ग्रट आयडियाज् : आधुनिक भाषाविज्ञानाचा जनक नॉम चॉम्स्की Print

अनघा दिघे ,सोमवार, २२ ऑक्टोबर २०१२
alt

अवरॅम नॉम चॉम्स्की हे ७ डिसेंबर १९२८ रोजी फिलाडेल्फिया/ पेनन्स्लविया येथे जन्मलेले अमेरिकन भाषाशास्त्रज्ञ आहेत. जनरेटिव्ह, युनिव्हर्सल आणि ट्रान्स्फॉम्रेशनल अशा विविध अंगांनी त्यांनी व्याकरणाचा प्रदीर्घ अभ्यास केला आहे. संरचनात्मक भाषाविज्ञानातील त्यांची कामगिरी ही अत्यंत मौलिक आहे. ५० वर्षांपेक्षा जास्त कालावधी ते मॅसेच्युसेट्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे कार्यरत होते. या आधुनिक भाषाविज्ञानाच्या जनकास देश-विदेशांतील ३७ विद्यापीठांनी मानद पदवी दिली आहे. ते एक तत्त्वज्ञ, तर्कशास्त्री, राजकीय टीकाकारदेखील आहेत. आपल्या राजकीय मतांच्या प्रचारासाठी आणि सक्रिय चळवळीसाठी सदैव कटिबद्ध असणारा तत्पर कार्यकर्ता, असे नॉम चॉम्स्की या हिऱ्याला अनेक पलू आहेत एवढेच नाही तर तो स्वयंप्रकाशाने अखंडितपणे प्रकाशमान आहे. त्यांचे विचार, संशोधन आणि ठोस राजकीय भूमिका यांची दीप्ती अजूनही त्रिखंडामध्ये झळकते आहे. जीवनाच्या विविध अंगांना स्पर्श करणारे त्यांचे प्रेरक विचार- त्यांच्याच शब्दांत-   
‘आपल्या पुढय़ातील प्रत्येक घडामोडीबद्दल प्रश्न विचारत राहणे यापलीकडे विचार आणि अभ्यास करण्याचा दुसरा कुठला पर्याय असूही शकेल, याचे मला कधीच भान नव्हते. परंतु बळजबरीने लादलेले अज्ञान असे आजकाल शिक्षण व्यवस्थेचे स्वरूप झाले आहे. शोध लावणे म्हणजे काय, तर छोटय़ा छोटय़ा घटितांना पाहून कोडय़ात पडण्याचा सहज स्वभाव जोपासणे होय. व्यक्तीच्या पूर्णत्वासाठी (परिपूर्ण होण्यासाठी) सुसंधी या शिक्षणाने पुरवल्या असायला हव्यात. प्रत्येक व्यक्तीला त्याच्या स्वत:च्या पद्धतीने धांडोळा घेण्यासाठी संसाधने आणि आव्हाने यांनी युक्त असे वातावरण पुरवणे, ही शिक्षणाची सर्वोत्कृष्टता होय.
ज्यावेळी इच्छाशक्ती / निर्णय / कारण / उपलब्ध पर्यायांपकी एका कृतीची निवड असले प्रश्न उद्भवतात, त्यावेळी मानवी विज्ञानाचे नुकसान होते. परिस्थितीचा आहे तसाच स्वीकार केला तर तुमच्यासमोर दोनच पर्याय राहतात- एक म्हणजे तीच पारंपरिक तत्त्वे सिद्धान्त चघळत राहा किंवा जे खरोखरीचे अविकृत सत्य आहे, तेच कथन करा आणि असे वाटेल की, जणू काही हा अगदी नेपच्यूनसारख्या दूरच्या ग्रहावरचा कुठलासा सिद्धान्त आहे.
परिस्थितीचा शांतपणे स्वीकार करून तुम्ही जर एकच एक विचार मांडत राहिलात (तुमच्या भावना मग काहीही असोत..) तर जे तुम्ही बोलत आहात तेच सरतेशवटी तुमच्यामध्ये रुजते, आरपार भिनते. कारण एका गोष्टीवर विश्वास ठेवणे आणि नेमके त्याच्या विरुद्ध गोष्ट बोलणे हे फार फार कठीण काम आहे.
आतंकवाद, लोकशाही आणि सत्ताकारण व राजकारण यावर त्यांनी परखडपणे मतप्रदर्शन केले आहे- ‘आतंकवाद थांबवावा कसा, याची काळजी प्रत्येकाला पडली आहे. आतंकवाद थोपवण्याचा एक अगदी सोप्पा मार्ग आहे -  त्यात सहभाग घेणे थांबवा. िहसेच्या विरुद्ध मत देण्यासाठी तुम्हाला प्रतिवादाची गरज नसते तर िहसेला दुजोरा देण्यासाठी तुम्हाला समर्थनाची गरज पडते.
