सर्वकार्येषु सर्वदा Print

संकलन: सुचिता देशपांडे - रविवार १६सप्टेंबर २०१२

वर्तमानपत्राने समाजाचा आरसा तर असावेच लागते. आसपास जे जे अमंगल, अपवित्र आणि अभद्र आहे, ते निसर्गदत्त कर्तव्य म्हणून वर्तमानपत्रास समोर मांडावेच लागते. परंतु या वातावरणातसुद्धा काही मंगल, पवित्र आणि भद्र असेही काही समाजात सुरू असते.  सारेच दीप कसे मंदावले आता, असे वाटत असले तरी सगळय़ाच ज्योती विझु विझु झालेल्या नसतात. अनुदार, असमंजस व्यवस्थेने या पणत्यांना मालवून टाकू नये, ही काळजी घेणे हीदेखील वर्तमानपत्रांची जबाबदारी. ‘लोकसत्ता’चा ‘सर्वकार्येषु सर्वदा’ हा उपक्रम हा याचाच भाग. आपल्यातलेच असे कोणीतरी कोणासाठी तरी भौतिक सुखांचा त्याग करीत झिजत असतात. त्यांना व्यासपीठ मिळावे, समाजातील सदिच्छाधारी, सद्विचारींसमोर त्यांना सादर करावे आणि त्या- त्या कार्यात जमेल
तितका हातभार लावावा, हा त्यामागील विचार. यंदाही आम्ही समाजोपयोगी काम करणाऱ्या अशा दहा निवडक संस्थांचा परिचय गणेशोत्सवाच्या काळात आपणास करून देणार आहोत. या संस्थांचा भार हलका करावा अशी आपलीही इच्छा असणारच. आम्ही केवळ माध्यम. बांधिलकी मानणारे. समाजोन्नतीसाठी दुष्ट प्रवृत्तींचे निर्दालन हे जसे आवश्यक असते, तसेच त्याहूनही अधिक आवश्यक असते सुष्ट प्रवृत्तींचे समर्थन. सर्वकार्येषु सर्वदा.. त्यासाठीच..
गेल्या वर्षीप्रमाणेच याही वर्षी आपला उदंड प्रतिसाद या उपक्रमास मिळो, या अपेक्षेसह..
आपला.. लोकसत्ता परिवार
बाप्पा अगदी हाकेच्या अंतरावर आला आहे.. ‘लवकर या..’चे आर्जव करणाऱ्या भक्तांना ‘हा काय आलोच!’ म्हणत उगी उगी करतोय. भक्त मात्र केव्हाचे ‘काहीतरी शुभवर्तमान घेऊन या लवकर..’ची करुणा भाकताहेत.
..गणेशोत्सवाच्या ११ दिवसांत दैनंदिन कचकच कशी मागे पडते! सजलेल्या दुकानांमध्ये, दर्शनाच्या रांगांमध्ये, ढणाढणा वाजणाऱ्या लाऊडस्पीकरच्या आवाजात विसरल्या जातात दुखऱ्या, ठसठसत्या आठवणी. श्वास कोंडणाऱ्या गर्दीच्या, गुदमरून टाकणाऱ्या ट्रॅफिकच्या, न संपणाऱ्या कामाच्या, जिवाभावाच्या माणसांसाठी काढू न शकलेल्या वेळेच्या, राजकीय-सामाजिक पटावरील सत्तांध गोचीडांच्या! गणेशाच्या त्या गोजिऱ्या रूपात तात्पुरतं का होईना, विसरतो आपण आपले दु:ख, भय, हताशपणा आणि विनवतो गणपतीबाप्पाला, की चांगली बुद्धी दे! सर्वाना सुखी ठेव!
