सहभागाची जादू Print

नीलिमा किराणे ,सोमवार, ८ ऑक्टोबर  २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

‘शून्य कचरा प्रभाग’ या कात्रजला गेल्या वर्षी राबवलेल्या प्रयोगाबाबत गेल्या आठवडय़ात प्रसिद्ध झालेल्या लेखाचा उत्तरार्ध- ज्या प्रयोगात नकळत व्यवस्थापनाची सारी तत्त्वे लागू झाली, त्याबाबत..
‘भानावर राहून योजना आखा आणि बेभान होऊन काम करा’ असं बाबा आमटे नेहमी म्हणायचे. कुठलंही काम करताना विचार आणि भावनांचा वापर कसा व्हावा ते हे तत्त्व फार नेमकेपणानं सांगत. शून्य कचरा प्रकल्पातही याचा अनुभव आला. कचऱ्यामध्ये प्रत्यक्ष हात घातल्यानंतर कचरा समस्या ही कचरा व्यवस्थापनाची समस्या आहे आणि ‘मिश्र कचरा’ हा तिचा गाभा आहे हे सत्य टीमला बुद्धीच्या पातळीवर पटलं. आपल्याला जे मनापासून पटलंय तिथे इतरांच्या सल्ल्यांनी निराश होऊन हार मानायची नाही. शेवटपर्यंत आणि १०० टक्के प्रयत्न करायचे यातून सुरुवातीचा काही काळ काम बेभानपणेच होत होतं. रोज सकाळी सहा वाजता झाडून सारी टीम साइटवर हजर असायची, मिश्र कचरा देण्यावरून नागरिकांशी भरपूर भांडणं व्हायची. तरीही स्वच्छतेसारखी चांगली गोष्ट नागरिक निश्चित अंगवळणी पाडून घेतील, हा ‘टिपिंग पॉइंट फिनोमेनावरचा’ विश्वासच खरं तर शून्य कचरा प्रकल्पाचा पाया होता. जास्तीत जास्त नागरिकांची ‘जाणीव’ जागी होण्यातून परिणाम दिसणार होते. परिणामाचा मापदंड होता प्रभागाच्या प्रत्येक भागातून येणाऱ्या वर्गीकृत ‘स्वच्छ कचऱ्याचं प्रमाण’.
पावलापुरता प्रकाश (one step at a time)
एका अंधाऱ्या रात्री वाटेत थबकलेल्या वाटसरूला एक साधू उजेडासाठी कंदील देऊ करतो. वाटसरू म्हणतो, ‘‘खूप लांब जायचंय. एवढासा दिवा नेण्यापेक्षा मुक्काम करून पौर्णिमेच्या भरपूर प्रकाशातच जावं म्हणतो.’’
साधू म्हणतो, ‘‘अरे, तुला एका वेळी एकच पाऊल टाकायचंय. तेवढा प्रकाश हा दिवा देतो. पौर्णिमेला खूप अवकाश आहे.’’
या गोष्टीतल्यासारखंच पुढच्या पावलापुरता उजेड घेऊन टीम पुढे सरकत होती. रोज नवी समस्या पुढे ठाकलेली असायची. कधी कचऱ्याच्या गाडय़ा नादुरुस्त, कुठे चढावर कचरावेचक जाऊ शकत नाहीत, कुठे कचरावेचकांमध्ये नियमितपणा नाहीच, कुठे कचरावेचक आणि भंगारवाल्यांच्या आर्थिक संबंधांमुळे समस्या, कर्मचारी व कचरावेचकांची भांडणं, सतत एकमेकांबद्दल लहानमोठय़ा तक्रारी, नागरिकांचा वर्गीकरणाला थंडा प्रतिसाद आणि वर रोजची वादावादी. या समस्या छोटय़ा वाटल्या तरी चालणारं गाडं थांबवायला पुरेशा होत्या. पण जेवढय़ा समस्या जास्त तेवढे नवे उपाय- सृजनशीलता जास्त हेदेखील तेवढंच खरं. पूर्वानुभवातली रूढ गृहीतकं सर्वाकडेच होती. पण तरीही ती धरून न ठेवता नव्याच्या स्वीकाराला मनं मोकळी होती हे टीमचं बलस्थान. त्यातून रस्ता स्पष्ट होत गेला. मनपाच्या यंत्रणेत कुठे बदल हवेत, यांत्रिक सुधारणा कुठे हव्यात, महापालिकेकडून काय हवे, नागरिकांकडून काय हवे, स्वयंसेवी संस्थांची मदत कुठे हवी याबाबत नेमकेपणा येत गेला.
