नाशिकमधील अनोखी वाचक चळवळ Print

प्रशांत ननावरे ,सोमवार, ८ ऑक्टोबर  २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

ए का ठराविक काळानंतर निसर्गामध्ये बदल घडत असतात आणि हाच नियम माणसालाही लागू पडतो. त्याच्याही आयुष्यात स्थित्यंतरं येत असतात. कारण माणूसही निसर्गाचाच एक भाग आहे. निसर्गातील अगदी साधं आणि सर्वश्रुत उदाहरण म्हणजे सह्य़ाद्रीच्या पर्वतरांगांत आढळणाऱ्या ‘कारवी’ या वनस्पतीचे वेगळेपण. सात वर्षांतून एकदा फुलण्याच्या वैशिष्टय़ामुळे तिच्या फुलण्याकडे सर्वाचे लक्ष लागून असते. आपल्यातील अनेकजण नेहमीच नावीन्याच्या शोधात असतात. असेच एक दाम्पत्य म्हणजे मनीषा आणि अजित बर्जे. नाशिक रोडवर ‘कारवी रिसोर्स लायब्ररी’ चालवणारे हे दाम्पत्य विविध उपक्रमांच्या अनुभवातून व कारवीच्या माध्यमातून वाचन चळवळ व त्याचबरोबर पर्यावरणस्नेही जीवनशैलीचा दृष्टिकोन लोकांपर्यंत पोहोचवण्याचा मनापासून प्रयत्न करीत आहेत.                 
साधारण १८ र्वष मुद्रण क्षेत्रात काम केल्यानंतर त्यातून बाहेर पडताना निसर्ग व पुस्तकांशी संबंधित काहीतरी करायचे या विचाराव्यतिरिक्त ठोस अशी कुठलीच योजना अजित आणि मनीषा यांच्या नजरेसमोर नव्हती. त्यावेळी भारतात कृषी पर्यटनाचे बीज रोवणारे ‘सगुणाबाग’ प्रकल्पाचे शेखर भडसावळे यांनी मोठय़ा आपुलकीने अजित यांना त्यांच्या विविध उपक्रमांमध्ये सामावून घेतले. पुढे डोंबिवलीच्या अण्णासाहेब भुस्कुटे विचार मंचच्या ‘आरोहण’ मोहिमेअंतर्गत केलेल्या महाराष्ट्राच्या अभ्यासदौऱ्यात आनंदवन, हेमलकसा, शोधग्रामपासून देवरुखच्या मातृमंदिर, अहमदनगरच्या राळेगणसिद्धी या आधुनिक तीर्थस्थळांच्या भेटीतून एकप्रकारे समाजभान आले आणि त्यातूनच निसर्गप्रेम व पर्यावरण या विषयांवर प्रामुख्याने भर असलेले ‘कारवी’ रिसोर्स ग्रंथालय’ उभारण्याचे त्यांनी निश्चित केले.
आज तीन वर्षांनंतर ‘कारवी रिसोर्स लायब्ररी’चे २५० सभासद आहेत, त्यामध्ये तीन ते ८५ र्वष वयोगटातील वाचकांचा समावेश आहे. सात वर्षांतून एकदा फुलणाऱ्या कारवीचे वेगळेपण लायब्ररीत असावे म्हणूनच लायब्ररीचे नामकरणही ‘कारवी रिसोर्स लायब्ररी’ असे करण्यात आले. साधारणत: माणूस आणि निसर्ग असे वर्गीकरण करण्यात येते. मात्र झाडं, प्राणी, पक्षी यांच्या साथीने निसर्गावर आणि पर्यायाने पर्यावरणावर प्रभाव टाकणारा माणून हा देखील तितकाच महत्त्वाचा घटक आहे हे आपण विसरतो. त्याच्या इष्ट, अनिष्ट कृतीतून निसर्ग व्यवस्थेवर होणारा परिणाम असा व्यापक विचार ग्रंथालयाच्या माध्यमातून शिकणे व हाताळणे असा त्यांचा यामागचा दृष्टिकोन होता. याची सुरुवात ग्रंथालयाच्या उभारणीतूनच झाली. ग्रंथालयामधील वस्तूही मोठय़ा खुबीने तयार करण्यात आल्या आहेत. यामध्ये देवदार लाकडाचा पुनर्वापर करून कपाटे, कागदी लॅम्पशेड, केनचे फíनचर, बांबूचे पडदे तयार करण्यात आले आहेत.
