रेडीमिक्स काँक्रीट क्षेत्रातील संधी Print

सुधीर मुकणे ,सोमवार, २२ ऑक्टोबर २०१२
alt

खूप पूर्वी घरे बांधण्याची पद्धत व आजची बांधणी यामध्ये जमीन-अस्मानाचा फरक आहे. घरबांधणीमध्ये वापरल्या जाणाऱ्या साधनसामग्रीमध्येसुद्धा खूप बदल झाला आहे. पूर्वी तंत्रज्ञान नव्हतं, म्हणून दगड, माती, झावळ्या, शेणमाती लिंपून घरे बनविली जायची, तर आजच्या काळात नवनवीन तंत्रज्ञानामुळे व अद्ययावत साधनसामग्रीने उंचच उंच इमारती उभ्या राहात आहेत. रेती-खडी-सीमेंट व पाणी वापरून काँक्रीट बनविण्याचे दिवस आज हद्दपार झाले आहेत. आजचा जमाना हा ‘रेडीमिक्स काँक्रीट’ वापरण्याचा आहे. रेडीमिक्स काँक्रीट बनविण्यासाठी यंत्रसामग्री आणि संगणकाने नियंत्रित केलेला प्लान्ट असतो. त्यात एका ठिकाणी काँक्रीट बनवून तो गोल फिरणाऱ्या व हंडीसारख्या दिसणाऱ्या ‘ट्रांझिस्ट मिक्सर’ मधून हे काँक्रीट पाहिजे त्या ठिकाणी वापरता येते. कमी क्षेत्रफळाच्या जागी इमारत बांधताना, अरुंद रस्त्यांच्या जागी, रेती-खडी ठेवण्यास जागा नसणाऱ्यांसाठी, मालाची कमतरता असते तेव्हा व अडचणीच्या ठिकाणी असा रेडीमेड माल मागवून वापरता येतो. गुणवत्ता व मिक्स डिझाइनने बनविलेला हा काँक्रीट माल आपल्या गुणवैशिष्टय़ांमुळे तो वापरणाऱ्याकडे कल वाढला आहे व त्यामुळे त्याचा प्रचार व प्रसार जोर धरू लागला आहे.
alt
असा ‘रेडीमिक्स काँक्रीट प्लान्ट’च्या जागी तेथे काम करण्यासाठी अनेक कुशल कामगारांची गरज लागत असते. तयार माल वापरणाऱ्यांची संख्या लक्षात घेता, ही नवीन गरज पूर्ण करून देण्यासाठी या ‘रेडीमिक्स काँक्रीट’ क्षेत्राकडे आज काळजीपूर्वक बघण्याची वेळ आली आहे व या संधीचा उपयोग आपल्यासाठी करून देणाऱ्या करिअरवर टाकलेला हा दृष्टिक्षेप!
शैक्षणिक पात्रता-
१) कमीत कमी दहावी पास, बारावी पास असल्यास उत्तम.
२) कॉम्प्युटर व इंटरनेटचे ज्ञान आवश्यक.
३) इंग्रजी भाषा समजलीच पाहिजे, कारण प्लान्टचे कमांड इंग्रजीतच येतात.
४) ‘ऑपरेटर’ होण्याकरिता ट्रेनिंग कोर्स करणे अत्यावश्यक आहे.
‘ऑपरेटर’ होण्याकरिता लागणाऱ्या आवश्यक गोष्टी-
१) इंग्रजी भाषा वाचता व समजणे आवश्यक आहे, कारण आरएमसी प्लान्ट पूर्णपणे कॉम्प्युटरने नियंत्रित केला जातो.
२) प्लान्टचे महत्त्वाचे भाग-समान, त्यांची नावे व अत्यावश्यक कार्यसूची इ. प्रणाली डॉयलॉग बॉक्सद्वारे स्क्रीनवर येत असल्याने त्याचे वाचन करून त्याप्रमाणे काम करावे लागते.
३) प्रत्येक काम समजून घ्यावे लागते.
