प्रोजेक्ट फंडा : जमाना ‘जंक फूड’चा Print

हेमंत लागवणकर ,सोमवार, ८ ऑक्टोबर  २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

स ध्याचा जमाना हा जसा माहिती तंत्रज्ञानाचा आहे, तसा तो ‘जंक फूड’चा आहे, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. वडापाव, भजी, सामोसे, बर्गर, नुडल्स, पिझ्झा, वेगवेगळ्या प्रकारचे वेफर्स हे आजच्या पिढीमध्ये विशेष प्रसिद्ध झालेले पदार्थ आहेत. शहरांमधल्या धावपळीच्या जीवनात हे पदार्थ ‘फास्ट फूड’ म्हणूनही प्रसिद्ध आहेत. चमचमीत चव असलेल्या आणि सहज उपलब्ध होणाऱ्या या पदार्थाना मोठी मागणी असल्याचं आढळतं.
‘जंक’ या शब्दाचा अर्थ ‘नको असलेला’ किंवा ‘निरुपयोगी’. ‘जंक फूड’ म्हणजे असे अन्नपदार्थ की जे कमी प्रमाणात खाऊनसुद्धा काहीच पोषण नसलेल्या एम्प्टी कॅलरी तुलनेने मोठय़ा प्रमाणात मिळतात. या पदार्थामध्ये मीठ, शर्करा, कबरेदके आणि मेद या घटकांचा समावेश आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात असतो.
गंमत म्हणून एखादेवेळा असे पदार्थ खाल्ले तर हरकत नाही. पण, अनेकदा रोजच्या आहारात याच प्रकारच्या अन्नपदार्थाचा समावेश असल्याचं आढळतं. वारंवार जंक फूड खाल्ल्याने लहान मुलांच्या एकाग्रतेवर विपरीत परिणाम होत असल्याचं आढळून आलं आहे. वाढत्या वयात जंक फूडचं मोठय़ा प्रमाणावर सेवन केल्यास अतिरिक्त कॅलरी शरीरात जाऊन चरबी साठवणाऱ्या पेशींमध्ये वाढ होते आणि परिणामी, लठ्ठपणा वाढायला लागतो. साहजिकच, उच्च रक्तदाब, मधुमेह, कॉलेस्टेरॉल वाढणं यासारख्या समस्यांना सामोरं जावं लागतं.
निकृष्ट दर्जाच्या जंक फूडमुळे शरीरावर अपायकारक परिणाम तर होतातच; पण वारंवार अशा प्रकारचा आहार घेतल्याने बुद्धयांकसुद्धा काही प्रमाणात कमी होत असल्याची
भीती ऑस्ट्रेलियातल्या अ‍ॅडलेड विद्यापीठातल्या शास्त्रज्ञांनी
व्यक्त केली आहे.
अनेकदा या जंक फूडचे शरीरावर होणारे विपरीत परिणाम माहिती असूनही हे पदार्थ खायचं पूर्णपणे टाळणं अवघड होतं. यामागचं प्रमुख कारण म्हणजे आपली बदललेली जीवनशैली. आपल्या रोजच्या धकाधकीच्या रूटीनमध्ये अनेक अवधानं सांभाळायची असतात. साहजिकच, वेळ वाचवण्याकडे आपला कल असतो. कमीत कमी वेळ खर्च करून जास्तीत जास्त गोष्टी करण्याचा आपला प्रयत्न असतो. या प्रयत्नामध्ये एखादा पदार्थ तयार करून खाण्याऐवजी वडापाव, बर्गर, पॅटीस यांसारखे पदार्थ पटकन विकत घेऊन खाल्ले जातात. त्यामुळे पदार्थ करण्यासाठी लागणारा वेळ आणि त्यासाठी लागणारे कष्ट दोन्ही वाचल्याचं आपल्याला समाधान मिळतं. पण त्याच वेळी अशा पदार्थाची हळूहळू शरीराला चक्क चटक लागते. असे चमचमीत पदार्थ खायला मिळाले नाहीत तर अस्वस्थ वाटायला लागते.
जंक फूड प्रकारातले कोणकोणते पदार्थ किती प्रमाणात आपण खातो, याचं सर्वेक्षण करण्याची गरज आहे. त्यासाठी ‘जंक फूड’ प्रकारातले कोणकोणते पदार्थ तुम्ही खाता याची यादी तयार करा. हे पदार्थ आठवडय़ातून किंवा महिन्यातून किती वेळा आणि किती प्रमाणात खाल्ले जातात, याचीही नोंद ठेवा. सर्वसाधारणपणे हे पदार्थ भुकेच्या वेळी म्हणजे जेवणाच्या वेळेदरम्यान खाल्ले जातात की दुपारच्या किंवा संध्याकाळच्या वेळेत खाल्ले जातात, याचं निरीक्षण करा.