जनजागरणातला नेमकेपणा
परिणामाचा अंदाज घेत पुढे जाण्याचं तत्त्व जनजागृतीतही होतंच. त्यामुळे विविध टप्प्यांसाठी गरजेनुसार मार्ग आणि माध्यमं वापरली गेली. पहिल्या टप्प्यावर कचरा समस्येबाबतची घराघराची जबाबदारी आणि कचरा वर्गीकरणाचे फायदे लोकांना समजावून सांगण्यासाठी सीएसआरखाली कमिन्स इंडियाच्या कर्मचाऱ्यांची फौजच मदतीला आली. ही समस्या चित्ररूपानं समजावून सांगणारे नेमका मजकुर व फोटो असणारे रंगीत फ्लिपचार्ट बनवले होते. ते घेऊन कचरावेचकांसोबत कमिन्स व स्वयंसेवकांनी प्रभाग पिंजून काढला. यातून परिसराला विषयाचा परिचय व आवश्यक ती वातावरणनिर्मिती झाली.
आम्ही आणि ते : सामूहिक आणि वैयक्तिक जबाबदारीची सांगड
‘नागरिक कचरा वेगळा करून देणं शक्यच नाही’ ही मानसिकता हा पहिला शत्रू असतो. कचरा न करणारे ‘आपण’ आणि कचरा करणारे ‘ते’ असं प्रत्येकजण या समस्येकडे पाहतो. अशा वेळी ‘नागरिकांचं कसं चुकतंय?’ छापाच्या चर्चा टाळून ‘जाणीव जागृतीतून काय घडायला हवं आहे?’ याचा टीमनं विचार केला. जाणीवजागृती म्हणजे प्रत्येक माणसाचं या समस्येशी स्वत:हून नातं जुळणं, प्रत्येकाची नाळ वैयक्तिकरीत्या कचऱ्याशी, कचरावेचकांशी आणि उरळीकर ग्रामस्थांच्या समस्यांशी जोडली जाणं. प्रत्येक व्यक्तीला कृतीपर्यंत नेणारा ‘आम्ही करणारच’ हा विश्वास मनामनात जागा करणं.
जनजागरणाचं माध्यम आणि पातळी त्याप्रमाणे टप्प्याटप्प्यावर बदलत गेली. सुरुवातीला महापालिकेच्या गाडीतून स्पीकरवर आवाहनांपासून, स्वच्छता फेऱ्या, पोस्टर शो, कचऱ्याबाबतची व्यंगचित्रं, शनिवार-रविवारी सोसायटी किंवा कोपरासभा व तेथेच पपेट शोचे आयोजन, शेवटच्या टप्प्यात रेडिओवर कार्यक्रम, ‘स्वच्छ सोसायटी, स्वच्छ गल्ली’ स्पर्धा अशा तऱ्हेने परिणाम पाहात माध्यमं वापरली गेली. मापदंड एकच- ‘स्वच्छ कचऱ्या’त झालेली वाढ.
सर्वात जास्त परिणामकारक ठरले पपेट-शो. एखाद्या सोसायटीतून ‘स्वच्छ कचरा कमी येतोय’ अशी तक्रार आली की तिथे पपेट-शो आयोजित केला जायचा. कचऱ्याच्या राक्षसाच्या माहितीसोबत लोकांच्या बेजबाबदार वागण्याबद्दल भाष्य आणि कोपरखळ्या पपेट्स एवढी सुंदर मारायची की, अक्षरश: दुसऱ्या दिवसापासून
पूर्ण सोसायटीतून ‘स्वच्छ कचरा’ यायला सुरुवात व्हायची.
