यश प्राप्त करा.