कॅम्पिंग : स्वानुभवातून आत्मपरीक्षण Print

सुनील जोशी ,सोमवार, १ ऑक्टोबर  २ ० १ २
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

अलीकडेच प्रकाशित झालेल्या एका सर्वेक्षण अहवालानुसार असं सिद्ध झालंय की, मन रिझवणाऱ्या आणि आल्हाददायक गोष्टींमध्ये कॅम्पिंगचा क्रमांक पहिला लागतो. गेली १५-२० र्वष, मी साधारण महिन्यातून दोनदा कॅम्पिंगला जातोच जातो. दोन दिवसांपासून ते दहा दिवसांपर्यंत, असं अनेक वेळेला कॅम्पिंग केलंय. कुटुंबासमवेत, इतर मित्रमंडळीसह किंवा अनेकदा एकटासुद्धा जातो. समजा, शनिवार-रविवारी कॅम्पिंगला जायचं ठरवलं तर आमची तयारी आधीच्या सोमवारपासून सुरू होते. जागेचा शोध सुरूहोतो त्या निमित्ताने. ‘गुगल अर्थ’वर जाऊन भूगोलाचं ज्ञान वाढतं, मग मित्र-मत्रिणींना फोन होऊन त्यांच्याशी संपर्क वाढतो. तंबू, स्लीपिंग बॅग, टॉयलेट टेन्ट, स्टोव्ह, गॅस, पॅक्ड फूड, कपडे अशा विविध गोष्टींची जमवाजमव सुरू होते. सोमवार ते शुक्रवार फेसबुक आणि टीव्ही जरा कमी होतो. शुक्रवारी रात्री- उद्या जायचं म्हणून झोप जरा कमीच लागते. शनिवारी सकाळी निघतो. थर्मासमध्ये चहा-कॉफी भरून घेतो, सॅण्डविचेस बनवून घेतो आणि छान जागा मिळाली की, मस्त वाटेत गाडी थांबवून खातो. कधी कधी टपरीवरील गरमागरम भजी, भाजलेलं कणीस आणि वाफाळता चहा असाही नाश्ता होतो.
सकाळी सहा वाजता निघाल्यावर आरामात गाडीने साधारण चार ते पाच तासांत पोचू, अशी म्पिंगची जागा शोधलेली असते. कधी कधी जागाबिगा आधी न शोधता असाच बाहेर पडतो आणि योग्य जागा निवडून चक्क तंबू लावतो. योग्य जागा म्हणजे एखाद्या गावापासून हाकेच्या अंतरावर असते. गावातल्या लोकांचा आपल्याला आधार असतो, काही लागलं-खुपलं तर गाववाले मदत करतात. बऱ्याच गावांच्या बाहेर देवळे किंवा शाळा असतात. अशा जागा फारच उत्तम. साधारण दुपारी १२च्या सुमारास मुक्कामस्थळी पोचलं की, प्रथम तंबू लावतो. गाडीत आणि तंबूत सर्व गोष्टी जागच्या जागी लावून घेतो. नूडल्स, पास्ता, सूप असं ‘ रेडी टू इट’ जेवण बरोबर नेलेलं असतं. स्टोव्ह किंवा सिलिंडरवर गरम करून मस्त जेवायचं आणि हॅमक बांधून साधारण तास-दोन तास पडी टाकायची. अंदाजे चार ते सातपर्यंत फेरफटका मारून यायचं. बरोबर पक्षीमित्र, वन्यजीवमित्र, वनस्पतीतज्ज्ञ, इतिहासतज्ज्ञ, छायाचित्रकार यांपकी कोणी असेल तर मग मजाच मजा. आपल्या ज्ञानात बरीच भर पडते. सात वाजता आल्यावर मस्तपकी खिचडी करायची किंवा कुणी गाववाला तयार झाला तर शेगडीवर केलेली झुणका-भाकर त्याच्या घरातून येते, तिच्यावर ताव मारायचा. देवळात बऱ्याच वेळा भजन असतं. त्यात सामील व्हायचं किंवा बरोबर आकाश निरीक्षणासाठी असलेले चार्ट असतात आणि एक बेसिक दुर्बिण आहे, तिनं आकाश दर्शन करायचं. रात्र झाली तरी शहरात एक प्रकारचा उजेड असतोच, पण इकडे पूर्ण काळोख असतो. त्या काळोखाची सवय होते. साधारण १० वाजता कॉफी किंवा मसाला दूध पिऊन शुभ रात्री.