जंक फूड खाणं खरोखरच आवश्यक होतं का? हे पदार्थ त्या वेळी खाण्याशिवाय तुमच्यासमोर पर्याय नव्हता का? मित्रमैत्रिणींच्या आग्रहावरून हे पदार्थ एखाद्या वेळी तुम्ही खाल्लेत का? जंक फूड खाण्यामागच्या अशा वेगवेगळ्या कारणांची नोंद करा.
एका आठवडय़ाच्या किंवा महिन्याच्या संकलित केलेल्या माहितीचं विश्लेषण करताना ‘जंक फूड’ खाणं खरोखरच आवश्यक किती वेळा होतं आणि हे पदार्थ खाणं सहज टाळता आलं असतं, असं किती वेळा आढळलं याचा वेध घ्या.
सर्वेक्षण केलेल्या कालावधीदरम्यान सेवन केलेले जंक फूड अणि पारंपरिक किंवा घरी तयार केलेले अन्नपदार्थ यांची तुलना करा.
या सर्वेक्षणादरम्यान तुमच्या तब्येतीबद्दलची निरीक्षणेसुद्धा नोंदवा. तब्येतीमध्ये काही विपरीत बदल आढळून आल्यास त्याच संबंध ‘जंक फूड’ खाण्याशी आहे का, हे तपासा.
वैयक्तिक स्तरावर किंवा आपल्या घरामध्ये ज्याप्रमाणे हा प्रकल्प राबविता येईल, त्याचप्रमाणे शाळेतसुद्धा अशाच प्रकारच्या प्रकल्प राबवणे शक्य आहे. त्यासाठी शाळेमध्ये मुलं रोज जो डबा आणणात, त्याचं सर्वेक्षण यादृष्टीने करता येईल. त्यासाठी सलग आठ दिवस किंवा १५ दिवसांचा कालावधी ठरवून घ्या. प्रत्येक विद्यार्थी दररोज डब्यामध्ये कोणते पदार्थ आणतो, याची नोंद करा. त्याचबरोबर या पदार्थाचे अंदाजे प्रमाण किती आहे, याचीही नोंद ठेवा.
एखादा विद्यार्थी डब्यामध्ये वारंवार ‘जंक फूड’ आणत असेल तर त्यामागे काय कारण आहे, याची विचारणा करा. अशा विद्यार्थ्यांच्या एकाग्रतेमध्ये, शिकण्याच्या क्षमतांमध्ये, आपल्याला मिळालेले ज्ञान व्यक्त करण्यामध्ये इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत काही विशिष्ट फरक जाणवतात का, याचा वेध घ्या.
अनेकदा प्रतिष्ठा, संपन्नता आणि आधुनिकतेच्या नावाखाली मोठय़ा प्रमाणात सेवन केल्या जाणाऱ्या जंक फूडबद्दल जनजागृतीसाठी अशा प्रकारचे प्रकल्प उपयुक्त ठरावेत.