परिभाषेतून परिणामकारकता
पपेट्सच्या तोंडून जाणारे शब्द प्रकल्पाची ‘परिभाषा’ बनली. ‘स्वच्छ कचरा’ या संकल्पनेचा अर्थ कात्रजमधल्या एवढय़ाशा चिल्ल्यापिल्ल्यांनाही कळायला लागला तो पपेटमुळे. कचरा- जागृतीवरच्या एका व्यंगचित्रात ओसुकाला हा शब्द चित्रकारानं वापरला होता- म्हणजे मिश्र कचरा. (ओला, सुका आणि ओसुकाला.) एका पपेट शोमध्ये ‘अगं, त्या काकू ना, ओसुकाला काकू आहेत. त्यांचा कचरा एवढा घाणेरडा असतो’ असं वाक्य पपेटच्या तोंडी आलं आणि परिसरात ‘ओसुकाला’ ही एक शिवीच होऊन गेली.
गृहिणी : नेमकी परिणामकारकता
अभियानांमध्ये अनेकदा शाळांचे माध्यम वापरले जाते. तिथे एकगठ्ठा संख्या मिळते आणि काहीतरी केल्यासारखं वाटतं म्हणूनही असेल. या प्रकल्पात मात्र शाळा जाणीवपूर्वक टाळल्या. कारण मुलांचं प्रबोधन परिणाम देणारच नव्हतं. आधी घराघरातल्या गृहिणी, मग पुरुष आणि मग लहान मुलं याच क्रमानं स्वच्छतेची सवय रुजणार होती. गृहिणी एकगठ्ठा मिळण्यासाठी आणि त्यांच्या गॉसिपमधून वातावरणनिर्मिती होण्यासाठी उपयोगी पडली ती वटपौर्णिमा. प्रभागातल्या तीन मोठय़ा वडांच्या शेजारी टीमनं कचरा जागृतीची पोस्टर प्रदर्शनं लावली. हळदी-कुंकवासोबत स्त्रियांना मिश्र कचरा, कचराडेपोमुळे होणाऱ्या समस्यांची माहिती दिली. यातून एका दिवसात तीन भागांत खूप मोठा पल्ला गाठला गेला. ‘आपला कचरा दुसऱ्याच्या दारात (उरळीत किंवा इतरत्र) टाकायचा नाही’ असा निर्धार एकदा स्त्रियांनी केल्यावर ते घडलंच. श्रमदान आणि स्वच्छता फेऱ्यांमध्ये स्त्रिया-मुलांसह सर्वाचा उत्स्फूर्त सहभाग होता.
गांधीविचार : जनसहभागाची जादू, सामूहिक जबाबदारी आणि आत्मसन्मान
व्यापक जनसहभागासाठीची कृती अतिशय नेमकी आणि सोपी, कुणालाही जमण्यासारखी असावी लागते. गांधीजींनी ‘रोज पंधरा मिनिटं सूतकताई’ या साध्या कृतीतून सर्वसामान्य माणसाला स्वत:च्या घरातून देशकार्याला जोडलं. ही छोटी कृती जेव्हा मोठय़ा समाज-कारणाला जोडली जाते तेव्हा प्रत्येकाचा आत्मसन्मान वाढतो. मोठय़ा प्रमाणात जनसहभाग साध्य करणारी अशीच काहीशी जादू इथेही घडली. स्वत:च्या घरात फक्त ओला-सुका वेगळा करणं या कृतीनं सर्वाना ‘स्वच्छता-कार्याला’ जोडलं.
जबाबदारीची वाटणी
कचरा घराघरातून उचलला जायचा तर कचरावेचकांना मोबदला दिला पाहिजे. तो महापालिकेनं देण्याऐवजी नागरिकांनी दिला तर रोजच्या पेपर आणि दुधाच्या नोंदीसोबत ‘कचरावाला आला का?’ तेही मांडलं जातं. ‘रोज कचरा उचलला जातोय हे पाहण्याची जबाबदारी आपोआप घराघरात वाटली जाते. महापालिकेच्या यंत्रणेवरचा देखरेखीचा ताण कमी होतो.
