नवनिर्माणाचे शिलेदार :‘गुणवत्ता’ मोजण्याचा नवा पॅटर्न Print

भाऊसाहेब चासकर ,सोमवार, १ ऑक्टोबर  २ ० १ २
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
(समन्वयक : हेमंत लागवणकर)
प्रिय दीक्षा,
alt वैशाली गेडाम

खूप म्हणजे खूपच गोड आहेस तू! तुझी नजर सतत काही शोध घेत असते. प्रत्येक चांगली गोष्ट तू करून पाहतेस. तुला खूप खूप वाचावेसे वाटते. वाचनालयातून पुस्तके घेतेस वाचण्यासाठी. सर्वासोबत मिळून राहतेस. सर्वाना मदत करतेस. सोबत-सोबत चालताना हळूच माझा हात पकडतेस, तेव्हा खूप छान वाटते मला. तू तुझ्या बाबांची फार लाडकी आहेस, हो ना? आणि आईला तुझे खूप कौतुक वाटते.

आता तू दुसऱ्या वर्गात गेलीस. पुढच्या वर्षी मी तुझी वाट पाहीन. आणखीन नवीन नवीन छान-छान गोष्टी शिकू.
तुझी,
वैशाली टीचर.

विदर्भातल्या चंद्रपूर जिल्ह्य़ात मारडा (मोठा) या लहानशा गावी प्राथमिक शिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या वैशाली गेडामने तिच्या वर्गातल्या एका विद्यार्थिनीला लिहिलेले हे पत्र. हे पत्र म्हणजे वर्षांच्या शेवटाला मुलांना शाळांकडून जे काही प्रगतिपुस्तक ऊर्फ निकालपत्र दिले जाते, त्या प्रगतिपुस्तकावरच्या मागच्या बाजूस लिहिलेला हा हृदयस्पर्शी मजकूर आहे!
गेल्या काही वर्षांपासून ‘सातत्यपूर्ण र्सवकष मूल्यमापन’ (CCE)  हे तीन भारदस्त शब्द शिक्षण क्षेत्रात सतत चर्चिले जाताहेत. स्मरणशक्ती ज्यांचे भांडवल नाही, अशा मुलांच्या मनात शाळेविषयी एक प्रकारची अढी निर्माण होते. कोमेजून जाणाऱ्या अशा कोवळ्या कळ्यांची ‘परीक्षा’ नावाच्या दुष्टचक्रातून सुटका करण्याच्या उदात्त हेतूने खरे तर या कार्यक्रमाची आखणी करण्यात आली आहे. शिक्षण हक्क कायदा बालककेंद्री शिक्षणावर भर देतो आहे. जीवन आणि शिक्षण यांची सांधेजोड नीट झाल्याशिवाय शिक्षण प्रक्रिया आनंददायी होऊ शकत नाही. म्हणूनच सध्या घोकंपट्टीपेक्षा ‘समज’ विकसित होण्यावर अधिकाधिक भर दिला जात आहे. याच हेतूने मूल्यमापनासाठी राज्यात सातत्यपूर्ण र्सवकष मूल्यमापन हा कार्यक्रम राबविला जातोय. गुणांऐवजी श्रेणी आणि वर्णनात्मक नोंदी नोंदवहीत घेतल्या जाताहेत. शिक्षकांनी निरनिराळी साधनतंत्रे वापरून हे काम करावयाचे आहे. हे करताना केवळ उपचाराचा भाग म्हणून नोंदी करणारे काही शिक्षक असतीलही कदाचित; नाही, असे नाही, पण अनेक शिक्षक या पद्धतीच्या मूल्यमापनाकडे अधिक गांभीर्याने बघत आहेत. काही धडपडणारे, सृजनशील शिक्षक याबाबत निरनिराळी संशोधने करीत आहेत. त्याला अनुलक्षून उपक्रम आणि प्रयोग करीत आहेत. वैशाली गेडाम त्यातली बिनीची शिलेदार आहे. इतकेच नाही तर तिने ज्या तऱ्हेने मुलांचे व्यक्तिमत्त्व नजरेसमोर ठेवून नोंदी केल्यात, त्यावरून तिच्या कामाचे वेगळेपण लगेच लक्षात येते. राज्याला मूल्यमापनाच्या बाबतीत निराळा दृष्टिकोन देण्याचा तिचा हा प्रयत्न आहे.
