बुद्धिमापन चाचणी विषयाची तयारी Print

संजय मोरे ,सोमवार, ८ ऑक्टोबर  २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

जवळपास सर्वच स्पर्धा परीक्षांमध्ये बुद्धिमापन चाचणी हा अनिवार्य आणि महत्त्वाचा असा  विषय आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत होणाऱ्या परीक्षांमध्ये एकूण २०० गुणांपैकी ५० गुण बुद्धिमापन चाचणी या विषयासाठी, बँकेतर्फे होणाऱ्या परीक्षांकरिता २०० पैकी ५० प्रश्न हे बुद्धिमापन चाचणी या विषयासाठी तर राज्य सेवा (पूर्व) परीक्षेमध्ये (महाराष्ट्र लोकसेवा आयोग) २०० प्रश्नांपैकी ५० प्रश्न बुद्धिमापन चाचणी या विषयाचे असतात. म्हणजेच जवळपास सर्वच परीक्षांमध्ये २५ टक्के भाग हा बुद्धिमापन चाचणीचा असतो. यामुळे आपण सरकारी नोकरी आणि त्यातील वेगवेगळी अधिकारपदे मिळविण्यासाठी बुद्धिमापन चाचणी हा विषय बरीच मोठी भूमिका बजावत असतो.
ही चाचणी म्हणजे उमेदवाराची बुद्धिमत्ता तपासणे होय. प्रशासकीय सेवेत प्राप्त परिस्थिती समजून घेऊन अचूक व जलद निर्णय घेऊ शकणाऱ्या अधिकाऱ्यांची सातत्याने गरज असते. या उद्देशानेच हा घटक जवळपास सर्व स्पर्धा परीक्षांत अनिवार्य असा घटक आहे. बुद्धिमत्ता म्हणजे सुसूत्र पद्धतीने विचार करणे, बुद्धिमत्ता म्हणजे जीवनातील प्रश्न सोडविण्याची क्षमता, असे बरेच बुद्धिमापन चाचणी या घटकावर सांगता येत असल्यानेच या घटकाला ठरावीक असा अभ्यासक्रम नाही. मात्र, गेल्या काही वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे सूक्ष्म अवलोकन केल्यास आपणास या विषयाचा या परीक्षेसाठीचा निश्चित असा अभ्यासक्रम सांगता येईल. तरीसुद्धा ५० प्रश्नांमध्ये ५० प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. ते प्रकार कोणते, ते या लेखात पाहू.
संख्यामालिका (८ ते १० गुण) : या विभागात दिलेली मालिका पूर्ण करणे, मालिकेचे सूत्र ओळखणे, कंसातील संख्या शोधणे, आकृती रचनेतील रिकाम्या जागी योग्य संख्या पर्यायातून निवडणे, अंक व चिन्ह यांची मालिका पूर्ण करणे, अंकांच्या लयबद्ध रचनेतील गाळलेल्या जागी योग्य अंकांची निवड पर्यायातून करणे, अंकमालिकेवर आधारित प्रश्न, अंक व वर्ण यांची मिश्रमालिका यांचा समावेश केलेला असतो.
वर्णमालिका (५ ते ७ गुण) : या घटकात दिलेली वर्णमालिका पूर्ण करणे, अक्षरांची लयबद्ध रचना, आकृतीतील गाळलेल्या जागी योग्य वर्ण पर्यायातून निवडणे, विशिष्ट प्रकारच्या मांडणीतील एखादे अक्षर गाळलेले असताना ते पर्यायातून निवडणे, एक वर्णाची मालिका, दोन वर्णाची मालिका, तीन वर्णाची मालिका, चार वर्णाची मालिका, पाच वर्णाची मालिका, वर्णमालेच्या उलट रचनेवर आधारित प्रश्न, वर्णमाला दिलेली असताना त्यावर आधारित प्रश्नांचा समावेश केलेला असतो.
