व्यावसायिक शिक्षण : खरोखरच किती व्यावसायिक? Print

मनोज अणावकर ,सोमवार, ८ ऑक्टोबर  २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

अभ्यासक्रम आणि त्याचे प्रत्यक्ष उपयोजन करताना त्या क्षेत्रात आवश्यक ठरणारे ज्ञान यात फार मोठी तफावत दिसून येते. आणि मग यातूनच घडतात कमी ताकदीचे व्यावसायिक. शिक्षणव्यवस्थेतील त्रुटी आणि विद्यार्थ्यांची अनास्था याची कारणमीमांसा आणि त्यावरील उपाययोजनांवर एक दृष्टिक्षेप-
आज पुन्हा एकदा नोकरीसाठी मुलाखत देऊन आलेल्या शिरीषचा पडलेला चेहरा खरं तर मुलाखतीचा निकाल स्पष्टपणे सांगून जात होता. पण तरीही न राहवून त्याच्या वडिलांनी विचारलंच, ‘‘का रे, आज काय कारण झालं?’’ त्यावर शिरीषने चिडून सांगितलं, ‘‘काही नाही, तीच ती कारणं. कोणाला जास्त टक्केवारी पाहिजे, तर कोणाला जास्त अनुभव पाहिजे. कोणाला मी त्यांच्या जॉबसाठी योग्य वाटत नाही, तर कोणी म्हणतो नोकरी देतो, पण स्टेटस्चं काम देत नाही आणि पगारही १०-१२ हजार रुपये सांगतात. बारावीपासून क्लास, कॉलेज शिक्षणासाठीचे इतर खर्च यावर लाखो रुपये खर्च करून दिवस-रात्र शिक्षणासाठी एवढी मेहनत घेतली. पण वेळ, मेहनत आणि पसा सगळं वाया गेलं.’’
हे अशा प्रकारचे संवाद अनेक घरांमधून आज ऐकायला मिळतात. व्यावसायिक अभ्यासक्रम, मग तो कोणताही असो, अभियांत्रिकीचा, वैद्यकीय, व्यवस्थापन क्षेत्रातला किंवा अगदी पत्रकारितेचा! पण थोडय़ाफार फरकाने हेच चित्र दिसतंय. कोणी म्हणतं की, आजचे अभ्यासक्रम हे अद्ययावत नाहीत, म्हणून असं चित्र आहे, तर कोणी म्हणतं की, आजच्या विद्यार्थ्यांचा दर्जा खालावलेला आहे, तर कोणी म्हणतं की, आजची व्यावसायिक शिक्षणपद्धती ही बाजारू आणि वरवरचं तसंच उथळ शिक्षण देणारी आहे. यातलं नेमकं खरं काय आहे, की सगळंच खरं आहे? खरं तर सध्या हे जे काही घडतंय, त्यातल्या या समस्यांची मुळं खूप खोलवर रुजली आहेत. हा प्रश्न केवळ अभ्यासक्रम, विद्यार्थी आणि व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या संस्था यांच्यापुरताच मर्यादित नाही. या समस्येच्या मुळाशी जायचं तर आजची कुटुंबव्यवस्था, समाजव्यवस्था, जीवनशैली, पालकांची मानसिकता आणि या सगळ्यातून घडणारी मुलांची व्यक्तिमत्त्वं या सगळ्याचा विचार करणं गरजेचं आहे आणि होऊ घातलेले सगळेच बदल हे निराशाजनक आहेत की, काही सकारात्मकही आहेत, याचा विचार होणं आवश्यक आहे.
सध्याची शिक्षणव्यवस्था म्हणजे ‘घमेला शिक्षण पद्धत’ आहे. ज्याप्रमाणे बांधकामाच्या ठिकाणी रांगेत उभे असलेले मजूर काँक्रीटनं भरलेलं घमेलं एकाकडून दुसऱ्याकडे पुढे सरकवत जातात आणि रिकामं घमेलं पुन्हा उलटय़ा दिशेने मागे सरकवत जातात, त्याप्रमाणे हे आजचे विद्यार्थी शाळा महाविद्यालयांमधल्या शिक्षकांनी दिलेले अभ्यासक्रमावरचे प्रश्न क्लासच्या शिक्षकांकडे सरकवतात आणि त्यांच्याकडून घेतलेली त्या प्रश्नांची उत्तरं पुन्हा शाळा-महाविद्यालयातल्या शिक्षकांकडे सरकवतात आणि परीक्षेच्या वेळी घोकंपट्टी करून उत्तरं लिहितात. यामुळे त्यांच्या डोक्यात काहीही शिरत नाही, विषयाचे सखोल आकलन तर दूरच राहिले. पूर्वी धडा वाचून त्याखालच्या प्रश्नांची उत्तरं मुलं स्वत: शोधत होती, त्यामुळे विषयाचं सखोल ज्ञान मिळण्याबरोबरच त्यांच्या विश्लेषक बुद्धीला चालनाही मिळत होती. त्यांना अभ्यास करताना खरोखरीचे आणि ताíकक प्रश्न पडत होते. पण आता अशा प्रकारचे प्रश्न पडणाऱ्या आणि इतक्या सखोल विचार करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस रोडावते आहे.