निर्णयप्रक्रियेमध्ये जनतेचा थेट तसेच अर्थपूर्ण सहभाग असण्यावर आपल्या राजकीय संरचनेचे स्वरूप रचलेले नाही. त्याऐवजी एलीट ग्रुपच या ठिकाणी निर्णय घेतात. खरं सांगायचं तर ही अशी यंत्रणा आहे की, जी एलीट लोकांच्या निर्णयावर सुरू राहते आणि ‘होयबा’ पद्धतीची जनतेची मंजुरी निश्चित कालावधीच्या अंतराने मिळवतात. संरक्षण आणि बचाव यावर केलेला खर्च हा एका व्यापक प्रमाणात श्रीमंतांच्या कल्याणासाठी केलेला खर्च ठरतो.’
क्रमिक शिक्षणाविषयीचे त्यांचे अवलोकन हे चाट करणारे आहे- ‘जगाविषयीचे सत्य शिक्षणसंस्थांमधून नीट शिकवले जात नसल्यामुळे शाळांना, मुलांच्या डोक्यावर उदंड प्रमाणात लोकशाहीचा प्रचार थोपवावा लागतो. खरीखुरी लोकशाहीवादी प्रणाली जर शाळा-शाळांमधून राबवली गेली असती तर या संस्थांनी सतत मुलांच्या मनांवर लोकशाही श्रेयस्कर असण्याची बाब सतत बिंबवली नसती. सर्व शिक्षण व्यावसायिक केवळ मोकळ्या मानसिकतेने, स्वीकारशील वृत्तीने वागण्यात लोकशाही आणणारे बनले असते. पण असे चित्र पाहायला सापडत नाही, हे आपण जाणतो. लोकशाही या संकल्पनेबद्दल खुली चर्चा होण्याची गरज जितक्या जास्त प्रमाणात जाणवते, हमखास तितक्याच व्यस्त प्रमाणात आपली राजकीय व्यवस्था ही लोकशाहीप्रवण असते.. ज्या लोकांचा आपण तिरस्कार किंवा राग-राग करतो त्या लोकांच्या बाबतीत जर आपल्याला अभिव्यक्तिस्वातंत्र्य ही संकल्पना मान्य नसेल तर मुळातच आपला त्या संकल्पनेवर विश्वास नाहीये, असाच त्याचा अर्थ होतो.’  
‘मी असा युक्तिवाद करतो की, परिषदीय साम्यवाद हे औद्योगिक समाजामध्ये क्रांतिकारी समाजवादाचे सहज स्वाभाविक असे स्वरूप आहे. समानतेवर आधारलेला न्यायपूर्ण समाज जर खरोखरच कधीकाळी अस्तित्वात आला तर जे जीवनमान मी आज उपभोगतो आहे, ते वास्तवात असू शकणारच नाही. असे घडलेच तर खूप मोठय़ा प्रमाणातल्या लोकसंख्येला भौतिक /ऐहिक विवंचनेतून जावे लागेल आणि माझ्या मते त्याला पर्यायच नाहीये.
मालमत्तेचा अधिकार हा इतर अधिकारांसारखा नसतो. (हे मत आधुनिक राजकीय सिद्धान्तांच्या अगदी विरुद्ध टोकाचे असेलही..) मला जर मत व्यक्त करण्याचे अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य आहे तर ते स्वातंत्र्य हे दुसऱ्याच्या मत-स्वातंत्र्याच्या आड येत नाही. पण जर माझ्याकडे मालमत्ता आहे आणि मालमत्ता कमावण्याच्या दुसऱ्याच्या अधिकाराच्या आड जर माझी मालमत्ता येत असेल तर याचा अर्थ असा होतो की, मालमत्तेचा अधिकार हा अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य/ मताधिकारापेक्षा वेगळा आहे. सहजासहजी कुणाला हे पटले नाही तरी, मालमत्ता कमावण्याचा अधिकार हा एक फार वेगळा अधिकार आहे.
ज्यांना उद्याच्या जेवणाची भ्रांत पडली आहे, असे जगण्यासाठी, तसेच तग धरून राहण्यासाठी संघर्ष करणारे लोक हे कुठल्याही बाजूने राजकीयदृष्टय़ा सक्रिय होणे ही अवघड गोष्ट असते. लोकरिवाजापासून ते थेट प्रचार मोहीम या सर्वच जागी सातत्याने लोकांवर एक दबाव असतो. जेणेकरून त्यांच्या मनात हा विचार पक्का व्हावा की आपण अगतिक/ लाचार आहोत. लोकधुरिणांच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी आणि वाटय़ाला आलेले भोग/ उपभोग घेण्यासाठी तेवढी एकच भूमिका त्यांना पार पाडायची असते. ड्रग्ज, गुन्हेगारी, रोजगार आणि सरकारी अनुदानावर जीवन कंठणाऱ्या वेल्फेअर मदर्स, निर्वासित देशप्रवेशी आणि अन्यदेशीय यांची जितक्या जास्त प्रमाणात भीती तुम्ही घालता नागरिकांना तितक्या जास्त प्रमाणात तुम्ही त्यांच्यावर नियंत्रण ठेवू शकता. तशी आपण जर निवडच करायचे ठरवले तर सुखदायी अशा भ्रांतीपूर्ण जगामध्ये आपण आपले संपूर्ण जीवन कंठू शकतो. सत्ता व सामर्थ्यांप्रती लाचारी/ दास्यवृत्ती ही बुद्धिजीवींची परंपराच आहे आणि जर मी तिच्याशी प्रतारणा केली नाही तर माझी मलाच लाज वाटेल.’