गणेशोत्सवात ‘श्रीं’चे वास्तव्य मनाला सुखावते. धूप, दीप, नैवेद्य, आरास यांत रमून जातो आपण. गणपतीचं कौतुक करावंसं वाटतं याचं कारण- हे सगळं करणं अधिक सोपं आहे. जगण्याच्या दैनंदिन प्रश्नांची उत्तरं शोधण्यापेक्षा सोप्पं! भयग्रस्त माहोल, वाढती अहिष्णुता, वेदनांचे फुटणारे धुमारे- ‘हे सगळं थांबायला हवं, काहीतरी करायला हवं’चा आपला कळवळाही आताशा आटत चाललाय. शांत डोळ्यांनी आपण हे बघतो आणि ‘काय करू शकतो आपण?’ म्हणत खांदे उडवतो. सर्वसामान्यांच्या मनात सलणाऱ्या ‘काय करू शकतो आपण?’ या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न  ‘लोकसत्ता’ गतवर्षांपासून करत आहे. आणि तुमच्या  मदतीच्या हाताने वंचितांच्या आयुष्यात किती मोठ्ठा फरक पडू शकतो, हेही दाखवून देत आहे.. ‘सर्वकार्येषु सर्वदा’ या उपक्रमाच्या निमित्ताने!
१४ विद्या आणि ६४ कलांची देवता असलेल्या श्रीगणेशाचे नाव घेत कुठल्याही शुभकार्याचा आरंभ केला जातो. यालाच अनुसरून गेल्या वर्षी समाजाच्या कानाकोपऱ्यात सुरू असलेल्या समाजोपयोगी संस्थांच्या उत्तुंग कार्याचा परिचय गणेशोत्सवाच्या दहा दिवसांमध्ये ‘सर्वकार्येषु सर्वदा’ या उपक्रमाद्वारे करून देण्यात आला. याअंतर्गत ‘लोकसत्ता’मधून दहा दिवस, दहा संस्थांची सविस्तर ओळख करून देण्यात आली आणि या कामात आपला खारीचा वाटा उचलण्याचे आवाहन वाचकांना करण्यात आले. ‘लोकसत्ता’च्या वाचकांनी या उपक्रमास भरभरून दाद दिली आणि या संस्थांसाठी तब्बल पाच कोटी रुपयांचा निधी जमा झाला. स्पृहणीय काम करणाऱ्या या संस्थांच्या कार्याला यामुळे नवी बळकटी मिळाली.
रोजच्या बऱ्या-वाईट घटनांचे वार्ताकन आणि विश्लेषण करण्यापलीकडे वर्तमानपत्राचे आणखीही उत्तरदायित्व असू शकते, या भूमिकेतून ‘लोकसत्ता’ने हा उपक्रम सुरू केलेला आहे. यामागे समाजभान जपणाऱ्या संस्थांना मदत करू इच्छिणाऱ्या हातांपर्यंत पोहोचविण्याच्या दुव्याची भूमिका ‘लोकसत्ता’ने निभावली. या योजनेअंतर्गत त्या- त्या संस्थांच्या नावानेच मदतीचे धनादेश पाठवण्याचे आवाहन करणारे ‘लोकसत्ता’ हे केवळ ‘माध्यम’ होते.
गतवर्षी निवड करण्यात आलेल्या संस्थांमध्ये वंचितविकास, आरोग्य, शिक्षण, कला तसेच पर्यावरणविषयक काम करणाऱ्या संस्थांचा समावेश होता. त्यांत भटक्या विमुक्त समाजातील मुलांसाठीचे समरसता गुरुकुलम्, कुष्ठरुग्णांसोबतच अपंग आणि वंचितांचे माहेरघर असलेले आनंदवन, पुण्यातील भारत इतिहास संशोधन मंडळ, डॉ. बावीस्कर यांचा संशोधन प्रकल्प, शरीरविक्रय करणाऱ्या स्त्रियांच्या मुलांसाठी कार्य करणारे नगरचे स्नेहालय, देशाच्या अनेक भागांमध्ये काम करणारी वंचित विकास संघटना, भारतीय जलसंस्कृती मंडळ आणि चित्रपटकलेचा वारसा जपणारे प्रभात चित्र मंडळ या दहा संस्थांच्या कामाचे मोल या उपक्रमातून वाचकांसमोर ठेवण्यात आले होते. याही वर्षी ‘लोकसत्ता’च्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’ या उपक्रमात समाजउत्थानासाठी प्रेरक काम करणाऱ्या दहा संस्थांची निवड करण्यात आली आहे. समाजहिताचे विविध उपक्रम राबविणाऱ्या या संस्था म्हणजे एका अर्थी अंधार भेदणारी प्रकाशाची बेटंच आहेत. वंचितांसाठी तसेच कला, विज्ञान, साहित्याच्या संवर्धनासाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या या संस्थांनी आजवर शेकडो लोकांना जगण्याचे बळ पुरवून त्यांच्या जीवनाला दिशा दिलेली आहे. ‘सर्वकार्येषु सर्वदा’ या उपक्रमात या संस्थांच्या कार्याची दखल घेणे म्हणूनच क्रमप्राप्त आहे.
