आम्ही करू शकतो! Print

नीलिमा किराणे ,सोमवार, १ ऑक्टोबर  २० १२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

‘शून्य कचरा प्रभाग’ या कात्रजला गेल्या वर्षी राबवलेल्या प्रयोगात स्व-विकसन आहे, सहभागाची जादू आहे, कामाकडे पाहण्याचा वेगळा अ‍ॅप्रोच आहे आणि स्वच्छतेसारख्या मूलभूत प्रश्नाला बांधिलकीनं भिडणारा प्रयत्न आहे. भारतीय समाजमन अंतर्बाह्य़ जाणणारे गांधीजी व्यवस्थापन गुरू होते आणि स्वच्छता हे त्यांचं ब्रीद. गांधी जयंतीच्या (२ ऑक्टोबर) निमित्तानं या प्रयोगातली शिकवण आणि व्यवस्थापनाची तत्त्वं शेअर करणं औचित्यपूर्ण ठरेल.
एखादं प्रोजेक्ट मग ते ऑफिसच्या कामाचे असो वा समाजातील एखाद्या कार्याशी निगडित असो- व्यवस्थापनाचे तत्त्व तिथेही सारखेच लागू होते. स्वयंशिस्त, टीमवर्क, कामाची प्रेरणा, समस्येच्या मूळापर्यंत जाणे आणि त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे आपण हे करू शकतो, हा विश्वास या साऱ्या गोष्टी कुठल्या कामाच्या पूर्ततेसाठी खूप खूप आवश्यक ठरतात. पुण्याच्या कात्रज परिसरात गतवर्षी ‘शून्य कचरा प्रभाग’ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवला गेला आणि त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. मागे वळून पाहताना या प्रकल्पात सहभागी झालेल्यांच्या लक्षात आले की, नकळत या प्रकल्पाच्या अमलबजावणीदरम्यान व्यवस्थापनाची सारी तत्त्वं त्यात झिरपली होती. स्वविकास असो वा सामूहिकदृष्टय़ा महत्त्वपूर्ण ठरणारा प्रकल्प असो, मूलभूत गोष्टीवर काम करणे हे विकासासाठी आवश्यक असते. पुण्याच्या या पथदर्शी प्रकल्पातून हेच अधोरेखित होते. ‘गांधी जयंती’च्या निमित्ताने हा प्रकल्प आणि त्यातील व्यवस्थापन तत्त्वं याचा अनोखा संबंध स्पष्ट झाला.
‘गोष्टीतल्या राक्षसाचा प्राण जसा एखाद्या छोटय़ाशा पोपटात असतो, तसा कचऱ्याच्या राक्षसाचा प्राण हा मिश्र कचऱ्यात आहे. ओला-सुका कचरा वेगळा व्हायला लागला की कचऱ्याच्या राक्षसाची प्राणशक्ती कमी कमी होत जाते. हा प्राण पुण्यातल्या ३५ लाख नागरिकांमध्ये विभागला गेलाय. ते सगळे एका वेळी कृती करत नाहीत म्हणून तो राक्षस संपत नाही. आपण सर्वानी निर्धार करून आपल्या प्रभागापुरता हा राक्षस संपवू या..’ ही कचऱ्याच्या राक्षसाची गोष्ट त्या वेळी पुण्यातील कात्रज परिसरातील कॉलनीतल्या सभांमधून  हमखास सांगितली जायची. त्यांना ती विलक्षण पटायची. दुसऱ्या दिवसापासून त्या भागातला मिश्र कचरा कमी होऊन ओला-सुका वेगवेगळा होऊन यायचा.
घनकचरा व्यवस्थापन ही पुण्यासह सर्वच शहरांना भेडसावणारी एक महत्त्वाची समस्या. सुमारे दोन वर्षांपूर्वी पुण्याच्या कचरा डेपोविरोधात ‘उरळी देवाची’ गावच्या गावकऱ्यांनी केलेले आंदोलन ताजे होते. गावातले कचऱ्याचे डोंगर, कायमची दरुगधी, श्वसनाचे विकार, पावसाळ्यात या कचऱ्याच्या डोंगरातून पाणी झिरपून दूषित झालेले नैसíगक जलस्रोत, तरुणांना लग्नासाठी मुली न मिळणं अशा अनंत समस्या एके काळचं हे निसर्गरम्य गाव झेलत होतं. आंदोलनानंतर तिथला कचरा डेपो बंद करून कचऱ्याला कॅिपग करणं सुरू झालं व सर्व कचरा प्रोसेसिंग युनिटस्मध्ये जाऊ लागला. परंतु या युनिटस्नादेखील मिश्र कचऱ्याच्या असंख्य समस्यांना तोंड द्यावं लागतं. कचऱ्याचा प्रश्न फक्त पुण्याचा नाहीच; तो सर्वव्यापी आहे. कुठल्याही महानगराजवळच्या कचरा डेपोच्या सर्वच गावांची साधारणपणे हीच परिस्थिती असणार आहे. या समस्येची व्यापकता लक्षात घेऊन पुण्यातल्या मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या ‘जनवाणी’ या स्वायत्त संस्थेनं या विषयावर अभ्यास करून समस्येच्या परिपूर्ण समाधानापर्यंत जायचं ठरवलं. पुणे महानगरपालिकेचा या प्रकल्पात महत्त्वपूर्ण सहभाग लाभला.
