एमपीएससी परीक्षेचे बदललेले स्वरूप Print

संजय मोरे ,सोमवार, १५ ऑक्टोबर २०१२

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा पद्धतीत गेल्या तीन-चार वर्षांत बरेच बदल केले आहेत. या परीक्षांची तयारी करताना परीक्षेचा बदलता पॅटर्न लक्षात घेऊन अभ्यास करणे आवश्यक ठरते. त्याविषयी..
करिअर घडवणे हे आजच्या युवा पिढीसमोरचे एक मोठे आव्हान आहे. आजच्या या स्पर्धेच्या युगात नोकरी मिळवणे आणि तीही सरकारी, ही सहजसोपी गोष्ट उरलेली नाही. सरकारी नोकरीची भुरळ तर आजही कायम आहे. त्यात राजपत्रित अधिकारी म्हणजे मानसन्मान, प्रतिष्ठा, उत्तम वेतन हे ओघाने आलंच. जर राजपत्रित अधिकारी व्हायचे असेल तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पद्धतीतून पार पडायला हवे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे उपजिल्हाधिकारी, पोलीस उपअधीक्षक/साहाय्यक पोलीस आयुक्त, तहसीलदार, मुख्याध्याधिकारी, साहाय्यक विक्रीकर आयुक्त, कक्ष अधिकारी, नायब तहसीलदार या व अशा राजपत्रित अधिकारी पदांच्या जागा भरल्या जातात. ही पदे म्हणजे प्रत्येकाला हवीहवीशी वाटणारी.. मग या परीक्षांचा अभ्यासदेखील त्या दर्जाचा नको का?
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे परीक्षा पद्धतीत गेल्या
तीन-चार वर्षांत बरेच बदल केले आहेत. पोलीस उपनिरीक्षक, साहाय्यक, विक्रीकर निरीक्षक या परीक्षांच्या अभ्यासक्रमात बदल केल्यानंतर राजपत्रित अधिकारी पदासाठी होणाऱ्या राज्यसेवा परीक्षेत तर आमूलाग्र बदल केला म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीची परीक्षा ही पूर्णपणे वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरूपाची केली. (परीक्षेच्या उत्तरपद्धतीमध्ये निगेटिव्ह मार्किंग पद्धत आणली हादेखील एक उल्लेखनीय बदल आहे.) आणि आता याच परीक्षेतील पूर्वपरीक्षेत एका प्रश्नपुस्तिकेऐवजी दोन प्रश्नपुस्तिकांचा समावेश केलेला आहे आणि हो, हा बदल म्हणजे यूपीएससी परीक्षेच्या पूर्वपरीक्षेप्रमाणेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पूर्वपरीक्षा.
दोन प्रश्नपुस्तिकेपैकी पहिली प्रश्नपुस्तिका ही सामान्य अध्ययन या विषयाची तर दुसरी प्रश्नपुस्तिका ही यूपीएससी परीक्षेच्या सीसॅट परीक्षेप्रमाणे आहे. दोन्ही प्रश्नपुस्तिकेस दोन तासांचा कालावधी देण्यात आलेला असून प्रत्येक प्रश्नपुस्तिका २०० गुणांची ठेवण्यात आलेली आहे. दुसरी प्रश्नपुस्तिका म्हणजे एमपीएससी परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या उमेदवारांसाठी पूर्णत: नवीन असा अभ्यासक्रम आहे. त्यामुळे या लेखात आपण या दुसऱ्या प्रश्नपुस्तिकेच्या अभ्यासक्रमाबाबत चर्चा करू. त्यातही मुख्यत: रिझनिंग व मेंटल अ‍ॅबिलिटी याबाबत पाहू.
२०० गुणांच्या या प्रश्नपुस्तिकेत कॉम्प्रीहेन्शन, इंटरपर्सनल स्किल्स इन्क्लुडिंग कम्युनिकेशन स्किल, लॉजिकल रिझनिंग, डिसिजन मेकिंग अ‍ॅण्ड प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, जनरल मेंटल अ‍ॅबिलिटी, बेसिक न्युमरसी (नंबर्स अ‍ॅण्ड देअर रिलेशन, ऑर्डर्स ऑफ मॅग्निटय़ुड इ.), डाटा इंटरप्रिटेशन, मराठी आणि इंग्रजी भाषा कॉम्प्रीहेन्शन स्किल या घटकांचा समावेश केलेला आहे.
लॉजिकल रिझनिंग अ‍ॅण्ड अ‍ॅनॉलिटिकल रिझनिंग या घटकात समान-संबंध, विसंगत घटक, सांकेतिक भाषा, संख्यामालिका, वर्णमालिका, दिशाविषयक प्रश्न, नातेसंबंध, विधाने-अनुमान, माहितीचे पृथक्करण, बैठक व रांगेतील प्रश्न, तुलनात्मक प्रश्न, घडय़ाळावरील प्रश्न, दिनदर्शिका व कालमापन, आकृत्यांची संख्या मोजणे अशा प्रश्नांचा समावेश होतो तर संख्यामालिका या घटकात मालिकापूर्ती, आकृतीतील गाळलेल्या जागी योग्य संख्या पर्यायातून निवडणे, कंसातील संख्या शोधणे तसेच वर्णमालिका या घटकात अक्षरांची लयबद्ध रचना, वर्णमालिका पूर्ण करणे, अक्षर व अंक मालिकेत गाळलेल्या जागी योग्य पर्याय निवडणे, समान संबंध या घटकात अंक-अंक संबंध, अंक-वर्ण संबंध, वर्ण-वर्ण संबंध, वर्ण-अंकवर्ण संबंध, वर्ण-चिन्ह संबंध या उपघटकांचा समावेश होतो. सांकेतिक भाषा या घटकात मिश्र सांकेतिक भाषा, वर्ण-वर्ण सांकेतिक भाषा, वर्ण-अंक सांकेतिक भाषा यांचा समावेश होतो.
बेसिक न्युमरसी या घटकात संख्या व संख्याप्रणाली, अपूर्णाकाचा लहान-मोठेपणा, डेसिमल (दशांश) तसेच बायनॉमिअल नंबर्स अशा घटकांचा समावेश होतो.
जनरल मेंटल अ‍ॅबिलिटी या घटकात क्वॉन्टिटेटिव्ह अ‍ॅप्टिटय़ुड या घटकाशी संबंधित म्हणजे मसावि व लसावि, सरासरी, काळ-काम व वेग, अंतर-वेग व वेळ, शतमान-शेकडेवारी, नफा-तोटा, गुणोत्तर-प्रमाण, भागीदारी, आगगाडीवरील प्रश्न, बोट व प्रवाहावरील प्रश्न, मिश्रणावर आधारित प्रश्न, इनपूट-आऊटपूट, डेटा सफिशियन्सी, सरळ व्याज व चक्रवाढ व्याज, अशा प्रश्नांचा यात समावेश केलेला असतो.
या परीक्षेचा अभ्यासक्रम अशा पद्धतीचा असून हा बदल नक्कीच बदल स्वागतार्ह आहे. बदल ही एकमेव कायम राहणारी गोष्ट आहे, असे आपण म्हणतो. म्हणूनच या बदलाचा स्वीकार करत परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांनी बदलत्या पॅटर्ननुसार आपल्या अभ्यासात बदल करायला हवा. फेब्रुवारी महिन्यात परीक्षा घेण्याचे संकेत लोकसेवा आयोगाकडून देण्यात आलेले आहेत. हा अंदाज घेत अभ्यासाला सुरुवात करा.
अभ्यासासाठी शुभेच्छा.