वैद्यकीय तंत्रज्ञानातील बहुविध पर्याय Print

गीता कॅस्टेलिनो ,सोमवार, ८ ऑक्टोबर  २०१२
(अनुवाद - सुचित्रा प्रभुणे)
alt

वैद्यकीय तंत्रज्ञानाशी निगडित करिअरचे बहुविध पर्याय आज उपलब्ध आहेत. लॅबोरटरी, रेडिओलॉजीसारख्या करिअरना आज देश-विदेशात मोठी मागणी आहेत. या क्षेत्राचा विस्तार, त्यातील संधी याविषयी..
एखाद्या रोगाचे नेमके निदान करून त्यावर आवश्यक ती उपाययोजना करण्यासाठी अलीकडच्या काळात प्रयोगशालेय चाचण्या (लॅबॉरेटरी टेस्ट) करण्याशिवाय पर्याय नसतो. या प्रयोगशालेय चाचण्यांसंदर्भात काम करणाऱ्या तज्ज्ञांना क्लिनीकल लॅबोरेटरी तंत्रज्ञ असे म्हटले जाते. ही मंडळी व्यावसायिकदृष्टय़ा अत्यंत कुशल असतात. प्रयोगशालेय चाचण्या उदा. रक्त, पेशी आणि फ्लुईडस्सारख्या शारीरिक घटकांची तपासणी करण्यासाठी मायक्रोस्कोप, कॉम्प्युटर, रसायने आणि विविध प्रयोगशालेय उपकरणांचा वापर करून त्यामार्फत आजाराचे योग्य ते निदान करण्यात ही मंडळी निष्णात असतात. त्यामुळेच रुग्णाच्या आजाराचे नेमकेपणाने निदान करण्यासाठी या मंडळींचे योगदान महत्त्वाचे असते. कारण रुग्णाच्या आजारांचे निदान करण्यासाठी पॅथोलॉजीशिवाय पर्याय नसतो. अशा वेळी निदान करण्यासाठी गरजेनुसार रुग्णाच्या त्या त्या घटकांचे नमुने गोळा करणे, त्यांची आवश्यक ती चाचणी करून मग त्याचे योग्य पद्धतीने विश्लेषण करून तपासणी अहवाल तयार करणे यासारखी कामे या वैद्यकीय तंत्रज्ञांना करावी लागतात. त्यांच्या या चाचणीवरूनच कर्करोग, हृदयविकार, मधुमेह आणि अशा स्वरूपाच्या अनेक विकारांचे निदान करता येते.
या तज्ज्ञ मंडळींच्या कामाचे नेमकेपणाने वर्णन करायचे झाले तर असे म्हणता येईल की, हे असतात पडद्यामागचे खरे कलाकार. कारण यांच्या सहकार्यामुळेच डॉक्टरांना रुग्णांचे नेमकेपणाने निदान करून त्यासाठी आवश्यक ती उपचारपद्धती राबविता येते. इतकेच नाही तर आपल्या शरीरात हवा, धूळ आणि पाण्यामार्फत सुक्ष्म स्वरूपाचे जावाणू प्रवेश करीत असतात. परिणामी वेगवेगळे विकार निर्माण होण्यास सुरुवात होते. पण अलीकडच्या प्रगत तंत्रामुळे हे जीवाणू आणि त्यामुळे फैलाविणाऱ्या विकारांचीदेखील माहिती मिळते. थोडक्यात काय तर, जितके प्रगत तंत्रज्ञान तितकी रुग्णांची शारीरिक स्थिती अधिक स्पष्टपणे दिसून येते. त्यामुळेच नेमके निदान करणे सहज सोपे होते.  