क्योटो पारितोषिक पटकावणारे, १९८७ आणि ८९ असे दोन वेळा ऑरवेल अ‍ॅवॉर्ड मिळवणारे, २०११ मध्ये सिडनी पिस प्राईज आणि त्याच वर्षांत कएएए IEEE Intelligent Systems' AI's चे (IEEE संगणक सोसायटीच्या कएएए IEEE Intelligent Systems या विख्यात मासिकाच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा) हॉल ऑफ फेम हा किताब पटकावणारे ते एक ज्ञानवृद्ध, तपस्वी असे भाषाशास्त्री आहेत.
ते सांगतात, ‘भाषा हा मानवाचा अलौकिक असामान्य असा पलू आहे. इतर प्राणी जगताच्या संपर्काच्या रीतींशी तिचे काहीही साधम्र्य नाही. खरोखरच मानवाची भाषा ही एकमेवाद्वितीय अशी बाब आहे. भाषा ही एक मुक्त निर्मितीची प्रक्रिया आहे. भाषेचे काही ठोस सिद्धान्त आणि कायदे असतात. परंतु सृजनशीलतेची तत्त्वे ज्या ज्या प्रकारे वापरात येऊ शकतात त्यावर कुठलेही बंधन किंवा मर्यादा नाहीत. सृजनशीलतेच्या या आविष्कारामधील वैविध्य हे अगणित असते. एवढेच नाही तर शब्दांचा अन्वयार्थ आणि त्यांचा वैविध्यपूर्ण वापर, तसेच त्यातून निघणारे अनेकानेक अर्थाचे पदर यातही मुक्तनिर्मितीची ही प्रक्रिया कार्यरत असते.
आधुनिक व्याकरण (जनरेटिव्ह ग्रामर) ही फक्त कायदे आणि नियमांची एक व्यवस्था असते. ज्यामुळे अगणितरीत्या भाषेच्या विविध पातळीवरील संरचना करण्याचा मार्ग तसेच अधिकार हा ती भाषा वापरणाऱ्याला प्राप्त होतो. या नियमांच्या व्यवस्थेच्या विश्लेषणामुळे आधुनिक व्याकरणाचे तीन महत्त्वपूर्ण घटक हाती लागतात- न्यासमीमांसा (syntactic), शब्दार्थ मीमांसा (semantic) आणि ध्वनिमीमांसा (phonological) हे ते तीन महत्त्वपूर्ण घटक आहेत.’
प्रेम काय आहे अशी विचारणा त्यांना कुणी केली असता त्यांनी उत्तर दिले, ‘मला एवढेच माहीत आहे की, तो एक अत्यंत अतूट असा बंध आहे. परंतु तरीही प्रेम म्हणजे काय, हे मी तुम्हाला नाही सांगू शकत.. प्रेमाविना जीवन ही वस्तुत: एक भयाण पोकळी, एक न भरून येणारी रिक्तता.. एम्प्टीनेस असतो..’
नतिक जबाबदारीविषयी ते असे म्हणतात, ‘अठराव्या शतकातील किंवा मंगळावरील अशा दूरस्थ मीडियाचे आपण काही विश्लेषण करत नाही आहोत. त्रास सोसणाऱ्या आणि मरण भोगणाऱ्या खऱ्याखुऱ्या मानवांशी आपला संबंध आहे. प्रत्यक्षाप्रत्यक्ष आपला सहभाग असणाऱ्या धोरणांमुळे शोषित, पीडित अशा मानवांच्या या व्यथा आहेत. लोकशाहीप्रणीत समाजांचे नागरिक या नात्याने अशा शोषितांची अवस्था सुधारण्यासाठी थेटपणे आपण बांधील तसेच जबाबदार आहोत. आपल्या जबाबदारीस अनुरूप अशी कृती आपल्या हातून होणार नाही, याची पक्की काळजी मीडिया घेते. दु:ख-दैन्यग्रस्तांच्या गरजा नाही तर मीडियातर्फे सत्तेतील धुरिणांचे हितसंबंध हे राखले जातात. अमेरिकन मीडियाची एकवाक्यता आणि आज्ञाधारकपणा याचे कुठलाही हुकूमशहा कौतुकच करेल. सामान्य माणसाची व्यवस्थेने चालवलेली फसवणूक आणि सत्तेच्या हिताच्या दिशेने त्यांची चुचकारणी हे अधिक पक्के होण्यामागे मीडिया ही शक्ती कार्यरत आहे. राज्य हे काही नतिकतेचे प्रेषित नसतात, परंतु मानव असतात. सामथ्र्यशाली संस्थांवरती नतिकतेचे मान प्रस्थापित करण्यासाठी माणसेच अंकुश ठेवू शकतात.’