त्यात आपल्या ७० विभागांद्वारे मराठीतून विज्ञानप्रसाराचे काम करणारी मराठी विज्ञान परिषद, निराधार ज्येष्ठ नागरिकांचे हक्काचे घरकुल असणारे खिडकाळी येथील साईधाम वृद्धाश्रम, शास्त्रीय संगीताच्या प्रसारासाठी झटणारी कल्याण गायन समाज संस्था गरजू रुग्णांना मोफत वैद्यकसाधने पुरविणारी ‘रुग्णोपयोगी वस्तुसंग्रह- सोलापूर’, नाशिक येथील भिन्नमती मुलींचा सांभाळ करणारी घरकुल संस्था, पुराचा आघात सोसूनही नव्या उमेदीने पुस्तकांचा सांभाळ करणारे चिपळूणचे टिळक वाचनालय, पाणी-व्यवस्थापनासंदर्भात काम करणारे सोलापूर येथील प्रयोग परिवाराचे विज्ञानग्राम, एचआयव्ही पॉझिटिव्ह मुलांसाठी काम करणारी पुण्यातील मानव्य संस्था, आदिवासींना स्वबळावर उभे करण्यासाठी झटणारे मेळघाट परिसरातील संपूर्ण बांबू केंद्र, धुळ्यातील राजवाडे  इतिहास संशोधन संस्था यांचा समावेश आहे.
अनेक सामाजिक समस्यांचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष संबंध हा समाजात न झिरपलेल्या विज्ञानविषयक जाणिवांशी असतो असे मानले जाते. मराठी भाषेत विज्ञानप्रसाराचे काम करणाऱ्या मराठी विज्ञान परिषदेने केलेले भरीव कार्य लक्षात घेता या संस्थेचा ‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमात समावेश केलेला आहे. १९६६ साली सुरू झालेल्या मराठी विज्ञान परिषदेचे महाराष्ट्रातील विविध भागांसह बेळगाव, निपाणी, गोवा, बडोदा येथील ७० केंद्रांमधून काम चालते. संस्थेच्या उपक्रमांबद्दल माहिती देताना अ. पां. देशपांडे यांनी सांगितले की, क्रमिक शिक्षणाला पूरक ठरतील असे प्रयोगाच्या आधारे विज्ञान शिकवण्याचे अनेक उपक्रम संस्थेतर्फे सुरू आहेत. पर्यावरणप्रेमी दृष्टिकोनातून वस्तूंचा वापर तसेच पुनर्वापराविषयीच्या संकल्पनांचा प्रसार परिषदेतर्फे करण्यात येतो. पाणी, वीज, ऊर्जा-बचत तसेच या स्रोतांचे संवर्धन आदी उपक्रमही संस्थेतर्फे हाती घेतले जातात. वयात येणाऱ्या मुलामुलींना लैंगिक शिक्षण दिले जाते. विद्यार्थ्यांच्या संकल्पनांचा विकास होण्याच्या दृष्टीने विविध उपक्रम संस्थेतर्फे राबवले जातात. दृक्श्राव्य पद्धतीने माहिती, प्रकल्प तयार करणे, प्रकल्प-भेटी, विज्ञान सहल असे उपक्रम वेळोवेळी राबवले जातात. विज्ञानभवनात निरंतर विज्ञान शिक्षण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. संस्थेतर्फे विज्ञान आणि गणित प्रयोग मेळावाही आयोजिण्यात येतो. आकाशदर्शन, विज्ञान खेळणी शिबीर, सूर्यचूल, सूर्यबंब शिबीर, विज्ञानमित्र शिबीर, शहरी शेती शिबीर आदींचे आयोजन करण्यात येते. विज्ञानभवनात विद्यार्थ्यांसाठी प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे. कुठलेही सरकारी अनुदान न घेता विज्ञानप्रसाराचे कार्य करणाऱ्या मराठी विज्ञान परिषदेच्या कार्याचे कौतुक करावे तितके थोडेच.