कचरावेचकांचा मोबदला एवढय़ा घरांमध्ये वाटला गेल्यामुळे एका घरानं देण्याची रक्कम अगदी किरकोळ असते. तरीही सुरुवातीला बंगलेवाल्या सुशिक्षितांनी ‘तत्त्वाचा प्रश्न’ केला. ‘‘आम्ही मनपाचा कर देतो. वर हे पैसे का द्यायचे?’’ असा त्यांचा सवाल. तर आमच्या नगरसेवकांकडून घ्या, हे झोपडपट्टीवाल्यांचं उत्तर. त्यावेळी भांडाभांडी करण्याऐवजी टीमनं त्याचं कारण आणि स्वरूप स्पष्ट केल्यावर विरोध मावळला. विशेष म्हणजे ‘स्वच्छतेमुळे आपली मुलंबाळं निरोगी राहतील’चं महत्त्व गरीब झोपडपट्टीवासीयांना आधी पटलं. तत्त्वाचा प्रश्न करणाऱ्यांना ‘तत्त्वापेक्षा स्वच्छता मोठी आहे’ हे पटवायला जरा जास्त वेळ लागला.
यश सर्वाचं (Appropriate Use of Resources)
हा प्रकल्प प्रत्येकासाठी ‘आपला’ होता. प्रत्येक व्यक्ती/संस्थेची बलस्थानं वापरात आणली गेली, तेव्हा मर्यादांचा विचारच करावा लागला नाही, मर्यादांकडे फक्त दुर्लक्ष केलं. महापालिकेच्या यंत्रणेची जबाबदारी इथे खूप मोठी होती. इतर नागरिकांसारखेच ‘हे घडणार नाही’ या मानसिकतेत सुरुवातीला मनपा कर्मचारीही होते. दृष्टिकोनापासूनचा हा बदल स्वीकारणं त्यांनाही सोपं नव्हतं. पण रूढ सरकारी मानसिकतेवर विजय मिळवून आयएसओ प्रमाणपत्राचा दर्जा गाठेपर्यंतचे सर्व बदल त्यांनी बांधीलकीनं केले. अधिकाऱ्यांनी त्या निर्धाराला बळ दिलं. कचरावेचक हा या यंत्रणेचा कणी आहे. ‘स्वच्छ’ संस्थेच्या कचरावेचकांनी ‘स्वच्छ कचऱ्याची’ संकल्पना स्वीकारली. मोठा आर्थिक भार कमिन्सनं उचलल्यामुळे छोटे-मोठे आर्थिक निर्णय ताबडतोब घेणे शक्य झाले. ते लाल फितीत अडकले नाहीत. कमी पडणारे टेंपो, घंटागाडय़ांसाठी लायन्स क्लब पुढे आला. उद्योजक वृत्तीच्या, प्रयोगशील स्थानिक माणसांची गरज प्लास्टिक मॅन्यु. असोसिएशननं भागवली. ज्या भागात नागरिक अगदीच सहकार्य देत नव्हते तिथे स्थानिक नगरसेवक मदतीला आले. ‘स्वच्छतामित्र’ या नात्याने प्रभागातले उत्साही आणि प्रभावी स्त्री-पुरुष सहभागी झाले. त्यांनी आपापल्या भागातल्या मिश्र कचऱ्याच्या, कचरा व्यवस्थापनातल्या अडचणी सोडवून शंभर टक्के वर्गीकरणाची जबाबदारी घेतली.
हा प्रकल्प एकटय़ा कुणाचाच नव्हता. तो यशस्वी होणं ही प्रत्येक स्टेकहोल्डरची गरज बनली. म्हणूनच तो कमी काळात एवढा पल्ला गाठू शकला.
