निरीक्षणे कशी घ्यावीत? Print

हेमंत  लागवणकर ,सोमवार, २२ ऑक्टोबर २०१२
alt

प्रकल्प उत्तम व्हावा, यासाठी निरीक्षणे अत्यंत बारकाईने आणि अचूक  घेणं अत्यंत आवश्यक आहे. त्याचप्रमाणे या निरीक्षणची पद्धतशीर नोंद ठेवणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे.
प्रकल्पासाठी निरीक्षणं घेण्याअगोदर करण्याअगोदर विषयाची नीट ओळख करून घेणं आणि त्याचा अभ्यास करणं आवश्यक आहे. प्रकल्पाच्या अनुषंगाने आपण कोणत्या प्रकारची निरीक्षणं घेणं आवश्यक आहे, हे सर्वप्रथम ठरवा आणि त्यांची एक यादी करा. आवश्यक तेथे तक्ते तयार करा. उदाहरणार्थ, ‘एका प्राण्याच्या जीवनपद्धतीचा अभ्यास’ असा प्रकल्प समजा तुम्हाला करायचा आहे, तर त्यासाठी तुम्हाला एखाद्या प्राण्याची निवड करून त्या प्राण्याचे बारकाईने आणि नियमितपणे निरीक्षण करावं लागेल. तसंच, ही निरीक्षणं कोणत्या दिवशी केली, कोणत्या वेळी केली, कुठे केली याची पद्धतशीर नोंद करावी लागेल.
या प्रकल्पासाठी तुम्हाला कोणती संभाव्य निरीक्षणं नोंदवावी लागतील याचा नमुना पुढे दिलेला आहे. या प्रकल्पामध्ये निवडलेल्या प्राण्याचं, त्याच्या शरीररचनेचं, सवयींचं, अधिवासाचं निरीक्षण करून नोंदवावी लागणारी निरीक्षणं पुढीलप्रमाणे :
प्राण्याचे सामान्य नाव :
प्राण्याचे शास्त्रीय नाव :
प्राण्याचे वर्गीकरण :
सहज दृष्टीस पडणारा/ दुर्मिळ/ लुप्त होण्याच्या मार्गावर :
अधिवास :
सूक्ष्म अधिवास :
क्रियाशील दिवसा/रात्री :
शाकाहारी/ मांसाहारी/ मिश्राहारी :
अन्न :
नर-मादी भेद :
प्राण्याची शरीर रचना :
१. आकारमान :
२. रंग :
३. शरीराचा आकार :
४. अन्न आणि अधिवासानुसार असलेले अनुकूलन :
५. पायाची रचना (बोटं आणि नख्या) :
६. मान (लांब/ आखूड) :
७. शेपूट (लांब/ आखूड) :
८. शिंगे (असल्यास) :
९. दृष्टी (क्षीण/ तीक्ष्ण) :
१०. आवाज :
११. श्रवण क्षमता
प्रजननाचा काळ
अंडी घालणारे/ पिल्लांना जन्म देणारे :
पिल्लांना जन्म देणारे असल्यास :
१. एका वेळी किती पिल्ले जन्माला येतात?, २. प्रजनन वर्षांतून किती वेळा होते?, ३. पिल्लांच्या पूर्ण वाढीसाठी आवश्यक असणारा कालावधी, ४. पिल्लांची काळजी कशा प्रकारे घेतात?
अंडी घालणारे असल्यास :
१. एका वेळी किती अंडी घालतात?, २. वर्षांतून किती वेळा अंडी घालतात?
३. अंडय़ांचा आकार, ४. अंडय़ांचा रंग, ५. अंडी उबविण्याचा कालावधी,
६. अंडय़ातून पिल्ले बाहेर पडल्यापासून पूर्ण वाढ होण्यापर्यंत लागणारा कालावधी, ७. अंडय़ांची व पिल्लांची काळजी :
समूहातील वर्तन :
इतर गुणवैशिष्टय़े-
alt
निरीक्षणं नोंदविण्यासाठी खिशात मावेल, अशी एक लहानशी टिपणवही नेहमी स्वत:जवळ ठेवा. निरीक्षणांची नोंद ताबडतोब टिपणवहीत करा. कारण कालांतराने काही निरीक्षणं विसरण्याचा संभव असतो.
