प्रोजेक्ट फंडा : वाहनेच वाहने चहूकडे.. Print

हेमंत लागवणकर ,सोमवार, २४ सप्टेंबर  २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

साधारणपणे २५-३० वर्षांपूर्वी घरात टी.व्ही. किंवा फ्रीज असणे हे आर्थिक सुबत्तेचं लक्षण मानलं जात होतं. जसजसं तंत्रज्ञान विकसित होत गेलं तसतशा इलेक्ट्रॉनिक्स वस्तू जास्त प्रमाणात आणि कमी किमतीमध्ये उपलब्ध झाल्या. त्यामुळे टी.व्ही. किंवा फ्रीजच नव्हे तर संगणकसुद्धा सामान्याच्या खिशाला परवडू लागला. त्याच वेळी स्वत:ची ‘फोर व्हीलर’ असणं हे प्रतिष्ठेचं लक्षण मानलं जात होतं. पण कालांतराने, मोबाइल फोन, चारचाकी वाहन या गोष्टी चैनीच्या नव्हे तर गरजेच्या समजल्या जाऊ लागल्या. खासगी वाहनांची संख्या जसजशी वाढायला लागली, तसतशा अनेक समस्यासुद्धा डोकं वर काढायला लागल्या. वाहतुकीची कोंडी होणं, सिग्नलजवळ वाहनांच्या लांबच लांबा रांगा लागणं, वर्दळीच्या ठिकाणी ध्वनिप्रदूषण होणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वाहनांमध्ये वापरण्यात येणाऱ्या जीवाश्म इंधनांच्या ज्वलनामुळे हवा प्रदूषणाचं प्रमाण वाढणं या समस्या भेडसावायला लागल्या.
केवळ मुंबई आणि उपनगरांचा विचार केला तर दररोज सोळा लाखांपेक्षा जास्त वाहने रस्त्यावरून धावत असतात. यामध्ये दरवर्षी तब्बल ११ टक्क्यांनी वाढ होत असते. जितकी वाहने जास्त, तेवढं त्यांच्यामधून बाहेर फेकल्या जाणाऱ्या धुराचं प्रमाण जास्त. अर्थात, वाहनांमुळे निर्माण होणाऱ्या हवाप्रदूषणाची ही समस्या केवळ मुंबईपुरती किंवा आपल्या देशापुरतीच मर्यादित आहे, असं नाही. जगभरातल्या अनेक देशांमध्ये ही समस्या आज भेडसावते आहे. यासंदर्भात इंग्लंडमध्ये केलेलं सर्वेक्षण ‘बीबीसी न्यूज’ने नुकतंच प्रसिद्ध केलं आहे. या सर्वेक्षणातून मिळालेली माहिती धक्कादायक आहे. रस्त्यावरून धावणारी वाहने आणि विमानांमधून होणाऱ्या इंधनाच्या ज्वलनामुळे जे हवाप्रदूषण होते, त्यामुळे इंग्लंडमध्ये दरवर्षी पाच हजार व्यक्तींना आपला जीव गमवावा लागतो; असं या सर्वेक्षणात आढळलं आहे. धक्कादायक गोष्ट अशी की, रस्त्यावरून धावणाऱ्या वाहनांमुळे होणाऱ्या अपघातांमध्ये वर्षभरात मृत्युमुखी पडणाऱ्या व्यक्तींची संख्या यापेक्षा दुपटीहून कमी म्हणजे दोन हजार आहे. शहरांमधून राहणाऱ्या लोकांसाठी ही धोक्याची घंटा आहे.

वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणामध्ये मेक्सिको शहराचा क्रमांक वरचा आहे. ज्वालामुखीमुळे निर्माण होणाऱ्या मोठय़ा विवरामध्ये हे शहर वसलेलं आहे. त्यामुळे शहराच्या सभोवती डोंगर आहेत. त्यामुळे धुराचा निचरा होण्यासाठी येथे बराच वेळ लागतो. मेक्सिको जरी विवरामध्ये वसलेलं असलं तरी समुद्रसपाटीपासून ते सुमारे २२४० मीटर इतक्या उंचीवर आहे. या उंचीवर हवेतील ऑक्सिजनचे प्रमाण तुलनेने कमी असल्याने इंधनाचे पूर्ण ज्वलन होण्याची समस्या इथे भेडसावते. इंधनांचे अपूर्ण ज्वलन प्रदूषण वाढविण्यास कारणीभूत ठरतं. अशा या मेक्सिको शहरामध्ये दर चार व्यक्तींमागे एक खासगी वाहन आहे. वाहनांमधून बाहेर पडणाऱ्या धुरामुळे सरकारला तेथे आणीबाणीसुद्धा घोषित करावी लागली आहे.
वाहनांमुळे निर्माण होणाऱ्या हवाप्रदूषणावर अंकुश ठेवण्यासाठी दोन महत्त्वाच्या गोष्टी करणं आवश्यक आहे. पहिली गोष्ट म्हणजे, खासगी वाहनांचा विशेषत: मोटारींचा वापर कमीत कमी करणे व सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर वाढवणे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याजवळ असलेल्या वाहनांच्या इंजिनची कार्यक्षमता अबाधित राखणे.
आपल्या शहरात वाहनांचा वापर कशा प्रकारे केला जातो आहे, या वाहनांमुळे कोणत्या रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी होत आहे, वाहनांमुळे हवाप्रदूषणाचे प्रमाण किती आहे, याबाबत सर्वेक्षण करता येईल. शहराच्या विविध भागांमध्ये असं सर्वेक्षण करून वाहनांमुळे उद्भवणाऱ्या संपूर्ण शहराच्या समस्या जाणून घेता येतील.
वेगवेगळ्या वयोगटातील विद्यार्थी वेगवेगळ्या प्रकारची माहिती जमा करू शकतील. त्यासाठी शहरातल्या एका रस्त्याची निवड करा. या रस्त्यावरून अध्र्या किंवा एक तासाच्या कालावधीत कोणकोणती वाहने जातात, याची नोंद करा. या काळात वाहतुकीची कोंडी होते का, होत असल्यास नेमकी कोठे व का होते, याची नोंद करा. या रस्त्यावर धुराचे प्रमाण किती आढळले, याची नोंद ठेवा. ही नोंद गुणात्मक पद्धतीने करता येऊ शकेल. म्हणजे धुराचे प्रमाण अत्यल्प आढळले, धुरामुळे काही वेळाने डोळे चुरचुरायला लागले, धुराचे प्रमाण इतके जास्त होते की, १०-१२ फुटांपलीकडचे स्पष्ट दिसत नव्हते इत्यादी. हे सर्वेक्षण एकाच रस्त्यावर दिवसातून दोन किंवा तीन वेळा वेगवेगळ्या वेळी करा. वेळ निवडताना शक्यतो सकाळी ८ ते १०, दुपारी १२ ते २ आणि संध्याकाळी ६ ते ८ या दरम्यान निवडा. त्याचप्रमाणे रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी त्याच वेळी सर्वेक्षण करा. तुम्ही केलेल्या निरीक्षणांची नोंद सोबत दिलेल्या तक्त्यामध्ये करा.
शहराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये केलेल्या सर्वेक्षणाचे एकत्रित संकलन करून विश्लेषण करा. या विश्लेषणावरून शहरात कोणत्या प्रकारच्या वाहनांचे प्रमाण जास्त आहे, कोणत्या रस्त्यांवर कोणत्या वेळी वाहतुकीची कोंडी होते, कोणत्या रस्त्यांवर धुराचं प्रमाण जास्त आढळलं, इत्यादी माहिती मिळेल.
या विश्लेषणावरून कदाचित असं आढळेल की, शाळा परिसरातील रस्त्यांवर दुपारी साडेबारा-एक वाजण्याच्या सुमारास स्कूल बसेस मोठय़ा प्रमाणावर आढळतात. या बसेसमुळे वाहतुकीची कोंडी होते. त्यामुळे प्रवासाला लागणारा वेळ तर वाढतोच, पण प्रदूषणाचे प्रमाणसुद्धा वाढते. विश्लेषणावरून आढळलेल्या अशा बाबींवर विचार करून या समस्या सोडविण्यासाठी काही उपाययोजना करता येतील का, याचा विचार करा. वाहतुकीसाठी वापरली जाणारी वेगवेगळी साधने, त्यांची वाहनक्षमता आणि या साधनांमुळे होणारे प्रदूषणाचे प्रमाण याविषयी माहिती जाणून घेण्यासाठी पुढीलप्रमाणे सर्वेक्षण करता येईल-
०  शाळेतला/ आपल्या वर्गातला प्रत्येक विद्यार्थी कोणत्या वाहनाने शाळेत येतो याची नोंद करा.
०  नोंद झाल्यावर इंधनावर चालणारी वाहने आणि इंधनाशिवाय चालणारी वाहने अशी विभागणी करा.
० प्रत्येक वाहनात जास्तीत जास्त किती माणसे बसू शकतात, ते लिहा.
० या सर्वेक्षणावरून कोणते वाहन वापरणे पर्यावरणाच्या दृष्टीने उपयुक्त आणि आपल्या सोयीचे आहे, हे ठरवा.
अशा प्रकारचे सर्वेक्षण तुम्ही राहता त्या इमारतीमध्ये किंवा आजूबाजूच्या परिसरातसुद्धा करता येईल.