त्रयस्थ आणि तटस्थ समन्वयकाची भूमिका (Role of Impartial Facilitator)
अशा प्रकल्पामधली एखाद्या त्रयस्थ समन्वयकाची गरज इथे अधोरेखित झाली. अनेक वर्षे एकत्र काम केल्याने मनपाचे सेवक आणि कचरावेचकांमध्ये जुने मतभेद, गृहीतकं, पूर्वग्रह होते. नागरिकांची सर्वाशी भांडणं तर रोजचीच. त्रयस्थ आणि तटस्थ समन्वयकामुळे कुठल्याही दोन गटांमधले मतभेद मिटवणं जसं सोपं झालं तसंच गरजेप्रमाणे योग्य त्यांची मदत घेणंही शक्य झालं. जनवाणी त्रयस्थ होती म्हणूनच मनपा व ‘स्वच्छ’चा अनुभवांमधली माहिती वापरून संपूर्ण प्रक्रिया आणि यंत्रणेचा नव्यानं विचार शक्य झाला.
छोटय़ा गोष्टींतल्या मोठय़ा इनसाइट्स
किरकोळ वाटणाऱ्या अनेक प्रसंगांनी दिलेली शिकवण फक्त प्रकल्पापुरती नव्हे तर एकूणच सामाजिक मानसिकता समजण्यासाठी महत्त्वाची होती.
०    पॅरेटोचा ८०-२० चा नियम : ‘८० टक्के गोष्टी घडणं हे २० टक्के गोष्टींवर अवलंबून असतं हा अर्थशास्त्रातला नियम,’ इथेही सिद्ध झाला. अडथळे खूप होते, पण कचरावेचकांसाठी सुरुवातीची आर्थिक जबाबदारी आणि नादुरुस्त घंटागाडय़ांची ताबडतोब दुरुस्ती एवढय़ा दोनच गोष्टी झाल्यानंतर पुष्कळ गोष्टी मार्गी लागल्या.
०    पेनी वाइज पाऊंड फुलीश : हातगाडय़ा, घंटागाडय़ांच्या दुरुस्तीसाठी लागलेली रक्कम अतिशय किरकोळ होती, पण त्या दुरुस्त झाल्यामुळे कचरावेचकांची जास्त घरे घेण्याची एकदम वाढलेली क्षमता पाहून ही म्हण आठवून गेली.
०    ‘कुठूनही, पण सुरुवात होणं महत्त्वाचं’. कचरावेचक व नागरिक यांच्यात विश्वास निर्माण होईपर्यंत सुरुवातीचे काही महिने कचरावेचकांना प्रकल्पातर्फे पगार दिला गेला व नागरिक मोबदला देऊ लागल्यानंतर तो थांबवला.
०    मोठय़ा सोसायटींचा कचरा सोसायटीच्या दारात एकत्रित उचलणं कचरावेचकांनाही सोपं वाटायचं. मग लक्षात आलं की, अनेकदा बहुसंख्य कुटुंबे ‘ओला-सुका’ वेगळा देतात. पण एक-दोनच घरांचा ‘ओसुकाला’ त्यात मिसळून सगळा कचरा खराब होतो. ही कुटुंबं नेमकी समजण्यासाठी दारादारातूनच कचरा उचलला जाणं अनिवार्य बनलं. हे लर्निग मोठं होतं. ‘भारतीय नागरिकांना स्वच्छतेची सवय लागणं शक्य नाही’ असं सार्वमत बनण्यासाठी हेच थोडे १० टक्के लोक कारणीभूत असतात. त्यांच्यामुळे स्वच्छता पाळणारे ९० टक्के बदनाम आणि अगतिक होतात. दे १० टक्के नेमके सापडल्यावर शिस्त लावणं आटोक्यातलं असतं.