या प्रयोगशालेय चाचण्यांमध्ये प्रामुख्याने पाच विविध क्षेत्रांचा समावेश होतो. जसे रक्तपेढी, क्लिनीकल केमिस्ट्री, हिमॅटोलॉजी, इम्युनोलॉजी आणि मायक्रोबायोलॉजी. अशा या विविध क्षेत्रांत वैद्यकीय तंत्रज्ञान तज्ज्ञांना आपले करिअर करता येते. याशिवाय सायटोटेक्नॉलॉजी ( ज्यात मानवी ऊतींचा प्रामुख्याने अभ्यास केला जातो ), युरिनॅलिसिस, पॅरासाइटलॉजी, सीरिऑलॉजी आणि कोअ‍ॅग्युलेशन हीदेखील अलीकडच्या काळात विकसित झालेली काही क्षेत्रे आहेत. या विविध क्षेत्रातील विकसित तंत्राव्दारे अनेक गुंतागुंतीच्या चाचण्या सहजपणे करता येतात, जसे मायक्रोस्कोपच्या साहाय्याने ऊतींचे निरीक्षण करणे, रक्त किंवा शरीरात असणाऱ्या फ्लुइडस्चे सूक्ष्म निरीक्षण करून त्यामध्ये जीवाणूंचा, इतर रोग फैलाविणाऱ्या जंतूंचा आदींचा फैलाव झाला आहे की नाही, हे पाहता येते. त्याशिवाय काही रासायनिक स्वरूपाच्या चाचण्यांव्दारे शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी अभ्यासिता येते. त्याचबरोबर एखाद्या औषधोपचार पद्धतीला रुग्ण कसा काय प्रतिसाद देतोय हेदेखील रक्ताची विशिष्ट स्वरूपाची चाचणी करून समजू शकते. त्यामुळेच या तज्ज्ञांना त्यांच्या चाचण्या या एकदम काळजीपूर्वक व अचूकतेने कराव्या लागतात आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या तंत्रज्ञान तज्ज्ञांजवळ स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यासाठी पुरेसे आíथक बळ असले तरीही उत्तम उपकरणे आणि स्वच्छ व आरोग्यदायी वातावरण या दोन गोष्टी व्यवसाय भरभराटीच्या दृष्टीने आवश्यक ठरतात.   
संशोधन कसे करायचे, त्याच्या पद्धती कोणकोणत्या आहेत, त्याचे टप्पे कोणते आणि हे सारे करताना ठराविक वेळेत अंतिम निष्कर्षांपर्यंत कसे अचूकतेने पोहचू शकतो, या सर्व बाबी वैद्यकीय तंत्रज्ञान तज्ज्ञ म्हणून वावरताना लक्षात घ्याव्या लागतात. या कामात अंतिम निष्कर्षांपर्यंत पोहोचताना अनेक तांत्रिक तसेच वैज्ञानिक बाबींचा नेमकेपणाने विचार करावा लागतो. त्याचबरोबर प्रयोगशालेय उपकरणे नीट हाताळता आली पाहिजे आणि कॉम्प्युटरचेदेखील उत्तम ज्ञान जोडीला आवश्यक आहे. वैद्यकीय चाचण्यांचे काम वरकरणी सोपे वाटत असले तरीही ते तितकेच कठीण आणि वेळखाऊ प्रक्रिया असलेले आहे. चाचणी केली आणि रुग्णांच्या निदानांचा लगेचच नेमका निष्कर्ष आला, असे सहसा होत नाही. यामुळे नेमके निदान करण्यासाठी तज्ज्ञांना सर्व चाचण्यांचे निष्कर्ष समोर ठेवावे लागतात. यात थोडीशी जरी गफलत झाली तरी ते रुग्णाला उपचारांच्या दृष्टीने त्रासदायक ठरू शकते. त्यामुळेच निदानाचा निष्कर्ष हा नेहमीच काळजीपूर्वक रीतीने काढावा लागतो. शिवाय या चाचण्यांचे नमुने घेत असताना वैद्यकीय तज्ज्ञांनादेखील स्वत:च्या आरोग्याची आवश्यक ती काळजी घ्यावी लागते. जेणेकरून त्यांनाही या चाचण्यांमार्फत कोणत्याही स्वरूपाचा जंतुसंसर्ग होणार नाही अथवा एखादे गंभीर स्वरूपाचे रसायन हाताळताना स्वत:ला कोणती इजा होणार नाही हे पाहणे आवश्यक ठरते.   
सरकारी किंवा खासगी स्वरूपाची रुग्णालये, वैद्यकीय अत्यावश्यक सुविधा पुरविणारी केंद्रे, खासगी प्रयोगशाळा (लॅब), रक्तपेढी किंवा डॉक्टरांच्या क्लिनीक्समध्ये अशा अनेक ठिकाणी वैद्यकीय तंत्रज्ञान तज्ज्ञांना कामाच्या अनेक संधी उपलब्ध असतात. या तज्ज्ञांना अत्याधुनिक तंत्रज्ञानासह उपकरण हाताळण्याचे योग्य ते ज्ञान असल्यास ते प्रयोगशालेय व्यवस्थापक किंवा कन्सल्टंट म्हणून अथवा आरोग्य केद्रांच्या व्यवस्थापन विभागात पर्यवेक्षक म्हणून काम करूशकतात. वैद्यकीय महाविद्यालयात किंवा वैद्यकीय व्यावसायिक शिक्षणाचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांमध्ये अध्यापनाच्या दृष्टीनेदेखील अनेक संधी त्यांच्यासाठी उपलब्ध असतात.      