कलेशिवाय जीवन नाही, याचा साक्षात्कार कल्याण गायन समाजाची कारकीर्द पाहून येतो. ‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमात दखल घेण्यात आलेली ही संस्था शास्त्रीय संगीताच्या प्रसाराचे मोलाचे कार्य करते. १९२६ मध्ये सुरू झालेल्या संस्थेच्या संगीत विद्यालयात आज ३५० विद्यार्थी गायन, वादन आणि नृत्य प्रशिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांकडून माफक शुल्क आकारले जाते. या संस्थेची आजवरची वाटचाल पूर्णत: लोकाश्रयावर सुरू आहे. ‘ना नफा’ तत्त्वावर सुरू असलेल्या या संस्थेचे काम करणाऱ्यांची आज चौथी पिढी तितक्याच निष्ठेने कार्यरत असल्याची माहिती राम जोशी यांनी दिली. १९३६ साली या संस्थेची वास्तू उभारली गेली. कालांतराने जीर्ण झालेल्या वास्तूची तीन वर्षांपूर्वी पुन्हा उभारणी केली गेली. त्यात अद्ययावत तंत्रज्ञानाधारित रेकॉर्डिग स्टुडिओ व अध्यासन सुरू करण्याचा संस्थेचा मानस आहे. संगीतकलेची पूर्णवेळ साधना करण्यासाठी ‘निवासी गुरुकुल’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रमही संस्थेने हाती घेतला आहे.
या उपक्रमात सहभागी करून घेण्यात आलेली आणखी एक संस्था म्हणजे निराधार, वंचित, अपंगांना आसरा देण्यासाठी गीता कुलकर्णी यांनी कल्याण -शीळरोडवर सुरू केलेला साईधाम वृद्धाश्रम. सुरुवातीला या वृद्धाश्रमात तीन वृद्ध होते. आज इथल्या वृद्धांची संख्या ३५ आहे. या वृद्धाश्रमासोबत संस्थेतर्फे मतिमंद, अपंग, परित्यक्त स्त्रियांची जबाबदारीही घेण्यात येते. या आश्रमाच्या रूपाने या उपेक्षित-वंचितांना हक्काचे घर मिळाले आहे. आश्रमातील वृद्धांची नियमित आरोग्य तपासणी आणि औषधोपचार केले जातात, तसेच त्यांच्या मन:स्वास्थ्यासाठी आध्यात्मिक कार्यक्रम केले जातात. परंतु वृद्धांचे जगणे आनंददायी करण्याच्या दृष्टीने आश्रमात आवश्यक त्या अद्ययावत सोयीसुविधा उपलब्ध करण्यासाठी संस्थेला निधीची चणचण भासत आहे.
‘रुग्णसेवेचा भावे प्रयोग’ म्हणून ओळखली जाणारी ‘रुग्णोपयोगी वस्तुसंग्रह- सोलापूर’ ही संस्था १९३२ मध्ये द. प्र. भावे गुरुजींनी सोलापूर येथे आपल्या राहत्या जागेत सुरू केली. विषमज्वर झालेल्या आपल्या भावाला गरिबीमुळे उपचारांकरिता वैद्यकीय साधने प्राप्त होऊ शकली नाहीत, याचा मोठा मन:स्ताप झालेल्या भावे गुरुजींनी आपल्या पगारातील काही रक्कम बाजूला ठेवली आणि त्यातून वैद्यक सेवेसंबंधीची उपकरणे खरेदी करून आसपासच्या गरजूंना ती कोणताही मोबदला न घेता वापरण्याकरता ते देऊ लागले. त्या काळात गरम पाण्याची पिशवी, थर्मामीटरसारखी साधनेही घराघरांत नसायची. घरोघरी जाऊन शुश्रूषा, उपचारपद्धती आणि वैद्यक साधनांविषयी माहिती देणाऱ्या भावे गुरुजींच्या वाटय़ाला सुरुवातीला उपेक्षाच आली. ‘निघाले युरीन पॉट वाटायला!,’ अशा शब्दांत त्यांची थट्टा केली जायची. विनामूल्य पद्धतीने उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या उपचार साधनांसमवेत त्यांनी हळूहळू मोफत होम नर्सिग सुरू केले. १९७७ साली त्यांचे पुत्र रमेश हे पुण्याला स्थायिक झाले आणि पुण्यातही या संस्थेचे काम सुरू झाले. आज या संस्थेचा सोलापूर तसेच पुण्यातही पसारा वाढला असून, पुण्यात संस्थेची चार केंद्रे कार्यान्वित झाली आहेत. पूर्वीच्या साधनांसमवेत आज संस्थेच्या वस्तुसंग्रहात वॉटर बेड, व्हीलचेअर, कुबडय़ा, कमोड खुच्र्या अशा वस्तूंचा तसेच रुग्णवाहिकांचा समावेश झाला आहे. पुणे तसेच सोलापूरच्या पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांसाठीही  संस्थेतर्फे सकस आहार योजना राबवली जाते. डायलिसिसच्या गरजू रुग्णांसाठी संस्थेतर्फे रक्ताचा खर्च उचलला जातो. अलीकडे ज्येष्ठ नागरिक आणि कर्करुग्णांसाठीही संस्थेने मदतकार्य सुरू केले आहे. वयाच्या ९७ वर्षांपर्यंत रुग्णांची सेवा करणाऱ्या भावे गुरुजींचे व्रत आता त्यांचे पुत्र रमेश भावे यांनी सुरू ठेवले आहे.
