कर्तव्यतत्पर कर्मचाऱ्यांचा आदर्श Print

दत्तात्रय आंबुलकर ,सोमवार, ८ ऑक्टोबर  २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

भारतीय कर्मचारी, त्यांची कार्यपद्धती  आणि  कर्तव्यनिष्ठा यांची जागतिक स्तरावर बहुविधप्रसंगी दखल घेतली जाते. अनेक प्रसंगी भारतीय कर्मचाऱ्यांनी बजावलेल्या कामगिरीचे कौतुकही केले जाते. विदेशातील अनेक व्यवस्थापनांनी प्रसंगानुरूप त्यापासून शिकवण घेतल्याची उदाहरणे आपल्यासमोर आहेत. या संदर्भात आणखी एक आदर्श उदाहरण म्हणून २६-११चा मुंबईवरील हल्ला आणि त्यावेळी ताज आणि ओबेरॉयच्या कर्मचाऱ्यांनी बजावलेल्या कामगिरीचा उल्लेख आवर्जून केला जातो.
२६ सप्टेंबर २००८ रोजी मुंबईवर अतिरेकी हल्ला झाला, तेव्हा मुंबईच्या ताज व ओबेरॉय या प्रतिष्ठित हॉटेल्सच्या कर्मचाऱ्यांनी दाखविलेले धैर्य, कर्तव्यनिष्ठा ही दाद देण्याजोगी होती. जीव पणाला लावून या कर्मचाऱ्यांनी आपल्या ग्राहकांचे केलेले रक्षण आणि केलेला अतिरेक्यांचा मुकाबला याची विशेष नोंद तर हॉर्वर्ड या जागतिक स्तरावरील सुप्रसिद्ध व्यवस्थापन संस्थेनेही घेतली आहे.
या संदर्भात हॉर्वर्ड बिझनेस स्कूलचे प्रा. रोहित देशपांडे यांनी विशेष अभ्यासपर संशोधन प्रकल्प सादर केला आहे. या अभ्यासप्रकल्पाचे शीर्षकच मुळी ‘टेरर अ‍ॅट ताज बॉम्बे- कस्टमर सेन्ट्रिक लीडरशिप’ असे आहे. दहशतवाद्यांच्या दहशतीच्या जीवघेण्या छायेतही ताज हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी दाखविलेली अतुलनीय निष्ठा व मुख्य म्हणजे ग्राहकांप्रती त्यांचे सर्वोच्च कर्तव्य या धैर्यगाथेचा समावेश आता हॉर्वर्ड व्यवस्थापन संस्थेच्या अभ्यासक्रमात अलीकडेच करण्यात आला आहे, हे विशेष.
alt
आपल्या अभ्यासविषयाच्या सुरुवातीलाच प्रा. देशपांडे यांनी ‘ताज’च्या कर्मचाऱ्यांचे धाडस व कर्तव्यनिष्ठा या उभयतांचे जाहीर कौतुक केले आहे. ‘ताज’चे कर्मचारी म्हणजे काही पोलीस अथवा सेनादलाचे जवान नव्हते. संबंधित हॉटेलमध्ये ते वर्षांनुवर्षे काम करीत असल्याने अशा संकटसमयी सुरक्षितपणे बाहेर जाण्याचे रस्ते त्यांना केवळ माहीतच होते असे नव्हे, तर त्याचा त्यांनी वेळोवेळी सरावसुद्धा केलेला असेल. मात्र असे असतानासुद्धा दहशतवाद्यांनी सर्वाना वेठीस धरले असताना कर्मचाऱ्यांनी दाखविलेले धैर्य आणि शौर्य कौतुकास्पद होते.  कामाबाबत भारतीयांमध्ये रुजलेली ‘अतिथी देवो भव’ ही परंपरा केवळ शिल्लक नसून ती आजही तेवढीच प्रज्वलित असल्याचा प्रत्यय या घटनेतून मिळाला आणि साऱ्या जगाला तो दिसला, असे प्रा. देशपांडे यांनी या प्रकल्प अहवालात नमूद केले आहे.
प्रा. देशपांडे यांच्या या अभ्यासात भारतीय कर्मचाऱ्यांच्या या कामगिरीची प्रेरणास्पद नोंद घेतली गेल्याने यानिमित्ताने हॉर्वर्डच्या माध्यमातून जगभरात या घटनेची नोंद निश्चितच घेतली जाईल. यापूर्वी भारतीय कर्मचारी-व्यवस्थापन आणि सामाजिक चळवळींच्या कामगिरीवर आधारित सुमारे ९० विशेष अभ्यास-संशोधन प्रकल्पांची नोंद हॉर्वर्डमध्ये घेण्यात आली आहे.
उदा. धारावीवरील संशोधन प्रकल्पाद्वारे आशिया खंडातील सर्वात मोठय़ा झोपडपट्टीचे पुनर्निर्माण : प्रयत्न आणि आर्थिक, सामाजिक व राजकीय परिणाम यासंबंधीची नोंद घेण्यात आली आहे.