रविवारी पहाटे पाच वाजता पक्ष्यांच्या आवाजाने जाग येते! एखाद्या गावातल्या घरात जायचं. विनंती करून गायी-म्हशीचं दूध काढायचा प्रयत्न करायचा. मग विनंतीपूर्वक चहा नाकारून ते फेसाळतं धारोष्ण दूध प्यायचं. मग मात्र चांगला दोन ते तीन तासांचा फेरफटका मारतो. अनेक नवनवीन गोष्टी अनुभवायला मिळतात.. विनंती केली तर बलगाडीतही बसता येतं. एखाद्या शेतात लावणी, बेणणी, खुरपणी, कापणी असं काही चाललं असेल तर थोडा मीही हातभार लावतो. त्या निमित्ताने तिथल्या लोकांशी संवाद होतो. त्यातून बरंच काही अनुभवायला आणि शिकायला मिळतं. परत आल्यावर आपल्या आवडीप्रमाणे नाश्ता करून जवळील पाण्याचा साठा शोधायचा आणि चांगलं तासभर डुम्बो डुम्बो केल्यावर मस्तपकी काहीतरी जेवण बनवून खायचं. पाहिजे असेल तर तासभर विश्रांती करून मग आपल्या परतीच्या मार्गाला लागतो. गेल्या २० वर्षांत मी बायको-मुलांसोबत अनेक ठिकाणी कॅम्पिंग केलंय, आम्हाला कुठेही वाईट अनुभव आलेले नाही! एकदा एक म्हैस तेवढी जरा अंगावर आली होती!
‘नो ट्रेस’ म्हणजे आपण जिथे कॅम्पिंग केलंय तिथे आपल्या अस्तित्वाचा कोणताही पुरावा राहणार नाही, याची मात्र आम्ही अतोनात काळजी घेतो. शेणाचा वास, मातीचा सुगंध, झाडांमधून वाहणाऱ्या वाऱ्याचा सळसळता आवाज, पक्ष्यांचा किलबिलाट, नदी झऱ्यांमधून वाहणाऱ्या पाण्याचा नादमधुर रव, रातकिडय़ांची किरकिर, नि:शब्द शांतता, अंगावर रोमांच आणणारा अंधार आणि हिरवी वनश्री या आपल्या पंचेद्रियांना यातनामुक्त करणाऱ्या गोष्टी आहेत. त्यांचा अनुभव हा तेथेच जाऊन घेतला पाहिजे.. मोबाइल, कॉम्प्युटर, सीडी प्लेअर अशा कोणत्याही गोष्टी त्या नैसर्गिक अनुभवांच्या पुढे फारच थिटय़ा आहेत!
निसर्गसान्निध्यात राहिल्यामुळे खरंच फार बरं वाटतं. प्रदूषणमुक्त अशा वातावरणात राहिल्यामुळे पुढचा आठवडा चांगला उत्साही वातावरणात जातो. कॅम्पिंगचे फोटो काढलेले असतात, ते मित्रमंडळींबरोबर पाहण्यात वेळ कसा जातो, हे कळतसुद्धा नाही! कॅम्पिंगमुळे वेगवेगळे प्रदेश पाहायला मिळतात. कुणाशी कधी, कसं बोलावं याचा अनुभव वाढतो. निसर्गाबद्दल ओढ वाढते. सर्व कामे स्वत: करायची सवय लागते. आठवडाभर आपण अत्यंत चाकोरीबद्ध आयुष्य जगत असतो. कॅम्पिंगला गेल्यावर मस्त स्वच्छंदी आणि मुक्तपणे दोन-तीन दिवस कंठायला मिळतात, त्यामुळे कळत नकळत नक्कीच तणाव निघून होतो. बरं, कॅम्पिंग करायला वयाची अट नाही! सात ते ७० वयोगटातील कोणीही सहजरीत्या हा अनुभव घेऊ शकतो.
तणावमुक्तीसाठी परिसंवाद किंवा ध्यानधारणा शिबीर यासोबत एकदा कॅम्पिंगचाही अनुभव घ्यावा. व्यवस्थापन प्रशिक्षण सेमिनारला जरूर जावे, पण त्यानंतर एकदा आपणहून कॅम्पिंगलाही जावे.. चार भिंतींच्या वर्गाबाहेर, मजा करत, स्वानुभवातून मिळणारे आत्मज्ञान हे सर्वश्रेष्ठ आहे का नाही, याचा प्रत्यय स्वत:लाच येईल..