राज्यभरातले शिक्षक एका विशिष्ट साच्यात केलेल्या नोंदीचे प्रगतिपुस्तक मुलांच्या हातावर ठेवत होते, तेव्हा वैशालीचे संवेदनशील मन एखाद्या टिपकागदाप्रमाणे मुलांची निरीक्षणे टिपत होते. त्या नोंदी ‘साक्षरता म्हणजे शिक्षण नाही तर सर्वागीण गुणवत्ता म्हणजे शिक्षण,’ अशी ठाम भूमिका घेऊन केलेल्या आहेत. मुळातच वैशाली टीचर म्हणजे चौकटीत अडकून पडणारी शिक्षिका नाहीच. शिक्षिकेपेक्षा ती शाळेतल्या मुलांची जीवलग मैत्रीण आहे. तिने ‘सातत्यपूर्ण र्सवकष मूल्यमापन’ (CCE) करताना प्रत्येक विद्यार्थ्यांची विषयनिहाय वेगळ्या प्रकारे केलेली नोंद ही वाचणाऱ्याला विचार करायला लावते. मुलांचा उत्साह वाढवते.
मुलांच्या बारीकसारीक नोंदी करायच्या तर मुलांमध्ये मिसळल्याशिवाय, तन-मन-धनाने काही एक केल्याशिवाय कसे शक्य आहे? वैशाली चौकटीतली शिक्षिका नाहीये. शिक्षणाकडे पाहण्याचा तिचा स्वत:चा निराळा दृष्टिकोन आहे. कोणतेही मूल कमी नाही, असा विचार करणारी ही शिक्षिका मुलांमधील असामान्य क्षमतेवर विश्वास ठेवणारी आहे.
खरं तर वैशाली गेडाम म्हणजे एक निराळंच रसायन आहे. एखाद्या चर्चेत बोलताना आग्रही, रोखठोक, सडेतोड, कटू आणि अत्यंत स्पष्ट बोलणारी वैशाली कधी काळी म्हणजे तिच्या लहानपणी मितभाषी असेल आणि त्याहून जास्त स्वप्नाळू असेल, यावर खरेच विश्वास बसत नाही. खावे, प्यावे, मस्त हुंदडावे. अंगणातल्या झुल्यावर बसून स्वप्नं पाहावीत, असा जणू हिचा दिनक्रमच होता आणि हो, लहानपणी तर तिला म्हणे स्वप्नं पाहण्याचा जणू छंदच जडला होता! यातली बहुतेक स्वप्नं सर्वाच्या म्हणजेच विश्वाच्या सुखसमृद्धीची असायची. अभ्यासात खूप हुशार वगैरे नसली तरी ‘पोटापुरते’ मार्क्स मिळत असल्याने आई-वडिलांनी अभ्यासाची भुणभुण कधी लावली नाही.