मदत जितकी गरजू व्यक्ती आणि समाजाला आवश्यक असते, तितकीच वारशाने पुढच्या पिढीपर्यंत पोहोचणाऱ्या ग्रंथसंपदेच्या जतनासाठीही ती गरजेची असते. याच हेतूने धुळ्याच्या इतिहासाचार्य वि. का. राजवाडे संशोधन मंडळाची निवड या उपक्रमासाठी करण्यात आली आहे. साहित्य आणि इतिहासविश्वाला दिशा देणाऱ्या ग्रंथसंपदेची निर्मिती करणारे इतिहासाचार्य राजवाडे यांच्या संशोधनकार्याचा यज्ञ त्यांच्या निधनानंतरही अखंड सुरू राहावा, यासाठी त्यांच्या अनुयायांनी १९२७ साली धुळे येथे इतिहासाचार्य वि. का. राजवाडे संशोधन मंडळाची स्थापना केली. या संस्थेत इतिहासाचार्यानी जमवलेली अमूल्य अशी ग्रंथसंपदा जतन करण्यात येऊ लागली. संशोधन मंडळाच्या संग्रही आज सुमारे सहा हजार ऐतिहासिक हस्तलिखिते आणि ३० हजार दुर्मीळ कागदपत्रे आहेत. या हस्तलिखितांमध्ये बखरी, मध्ययुगीन काव्ये, वैद्यक, ज्योतिषविषयक ग्रंथ, पुराणे, चरित्रे आदींचा समावेश आहे. मराठी आणि संस्कृत भाषेसह हिंदी, फारसी, गुजराती, मारवाडी भाषेतील हस्तलिखितांचा त्यात समावेश आहे. बहुसंख्य कागदपत्रे मोडी लिपीत तसेच फारसी आणि इंग्रजी भाषेतील आहेत. मराठय़ांच्या इतिहासावर प्रकाश टाकणारी सुमारे २० हजारांहून अधिक कागदपत्रे राजवाडे यांनी जमा केली होती. ही ऐतिहासिकदृष्टय़ा महत्त्वाची संपदा आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने जतन करून ठेवणे ही आज काळाची गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हस्ताक्षरातील दुर्मीळ पत्रांचा अमूल्य दस्तावेज संरक्षित करण्यासाठी आज संस्थेला निधीची कमतरता भासते आहे. त्याचप्रमाणे इतिहासाचार्य राजवाडे यांची काही ग्रंथसंपदा निधीअभावी प्रकाशित होऊ शकलेली नाही. सातपुडा पर्वतरांगेच्या सावलीतील धुळे जिल्ह्य़ाच्या परिसरातील आदिवासी कला-संस्कृतीचा अभ्यास तसेच राजवाडे यांनी गोळा केलेल्या असंख्य अप्रकाशित कागदपत्रांचे अध्ययन, या भागातील गावांचा इतिहास या सर्वाचे विधीवत आलेख तयार करावेत यासाठी संस्था प्रयत्नशील असल्याचे संस्थेचे संजय मुंदडा यांनी सांगितले. संस्थेकडे असलेल्या दुर्मीळ ऐतिहासिक छायाचित्रांसाठी संस्थेतर्फे रॉयल गॅलरी उभारण्याचे काम सुरू आहे. संस्थेतर्फे हाती घेण्यात आलेल्या संशोधन प्रकल्पांना आर्थिक मदत उपलब्ध व्हावी यासाठी एका सहकारी बँकेची स्थापना करण्यात आली होती. त्याद्वारे संशोधन मंडळाला मदतही उपलब्ध होत होती. परंतु कालांतराने ही बँक बंद झाली. गेल्या दहा वर्षांपासून आर्थिक मदतीचा स्रोत बंद झाल्याने येथील ग्रंथसंपदेचे जतन आणि प्राचीन वस्तुसंग्रहालयाचे संरक्षण करण्याचे मोठे आव्हान संस्थेसमोर उभे ठाकले आहे.