alt
अगदी सुरुवातीपासूनच फक्त वाचण्यासाठी नव्हे तर ग्रंथालयाच्या माध्यमातून ‘माहितीपूर्ण’ पुस्तके उपलब्ध करून द्यायची,  हे त्यांनी निश्चित केले. त्यामुळे निसर्ग-पर्यावरणविषयक गाणी-गोष्टींपासून विश्वकोषाचे सर्व खंड त्यांच्या ग्रंथालयात आहेत. यातही मराठी व इंग्रजी वाङ्मयातील आशयघन पुस्तकांवर विशेष भर देण्यात आला आहे. पुस्तकांच्या साथीनेच अंतर्नाद, आंदोलन, छात्रप्रबोधन, साधना, ललित, गतिमान, संतुलन, आपलं पर्यावरण, Down to earth, Sanetury, Hornbill, National Geographic अशी सहसा वर्तमानपत्रांच्या स्टॉलवर न मिळणारी मासिकंही ग्रंथालयात येतात. आजचा जमाना हा रेडिमेडचा जमाना आहे, त्यामुळे शालेय प्रकल्प तयार करताना विद्यार्थी इंटरनेटवरून माहिती कॉपी-कट-पेस्ट करतात. याला छेद देण्यासाठी आणि विद्यार्थ्यांनी अधिकाधिक माहिती पुस्तकातून मिळवावी, यासाठी अधिकाधिक संदर्भग्रंथ या ग्रंथालयात उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ज्यामध्ये प्राणी, पक्षी, झाडं या विषयांबरोबरच कीटक, विश्वकोश, शंख-िशपले, गंधर्व संगीतकोश, भूगोल कोश, अवकाश, सागरी जीवन, खनिजं, पुरातन बांधकाम,  वन्य जीवन, महाराष्ट्रातील अभयारण्ये, वनस्पतीशास्त्र, प्राणिशास्त्र इ. अनेक विषयांचा समावेश आहे. याच्या वाचन व अभ्यासासाठी ग्रंथालयात पुरेशी जागा आहे. संदर्भवाचन सभासदांना मोफत आहेच, शिवाय सभासद नसलेल्या लोकांनाही त्याचा अल्प दरात लाभ घेता येतो.
अनेकदा माणसाचा कल विशिष्ट प्रकारची पुस्तके वाचण्याकडे असतो, पण त्यामुळे तो इतर विषयांतील महत्त्वाच्या आणि मनोरंजक माहितीला मुकतो. याच कारणास्तव लायब्ररीमध्ये पुस्तकांचं वर्गीकरण नाही. सर्व विषयांवरील पुस्तके एकत्र मांडण्यात आली आहेत. यामुळे पुस्तके चाळताना नवीन विषय लक्षात येतो आणि कधी कधी वाचकाला वेगळ्या विषयात वाचनाची गोडी निर्माण होते.