सांकेतिक भाषा (९ ते १२ गुण) : या घटकात वर्ण, अंक व चिन्ह यांचा संबंध जोडून सांकेतिक भाषा तयार केलेली असते. त्यावर आधारित प्रश्न विचारले जातात. यात अंक-अंक संबंध, अंक-वर्ण संबंध, वर्ण-वर्ण संबंध, वर्ण-अंक संबंध, अंक-चिन्ह संबंध, वर्ण-चिन्ह संबंध अशा प्रकारच्या प्रश्नांचा समावेश केलेला असतो.
समान संबंध (४ ते ६ गुण) : दोन घटकांतील समान संबंधांवर आधारित उर्वरित घटकातील संबंध शोधावयाचा असतो. यात अंक, वर्ण, स्थान, पदार्थ, वस्तू व व्यक्ती यांच्या जोडय़ांतील विशिष्ट संबंध शोधण्यावरील प्रश्नांचा समावेश असतो. यात वर्ण-वर्ण, वर्ण-अंक, वर्णअंक-वर्ण, राज्य-राजधानी, देश-राजधानी,
देश-चलन, खेळ-खेळाडू, देश-ध्वज, माप-मापक,
शोध-संशोधक संबंध अशा प्रकारच्या प्रश्नांचा समावेश केलेला असतो.
विसंगत घटक (४ ते ६ गुण) : यात दिलेल्या घटकातील वेगळा घटक शोधायचा असतो. यात अंक, वर्ण, भाषा व चिन्ह यांचा समावेश असतो.
इतर घटक (१२ ते १५ गुण) : या विभागाला इतर घटक असे आपण समजू. त्याचे कारणदेखील तसेच आहे, ते म्हणजे वरील पाच घटक हे मुख्य घटक असून त्याव्यतिरिक्त येणारे घटक म्हणजे इतर घटक होय.
इतर घटक या भागात दिशाविषयक प्रश्न, नातेसंबंध, वेन-आकृत्या, विधाने-अनुमान, कालमापन, बैठक
व रांगेतील प्रश्न, तुलनात्मक प्रश्न, घटनांचा-वस्तूंचा
योग्य क्रम लावणे, आकृत्यांची संख्या मोजणे, गणितावर आधारित प्रश्न, चिन्हांची अदलाबदल करून येणाऱ्या रचनेवर आधारित प्रश्नांचा समावेश केलेला असतो.
अशा प्रकारचा या घटकाचा अभ्यासक्रम असून सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे वेळ. या घटकातील प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांना येत नाहीत असे नाही; परंतु कमी पडतो तो वेळ. म्हणूनच या घटकासाठी वेळेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. यावर सर्वात चांगला उपाय म्हणजे या बुद्धिमापन चाचणी घटकाच्या अभ्यासक्रमाचे तंत्र व त्यातील शॉर्टकट्स.
या अभ्यासक्रमाची पूर्वतयारी करताना :
१)     आपणास १ ते ३० पर्यंतचे वर्ग व १ ते २० पर्यंतचे घन लक्षात असणे आवश्यक आहे.
२)     बुद्धिमापन चाचणी घटकाचा सराव करताना रोज ५० प्रश्न  सोडवा व तेही ३५ ते ४० मिनिटांत. त्याचप्रमाणे दररोज एक तास तरी बुद्धिमापन चाचणी या विषयाचा सराव करावा.
३)     बुद्धिमापन चाचणी या घटकातील प्रश्न कठीण नसतात; वेळखाऊ असतात. वेळ वाचविण्यासाठी गरज आहे, ती वेगाची व वेग वाढविण्यास गरज आहे ती सरावाची.
४)    सराव करताना प्रथम अचूकता साधा आणि मग वेग वाढविण्यावर भर द्या.
५)     मागील प्रश्नपत्रिकांचे अवलोकन करून अभ्यासाची दिशा ठरवा. तर मग लागा अभ्यासाला.