निवडलेल्या प्रभागातल्या प्रत्येक घरातून ओला व सुका कचरा वर्गीकृत होऊन तो घराघरांतून कचरावेचकांद्वारे उचलला जाईल व तसाच वेगवेगळा वाहून त्याची प्रभागातच पर्यावरणपूरक पद्धतीने विल्हेवाट लागेल अशी या ‘शून्य कचरा प्रभाग प्रकल्पा’ची थोडक्यात संकल्पना. पुणे मनपा, कमिन्स, स्वच्छ संस्था, प्लास्टिक मॅन्यु. असोसिएशन, लायन्स क्लब आणि कात्रजचे नगरसेवक व नागरिकांचा त्यामध्ये सक्रिय सहभाग होता. समन्वयकाची जबाबदारी ‘जनवाणी’ने घेतली होती.
कात्रजकर नागरिकांनी स्वयंशिस्तीने फेब्रुवारी ते डिसेंबर २०११ या प्रकल्पाचा पहिला टप्पा मोठय़ा प्रमाणात यशस्वी केला. कात्रजमधली स्वच्छता आता डोळ्यांनाही दिसते, सार्वजनिक आरोग्य सुधारलं आहे, डास, माशा, घाण, दरुगधी आढळत नाही तसेच कचरावेचकांचं उत्पन्न वाढल्यामुळे सर्वाची मुलं शाळेत जाऊ लागली आहेत. नागरिकांना स्वच्छतेची सवय लागण्यासाठीचा पहिला मोठा पल्ला या काळात गाठला गेला. यापुढच्या टप्प्यात ओल्या-सुक्याची आकडेवारी कमी-जास्त होईल, परंतु यातून शंभर टक्के ओल्या-सुक्याचं वर्गीकरण व शंभर टक्के ओल्या-सुक्याची भागपातळीवर विल्हेवाट या दिशेनं विविध पर्यायांवर सातत्यपूर्ण काम सुरू झालं.
‘आम्हा भारतीयांना स्वच्छता पाळणं कधीच जमणार नाही’
 हे सर्वमान्य सत्य खोटं पाडण्याचं काम या प्रकल्पानं केलं. ‘आम्ही करू शकतो’ हा निर्धारपूर्ण आत्मविश्वास जागवला, ही यातली खूप मोठी गोष्ट.  
सगळ्या टीमलाच या प्रकल्पानं खूप इनसाइटस् दिल्या. समाजाच्या मानसिकतेच्या विविध पैलूंचा अनुभव टीमला आला. मिश्र कचऱ्याचा अक्राळविक्राळ राक्षस जवळून दिसला तसाच त्याला संपवण्याचा मार्गसुद्धा. या प्रकल्पानं टीमपातळीवर जे शिकायला मिळालं ते आज गांधी जयंतीच्या निमित्तानं शेअर करायचंय, व्यवस्थापनाची तत्त्वं म्हणून आणि सामाजिक प्रश्नातली जबाबदार नागरिकाची भूमिका म्हणूनही. (A perfect case study for HR & CSR- Corporate Social Responsibility)  
प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन अनुभवा (Go to Gemba)
प्रत्येकालाच सर्वसामान्यपणे ठाऊक असतं की प्लास्टिकचा वाढता वापर हे कचरा समस्येचं मूळ आहे आणि ओला-सुक्या कचऱ्याचं वर्गीकरण हा त्यावरचा उपाय. प्रकल्पाच्या सुरुवातीला कात्रजच्या टीमलाही असंच वाटत होतं. मात्र अशी कुठलीही जुनी गृहीतकं पक्की न मानता कचरा आणि कचरा व्यवस्थेचं प्रत्यक्ष निरीक्षण करून, कचऱ्याचा प्रोसेसिंग युनिटपर्यंतचा प्रवास टीमनं आधी अनेकदा प्रत्यक्ष पाहिला. महापालिकेचे कर्मचारी, ‘स्वच्छ’ संस्थेचे कचरावेचक, अशा कचरा व्यवस्थापनाशी प्रत्यक्ष संबंधित शेवटच्या टोकासोबत चर्चा केल्या. तेव्हा पुस्तकी ज्ञानाच्या पलीकडे असलेली कचरा समस्येची भीषणता स्पष्ट दिसली, दृष्टीआड सृष्टी या नियमानुसार आपण त्याकडे करत असलेल्या दुर्लक्षाचे भयावह परिणाम टप्प्याटप्प्यानं उलगडत गेले. ‘गो टू गेंबा’ म्हणजे ‘प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन अनुभव घ्या’ हे जपानी व्यवस्थापन तत्त्व इथं वापरलं गेलं होतं.
