आयोजन आणि ध्वनिचित्रमुद्रण Print

रविराज गंधे ,सोमवार, १ ऑक्टोबर  २० १२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

अलीकडे घरगुती असो वा सार्वजनिक असो, कार्यक्रमांची संख्या वाढू लागली आहे आणि तो कार्यक्रम इव्हेन्ट व्हावा, असे सर्वानाच वाटू लागले आहे. अशा कार्यक्रमांचे आयोजन करणाऱ्यांना आज मोठी मागणी आहे.
दूरचित्रवाणीवर विविध विषयांवरील निरनिराळ्या प्रकारचे  विविध कार्यक्रम प्रसारित होत असतात. मालिका टॉक शो, चॅट शो, क्वीझ प्रोग्राम, ट्रॅव्हल-हेल्थ-रेसिपी शोज्, नाच-गाण्यांच्या स्पर्धाचे रिअ‍ॅलिटी शोज् इत्यादी. गेल्या काही वर्षांपासून अनेक दूरचित्रवाणी वाहिन्या नानाविध प्रकारच्या इव्हेन्टस्चं आयोजन करून ते ध्वनिचित्रमुद्रित करून त्याचं प्रसारण करीत असतात. पूर्वी सत्कार किंवा पुरस्कार वितरण समारंभ हे विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन साधेपणानं किंवा चांगल्या नेटकेपणानं साजरे व्हायचे. त्याचा खर्चही हॉलचं भाडं, हार-तुरे किंवा चहा-पाण्याचा खर्च इतकाच असायचा. त्याची वर्तमानपत्रात फोटोसह बातमी यायची, परंतु तो सोहळा टीव्हीवर दिसावा असा आग्रह किंवा प्रतिष्ठेचा प्रश्न नव्हता. आज मात्र चॅनेल-आयोजक अन् प्रायोजक यांनी धार्मिक सण-उत्सव-समारंभाचं मार्केटिंग करण्यासाठी इव्हेन्टमध्ये त्याचं रूपांतर केलं आहे. त्यामुळे बहुतेक पुरस्कार वितरण समारंभ, सत्कार- उद्घाटन सोहळे हे दणक्यात भव्यदिव्य अन् आकर्षक स्वरूपाने सादर होऊ लागले. समारंभाचं थेट प्रक्षेपण दूरचित्रवाणीवर जर लाइव्ह होत असेल तर दुधात साखर! अशा प्रकारच्या इव्हेन्ट्सचं आयोजन कसं केलं जातं? या संदर्भातील माहिती माध्यमकर्मी तसंच इव्हेन्ट मॅनेजमेंटचं काम माध्यमांसाठी करू इच्छिणाऱ्यांना उपयुक्त ठरू शकेल.
alt
इव्हेन्टचं एखाद्या सभागृहात किंवा खुल्या मैदानावर सादर करण्यासाठी करावं लागणारं आयोजन आणि आयोजित केलेल्या इव्हेन्टचं ध्वनिचित्रमुद्रण आणि प्रसारण हे दोन स्वतंत्र भाग असतात. हे काम पाहणारे दोन्ही विभाग आणि इतर अनेक छोटे-मोठे कार्यक्रमनिर्मितीचे तांत्रिक विभाग- व्यवस्थापन विभाग स्वतंत्रपणे परंतु एकमेकांना पूरक अशा पद्धतीने इव्हेन्टसाठी काम करीत असतात. या सर्व विभागांमध्ये एक समन्वय आणि सुसूत्रता असणं अत्यंत गरजेचं असतं. इव्हेन्ट डायरेक्टर- मॅनेजर यांच्याशी सतत संपर्क अन् संवाद असणं आवश्यक असतं. किंबहुना हाच इव्हेन्ट्सच्या आयोजन अन् प्रसारण प्रक्रियेचा प्राण असतो, असं म्हटल्यास अतिशयोक्ती होऊ नये. कारण हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीमध्ये