निसर्ग व पर्यावरण विषयातील आवड व जाणीव मुलांमध्ये जागृत व्हावी, यासाठी या विषयांवरील माहितीपट ग्रंथालयात दाखवले जातात. मराठी विज्ञान परिषद, केंद्र सरकारचे क्षेत्रीय प्रचार कार्यालय यांच्या जोडीने हे ग्रंथालय निसर्ग विज्ञानविषयक कार्यशाळा, जी. एम. बियाणांबद्दल विद्यार्थ्यांना माहिती, सौरऊर्जेवर व्याख्यानं, कार्यशाळा इत्यादी विविध उपक्रमांत सहभागी होत असते. ‘नेचर कॉन्झर्वेशन सोसायटी’च्या माध्यमातून शहरी व ग्रामीण भागांसाठी पत्रकं, पोस्टर्स, पुस्तकांची निर्मिती यातही ग्रंथालयाचा सहभाग असतो. गलोल वापरण्याचे दुष्परिणाम, ग्लोबल वॉìमगविषयी जनजागृती, पर्यावरण रक्षणाचे महत्त्व, स्थानिक पक्ष्यांची सूची, पुस्तकांचे प्रदर्शन इ. कार्यक्रमही राबवले जातात. ‘सेंटर फॉर एन्व्हायर्नमेंट एज्युकेशन’ मार्फत शालेय स्तरांवर चालवले जाणारे सृष्टी मित्र पुरस्कार, ग्रीन टीचर यासारख्या उपक्रमांची माहिती शाळांपर्यंत पोहोचवण्यात ग्रंथालय सहभागी होते.
पुस्तक विक्री हा या ग्रंथालयाचा मुख्य उद्देश नाही. मात्र विज्ञान प्रसार, नॅशनल बुक ट्रस्ट, ज्ञानप्रबोधिनी, उएए, उरए, उइळ, प्रथम बुक्स यासारख्या संस्थांच्या उत्तमोत्तम पुस्तकांची विक्री ग्रंथालयामार्फत केली जाते. ज्यामुळे आशयघन, जाहिरात होत नसलेली पुस्तके सर्वांपर्यंत पोहोचतात. भावी उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना व जिज्ञासूंना निसर्गातील विविध परिसंस्थांची माहिती प्रत्यक्ष स्थळांना भेटी देऊन करून देणे, या विषयांची लोकांमध्ये जागृती व्हावी यासाठी तज्ज्ञांची व्याख्याने आयोजित करणे, निसर्ग व पर्यावरण क्षेत्रात उपलब्ध असणाऱ्या व होऊ शकणाऱ्या शिक्षण व रोजगाराच्या संधींची माहिती विद्यार्थ्यांना करून देणे यावर असणार आहे. वाचनासोबत जीवनशैलीतून व अतिरेकी उपभोगातून पर्यावरणविषयक निर्माण होणाऱ्या समस्यांची जाण लोकांना करून देणे यावर काम करण्याचा मनीषा आणि अजित यांचा मानस आहे.
alt
ग्रंथालयाच्या उभारणीत पालक, मित्रमंडळी, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी यांचे मोलाचे मार्गदर्शन त्यांना मिळाले. अनेक ओळखीच्या व्यक्तींनी त्यांच्याकडची दुर्मिळ ग्रंथसंपदा ग्रंथालयाला दिली, तसेच पूर्णत: अनोळखी व्यक्तींनीदेखील बहुमोल ग्रंथ उदार अंत:करणाने दिले. शाळा व सभासदांचे प्रोत्साहनानेही या कार्यालयाला बळ मिळाल्याचे मनीषा आणि अजित कृतज्ञतापूर्वक सांगतात.
नवीन तंत्रज्ञानाची बलस्थानं ओळखून ग्रंथालयाची वेबसाइट www.carvibooks.com सुरू करण्यात आली आहे. नुकतीच त्यावर ग्रंथालयात असलेल्या मराठी व इंग्रजी पुस्तकांची सूची उपलब्ध करून दिली आहे. carvibooks.blogspot.com हा ब्लॉगही सुरू केला आहे. ज्याचा वापर निसर्ग, पर्यावरण व साहित्यविषयक लेख व माहितीसाठी करण्यात येणार आहे. विस्तारित शहराची गरज ओळखून घरपोच सेवेचा पर्यायही सभासदांसाठी ठेवला आहे. ज्याचा फायदा लांब राहणाऱ्या तसेच वयस्क वाचकांनाही घेता येतो.
