‘फोर्ड’मधील फलदायी प्रयोग Print

दत्तात्रय आंबुलकर ,सोमवार, १ ऑक्टोबर  २ ० १ २
alt

अमेरिकन वाहन उद्योगातील सुप्रसिद्ध अशी ‘फोर्ड’ कंपनी भारतातील आपला व्यावसायिक व्याप वाढवीत असतानाच कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे कौशल्य आणि कार्य- विकासाद्वारा विविध प्रकारचे महत्त्वाकांक्षी उपक्रम राबवत आहेत. त्याविषयी..
कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मध्यवर्ती मानून त्यांच्या विकासविषयक प्रयत्नातच कंपनीचा विकास सामावला आहे, या तत्त्वावर कंपनीचा विश्वास आहे. कर्मचाऱ्यांचे विकासविषयक प्रयत्न राबविताना कंपनीला कार्यरत असणाऱ्या ‘पीपल डेव्हलपमेंट कमिटी’चे मोठे सहकार्य मिळाले. त्यातून सारेच चित्र पालटत गेले.
या समितीतर्फे कर्मचाऱ्यांना विशेष कौशल्य प्राप्त करून त्यांना अधिक कौशल्य व जबाबदारीचे काम करण्यासाठी प्रोत्साहन-प्रशिक्षण दिले जाते. कनिष्ठ कर्मचाऱ्यांना अनुभवी सहकाऱ्यांकडून मार्गदर्शन करणे, त्यांच्यामध्ये आवश्यक व वाढत्या जबाबदारीला पूरक अशी मानसिकता निर्माण करणे यासारखी कामेही केली जातात.
पीपल डेव्हलपमेंट कमिटीमध्ये प्रामुख्याने कारखान्यात काम करणारे पर्यवेक्षक व व्यवस्थापकांचा समावेश असतो. ही मंडळी आपापल्या विभागात काम करणाऱ्या कर्मचारी व सहकाऱ्यांचे प्रतिनिधित्व करतात. प्रतिनिधींची ‘पीपल डेव्हलपमेंट कमिटी’वर नेमणूक करताना त्यांनी संबंधित विभागात काम करण्यासाठी आवश्यक ती कौशल्य व कार्यक्षमता पातळी गाठली असणे आवश्यक मानले जाते.
फोर्ड कंपनीच्या ‘पीपल डेव्हलपमेंट कमिटी’चे अन्य वैशिष्टय़ म्हणजे या कमिटीला आता कारखाना पातळीशिवाय राष्ट्रीय व आशिया स्तरावरील समितीचे स्वरूप देण्यात आले आहे. यामुळे समितीच्या सदस्यांना आता विविध पातळ्यांवर विचारविनिमय व कामकाज करून त्याद्वारा कर्मचारी आणि कंपनी या उभयतांचा एकत्रित विकास करण्याचे प्रोत्साहन मिळत जाते व त्यामुळे सर्वच स्तरांवरील कर्मचाऱ्यांचा विकाससुद्धा साधला जातो.
कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या कौशल्यवाढीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने कर्मचारी-अधिकाऱ्यांचे आपसातील संबंध केवळ कनिष्ठ-वरिष्ठ अशा स्वरूपाचे आणि मर्यादित न राहता ते नेहमी सहकार्याचेच नव्हे तर सौहार्दाचे राहण्यासाठी उभयतांमध्ये सतत संवाद साधला जातो. हे काम व अशा संवादमय वातावरणाची निर्मिती करून त्यामध्ये सातत्य राखण्याचे कामही ‘पीपल डेव्हलपमेंट कमिटी’ करत असते, हे विशेष. या कामी कंपनीचा मनुष्यबळ विकास विभाग महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतो.
कर्मचाऱ्याचा विकास खऱ्या अर्थाने घडवून आणायचा असेल तर त्यासाठी संबंधित कर्मचाऱ्याने वैयक्तिक व सामायिक स्तरावर स्वयंप्रेरणेने प्रयत्न करणे आवश्यक आहे. अशा प्रयत्नांद्वारे कर्मचारी आपल्या विकासाचा व्यावहारिक व त्याचबरोबर व्यापक विचार करीत असल्याने त्यासाठी ‘फोर्ड’ कंपनीने प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी ‘एम्प्लॉई डेव्हलपमेंट प्लॅन’ स्वरूपात विकासविषयक उपक्रमाची जोड दिली आहे. या उपक्रमाची अंमलबजावणी ‘पीपल डेव्हलपमेंट कमिटी’ व एचआर विभाग यांच्या संयुक्त प्रयत्नातून केली जाते.