सादर केल्या जाणाऱ्या सोहळ्याच्या आयोजनात काही चुका झाल्यास तिथं दुरुस्तीस जागा नसते. टेलिव्हिजन चॅनेलवर प्रसारित होणारे बहुसंख्य इव्हेन्ट्स हे पुरस्कार वितरण किंवा सन्मान प्रदान करण्यासाठी आयोजित केले जातात. या वितरणादरम्यान नाच-गाणी, विनोदी प्रहसन, छोटय़ा मुलाखती, जादूचे किंवा स्टन्टचे प्रयोग इत्यादी करमणुकीचे कार्यक्रम सादर होतात. एकूण इव्हेन्टची संकल्पना आणि सादरीकरण हे साधारणपणे प्रायोजकांना अभिप्रेत असलेलं त्या कार्यक्रमाचं स्वरूप अन् हेतू लक्षात घेऊन चॅनेलकडून केलं जात. अर्थातच यामध्ये प्रायोजकांच्या उत्पादनाचं प्रमोशन अन् ब्रॅन्डिंगची पूर्ण काळजी घेतली जाते. असं असलं तरी चॅनेलचे निर्माते-दिग्दर्शक-कलाकार नावीन्यपूर्ण कल्पना राबवून इव्हेन्ट जास्तीत जास्त मनोरंजक, आकर्षक अन् प्रेक्षणीय करीत असतात. याव्यतिरिक्त दिवाळी, गणपती विसर्जन, नवरात्रीचे सण, होळी, पंढरीची वारी आदी अनेक सण-उत्सवांचे ‘इव्हेन्ट’ म्हणून प्रक्षेपण चॅनेल्स करीत असतात. हे सण-उत्सव सार्वजनिकरीत्या जसे साजरे होतात तसे दाखविले जातात. अलीकडे प्रायोजकांना प्रत्येक गोष्टीत इव्हेन्ट दिसत असल्यानं वर्षभर प्रेक्षकांना इव्हेन्टची मेजवानी मिळत राहते. आपल्याकडे करमणुकीच्या कार्यक्रमांची नेमकी स्पष्ट कल्पना रुजली नसल्याने नेमकं कशाला इव्हेन्ट म्हणायचं हा मोठाच प्रश्न आहे.
alt
इव्हेन्टच्या आयोजनात इव्हेन्ट मॅनेजर, इव्हेन्ट डायरेक्टर आणि प्रायोजक यांची कळीची भूमिका असते. इव्हेन्ट मॅनेजर हा प्रामुख्यानं सोहळ्याच्या आयोजनाची प्राथमिक आणि महत्त्वाच्या मुख्य बाबींची पूर्तता करण्याचे काम करीत असतो. यामध्ये सभागृहाच्या जागेचं आरक्षण, तेथील सोयी-सुविधांची पाहणी, कार्यक्रमासाठी आवश्यक असलेल्या पोलीस, वाहतूक, अग्निशमन, करमणूक इत्यादी सरकारी खात्यांच्या परवानग्या मिळवणे. कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिका, सन्मानचिन्ह, बॅनर-फ्लेक्स इत्यादी तयार करवून घेणे, व्ही. आय. पी. गेस्ट, सेलिब्रिटिज आदींच्या तारखा मिळवणे, कार्यक्रमासाठी आवश्यक वाहतूक अन् केटरिंगची व्यवस्था पाहणे, चित्रिकरणासाठी आवश्यक अशी तांत्रिक सामग्री मागवणे, व्हॅनिटी व्हॅन, जनरेटर आदी सुविधा पुरवणे अशी असंख्य कामे मॅनेजर या नात्यानं करावी लागतात. ते करीत असताना चित्रविचित्र अडचणी आणि समस्या अनपेक्षितपणे उभ्या राहतात. अशा वेळी मॅनेजरच्या संयमाची अन् सहनशीलतेची कसोटी लागते. इव्हेन्टच्या आयोजनासाठी शांत डोक्यानं सर्व गोष्टी हाताळणं गरजेचं ठरतं.