निरीक्षणांची नोंद करताना ती एखाद्या निबंधाच्या स्वरूपात नसावी. निरीक्षणं नोंदविण्यासाठी तक्त्यांचा उपयोग करता येईल. त्यासाठी आवश्यक ते वेगवेगळे घटक ठरवून घेऊन त्याप्रमाणं तक्ता आखून त्यामध्ये निरीक्षणांची नोंद करा.
उदा. ‘निरनिराळ्या तणांचा अभ्यास करणं’ असा प्रकल्प विषय असल्यास निरीक्षणं नोंदविण्यासाठी पुढीलप्रमाणं तक्ता करता येईल.
काही प्रकल्पांमध्ये निरीक्षणांबरोबरच काही भौतिक राशींचे मापन करणं आवश्यक असतं. उदाहरणार्थ, ‘आपल्या घरातील पाणीवापराचा ताळेबंद’ या प्रकल्पासाठी पुढीलप्रमाणं तक्ता करता येईल.
alt
वरील तक्त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी वापरलं जाणारं पाणी आणि वाया जाणारं किंवा अपव्यय होणारं पाण्याचं प्रमाण या दोन घटकांचं मापन करणं आवश्यक आहे. अशा वेळी मापनाच्या योग्य आणि अचूक पद्धतीचा अवलंब करा. निरीक्षण तक्त्यामध्ये भौतिक राशींची नोंद केली असल्यास त्या राशींची एककं लिहायला विसरू नका. प्रकल्पासाठी निरीक्षणं कधी आणि कुठे घ्यायची यासाठी तज्ज्ञांचं मार्गदर्शन घ्या. निरीक्षणं घेण्यासाठी योग्य वेळ निश्चित करणं अतिशय महत्त्वाचं आहे. ही वेळ प्रकल्पाच्या विषयाशी संबंधित असते. उदाहरणार्थ, पक्ष्यांचं निरीक्षण करण्यासाठी तुम्ही जर दुपारची वेळ निवडलीत तर ते चुकीचं ठरेल. पक्ष्यांचं निरीक्षण करण्यासाठी सकाळी लवकरची किंवा संध्याकाळची वेळ निवडायला हवी. कारण बहुतांश पक्षी याच वेळी अधिक क्रियाशील असतात.
समुद्रकिनाऱ्यावर आढळणाऱ्या शंखशिंपल्यांचं निरीक्षण करायचं असेल तर भरतीची वेळ टाळावी. यासाठी ओहोटीची वेळ चांगली. कारण ओहोटीच्या वेळी अनेक शंखशिंपले पाहायला आणि जमा करायला मिळतात.
निरीक्षणे काळजीपूर्वक आणि एकाग्रतेने करा. निरीक्षणे घेताना आवश्यक ती छायाचित्रं काढल्यास उत्तम! पण जर छायाचित्र घेणं शक्य नसेल तर तुम्ही रेखाचित्र काढू शकता.
निरीक्षणे घेताना विद्यार्थ्यांचा मोठा गट करू नका. क्षेत्र अभ्यासाच्या ठिकाणी वाहनांमध्ये बसून फिरू नका. निरीक्षणे घेताना तुम्हाला मिळालेल्या लोकांच्या सहभागाचीसुद्धा नोंद ठेवा. याचा उपयोग तुम्हाला प्रकल्प अहवाल तयार करताना आणि स्थानिक अधिकारी किंवा लोकसहभागाच्या माध्यमातून उपाययोजना करताना होईल.
निरीक्षणे घेण्याच्या व क्षेत्र अभ्यासाच्या अनेक शास्त्रीय पद्धती आहेत. आपल्या प्रकल्पाच्या विषयानुसार योग्य ती पद्धत वापरून निरीक्षणं घेणे आवश्यक ठरते.