मुंबईच्या डबेवाल्यांची जिद्द-चिकाटी, त्यांच्या कामाचे स्वरूप आणि त्यातील चोखपणा याची स्टीफन थॉके या हॉर्वर्ड विद्यापीठाच्या व्यापार प्रशासकीय विभागाच्या प्राध्यापकाला विशेष भुरळ घातली आहे. त्यांनी त्यांच्या ‘डबेवाला सिस्टीम : ऑन टाइम डिलिव्हरी- एव्हरी टाइम’ या अभ्यासात मुंबईच्या डबेवाल्यांची अचूक कार्यशैली, कार्यपद्धती, अचूक व दर्जेदार काम, माफक आर्थिक अपेक्षेसह हसतमुख सेवा व मुख्य म्हणजे वेळेत काम करण्याची सचोटी या गुणांची जागतिक स्तरावरील व्यवस्थापनतज्ज्ञांपुढे मुक्तकंठाने प्रशंसा केली आहे.
जागतिक व्यवस्थापन क्षेत्रातही आश्चर्य मानले गेलेले मुंबईचे डबेवाले दररोज मुंबईत दररोज केवळ सहा तासांत दोन लाख ६० हजार डब्यांची अचूक ने-आण सातत्याने व प्रसंगी वाहतुकीच्या संकटांवरही मात करून लाखो ग्राहक व त्यांच्या कुटुंबीयांचे आठवडी सहा दिवस, वर्षांतील ५१ आठवडे समाधान साधणारे जेमतेम शिक्षित डबेवाले हे हॉर्वर्ड बिझनेस स्कूलमधील अनेकांसाठी आजही अतक्र्य असे प्रेरणास्रोत ठरले आहेत ते उगाच नव्हे.
प्रा. स्टीफन थॉके यांच्या मते, मुंबईच्या डबेवाल्यांची संस्थाबांधणी ही त्यांच्या दृष्टीने फार महत्त्वाची ठरते. एखाद्या छोटेखानी ग्राहकोपयोगी व व्यापारिक उपक्रमाला सातत्यपूर्ण कामाद्वारे चिरस्थायी व दर्जेदार स्वरूप प्राप्त करून देणे व मुख्य म्हणजे अल्प मोबदल्यात लाखो ग्राहकांची सातत्याने व दर्जेदार सेवा करणे हे बहुराष्ट्रीय कंपन्यांतील व्यवस्थापन व व्यवस्थापकांसाठी अनुकरणीय ठरले असून त्याचा उल्लेख ते आपल्या सर्व प्रमुख भाषणात आजही करीत असतात.
जनसामान्यांच्या कार्यकर्तृत्वाच्या यशोगाथांनी हॉर्वर्डवाल्यांना नेहमीच भुरळ घातली असून या संदर्भात हॉर्वर्ड बिझनेस स्कूलने यापूर्वी स्टेट बँक ऑफ इंडिया, बंगळुरूचे नारायण हृदयालय हार्ट हॉस्पिटल इ. वरील यशोदायी संशोधनांचा समावेश केला आहे. हॉर्वर्ड बिझनेस स्कूलने जागतिक स्तरावरील भारत आणि भारतीयांशी संबंधित विविध व्यवस्थापनपर कल्पना आणि संकल्पनांचा अभ्यास करून त्यांचा आपल्या शैक्षणिक अभ्यासक्रम-उपक्रमांमध्ये समावेश करण्यासाठी मुंबई येथे जागतिक स्तरावरील प्रथमच उपकेंद्र सुरू केले असून या उपकेंद्रात ८२ विद्यार्थ्यांच्या विशेष अभ्यासक्रमाची सोय करण्यात आली आहे.
अशाच प्रकारच्या संशोधनपर अभ्यास-विषयांमध्ये समावेश करता येण्यासारखा विषय म्हणजे मुंबईतील महाराष्ट्राच्या मंत्रालयाला मोठी आग लागल्यानंतर तेथील काही कर्मचाऱ्यांनी दिलेल्या आपल्या अचाट साहस आणि कर्तव्यपूर्तीचा परिचय. आगीच्या ज्वाळांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे कार्यालय वेढले असता अनेकांनी जळत्या मंत्रालयाबाहेर जाण्याचा मार्ग चोखाळला असता मुख्यमंत्र्यांचे कार्यालयीन चोपदार तुकाराम मोरे यांनी महत्त्वाच्या कागदपत्रांना आगीपासून वाचविण्याचे महनीय काम करताना आपल्या प्राणांची दिलेली आहुती म्हणजे कामाप्रती निष्ठेचे अतुलनीय उदाहरणच ठरले असून आगग्रस्त मंत्रालयावरील राष्ट्रध्वजाला आगीच्या ज्वाळांची पर्वा न करता सन्मानपूर्वकरीत्या उतरवूनच मंत्रालयाच्या छतावरून आपत्कालीन मार्गाने उतरणाऱ्या मंत्रालयातील सहा कर्तव्यनिष्ठ कर्मचाऱ्यांनी शिवाजी महाराजांच्या काळातील ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या लढाऊ इतिहासाचाच प्रेरणादायी पुनप्र्रत्यय आणून दिला आहे.