बर्जे दाम्पत्याच्या या चळवळीला आता खऱ्या अर्थाने व्यापक स्वरूप प्राप्त होत आहे. दोनच महिन्यांपूर्वी ब्रिटिश काऊन्सिल लायब्ररीने, कारवी रिसोर्स लायब्ररीने नाशिक शहराचे प्रतिनिधित्व करावे म्हणून हातमिळवणी केली आहे. स्थापनेपासून अवघ्या तीन वर्षांत जगातील एका नावाजलेल्या लायब्ररीने ‘कारवी’च्या कामाची दखल घेतली यामध्येच त्यांचे वेगळेपण सामावलेले आहे. ब्रिटिश लायब्ररीच्या शाखा या काही मोठय़ा आणि मोजक्याच शहरांमध्ये आहे. असं असलं तरी त्यांच्या संग्रहामध्ये असलेली हजारो ई-बुक इतर छोटय़ा शहरांमधील गरजू व्यक्तींनाही उपलब्ध व्हावीत असा ब्रिटिश लायब्ररीचा मानस आहे. आता ‘कारवी रिसोर्स लाब्ररी’च्या माध्यमातून हे माहितीचे दालन नाशिककरांसाठी खुले झाले आहे. या लायब्ररीचे वार्षकि सभासदत्व फक्त अकराशे रुपये आहे. म्हणजे गणित मांडल्यास दिवसाला फक्त तीन रुपये. यामध्ये वाचकांना मानववंशशास्त्र, भाषा आणि साहित्य, वैद्यकशास्त्र, व्यवस्थापन आणि अर्थशास्त्र, कला, फिजिकल सायन्स, समाजशास्त्र, कॉम्प्युटर आणि आय.टी., इतिहास, लाइफ सायन्स, सायकॉलॉजी, तंत्रज्ञान याव्यतिरिक्त शेती आणि मिलिटरी सायन्ससारखी पुस्तके वाचायला मिळणार आहेत. संपूर्ण जगातील विविध संस्थांशी ब्रिटिश लायब्ररीने हातमिळवणी केली असल्याने तब्बल सत्तर हजार ई-बुक्स वाचण्यासाठी उपलब्ध आहेत. त्यामध्ये चौदा हजार ई-जरनल्स आणि फक्त लिखित माहिती असलेल्या सात हजार ई-जरनल्सचादेखील समावेश आहे. केवळ विद्यार्थ्यांनाच नव्हे तर पीएच.डी. करणाऱ्या शिक्षकांनाही अशा प्रकारची पुस्तके प्रकल्प तयार करण्यासाठी मोठय़ा प्रमाणात उपयोगात येत असतात. ब्रिटिश लायब्ररीचे सभासदत्व स्वीकारल्यानंतर कोणतेही संपूर्ण पुस्तक अथवा जरनल १४ दिवसांसाठी डाऊनलोड करता येते आणि ऑफलाइन वाचता येते. यातील तुम्हाला आवश्यक असणारी जास्तीत जास्त चाळीस पाने िपट्र तसेच कायमस्वरूपी साठवूनही ठेवता येतात. तसेच ही पुस्तके तुमच्या कॉम्प्युटरबरोबरच, आयपॅड, किंडल आणि स्मार्टफोनवरही वाचता येतात. पूर्वी शैक्षणिक पुस्तकांसाठी लायब्ररीचे सभासदत्व फक्त संस्थांना देण्यात यायचे त्यामुळे हा माहिचीचा खजिना असून नसल्यासारखा होता. पण आता वैयक्तिक सभासदत्व दिल्याने प्रत्येकाला स्वतंत्र लॉगईन आयडी आणि पासवर्ड देण्यात येतो. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला या लायब्ररीपर्यंत पोहोचता येते. एवढंच नव्हे तर ब्रिटिश लायब्ररीतर्फे वेळोवेळी आयोजित करण्यात येणाऱ्या वर्कशॉप, सेमिनार आणि व्याख्यानांनासुध्दा हजेरी लावता येणार आहे. त्यामध्ये इंग्रजी भाषेचे वर्गही आहेत. ज्यांना शक्य आहे, ते पुण्यात जाऊन ब्रिटिश लायब्ररीचा आस्वाद घेऊ शकतात. तसेच ऑनलाइन गोष्टींची माहिती न्यूजलेटर आणि ई-मेलद्वारे मिळत राहणार आहे. छोटय़ा शहरांमधील अनेकांना आजही ब्रिटिश लायब्ररीबद्दल ठाऊक नाही. पण आता निदान नाशिकसारख्या शहरात ‘कारवी’ रिसोर्स लायब्ररी’च्या माध्यमातून त्याची माहिती होईल आणि माहितीच्या महाजालापर्यंत पोहोचणे शक्य होणार आहे. याबाबत अधिक जागरुकता निर्माण करण्यासाठी अजित स्वत: महाविद्यालयांमध्ये जाऊन तेथील विभाग प्रमुख आणि विद्यार्थ्यांसमोर प्रेझेंटेशन करतात. कारवीच्या नावाशी आता ब्रिटिश लायब्ररी जोडली गेल्याने ही वाचन चळवळ अधिक व्यापक होण्यास मदत होणार आहे.      
