रेल्वे भरतीसाठी परीक्षेची तयारी Print

संजय मोरे ,सोमवार, १ ऑक्टोबर  २ ० १ २
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

भारतीय रेल्वे ही आपल्या देशातील सर्वात मोठे उद्योगक्षेत्र असून सर्वाधिक मनुष्यबळही याच उद्योगक्षेत्रात आहे. या मोठय़ा उद्योगक्षेत्रात गँगमन, ट्रॅकमन, खलाशी या पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली असून नोकरी शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक चांगली संधी चालून आलेली आहे.भूमिपुत्रांचा विचार करता ही परीक्षा मराठी, हिंदी, इंग्रजी व कानडी अशा भाषांमधून होणार आहे. साधारणपणे प्रत्येक दोन-अडीच वर्षांतून अशा प्रकारची भरती रेल्वे प्रशासनातर्फे होते. जर गेल्या वेळेस उमेदवारांनी प्रयत्न केला नसेल तर आताची ही संधी जाऊ नये, हे पाहावे. तसेच गेल्या वेळेस अयशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांसाठीही एक पुन्हा चालून आलेली संधी आहे. म्हणजेच त्यांना परीक्षा पद्धती, अभ्यासक्रम यांचा अनुभव आहे. त्या अनुभवाच्या जोरावर परीक्षा उत्तीर्ण व्हायला हरकत नाही.
परीक्षा पद्धती, अभ्यासक्रम व तयारी :
या पदासाठी होणाऱ्या भरतीप्रक्रियेसाठी प्रथम शारीरिक चाचणी व त्यानंतर त्यात उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना लेखी परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. लेखी परीक्षेसाठी प्रश्नपत्रिकेचे स्वरूप इयत्ता आठवीच्या अभ्यासक्रमावर आधारित राहील. यात सामान्यज्ञान, गणित, तर्कशक्ती व सामान्य विज्ञान असे चार घटक असून परीक्षेसाठी दोन तासांचा कालावधी देण्यात येणार आहे. साधारणपणे १५० प्रश्न १२० मिनिटांत सोडवायचे आहेत. तसेच गेल्या वर्षीच्या प्रश्नपुस्तिकेचा आढावा घेतल्यास असे लक्षात येते की, सामान्यज्ञान या विषयावर इतिहास, भूगोल तसेच चालू घडामोडींवर आधारित प्रश्न विचारले जातात.
भूगोल या घटकात अक्षवृत्ते आणि रेखावृत्ते, स्थानिक वेळ व प्रमाण वेळ, प्रमुख भूरूपे, महासागर, हवा आणि हवामान, विषुववृत्तीय प्रदेश, गवताळ प्रदेश, मान्सून प्रदेश, उष्ण वाळवंटी प्रदेश, भूमध्यसागरी प्रदेश, पश्चिम युरोपीय प्रकारचे प्रदेश, तैगा प्रदेश, टुंड्रा प्रदेश, आशिया खंड व त्यातील देश तसेच त्यासंबंधीची माहिती अशा घटकांचा समावेश होतो.
नागरिकशास्त्र या घटकात ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांचे महत्त्व, सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण या सर्व बाबींचा समावेश केलेला असतो. गणित या घटकात मसावि व लसावि, सरळरूप द्या, अपूर्णाकांची बेरीज व वजाबाकी, अपूर्णाकांचा लहान-मोठेपणा, दशांश अपूर्णाकांवर आधारित प्रश्न, सरळव्याज व चक्रवाढ व्याज, सरासरी, गुणोत्तर-प्रमाण, शेकडेवारी, भागीदारी, वर्ग व वर्गमूळ, घन व घनमूळ, नफा-तोटा, काळ-काम व वेग, अंतर-वेग व वेळ, बोट व प्रवाहावरील उदाहरणे, आगगाडीवरील उदाहरणे, घडय़ाळावरील उदाहरणे अशा प्रश्नांचा यात समावेश केलेला असतो.
सामान्य विज्ञान या घटकात द्रव्याच्या अवस्था, परिसरातील बदल, मापनाची परिमाणे, मापन-अचूकता आणि अंदाज, गती आणि गतीचे प्रकार, बल आणि बलाचे प्रकार, साधी यंत्रे, कार्य आणि ऊर्जा, हवा आणि पाणी, सजीवांतील विविधता, सजीवांची लक्षणे, सजीवांचे वर्गीकरण, निसर्गातील समतोल, अणू आणि रेणू, आरोग्यशास्त्र अशा सर्व घटकांचा समावेश केलेला असतो. त्याचप्रमाणे चालू घडामोडी या घटकात आंतरराष्ट्रीय खेळ, भारतीय खेळ, खेळाशी संबंधित व्यक्ती, साहित्य व पुरस्कार, शोध व संशोधक, खेळाशी संबंधित संज्ञा, आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक चालू घडामोडींचा समावेश केलेला असतो.
बुद्धिमापन चाचणी या घटकात संख्यामालिका, वर्णमालिका, समान-संबंध, विसंगत घटक, अक्षरांची लयबद्ध रचना, दिशाविषयक प्रश्न, नातेसंबंध, वेन-आकृत्या, कंसातील संख्या शोधणे, विधाने-अनुमान, माहितीचे पृथक्करण, आकृत्यांची संख्या ओळखणे, बैठक व रांगेतील प्रश्न, तुलनात्मक प्रश्न, आकृत्यांची मालिका पूर्ण करणे अशा प्रश्नांचा समावेश केलेला असतो.
या परीक्षेचा अभ्यासक्रम अशा प्रकारचा आहे. परीक्षेची तारीख अद्याप जाहिरातीत प्रसिद्ध केली नसली तरीसुद्धा साधारणपणे तीन ते चार महिन्यांमध्ये परीक्षा घेतली जाते.
स्पर्धा परीक्षांचा अभ्यास कॉल लेटर आल्यावर करायचा नसतो तर अगदी सुरुवातीपासूनच म्हणजे फॉर्म निघाल्यापासून करायचा. परीक्षा किती दिवसांनंतर होईल, हा विचार करण्यात वेळ घालवू नका. गणिताचा अभ्यास करताना रोज किमान २५ ते ३० उदाहरणे सोडविण्याचा सराव करावा. वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका सोडविण्याचा सराव करा. किमान एक प्रश्नपत्रिका प्रत्येक आठवडय़ाला सोडविण्याचा प्रयत्न करा. चालू घडामोडींच्या अभ्यासासाठी महत्त्वाच्या नोंदी रोजच्या रोज ठेवीत चला. राजकीय पक्ष- पुढारी, राज्य- राजधानी, देश- चलन, सर्वात मोठे सरोवर, रस्ते व राष्ट्रीय महामार्ग यांचा व्यवस्थित अभ्यास करा. लक्षात घ्या, यश एका रात्रीत मिळत नाही. त्यासाठी अथक परिश्रम, योग्य व तंत्रपूर्ण अभ्यास, चिकाटी व जिद्द यातून यशाची निर्मिती होते.
तर मग वाट कशाची पाहताय. लागा अभ्यासाला. अभ्यासासाठी शुभेच्छा!