ज्यांच्याबद्दल मनात कणव दाटून येते अशी भिन्नमती (मेन्टली रिटार्डेट) मुलींना हक्काचे घर उभे करणाऱ्या नाशिकजवळच्या ‘घरकुल’ या संस्थेचाही ‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमात समावेश करण्यात आलेला आहे. भिन्नमती मुलांचा सांभाळ हा त्यांच्या पालकांसाठी खूपच जबाबदारीचा आणि अतीव चिंतेचा विषय असतो. त्यात ते मूल जर मुलगी असेल तर पालकांची जबाबदारी अधिकच वाढते. वयस्कर पालकांना आपल्यानंतर या मुलीचा नीट सांभाळ कसा होणार, ही चिंता पोखरत असते. हे लक्षात घेऊन आर्थिक स्थिती बिकट असलेल्या भिन्नमती मुलांच्या पालकांना मदतीचा हात देण्यासाठी म्हणून ‘घरकुल’ आकाराला आले. नाशिकजवळ विद्याताई फडके यांनी भिन्नमती मुलींसाठी ‘घरकुल’ निवासी योजना सुरू केली. १ नोव्हेंबर २००६ मध्ये घरकुल सुरू झाले तेव्हा तिथल्या मुलींची संख्या चार होती. आज तिथे २५ भिन्नमती मुली राहतात. यापैकी १३ मुलींचा पूर्ण खर्च संस्थेने उचलला आहे. तिथे राहणाऱ्या सात मावश्या या मुलींची काळजी घेतात. या भिन्नमती मुलांच्या शारीरिक-भावनिक आरोग्याची काळजी घेतानाच त्यांना व्यग्र ठेवण्याकरिता विविध उपक्रम संस्थेतर्फे राबवले जातात. मुलींच्या क्षमता लक्षात घेत त्यांना दिवे, मेणबत्ती, चिवडे, चटण्या, लोणची बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात येते. मनोरंजनाच्या दृष्टीने या मुलींसाठी नृत्य थेरपी, योग, प्राणायाम, ध्यानधारणा यांचे प्रशिक्षणही दिले जाते. असे मानले जाते की, भिन्नमती अवस्था हा आजार नसून एक स्थिती असते. घरापासून दूर राहणाऱ्या या मुलींना आपुलकीचे ‘घरकुल’ देणारी ही संस्था पूर्णपणे लोकाश्रयावर सुरू आहे. ही संस्था सध्या भाडय़ाच्या जागेत कार्यरत असून, स्वत:ची हक्काची जागा आणि त्यात मुलींसाठी विविध सोयीसुविधा निर्माण करणे, ही आज संस्थेची निकड असल्याचे विद्याताईंनी सांगितले.