अजित गेल्या काही वर्षांपासून नेचर कंसर्वेशन सोसायटी ऑफ नाशिकसाठीही काम करतात. सध्या ते बर्डस ऑफ नाशिक या पुस्तकाच्या तयारीतही व्यस्त आहेत. मनीषा या कॉमर्स ग्रॅज्युएट असून त्यांना फार पूर्वीपासून लहान मुलांची आवड आहे. म्हणून त्या जवळपास चार-पाच र्वष खेळघर म्हणून उपक्रम चालवायच्या. जिथे अभ्यासाव्यतिरिक्त खेळाला उत्तेजन दिलं जायचं. सध्या लायब्ररीच्या कामाबरोबरच त्या हुशार नव्हे तर ज्यांना खरंच गरज आहे अशा मुलांसाठी गणित आणि विज्ञान विषयाच्या शिकवण्याही घेतात. अजित आणि मनीषा दोघांचीही मानसिकता सारखी आहे, त्यामुळे त्यांनी पूर्वीपासूनच स्वत:च्या गरजा कमी ठेवल्या आहेत. मॉल किंवा मल्टिप्लेक्समध्ये जायला त्यांना आवडत नाही. पेपर वाचणं, टीव्ही पाहणं बंद केलं. दिवसातून फक्त एकदा संध्याकाळी बातम्या पाहतो. आठवडय़ातून फक्त शनिवार आणि रविवारी लोकसत्ता वर्तमानपत्र वाचतो, असं अजित आवर्जून सांगतात.
सद्य परिस्थितीत सभासद लायब्ररीमधील पुस्तके घरी घेऊन जातात अथवा तेथे बसून वाचण्याचा आनंद घेतात. मात्र नजीकच्या भविष्यात मुलांना लायब्ररीमध्ये बसूनच कॉम्प्युटरवर पुस्तके वाचता यावीत असा प्रयत्न असणार आहे. तसेच पर्यावरणाची माहिती देणारे माहितीपट स्वत: तयार करून त्यानिमित्ताने एखादा फिल्म क्लब सुरू करण्याचा त्यांचा विचार आहे. निसर्गाची माहिती आणि पर्यावरण हा विषय पुस्तकातून घेण्यापेक्षा प्रत्यक्ष निसर्गाच्या सान्निध्यात जाऊन मुलांना तो समजून देता येईल का, म्हणून त्या दृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत. एकंदरीत एका वेगळ्या प्रयोगाद्वारे मुलांना निसर्गाशी जोडण्याचा वसा बर्जे दाम्पत्याने घेतला असून गेल्या तीन वर्षांतल्या वाटचालीतून त्यांनी ज्या कारणास्तव यामध्ये उडी घेतली होती त्या ध्येयाकडे हळूहळू वाटचाल होताना दिसत आहे.           
वेबसाइट- www.carvibooks.com
ई-मेल- This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it