इव्हेन्ट डायरेक्टर आणि निर्माता हे सोहळ्यामध्ये सादर केल्या जाणाऱ्या कार्यक्रमाची आखणी आणि नियोजन करतात. यामध्ये कार्यक्रमामध्ये (सॉफ्टवेअर) सादर होणाऱ्या विविध आयटम्सचा तपशील ठरविला जातो. कलाकारांची निवड, सादर केल्या जाणाऱ्या नृत्य-गाण्यांची निवड, कार्यक्रमांची संहिता (स्क्रीप्ट), शोचे अ‍ॅन्कर्स (निवेदक-सूत्रसंचालक) ठरविणे, त्या सर्वाच्या रिहर्सल्स आयोजित करणे, या सर्व गोष्टी पाहिल्या जातात. इव्हेन्टसाठी सेट उभारणे, ड्रेस डिझायनर-मेकअप आर्टिस्ट, अन्य साहित्याची जुळवाजुळव करणे अशा अनेक गोष्टी इव्हेन्ट डायरेक्टर अन् निर्माता ठरवीत असतात. या सर्व गोष्टींसाठी खर्चाची नेमकी किती तरतूद करावी लागेल याचा सर्वागाने विचार करून कार्यक्रमाचं बजेटही ठरवावं लागतं.
इव्हेन्टसचं ध्वनिचित्रमुद्रण करणारा निर्माता (पॅनेल प्रोडय़ुसर) हा रेकॉर्डिगसाठी जुळवाजुळव करीत असतो. निर्माता तंत्रनिर्देशकाच्या साहाय्याने चित्रिकरणासाठी आवश्यक प्रकाशयोजनेसाठी लाइट्स, कॅमेरे, क्रेन्स किंवा ट्रॉली आदी यांत्रिक उपकरणांचे आयोजन करतो. कार्यक्रम मनोहारी करण्यासाठी विविधरंगी लाइट्सचा, स्कॅनर किंवा एलईडी लाइट्सचा वापर करावा लागतो. कार्यक्रमासाठी ऑडिओ-व्हिज्युअल फुटेज, प्रायोजकांचं स्टेज ब्रॅन्डिंग, लोगो आदींसाठी एलसीडी स्क्रीनची जागा ठरविणे, आदी गोष्टी निर्माता ठरवितो. कार्यक्रमांची संपूर्ण संहिता तपासणे तसेच मिनिट टू मिनिट प्रोग्राम (फ्लो-चार्ट Flow-Chart) तयार करणे ही निर्मात्याची जबाबदारी असते. सर्वसाधारणपणे कुठल्याही मोठय़ा इव्हेन्टची संकल्पना आणि स्वरूप त्या त्या चॅनेल्सचे प्रोग्रॅमिंग हेड, इव्हेन्ट डायरेक्टर प्रायोजकांच्या सहमतीने ठरवितात. आपल्या प्रॉडक्टचं कार्यक्रमातून जास्तीत जास्त चांगलं आकर्षक प्रमोशन व्हावं अशी कुठल्याही प्रायोजकाची अपेक्षा असते. त्यामुळे सूत्रसंचालकाच्या निवेदनात, स्टेजवरील एखाद्या कार्यक्रमातील स्क्रीप्टमध्ये, रंगमंचावरील सेटच्या डिझाइन अन् रंगसंगतीमध्ये त्या त्या प्रॉडक्टची झलक दिसणे अनिवार्य ठरतं. त्याची काळजी निर्माते-दिग्दर्शक घेत असतात. प्रायोजकांचा वाढता हस्तक्षेप ही चॅनेलसमोरची मोठी समस्या असते. अर्थात त्यावर खुबीनं दर्जाशी तडजोड न करता मार्ग काढण्याची कला सर्व चॅनेल्सना आता अवगत झाली आहे.