०    यातून सगळ्यात मोठं अनपेक्षित फलित निघालं ते म्हणजे ही पद्धत रुजल्यानंतर पुढे रस्त्यावरच्या ‘सार्वजनिक कचराकुंडय़ां’चीच गरज उरणार नाही, हे स्पष्ट झालं. रस्त्यावरच्या घाणीचं मूळ तिथेच असू शकतं. रस्त्यावरून जाणाऱ्या-येणाऱ्याांमुळे होणाऱ्या कचऱ्याचं प्रमाण किरकोळ असतं. महापालिकेने चाचणीसाठी परिसरातल्या काही कचराकुंडय़ा काढल्या. तिथे पूर्वीच्या सवयीने कचरा टाकायला येणाऱ्या लोकांना थांबवण्यासाठी सुरुवातीला परिसरातले स्वच्छतामित्र राखण करत. भांडणं होत, पण हळूहळू त्या जागी कचरा टाकण्याची सवय मोडून जाई. एका स्वच्छतामित्रानं तिथे ज्येष्ठ नागरिकांसाठी बाकं टाकून देण्याचा सल्ला दिला. त्यामुळे तिथे कचरा पडण्याचा प्रश्न संपला आणि लक्षही राहिलं. कधी कधी अवघड वाटणाऱ्या प्रश्नांची उत्तरं इतकी साधीसोपीही असू शकतात.
०    महापालिकेचे कर्मचारी, अधिकारी आणि स्वच्छतामित्रांचा संपर्क वाढला. परिचयातून परस्परांवरचा अविश्वास संपला. गटार तुंबलंय, पाणी साठलंय अशा समस्यांचे तपशील प्रभाग कार्यालयाला स्वच्छतामित्र आपलेपणानं पोहोचवू लागले आणि समस्या आपलेपणानंच सोडवल्या जाऊ लागल्या. नकळतपणे प्रभागाची स्वच्छता सर्व बाजूंनी होऊ लागली.
०    कायदा आणि शिक्षेच्या धाकापेक्षा जाणीवजागृती परिणाम देते हे सिद्ध झालं.
प्रयोग, प्रयत्न आणि यश, अपयश
प्रकल्पाच्या सुरुवातीच्या ‘हे घडणार नाही’च्या काळात टीममध्ये ‘प्रकल्प अयशस्वी झाला तर?’ची चर्चा होत असे. त्यातून एकदा काही प्रश्न वर आले. ‘अपयशाची काल्पनिक भीती मोठी की महत्त्वाचे प्रयोग शक्य असताना टाळल्याची रुखरुख आयुष्यभर छळेल ही भीती मोठी? शास्त्रज्ञांच्या प्रयोगांतून अपेक्षेपेक्षा वेगळं काही निघालं तर त्याच्या प्रयोगशीलतेचं आणि प्रयत्नांचं महत्त्व संपतं का?’ या प्रश्नांनी दिलेली इनसाइट फार महत्त्वाची होती.
‘शून्य कचरा’ प्रयोग पुढे चालतच राहणार आहे. अजून शंभर टक्के पूर्णत्व गाठलेलं नाही. ओला कचरा कॉप्रेस करून इंधनाच्या कांडय़ा बनवणे, प्लास्टिक व टेट्रापॅक्सपासून बांधकामासाठीचे बोर्ड बनवणे अशा कचरा शंभर टक्के जिरवण्याच्या पर्यायांवर संशोधन चालू आहे. सुक्या कचऱ्याचीसुद्धा वाहतूक नको म्हणून ‘ड्राय वेस्ट मंडई’ भरवायची कल्पना आहे. कचरावेचक व महापालिका कर्मचाऱ्यांच्या कामातल्या गैरसोयी दूर करणाऱ्या टुल्सवर संशोधन चालू आहे. आता सर्वानाच माहीत आहे, यशापयशापेक्षाही महत्त्वाचं आहे ते न थकता प्रयोग करत पुढे जाणं. ‘आम्ही करू शकतो’च्या मंत्राची ही पहिली झलक आहे. आत्ता कुठे एका प्रभागाचं रूप पालटलंय. आता वाट पाहायची ती स्वच्छतेचा ‘टिपिंग पॉइंट’ येऊन ‘इंडिया शायनिंग’ होण्याची!