समस्या नेमकी करा, तिचा गाभा शोधा (Identify / Specify the Need)
या प्रकल्पाच्या निमित्तानं केवळ कचरा समस्येच्या नावाने शंख करण्याऐवजी त्या समस्येच्या मूळापर्यंत पोहोचायचे ठरवले. तेव्हा लक्षात आलं की, वाढतं शहरीकरण हे कचरा समस्येचं मूळ. ग्रामीण भागात जास्त कचरा हा जैव (निसर्गनिर्मित) असतो. तिथं परसबागेत, शेतात बऱ्याचशा कचऱ्याचं नैसíगकरीत्याच विघटन होते. शहरात मात्र मोठमोठय़ा इमारतींत म्हणजे थोडय़ा जागेत खूप जास्त लोक राहतात. मोकळी जमीन, उघडी माती क्वचित दिसते. (रस्त्याच्या कडेची जागा आणि नाल्यांमध्येसुद्धा हल्ली आपण काँक्रिटिंग करू लागलो आहोत.) घराघरांतून निर्माण होणारा ओला कचरा प्लास्टिकच्या पिशव्यांतून कचरा कुंडय़ांकडे येतो. त्यामुळे नैसर्गिक विघटनाची प्रक्रिया थांबून ओला कचरा पिशवीत सडतो. दरुगधी फैलावते, डास, माशा वाढतात. माशांसोबत सर्व प्रकारची रोगराई फैलावते. शिवाय कुत्री, गायी, डुकरं त्या पिशव्या फाडून अन्न खातात. त्यामुळे कचरा कुंडय़ांबाहेरही घाण पसरते. प्राण्यांच्या पोटात प्लास्टिक जाते. (अनेकदा कचरावेचकही कचराकुंडीवरच चढून त्यातल्या त्यात स्वच्छ कचरा शोधत असतात. हे विदारक दृश्य रोज पाहूनही आपण सोयीस्करपणे त्याकडे कानाडोळा करतो.)
शहरी जीवनशैलीमध्ये खूप मोठय़ा प्रमाणातल्या विकतच्या अन्नपदार्थासाठीही प्लास्टिक पिशव्यांचा वापर होतो. त्यामुळे श्रीमंत लोकवस्ती असणाऱ्या भागात कचऱ्याचं प्रमाण झोपडपट्टीपेक्षा जास्त आढळतं. खरं तर जवळजवळ ८० टक्के सुका कचरा हा पुनर्वापर करण्यासारखा असतो. परंतु खाद्यपदार्थ व भाज्या-खरकटं त्यात मिसळलं गेल्यानं एरवी भंगारमध्ये विकला जाऊ शकणारा प्लास्टिक, कागद इ. सुका कचरा ओला होऊन, सडून निरुपयोगी होतो. भाव मिळत नसल्याने तो पुनर्वापराच्या साखळीत (Recycling chain) येऊ शकत नाही आणि ओला-सुका मिश्रित असे कचऱ्याचे प्रचंड ढीग व पुढे डोंगर तयार होतात. त्यांचं काहीच करता येणं शक्य नसतं. हळूहळू ते महापालिकेच्या व्यवस्थापन क्षमतेच्याही पलीकडे जाते. काही वर्षांनी त्या डोंगराला कॅपिंग करणं एवढाच पर्याय उरतो. याचा अर्थ कचरासमस्येचा गाभा आहे तो ‘मिश्र कचरा’.