विशेषत: व्यवसायाभिमुख करिअर क्षेत्रांमध्ये अशा प्रकारच्या विश्लेषक बुद्धीची फारच आवश्यकता असते, नव्हे ती मूलभूत गरजच आहे. अभियांत्रिकी प्रकल्पातल्या तांत्रिक अडचणींमधून मार्ग काढण्यासाठी, रुग्णाने सांगितलेल्या तक्रारींचं विश्लेषण करून रोगाचं निदान करण्यासाठी, व्यवस्थापनात-प्रशासनात आलेल्या रोजच्या अडचणींमधून मार्ग काढण्यासाठी किंवा घटनास्थळी एखादी घटना घडत असताना त्यातली नेमकी बातमी शोधून काढण्यासाठी अशी विश्लेषक बुद्धी असणं, ही कोणत्याही व्यावसायिकासाठी अत्यंत गरजेची बाब आहे. मोठेपणी कुठलंही करिअर क्षेत्र निवडलं, तरी विविध प्रकारच्या स्वभावाच्या माणसांबरोबर काम करताना सगळ्यांना बरोबर घेऊन काम करायचं कसब विकसित करावं लागतं. परिस्थितीशी जुळवून कसं घ्यावं, आपल्या बरोबरच्यांचाही विचार कसा करावा, कधी कधी (नव्हे बऱ्याचदा) आयुष्यात आणि करिअरमध्येही तडजोड करावी लागली तर ती किती आणि कशी करावी, हे सगळं यशस्वी करिअर घडवण्यासाठी माहीत असणं आवश्यक असतं.
देशभरातल्या अनेक शाळा-महाविद्यालयांमध्ये असलेल्या अपुऱ्या मूलभूत शैक्षणिक सुविधा, आजच्या व्यावसायिक क्षेत्रात झालेल्या अद्ययावत तंत्रज्ञानाचा अंतर्भाव नसलेले अभ्यासक्रम आणि पुरेशा उच्चशिक्षित तसंच अनुभवी शिक्षकांचा अभाव, याचाही परिणाम एकंदर शिक्षण पद्धतीवर होत असल्यामुळे अभियांत्रिकी, वैद्यकीय, व्यवस्थापन, वास्तुशास्त्र, पत्रकारिता अशा सर्वच प्रकारच्या व्यावसायिक शिक्षण संस्थांमधून फार मोठय़ा प्रमाणावर त्या त्या करिअर क्षेत्रांमध्ये उपयुक्त नसलेले निकृष्ट व्यावसायिक बाहेर पडत आहेत. चांगले विद्यार्थी घडवण्याचा वसा घेऊन आणि त्यासाठी ‘मला शिक्षकच व्हायचं आहे’, असं ठरवून मुद्दाम जाणीवपूर्वक शैक्षणिक क्षेत्रात करिअर करायला येणाऱ्या शिक्षकांची संख्याही कमी होताना दिसते आहे. कसलीशी स्पर्धापरीक्षा देण्यासाठी किंवा उच्चशिक्षण घेण्यासाठी अभ्यासाला वेळ हवा आहे आणि तो उद्योगक्षेत्रापेक्षा शिक्षणक्षेत्रात अधिक मिळू शकतो, अशा विचाराने किंवा हल्ली सहावा वेतन आयोग लागू झाल्यापासून उद्योग क्षेत्रापेक्षा कमी कष्टात चांगले वेतन मिळते, म्हणून व्यावसायिक शिक्षण क्षेत्राकडे वळणाऱ्या शिक्षकांची संख्याही लक्षणीय आहे. असे शिक्षक विद्यार्थ्यांमधून चांगले व्यावसायिक कसे घडवू शकणार? दुसरा सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे व्यावसायिक शिक्षण संस्थांमधले शिक्षक जर त्या त्या उद्योगक्षेत्रांमधील तांत्रिक प्रगतीशी आणि ज्ञानाशी अवगत नसतील, तर ते जुनेच तंत्रज्ञान शिकवत राहणार. यासाठी दर पाच - सात वर्षांनी किमान एक ते दोन वर्षांसाठी शिक्षकांना त्या  उद्योगक्षेत्रांमधल्या कंपन्यांमध्ये प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेण्यासाठी पूर्णवेळ पाठवायला हवे. तरच उद्योग क्षेत्राला अपेक्षित असलेले विद्यार्थी हे शिक्षक घडवू शकतील. मुलांच्या शिक्षणातही व्यवसाय शिक्षण देताना मुलांना सैद्धान्तिक ज्ञान (थिअरी) म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान देण्याऐवजी अधिकाधिक प्रात्यक्षिके, प्रकल्प आणि थेट कामावर अनुभव घ्यायची संधी मिळायला हवी. यासाठी उद्योगक्षेत्राकडून शिक्षण संस्थांनी स्वत: खरोखरीची कामे (केवळ महाविद्यालयीन प्रात्यक्षिके नव्हेत) घेऊन वर सांगितल्याप्रमाणे प्रशिक्षण दिलेल्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ती मुलांकडून करून घ्यावीत. यातून त्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव महाविद्यालयातच मिळाला तर ते शिक्षण पूर्ण करून बाहेर पडल्यावर नक्कीच उद्योगक्षेत्राला उपयुक्त ठरू शकतील. त्यामुळे त्यांना नोकऱ्या तर मिळतीलच, पण तशा त्या नाही मिळाल्या तरीही प्रत्यक्ष कामाचा अनुभव त्यांच्यापाशी असल्याने ते न घाबरता आत्मविश्वासाने स्वत:चा व्यवसाय सुरू करू शकतील. यातून त्यांच्या रोजगाराचा प्रश्न तर सुटेलच, पण कुठलाही उद्योग करताना इतरांच्या मदतीनेच तो करावा लागत असल्यामुळे इतर अनेकांनाही त्यातून रोजगार मिळू शकेल. अशा प्रकारे अशा व्यावसायिकांची वैयक्तिक प्रगती होण्याबरोबरच त्यात्या उद्योगक्षेत्राचीही भरीव प्रगती व्हायला मदत होईल.
आजचे व्यवसाय शिक्षणाचे फारसे समाधानकारक नसलेले चित्र जर बदलायचे असेल, तर केवळ अभ्यासक्रमांना, शिक्षणसंस्थांना किंवा विद्यार्थ्यांना दोष देऊन चालणार नाही. आजच्या विद्यार्थ्यांमध्ये झालेले सर्वच बदल निश्चितच नकारात्मक नाहीत. लहानपणापासून त्यांना कॉम्प्युटर, इंटरनेट यासारखी साधने मिळाली आहेत आणि ती कशी हाताळावीत याचे कौशल्य आज शिक्षकांपेक्षाही मुलांकडे अधिक आहे. या साधनांचा वापर करून त्यांनी मिळवलेली माहिती कधी कधी शिक्षकांनाही अचंबित करून जाते. मुलांची विश्लेषक बुद्धी कदाचित कमी झाली असेल, पण व्यावहारिक हुशारी आणि कुठलीही गोष्ट पटकन समजून घ्यायची क्षमता, यामुळे त्यांच्या विचारांची गती अधिक वाढली आहे. या गतीबरोबर आजच्या शिक्षकांना धावता आले पाहिजे. तसे झाले नाही तर त्यांचे कुतूहल शमवण्यात शिक्षक आणि पालक अपयशी ठरतील आणि मग केवळ विद्यार्थ्यांना दोष देऊन काहीही साध्य होणार नाही. त्यामुळे आजच्या व्यावसायिक शिक्षण पद्धतीतल्या त्रुटी दूर करून सध्याचे चित्र बदलायचे असेल तर यावर कोणते उपाय योजून त्यासाठीचे प्रयत्न करता येतील, याचा विचार व्हायला हवा.
याविषयी केवळ चर्चासत्र, शोधनिबंध, परिसंवाद आणि बठकांमधून मोठमोठय़ा आदर्शवादी गप्पा न मारता आजच्या मुलांची मानसिकता, त्यांची घडलेली व्यक्तिमत्त्वे, त्यात सुधारणा करण्यासाठी किंवा आहे त्या गुणांचा उपयोग करून घेऊन आणि उद्योगक्षेत्राच्या गरजा ओळखून अभ्यासक्रम आखणे, अद्ययावत उपकरणांचा अंतर्भाव आणि शिक्षकांना प्रशिक्षण याद्वारे हे बदल साध्य केलेत तर खरोखरीचे कौशल्य असलेले आणि समस्यांमधून मार्ग काढायची क्षमता असलेले हुशार व्यावसायिक आपण घडवू शकू. त्यात त्यांच्या व्यक्तिगत करिअरचा आलेख उंचावण्यासोबत देशाचीही प्रगती साधता येईल.