दहावी पास झाल्यावर अकरावीला विज्ञान शाखेत प्रवेश घेण्याची खूप इच्छा होती, पण गणित विषय कच्चा असल्याने घरच्यांनी तिला कला शाखेत प्रवेश घ्यायला लावला. बारावीनंतर पुढे पदवीक्रमासाठी इंग्रजी हा स्पेशल विषय निवडला खरा; परंतु तिसऱ्या वर्षांचा निकाल लागला. तेव्हा एका विषयात नापास झाल्यामुळे वैशाली रडून बेजार झाली होती. याआधी  नापास होण्यासारखे ‘अपयश’ वाटय़ाला आलेले नसल्याने हा अनुभव तिला विसरायचा म्हटले तरी विसरता येईना. नेमके याच वर्षी डी. एड. बारावीनंतर झाले. निराशेने चहूबाजूंनी घेरले असतानाच, वैफल्याच्या खोल गर्तेत तिचे पाय रुतलेले असतानाच वैशालीला बारावीच्या गुणांवर डी. एड.ला पाठवायचे असा निर्णय घरच्या लोकांनी परस्परच घेऊन टाकला. इच्छा नसतानाही घरच्या लोकांच्या आग्रहाखातर डी. एड.ला गेली. नाइलाजाने गेली तरी डी. एड.ला असताना सर्व उपक्रमांमध्ये ही अत्यंत उत्साहाने सहभागी होत असे. दोन्ही वर्षी ती सगळ्यांत पुढे होती. डी. एड्.चा निकाल लागल्यानंतर सात-आठ महिन्यांतच चंद्रपूर जिल्हा परिषदेत नोकरी मिळाली. ध्यानीमनी नसताना ही शिक्षिका झाली, पण हे काम मन लावून करायचे, असे तिने ठरवले होते. नवनियुक्त शिक्षकांच्या प्रशिक्षणात मार्गदर्शक म्हणाले, ‘तुम्हाला नोकरी मिळाली आहे. तुम्ही पुढे पदवी मिळवून स्पर्धा परीक्षा देऊन शिक्षण किंवा इतर विभागांत अधिकारी होऊ शकता. पुढे जाऊन कोणाकोणाला अधिकारी व्हायचे आहे?’ सगळ्यांनी हात वर केले. वैशालीने एकटीने हात वर केला नाही. मार्गदर्शकांनी कारण विचारले तेव्हा, ‘मला आयुष्यभर शिक्षकच राहायचे आहे,’ असे बाणेदार उत्तर वैशालीने दिले. आज अनेक शिक्षक या पदाकडे एखाद्या प्लॅटफॉर्मप्रमाणे पाहताहेत. मास्तरकी करता करता स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा. एखाद्या क्लास वन, क्लास टू पदाची नोकरी मिळाली रे मिळाली की, निघून जायचे, असा ट्रेंड जोरात आहे. या पाश्र्वभूमीवर वैशालीच्या निश्चयाला सलाम करावासा वाटतो.
नोकरीत रुजू झाल्यावर शाळेत पाचवी ते सातवी, अशा वर्गाना शिकविताना निरनिराळे उपक्रम राबविण्यास सुरुवात केली, पण बहुतेक मुलांना लिहिता-वाचता येत नव्हते. दोन-तीनजणांचा अपवाद वगळता वर्गातली बहुसंख्य मुले बोलायचीच नाहीत. एका एका समस्येच्या मुळाशी जाऊन उपचार करू लागल्यावर काही बदल होतील, असा विश्वास वाटत होता. मुले मोकळी व्हावीत, त्यांनी निर्भयपणे संवाद साधावा, खूप खूप प्रश्न विचारावेत. बौद्धिक आनंद त्यांना उपभोगता यावा, यासाठी ही त्यांना सुट्टीच्या दिवशी फिरायला घेऊन जात असे. घरी बोलवत असे. त्यांच्या सोबतीने स्वयंपाक आणि एकत्र बसून जेवणही करीत असे.
प्रेमळ स्वभाव हे शिक्षकी पेशासाठी लागणारे भांडवल वैशालीकडे अंगभूतच होते. त्यासोबत मुलांना स्वातंत्र्य दिले. मग खेळ, मस्ती, गाणी, गप्पागोष्टी.. असे सुरू झाले. मुलांना समजून घेत वैशालीने नाना प्रकारचे प्रयोग केले. त्यात यश मिळत गेले. वर्ग पुढे जात होता तसा उत्साह वाढत गेला. यातून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या, असे वैशाली सांगते.
हे सगळे व्यवस्थित सुरू असताना वैशालीचे शिक्षणविषयक काही एक चिंतन सुरू होते.