महापालिकेच्या अनेक गाडय़ांमध्ये मिश्र कचराच वाहिला जाताना नागरिकांना डोळ्यांना दिसतो, त्यामुळे ओल्या-सुक्याचं महत्त्व कळणाऱ्यांनादेखील तो वेगळा करण्याचे प्रयत्न निर्थक वाटतात. जमलेल्या कचऱ्यातून विक्रीयोग्य कचरा वेचक काढून घेतात, पण शेवटी प्रोसेसिंगला मिश्र कचरा जातो. काही सोसायटींमध्ये ओला-सुका कचरा वेगळा करून गांडूळ खत किंवा कंपोस्टिंगचे प्रकल्प चालू असतात; परंतु समस्येचे गांभीर्य न पोहोचल्याने किंवा ‘ते मनपाचं काम’ अशा मानसिकतेमुळे त्याचं सार्वत्रिकीकरण होत नाही. यासाठी घराघरांतूनच ओला-सुका कचरा वेगळा ठेवला जायला हवा व विल्हेवाटीच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत त्याचा प्रवास शंभर टक्के वेगवेगळाच झालेला नागरिकांना डोळ्यांना दिसायला हवा.
गरजेचा खरा साक्षात्कार Realization that makes the difference
तत्त्व म्हणून पूर्वीपासून माहीत असलेल्या वर्गीकरणाच्या गरजेचा खरा साक्षात्कार टीमला अशा पद्धतीनं कचऱ्याला प्रत्यक्ष हात घातल्यानंतरच झाला. त्यातून एका नवीन     
 घोषणेचा जन्म झाला, ‘चला, कचरा स्वच्छ ठेवू या.’ यानिमित्तानं काढलेल्या आकडेवारीनं टीमला आणखी एक दिशा दाखवली.
पुण्यात रोज साधारण १५०० टन कचरा निर्माण होतो. त्यातला अगदी पाचशे टन विविध बायोगॅस प्रकल्पांत मुरतो, असं मानलं तरी प्रक्रियेसाठी रोज हजार टनांच्या आसपास कचरा जातोच. मिश्र कचऱ्याची समस्या आणि प्रचंड वाहतूकखर्चाचा विचार करता जास्तीत जास्त ओला कचरा कुठल्याही मार्गानं प्रभागातच जिरावा आणि सुका कचरा कमीत कमी वाहतूक खर्चात भंगारच्या व्हॅल्यू चेनमध्ये जावा हा सर्वात सोयीस्कर मार्ग, ज्यामुळे महापालिका, कचरावेचक व नागरिक या सर्व घटकांचा फायदा होईल आणि स्वच्छता वाढल्यामुळे सार्वजनिक आरोग्यही सुधारेल.
जुन्या दृष्टिकोनातला आमूलाग्र बदल (The Paradigm Shift in Approach)
या प्रकल्पाच्या निमित्ताने समस्येचे निराकरण करताना दृष्टिकोनात आमूलाग्र बदल करणे अत्यावश्यक असते, हे स्पष्ट झाले. महानगरातल्या कचऱ्याच्या समस्येवर अनेकजण अनेक पद्धतींनी काम करत असतात. बायोगॅस प्लँट, कचरा डेपो, सोसायटीत खतनिर्मिती, कचरा जाळणं, घरगुती वापराचे छोटे बायोगॅस प्लँट अशा अनेक प्रकारांनी थोडय़ा थोडय़ा प्रमाणात तात्पुरतं उत्तर त्यावर निघतं, पण त्यामुळे हा कचऱ्याचा राक्षस संपत नाही. प्लास्टिकचा वापर पर्यावरणविरोधी आहेच, पण त्यात सोयही असल्यामुळे तो थांबवणं शक्य नाही. ‘कापडी पिशव्या वापरा’, ‘कचरा कमीत कमी करा’, ‘घरात जिरवा’ अशी भावनिक आवाहने तात्पुरते समाधान देतात, ती सयुक्तिकही असतात, पण ते समस्या समूळ संपवणारे उपाय नव्हेत. त्यासाठी विचारांची दिशाच अमूलाग्रपणे बदलली पाहिजे.
‘कचऱ्याची समस्या ही पूर्णपणे कचरा व्यवस्थापनाची समस्या आहे,  हे टीमनं पहिलं तत्त्व ठरवलं. व्यावसायिकतेनं कायमचं उत्तर शोधायचं म्हणून पुढे प्रकल्पासाठी ‘आयएसओ’ प्रमाणपत्र मिळवलं ज्यामुळे सातत्यपूर्ण स्वच्छतेचा मार्ग स्पष्ट झाला तसंच डेटा आणि डॉक्युमेंटेशनही पद्धतशीर झालं.  