कामाचा असा प्रचंड आवाका असलेली आणखी एक संस्था म्हणजे चिपळूणचे टिळक वाचनालय. १८६४ साली उभारण्यात आलेले हे वाचनालय पुढील वर्षी दीडशे वर्षांचे होईल. लोकमान्य टिळकांची स्वाक्षरी असलेल्या पुस्तकाच्या प्रतीसोबत अत्यंत दुर्मीळ ग्रंथसंपदा व हस्तलिखिते या ग्रंथालयात आहे. २००५ साली या ग्रंथालयात ५८ हजार पुस्तके होती. त्या वर्षी चिपळूणमध्ये आलेल्या महापुरात ग्रंथालयातील ४० हजार पुस्तके वाहून गेली. मात्र, या आघाताने हाय न खाता कार्यकर्त्यांनी अथक मेहनत करून गेल्या सहा वर्षांत ग्रंथालयातील पुस्तकांची संख्या ६३ हजारांवर नेल्याची माहिती संस्थेचे प्रकाश देशपांडे यांनी दिली. पूर्णत: लोकाश्रयावर सुरू असणाऱ्या या जुन्याजाणत्या संस्थेने अनेक महत्त्वाकांक्षी योजना हाती घेतल्या आहेत. ग्रंथालयाची पुनर्उभारणी हे संस्थेचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहेच; त्याचसोबत कोकणचे पर्यावरण, इतिहास, भूगोल, खनिजे, जलसंपदा व मत्स्यविषयक अभ्यासपूर्ण माहिती पुरवणारे कोकण संशोधन केंद्र सुरू करण्याचा संस्थेचा मानस आहे. कोकणसंबंधित संशोधन करणाऱ्या अभ्यासकांसाठी अपरान्त संशोधन केंद्राच्या उभारणीचीही योजना आहे. त्यात संबंधित विषयांच्या सूची आणि संदर्भग्रंथांचाही समावेश असेल. कोकणाशी संबंधित अशा पुरातन वस्तूंचे जतन करण्यासाठी कलादालन सुरू करावे असा संस्थेचा मानस आहे. कोकणच्या दमट हवेत ग्रंथालयातील पुस्तकांचे जतन योग्य पद्धतीने व्हावे यासाठी योजाव्या लागणाऱ्या विविध उपायांसाठीही संस्थेला मोठय़ा निधीची आवश्यकता भासत आहे.
एचआयव्ही- एड्सबाधित मुलांची काळजी घेणाऱ्या पुण्याच्या मानव्य संस्थेच्या कार्याची दखलही समाजाने घ्यायला हवी. ‘मानव्य’ची स्थापना १९९७ साली विजयाताई लवाटे यांनी केली. या संस्थेचा ‘मानव्य गोकुळ’ हा एचआयव्हीबाधित मुलांसाठीचा प्रकल्प पुण्याजवळ वसला आहे. आज या संस्थेत ६३ मुले आणि त्यांची काळजी घेणाऱ्या सहा गृहमाता आहेत. या निवासी प्रकल्पातील या मुलांना चौरस आहार दिला जातो, तसेच त्यांच्यावर औषधोपचार आणि वैद्यकीय तपासणी केली जाते. संस्थेच्या ‘माझी शाळा’ या प्रकल्पाअंतर्गत मुलांच्या कुवतीनुसार त्यांना क्रमिक अथवा व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते. या संस्थेच्या आवारात जिल्हा परिषदेची पहिली ते सातवीपर्यंतची शाळा सुरू करण्यात आली आहे. तिथे ही मुलं शिक्षण घेतात. त्यानंतरच्या शिक्षणासाठी मुलांना बाहेरच्या शाळांमध्ये पाठवले जाते. यंदा संस्थेच्या तीन विद्यार्थ्यांनी कला शाखेतील पदवी शिक्षणाच्या अभ्यासक्रमास प्रवेश घेतला आहे. ‘मानव्य गोकुळ’च्या ‘कृष्णार्पणम् निरामय वैद्यकीय आणि संशोधन केंद्र प्रकल्पा’मुळे संस्थेतील मुलांना त्वरित उपचार उपलब्ध होत आहेत. याचा लाभ परिसरातल्या गावांतील लोकांनाही झाला आहे. गावातील रुग्णांना या प्रकल्पाअंतर्गत अल्प खर्चात वैद्यक तपासणी व उपचार घेता येतात. ‘मानव्य’च्या ‘उमेद मोबाइल क्लिनिक’मुळे १२ गावांतील लोकांना वैद्यक सुविधा त्यांच्या दाराशी उपलब्ध झाली आहे.