शिक्षण कशासाठी असते? केवळ करिअर म्हणजे शिक्षण का? नाही. या मनोस्वस्थतेतून बाहेर पडण्यासाठी गावात प्रबोधन करण्याच्या हेतूने पहाटे पाच वाजता उठून ग्रामगीतेवर बोलायला सुरुवात केली. पावणे दोन वर्षे हे चालवले. गावातल्या नाल्या, रस्ते स्वत: पुढाकार घेऊन स्वच्छ केले. गावात फिरते वाचनालय चालविले. महिलांचे मेळावे घेतले. सांस्कृतिक कार्यक्रम सुरू केले. लोक भारावून गेले. शाळेत आणि समाजात दोन्हीकडेही एकाच वेळी काम सुरू असते.
शिक्षणातले नवीन प्रवाह समजून घेत प्रयोग सुरू असतात. सकाळपासून संध्याकाळपर्यंतचा वेळ कमी पडतो. बहुविध बुद्धिमत्तांचा सिद्धांत समजून घेतल्यावर मूल्यामापनाचा निराळा विचार हिच्या मनात घोळू लागला. वैशालीला असे वाटायला लागले की, परीक्षा घेणे मुलांवर अन्यायकारक आहे. कोणत्या ना कोणत्या विषयात प्रत्येकाला गती असतेच. मजूर आणि अभियंता दोघांचीही आपल्याला सारखीच गरज असते. दोघांच्याही मेहनतीने समाज पुढे जातो. मग एखाद्याच्या मेहनतीला ‘अ’ आणि दुसऱ्याच्या मेहनतीला ‘क’ किंवा ‘ड’ ठरविण्याचा अधिकार आपल्याला कोणी दिला? दोघेही माणूसच आहेत. पारंपरिक मूल्यमापनात आपण व्यक्तीची ‘किंमत’ ठरवतो आणि पुढे समाजाच्या बाजारात उभे करून विक्री करतो, असे वैशालीचे मत आहे.
शिक्षणाने समाजात शांतता नांदावी. सुव्यवस्था यावी, पण असे का होत नाही? कारण बाहेरचे जग समजून घ्यायला आपले शिक्षण कमी पडतेय, असे निरीक्षण वैशाली नोंदविते. ‘शांततेसाठी शिक्षण’ हा वैशालीच्या विशेष अभ्यासाचा विषय आहे. वैशाली तरल मनाची कवयित्री आहे. विविध नियतकालिकांतून ती लिहीत असते. मूल्यमापनातील तिच्या प्रयोगांचे ‘माझे प्रगतिपुस्तक’ नावाने पुस्तक प्रकाशित झालेय. या प्रकारच्या मूल्यमापनाची कल्पना कशी काय सुचली, या प्रश्नावर तिने उत्तर दिले, ‘गुणपत्रिकेतून काय समजते आपल्याला? या अंकदर्शनातून काहीही हाती लागत नाही. म्हणूनच वर्णनात्मक पद्धती आपण स्वीकारायलाच पाहिजेत. आपण जसे मुलांचे मूल्यमापन करीत असतो. तसेच मुले आपले मूल्यमापन करीत असतात. मी काम करीत गेले, काही तरी नवीन गवसत गेले, जे सापडले ते मुलांचा स्वत:वरचा आणि शिक्षणावरचा विश्वास वाढविणारे आहे.’
शिक्षक प्रयोगशील असतील तर शिक्षणदेखील प्रयोगशील राहते. शाळांचे मुख्य भांडवल म्हणजे शिक्षकांची सर्जनशीलता हेच आहे. विषय मांडणीसाठी ते सतत नवीन मार्ग शोधतात. साहित्यनिर्मिती करतात. स्थानिक प्रश्नांना स्थानिक उत्तरे शोधतात. नेटाने, जिद्दीने काम पुढे नेत राहतात. वैशालीचे काम याच पद्धतीचे आहे.