‘एम्प्लॉई डेव्हलपमेंट प्लॅन’मध्ये संबंधित कर्मचाऱ्याची पात्रता, कार्यक्षमता, कौशल्य स्तर व प्रगतीविषयक क्षमता इ. मुद्दय़ांचा एकत्रित विचार करून कर्मचाऱ्यांचा व त्याद्वारे कंपनीच्या सर्वागीण विकासासाठी प्रयत्न केले जातात. याच प्रयत्नांच्या पुढच्या टप्प्यात संबंधित कर्मचारी, त्यांचे सहकारी, वरिष्ठ-व्यवस्थापक व एचआर यांची आपापल्या प्रयत्नांच्या संदर्भातील जबाबदारी निश्चित करण्यात येऊन त्या दृष्टीने प्रयत्न केले जातात. यामुळे अशा प्रयत्नांमध्ये संबंधित कर्मचाऱ्याशिवाय सर्वच संबंधितांचा सहभाग विनासायास होत जातो.
‘फोर्ड’ व्यवस्थापन व कंपनीच्या संदर्भात सांगायचे झाल्यास अशा प्रयत्नांमुळे कंपनीमध्ये कामगार-कर्मचारी पातळीपासून अधिकारी-व्यवस्थापकांपर्यंत विविध स्तरावरील आवश्यक व प्रशिक्षित कर्मचारी सातत्याने उपलब्ध असतात. कंपनीच्या विस्तारवाढीच्या वेळी अशा प्रकारचे प्रशिक्षितच नव्हे तर संस्कारित कर्मचारीसुद्धा नेहमीच उपयुक्त ठरतात.
कंपनीच्या पुढाकारातून साकारलेल्या या उपक्रमांचे वैशिष्टय़ म्हणजे ही योजना आणि त्यासाठीचे नियोजन यामागे कर्मचारी आणि कंपनी या उभयतांच्या सध्याच्या व भविष्यकालीन गरजांना मूलभूत व मूलगामी महत्त्व देण्यात आले आहे. या प्रयत्नांचा लाभ कंपनी आणि कर्मचाऱ्यांना होत असतानाच कर्मचाऱ्यांमध्ये अधिक जबाबदारीची भावना निर्माण झाली आहे. कौशल्यवाढीच्या जोडीलाच कंपनी अभ्यासू विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी पदवी वा एमबीएसारख्या अभ्यासक्रमासाठी प्रोत्साहन देत असून या योजनेचा फायदाही फोर्ड कंपनीचे कर्मचारी लक्षणीय स्वरूपात घेत असतात.
‘फोर्ड’मधील कर्मचारीविषयक विविध उपक्रमांची अन्य वैशिष्टय़े म्हणजे या उपक्रमांची मांडणी- आखणीला सातत्यपूर्ण अंमलबजावणीचीही जोड देण्यात आल्याने त्यांची नेमकी परिणामकारकता साधली गेली आहे. या उपक्रमांची अन्य प्रमुख वैशिष्टय़े म्हणजे त्यांची मुख्य जबाबदारी संबंधित प्रमुख व्यवस्थापकांची असते तर अंमलबजावणी व सर्वाच्या सहभागाची जबाबदारी एचआर विभागाची असल्याने त्याला सामूहिक जबाबदारीचे सामायिक स्वरूप प्राप्त झाले आहे.
या उपक्रमांच्या अंमलबजावणीचे ‘फोर्ड’ इंडियाला प्रामुख्याने पुढील लाभ झाले आहेत-
* कर्मचाऱ्यांचे नोकरी सोडून जाण्याचे प्रमाण आणि टक्केवारी वाहन उद्योगाच्या तुलनेत निम्म्याने कमी झाली आहे.
* गेल्या १० वर्षांत सुमारे एक हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांनी आपल्या पात्रता व कौशल्यवाढीच्या आधारे अधिकारी पदावर बढती मिळविली आहे.
* कंपनीतील व्यवस्थापक पदावर अंतर्गत उमेदवारांची निवड-नेमणूक करण्याचे प्रमाण सर्वाधिक म्हणजेच ८०% पर्यंत वाढले आहे.
‘फोर्ड’च्या या उपक्रमात सुमारे १० हजार कर्मचारी आजवर सहभागी झाले असून या साऱ्यांच्या परिणामी कंपनीला नव्यानेच मिळालेला ‘ह्य़ुविट सर्वोत्तम कंपनी पुरस्कार’ही कर्मचारी आणि कंपनी या उभयतांसाठी लाभदायी ठरला आहे.’