रेडिओग्राफी : वैद्यकीय तंत्रज्ञान क्षेत्रातील रेडिओग्राफी हे अत्यंत महत्त्वाचे असे क्षेत्र आहे. याद्वारे गंभीर आणि महत्त्वपूर्ण अशा रोगांचे निदान शक्य होते. जसे कर्करोग, टय़ुमर आणि अल्सरसारख्या रोगांचे नेमकेपणाने निदान शक्य होते. त्या त्या रोगांची अवस्था म्हणजे तो रोग नेमक्या पहिल्या, दुसऱ्या वा अंतिम अशा कोणत्या टप्प्यात आहे, ते समजल्यामुळे, त्यानुसार उपचारपद्धतीला सुरुवात करता येते. अलीकडे हे तंत्रज्ञान आणखी प्रगत झाल्यामुळे त्याव्दारे मानवी शरीरांतर्गत विविध अवयवांचे जसे हृदय, मेंदू, पचन संस्था आणि इतर अन्य अवयवांचेही निरीक्षण करता येते.
या रेडिओग्राफी तंत्रज्ञानात एक्स-रे, फ्लुरोस्कोपी, अल्ट्रासाऊंड, सीटीस्कॅन, एमआरआय, अ‍ॅन्जिओग्राफी अशा विविध तंत्राचा समावेश होत असतो. यामुळे त्या त्या अवयवाची अंतर्गत रचना योग्य रीतीने दिसून येते. त्यामुळे रुग्णाला आजार नेमका कशामुळे झाला आहे ते समजते आणि त्यानुसार आवश्यक ती उपचारपद्धत डॉक्टरांना सुरू करता येते. या क्षेत्रात प्रामुख्याने दोन प्रकारच्या करिअरच्या संधी उपलब्ध आहेत. त्यापकी एक म्हणजे डायग्नोस्टीक रेडिओग्राफी आणि दुसरी म्हणजे थेरपीअ‍ॅटीक रेडिओग्राफी. काळानुसार या तंत्रज्ञानात बऱ्याच वेगाने बदल घडून येत असतात. त्यामुळे हे तंत्र अवगत असणाऱ्या तज्ज्ञांची मोठय़ा प्रमाणावर गरज भासत असते.   
आता या दोन्ही क्षेत्रांतील नेमका फरक काय ते समजून घेऊ या. डायग्नोस्टीक रेडिओग्राफर तज्ज्ञ हे रुग्णालयाच्या अथवा प्रत्यक्ष रेडिओलॉजी केंद्रात काम करीत असतात. प्रत्यक्ष शस्त्रक्रिया सुरू असतानादेखील त्यांची गरज भासत असते. म्हणजे कधी कधी शस्त्रक्रिया सुरू असताना अमुक एका अवयवाच्या स्थितीचा उदा. हृदयाची स्थिती जाणून घेणे महत्त्वाचे असते. अशा वेळी ही तज्ज्ञमंडळी आपापल्या उपकरणांसह तिथे हजर असल्यामुळे त्या त्या अवयवांचा नेमकेपणाने अंदाज घेऊन डॉक्टरांनादेखील शस्त्रक्रियेचा पुढचा अंदाज घेऊन त्यानुसार कृती करणे सहजशक्य होते.
सर्वसाधारणपणे रुग्णालयाच्या रेडिओलॉजी विभागात अल्ट्रासाऊंड, एक्स- रे अशा हर तऱ्हेच्या गोष्टींचा समावेश केलेला असतो. त्यामुळे रुग्णालयाच्या वेगवेगळ्या विभागांना आवश्यक ती सेवा पुरविण्याचे काम डायग्नोस्टीक रेडिओग्राफर करीत असतात. यात एक्स- रे पासून सीटीस्कॅनपर्यंतच्या हर चाचण्यांचा समावेश असतो.