एखादा सुंदर मनोरंजक आकर्षक इव्हेन्ट आपण छोटय़ा पडद्यावर पाहतो तेव्हा त्यामागे शेकडो कलावंत-तंत्रज्ञांची अनेक दिवसांची मेहनत अन् तयारी असते. इव्हेन्टच्या आधी बऱ्याच गोष्टींच्या प्रक्रिया दोन-तीन महिने आधी सुरू कराव्या लागतात. जर कार्यक्रमात चित्रपट अथवा मालिकांतील कलाकारांना पुरस्कार दिले जाणार असतील तर त्यासाठी तज्ज्ञ-परीक्षक नेमणं, त्याचा प्रीव्ह्य़ू (Preview) अ‍ॅरेंज करणं ही कामे आधी करावी लागतात. समाजातील कर्तृत्ववान लोकांचा सन्मान केला जाणार असेल तर निवड समितीचं आयोजन कार्यक्रमाच्या दीड-दोन महिने आधी होणं गरजेचं असतं. कारण पुरस्कारप्राप्त व्यक्तीची ऑडिओ-व्हिज्युअल क्लिपिंग तयार करण्यासाठी तसेच अन्य तयारीसाठी तेवढा अवधी आवश्यक असतो.
मंत्रमुग्ध करणारी नाच-गाणी, धमाल विनोदी प्रहसनं, खुसखुशीत-चटपटीत-खटकेबाज सूत्रसंचालन, गमतीदार मुलाखती आदी मालमसाल्याचा अंतर्भाव असलेला इव्हेन्ट रंगतदार होतो. कार्यक्रमातील सहभागी कलावंत जितके अधिक प्रसिद्ध अन् लोकप्रिय तितका कार्यक्रमाचा टीआरपी जास्त असं गणित मांडलं जातं. इव्हेन्ट प्रत्यक्षात जितका रंगतदार अन् आकर्षक होतो तसाच तो दिमाखदार पद्धतीनं गतिपूर्ण रितीने प्रक्षेपित होणं आवश्यक असतं. प्रायोजकांच्या टॅगलाइन, ब्रेक बम्पर, कमर्शिअल्स, यांचा ठराविक कालावधीनंतर येणाऱ्या ब्रेकमध्ये केला जाणारा चपखल वापर कार्यक्रमाची लय गतिमान करतो. संगणकीय संकल्पनादरम्यान कार्यक्रमास स्वरूप जास्तीत जास्त आकर्षक केलं जातं. माध्यमकर्मी या गोष्टी सरावात आत्मसात करू शकतो. अलीकडे परदेशातही इव्हेन्टचं आयोजन केलं जातं. आयोजनाची पद्धत हीच असली तरी हे काम अधिक जिकीरीचे, जोखमीचे अन् तुमचं व्यवस्थापकीय कौशल्य पणाला लावणारं असतं.
इव्हेन्ट मॅनेजमेंटचं शिक्षण-प्रशिक्षण नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ इव्हेन्ट मॅनेजमेंट, इव्हेन्ट मॅनेजमेंट कॉलेज ऑफ मुंबई तसेच अनेक मॅनेजमेंट इन्स्टिटय़ूटमध्ये माध्यमकर्मी घेऊ शकतात. या विषयातील पदवी आणि पदविका कोर्सेस चालवणाऱ्या भारतातल्या संस्थांची माहिती नेटवर उपलब्ध आहे. अशा संस्थांमधून रीतसर प्रशिक्षण घेऊन चॅनेलमध्ये काम करण्याचा अनुभव गाठीशी असल्यास माध्यमकर्मीना इव्हेन्टचे आयोजन करणाऱ्या मोठय़ा कंपन्यांमध्ये नोकऱ्या मिळू शकतात. मनोरंजन क्षेत्रात या क्षेत्रातील जाणकार अन् वाकबगार लोकांना मोठी मागणी आहे.