महापालिका व्यवस्थापनासाठीचं सर्वात लहान युनिट म्हणजे प्रभाग. उद्या प्रशासकीय पातळीवर हा प्रयोग इतरत्र कुठंही मोठय़ा प्रमाणावर राबवणं शक्य व्हावं म्हणून कात्रज हा पुण्यातला सर्वात मोठा प्रभाग निवडला गेला. जिथं झोपडपट्टय़ा, सोसायटी, अनधिकृत बांधकामं, बंगल्यांच्या सोसायटी, रिकामे प्लॉटस् इ. सर्व प्रकार आहेत. शिवाय टेकडय़ा, नाले, डोंगरउतार ही नैसíगक विविधतादेखील आहे. थोडक्यात, सर्व प्रकारच्या समस्या या एकाच प्रकल्पात येऊन गेल्यास तो खरोखरीचाच पथदर्शी प्रकल्प ठरेल, असा एक उद्देश हा प्रभाग निवडण्यामागे होता.  
या प्रकल्पाची प्रक्रिया आठवताना आता वाटतं, की व्यवस्थापन-मानसशास्त्रातली दोन महत्त्वाची तत्त्वं टीम पाळत होती.  
अर्जुनाचा पोपटाचा डोळा आणि शंभर टक्के प्रयत्न ((Ultimate Focus & 100% Efforts))
या संदर्भात टीमच्या चच्रेत ‘बहिऱ्या बेडकाची गोष्ट’ असायची.
एका कोरडय़ा पडलेल्या विहिरीत अडकलेले दोन बेडूक उंच उडय़ा मारून विहिरीबाहेर पडण्याचा प्रयत्न करत असतात. पुन:पुन्हा दगडावर आपटून जखमी होत असतात. ते पाहून बाहेर काठावर पोहोचलेले इतर बेडूक त्यांना ‘कशाला धडपडता? शांतपणे देवाचं नाव घेत मरा’ असं ओरडून सांगत असतात. त्यामुळे हताश होऊन त्यातला एक बेडूक प्रयत्न सोडून देतो आणि मरतो. दुसरा मात्र सर्वशक्तीनिशी प्रयत्न करून अखेरीस बाहेर उडी मारतोच. अभिनंदनाचा जल्लोष करणाऱ्या बेडकांना कळतं की तो बेडूक बहिरा होता. त्याला इतरांचे सल्ले ऐकूच आले नव्हते. आमच्या टीमचीही परिस्थिती तशीच होती. ‘आपले लोक एवढे शिस्तीनं ओला- सुका कचरा वेगळा करणं शक्य नाही. अनेक प्रयत्न होऊनही जे कधीच घडलं नाही ते आज का घडेल?’ असं प्रत्येक जण हिरिरीनं पटवत असताना त्याकडे टीम बहिऱ्या बेडकासारखीच दुर्लक्ष करत होती. शून्य कचऱ्याच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी घराघरांतून ओल्या-सुक्याचं शंभर टक्केवर्गीकरण आणि त्याचं विल्हेवाटीपर्यंत वेगवेगळंच राहणं हा एकमेव फोकस अनेकांनी अनंत पर्याय सुचवले तरी पक्का ठेवला. कारण ‘मिश्र कचरा’ हेच कचरा समस्येचं मूळ आहे, घाव तिथंच घातला पाहिजे, यावर सर्व टीमची श्रद्धाच होती.
टिपिंग पॉइंटची संकल्पना (Tipping Point)
दुसरी कथा वॅटसनच्या शंभर माकडांच्या अनुकरणाच्या वर्तनाबाबतच्या प्रयोगाची. एका बेटावरच्या माकडांच्या टोळीतल्या काही जणांना बटाटे धुऊन खायची सवय लावली जाते. ही सवय सुरुवातीला खूप हळूहळू पसरते. मात्र शंभरावं माकड जेव्हा बटाटे धुऊन खायला लागतं त्यानंतर मात्र जवळजवळ सगळीच माकडं बटाटे धुऊन खाऊ लागतात. यालाच टििपग पॉइंट फिनोमिनाही म्हणतात. एका टप्प्यापर्यंत गोष्टी हळूहळू घडतात, घडवाव्या लागतात, पण ती मर्यादा एकदा गाठल्यानंतर मात्र गोष्टी विलक्षण वेगानं पसरतात.
स्वच्छतेसारखी चांगली गोष्ट नागरिक हळूहळू स्वीकारतील आणि तिची सवय अंगवळणी पाडून घेतील, हा विश्वास सुरुवातीच्या अनंत अडचणींच्या काळात टीमनं एकमेकांच्या मदतीनं जागा ठेवला..    
(प्रकल्पानं दिलेल्या आणखी इनसाइटस्, सहभागाची जादू आणि प्रयोगशीलतेचं महत्त्व सांगणारा उत्तरार्ध पुढील सोमवारी)