तर थेरपीअ‍ॅटिक रेडिओग्राफरचे काम डॉक्टर, फिजीशियन, नर्स किंवा कर्करोग रुग्णांना सहाय्य करणाऱ्या ऑन्कोलॉजी सारख्या टीमबरोबर साहाय्यक म्हणून काम करण्याची जबाबदारी यांच्यावर असते. रुग्णांना आयोनायजिंग रेडिएशन ( जे हाय एनर्जी एक्स- रे म्हणून ओळखले जातात ) देण्याची महत्त्वाची जबाबदारी थेरपीअ‍ॅटीक रेडिओग्राफर पार पाडत असतात. कर्करोग किंवा टय़ुमरसारख्या केसेसमध्ये रुग्णांच्या शरीरात किरणोत्सारांचा आवश्यक तो डोस पोहचावा. जेणेकरून शरीरभर पसरणाऱ्या गाठीयुक्त पेशींच्या वाढीवर नियंत्रण ठेवता येईल,  हा या रेडिएशन उपचारपद्धतीमागचा मुख्य उद्देश असतो. त्यामुळे बऱ्याचदा कर्करोगग्रस्त रुग्णांची उपचारपद्धती ठरविण्यासाठी जसे कोणती उपचारपद्धती, तिची प्रक्रिया, त्याचे नियोजन, उपचारानंतर होणारे परिणाम आदीसाठी या तज्ज्ञ मंडळींचे सहकार्य घेतले जाते.  
बरेचदा असे दिसून येते की, रुग्णांना रेडिओलॉजी संदर्भात चाचणी करीत असताना मनावर एकप्रकारचा ताण जाणवत असतो. अशा वेळी रुग्णाची भावनिक आणि शारीरिक गरज लक्षात घेऊन रेडिओग्राफरने आवश्यक तो दिलासा देत रुग्णास सहकार्य करावे. यामुळे चाचणी परीक्षणाची प्रक्रिया दोघांच्याही दृष्टीने सहज सुलभ होईल. दुसरे असे की रेडिओग्राफर्सचे  काम हे तांत्रिक स्वरूपाचे असते, त्यामुळे ज्यावर काम करावयाचे आहे ती उपकरणे रेडिओग्राफरला योग्य तऱ्हेने हाताळता आली पाहिजे. त्याचबरोबर मानवी शरीराची ओळख, त्यांचे कार्य वैद्यकशास्त्राच्या दृष्टीने असलेले त्यांचे महत्त्व, त्या त्या अवयवांचा मानवी आरोग्यावर होणारा परिणाम इ.विषयी आवश्यक ती माहिती त्यांना असावी. तसेच रुग्णासाठी चाचणी परीक्षण करताना रेडिओग्राफरने नेमका दृष्टिकोन समोर ठेवून त्यानुसार सविस्तर चाचणी परीक्षण करावे.  
वैद्यकशास्त्रात रेडिओग्राफर्सचे असलेले महत्त्व लक्षात घेता, त्यांना देशात आणि परदेशात करिअरच्या दृष्टीने अनेक उत्तम संधी उपलब्ध असतात. जसजसे तंत्रज्ञान प्रगती करीत आहेत, तसतशी अद्ययावत सेवासुविधांनी युक्त अशी आरोग्य केंद्रे निर्माण करणे ही काळाची गरज बनत चालली आहे. त्यामुळे दिवसेंदिवस अशी सुसज्ज रुग्णालये मोठय़ा प्रमाणावर निर्माण होताना दिसत आहेत. तर अनेक सरकारी रुग्णालयांतदेखील अद्ययावत सेवा पुरविण्याकडे कल असतो. त्यामुळेच रेडिओग्राफर्सना खासगी तसेच सरकारी रुग्णालये, डायग्नोसिस केंद्रे, सुपर स्पेशालीटी रुग्णालये अशा अनेक ठिकाणी वाव आहे. शिवाय तुमच्याकडे उत्तम आíथक पाठबळ असेल तर तुम्ही स्वत:चादेखील व्यवसाय सुरू क रू शकतात. या क्षेत्रातील जर तुम्ही उच्चशिक्षित ज्ञान घेतले असेल तर अध्ययन किंवा संशोधन क्षेत्रातदेखील तुम्ही उत्तमप्रकारे करिअर करू शकता. एकूणच भारतीय रेडिओग्राफर्सचा चांगला दर्जा लक्षात घेता त्यांना युरोप, अमेरिका आणि अरब देशांत चांगलीच मागणी असलेली दिसून येते.