४) मेहनत व सदैव कष्ट करण्याची तयारी ठेवावी लागते.
५) बांधकाम साहित्यांची पारख, त्याच्या गुणवत्तेच्या चाचण्या इ.चा अभ्यास लागतो.
६) काँक्रीट मिक्स डिझाइन (CMD) चे ज्ञान आवश्यक.
७) संवादकौशल्य आणि सहकाऱ्यांशी जुळवून घेण्याची   तयारी असणे आवश्यक.
८) साइटवर काम करणारे अभियंते, पर्यवेक्षक यांच्या म्हणण्याप्रमाणे काँक्रीट बनवून पाठवावे लागते.
९) मोठमोठय़ा प्लान्टमध्ये शिफ्ट डय़ुटी करावी लागते, तर लहान प्लान्टच्या ठिकाणी जेथे एकच ऑपरेटर ठेवतात, तेथे काम पूर्ण होईपर्यंत थांबावे लागते.
१०) लहान प्लान्टच्या ठिकाणी ‘वन मॅन शो’ असल्याने प्लान्ट बंद ठेवू शकत नाही. त्या ठिकाणी जास्त मेहनत करण्याची तयारी ठेवावी लागते.
११) प्लान्टमध्ये सतत होणारे लहानसहान तांत्रिक दोष दुरुस्त करता आले पाहिजे.
१२) प्रगत तंत्रज्ञानाची माहिती वेळच्या वेळी अपडेट करता यायला हवी.
१३) वेगवेगळ्या कंपनीचे आरएमसी प्लान्ट व त्यांचे क्षमतेनुसार असणारे प्रकार त्याची माहिती असली पाहिजे.
१४) ट्रेनिंगमध्ये प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर कंपनीने दिलेल्या प्रमाणपत्रानुसार चांगली नोकरी मिळण्यास मदत होते.
१५) ऑपरेटरचा चांगला अनुभव घेतल्यास पुढे प्लान्ट मॅनेजर होऊन दरमहा रुपये पन्नास ते साठ हजार पगार मिळवता येतो.
ट्रेनिंग कोर्समध्ये खालील गोष्टी शिकविल्या जातात-
१) संपूर्ण काँक्रीट प्लान्टची माहिती.
२) प्लान्टचे विविध भाग व त्यांची कार्यप्रणाली.
३) मिक्सर कॅपॅसिटी, बकेट कॅपॅसिटी, स्क्रॅप मिक्सर, हॅन्ड मिक्सिंग, विविध प्रकारच्या व क्षमतेच्या मोटर, त्यांची एचपी क्षमता, कॉम्प्रेसर, मोटर कॅपॅसिटी इ.ची सविस्तर माहिती.
४) बॅचिंग-वे किंवा व्हॉल्यूम.
५) सिमेंट, फ्लॅयअ‍ॅश (Fly-ash) इ.च्या साठवणुकीसाठी असणारे silu.
६) साधनसामग्रीची गुणवत्ता पडताळणी व चाचणी.
७) बॅच रिपोर्ट, क्वॉलिटी कंट्रोलिंग.
८) मशिनची ऑपरेटिंग व काँक्रीटची बॅच करून देणे.
९) क्राँक्रीटची ट्रान्झिस्ट मिक्सरमध्ये लोडिंग व अनलोडिंगचे प्रशिक्षण मिळते.
१०) प्लान्टमध्ये निर्माण होणारे दोष व त्याच्या निवारण्याच्या पद्धतीची माहिती दिली जाते.
ट्रेनिंग कोर्सची पद्धत-
१) सर्वात प्रथम प्रवेश परीक्षा घेऊन त्या बाबतीतील ज्ञान किती आहे हे बघितले जाते व त्यानुसार निवड होते.
२) क्लासरूम ट्रेनिंग- सर्वात प्रथम आरएमसी प्लान्टच्या संपूर्ण मशीनबद्दल माहिती दिली जाते. कंट्रोल सिस्टीम व सॉफ्टवेअरची माहिती तसेच ऑपरेटिंगची पद्धत शिकविली जाते.
३) फॅक्टरीमध्ये ट्रेनिंग- प्रत्यक्ष फॅक्टरीमध्ये सर्व प्रयोगानिशी व प्रात्यक्षिकांसह शिकविले जाते.
४) साइट ट्रेनिंग- आरएमसी प्लान्टच्या साइटवर नेऊन प्रत्यक्ष ऑपरेटिंग कसे करायचे हे प्रात्यक्षिकांसह शिकविले जाते व तेथेच खरा आत्मविश्वास मिळू शकतो.
५) कोर्स पूर्ण झाल्यावर परीक्षा घेतली जाते व त्याप्रमाणे प्रमाणपत्र प्रदान केले जाते.
सर्टिफिकेट दाखविल्यावर लगेचच नोकरी मिळू शकते किंवा ज्या कंपनीतून ट्रेनिंग केले, त्या कंपनीच्या प्लान्टवर नियुक्ती केली जाते व सुरुवातीला रुपये आठ ते दहा हजाराची नोकरी मिळू शकते.
आरएमसी प्लान्ट असणाऱ्या कंपन्या-
१) स्विंग स्टेटअर (२) ग्रिव्हज् (३) सॅनी (४) पेन्टा (५) भाई (६) लिबर (७) मॅल्सोमॅक्स (८) मॅक्स टेक (९) रेवती (१०) अपोलो (११) मॅकॉन (१२) अ‍ॅक्वारियस.
वरील सर्वच कंपन्या ‘ऑपरेटर’ होण्याचे प्रशिक्षण देत असतात. त्या-त्या कंपन्यांच्या वेबसाइटवर त्यासंबंधी माहिती उपलब्ध असते.
ऑपरेटर ट्रेनिंग-
हा पूर्ण दोन महिन्यांचा कोर्स असून त्याचा खर्च ४० हजारांपर्यंत येतो. २४ मे २०११ ते २३ जुलै २०११, १ जुलै ते ३१ ऑगस्ट, ४ ऑगस्ट ते १ नोव्हें., १७ सप्टें. ते १६ ऑक्टो., ४ ऑक्टो. ते ३ डिसें. व ३ नोव्हें. ते ३१ डिसें. २०११ असे कोर्सचे सहा वेळापत्रके कंपनीने जाहीर केली आहेत. तसेच २, ३ व ४ दिवसांचे मिनी कोर्ससुद्धा उपलब्ध असून, त्याचा खर्च ५००० ते ७००० दरम्यान येतो.
दोन महिने प्रशिक्षण घेऊन जर का वेगळ्या क्षेत्रात पाऊल ठेवल्यास पुढे हेच क्षेत्र प्रगतीची अनेक संधी आणून देऊ शकेल. वरील ट्रेनिंग कोर्स हा कलकत्ता व नवी दिल्ली येथेसुद्धा आहे, त्याची चौकशी वरील फोनवर करावी.
ट्रेनिंग कोर्स पूर्ण केल्यावर कंपनी प्रमाणपत्र आणि परवाना देते. ते दाखविल्यावर लगेच नोकरी मिळू शकते. तसेच कंपनी आपल्या प्लान्टमध्ये तसेच ज्यांना प्लान्ट विकला आहे, अशा ठिकाणी शिफारस करत असते.
आरएमसी प्लान्टमधील इतर करिअर-
१) ट्रॉन्झिस्ट मिक्सर- ड्रायव्हर व हेल्पर
२) सुपरवायझर
३) प्लान्ट इनचार्ज
४) क्वॉलिटी कंट्रोलर
५) मार्केटिंग
वरील पाचही करिअरबद्दल आपण सविस्तर विचार करणार आहोतच, तत्पूर्वी या आजच्या ‘ऑपरेटर’ करिअरचा विचार मनात ठेवून आपल्या इच्छा-अपेक्षा भविष्यात पूर्ण करून देण्यासाठी या वेगळ्या वाटेवर जाण्यास हरकत नसावी!