‘गरजू आदिवासींकडे याचक या दृष्टिकोनातून बघण्यापेक्षा त्यांना स्वावलंबनाचे धडे दिले तर..!’ या भूमिकेतून मेळघाटात संपूर्ण बांबू केंद्र उभारले गेले. या संस्थेचे काम स्वयंसेवी क्षेत्रात काम करणाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारे ठरावे. आदिवासींच्या कष्टांतून आपल्या प्राथमिक गरजा भागवताना त्यांना मात्र इतरांच्या मदतीवर जगायला लावले जाते. या दुष्टचक्रातून मेळघाटातील आदिवासींची सुटका व्हावी आणि त्यांच्या भोवतालच्या नैसर्गिक संसाधनांसंबंधात योग्य ते प्रशिक्षण देऊन त्यांना स्वत:च्या पायावर उभे करण्याचे संस्थेचे मोठे कार्य मेळघाटात सुरू आहे. मेळघाटात लवादा येथील गावात १९९७ साली सुनील देशपांडे यांनी संपूर्ण बांबू केंद्र उभारले. कुठलेही सरकारी अनुदान न घेता चालविल्या जाणाऱ्या या केंद्रात आदिवासींना बांबूपासून विविध वस्तू बनविण्याचे प्रशिक्षण दिले जाते. यासंबंधी संस्थेने ‘इग्नू’शी संलग्न असे बांबू टेक्नॉलॉजीचे विविध अभ्यासक्रम सुरू केले आहेत. त्याअंतर्गत बांबूच्या सजावटीच्या गोष्टी, फर्निचर, ज्वेलरी, बांधकामाचे सामान बनविण्याचे प्रशिक्षण दिले जाते. बनवलेल्या वस्तू आदिवासी स्वत: विकतात किंवा संस्थेच्या उद्योगशाळेमार्फत या वस्तूंना बाजारपेठ मिळवून दिली जाते. संस्थेतर्फे आजपर्यंत पाच हजारांहून अधिक आदिवासींना प्रशिक्षण देण्यात आले असून बांबूची लागवड, बांबूसंबंधीचे संशोधन प्रकल्पही संस्थेतर्फे हाती घेण्यात आलेले आहेत.
भोपाळकांड झाल्यानंतर २ ऑक्टोबर १९८५ साली युनियन कार्बाइडच्या गेटवर सहा हजार वैज्ञानिकांनी मिळून शपथ घेतली की, ‘हार्ड केमिकल पाथ’ सोडून आम्ही ‘सॉफ्ट एनर्जी पाथ’ विकसित करू. त्यात संशोधक अरुण देशपांडे हेदेखील सहभागी झाले होते. या शपथेनुसार पर्यावरणप्रेमी जगणे स्वीकारण्यासाठी ते दिल्लीहून सोलापूरच्या अंकोली या खेडेगावात वास्तव्याला आले. पुरेसा पाऊस आणि सुपीक जमीन असूनही सोलापूर जिल्हा हा दुष्काळी का, याचे नेमके कारण पाण्याची साठवण करण्याकडे झालेले अक्षम्य दुर्लक्ष हे असल्याचे त्यांच्या ध्यानात आले. या मानवनिर्मित दुष्काळाचे संकट निवारण्यासाठी अरुण देशपांडे यांनी वॉटर बँक योजना सुरू केली. त्यासाठी २६ फूट खोल आणि एक लाख चौरस फुटांचे तळे त्यांनी बांधले. या वॉटर बँकेमुळे यंदाच्या भीषण दुष्काळी परिस्थितीतही प्रयोग परिवारतर्फे वसविण्यात आलेल्या या विज्ञानग्रामात दोन हजार जनावरांना वर्षभर पुरेल एवढे पाणी आणि सावली पुरवता येणे शक्य झाले आहे. अशा वॉटर बँकेतून मिळणाऱ्या मातीतून घरबांधणी होऊ शकते आणि त्याभोवतालच्या दहा गुंठे परिसरात बाग व शेती पिकवता येऊ शकते. अशा एका वॉटर बँकेवर सुमारे ५० कुटुंबे स्वावलंबी बनू शकतात. लुटारू बाजारपेठेकडे जाणारे बहुतांश पाणी थांबवून निर्माण केलेली अशी वॉटर बँक स्वावलंबी व पर्यायाने पर्यावरणप्रेमी जीवन जगण्यास मदत करू शकते, हे अधोरेखित करणारे ‘विज्ञानग्राम’सुद्धा ‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमात समाविष्ट करण्यात आले आहे.
रचनात्मक कार्याद्वारे समाजातील अन्याय, क्रूरता, वेदना, कोंडमारा, विनाशकारी विकास या प्रवृत्तींशी लढा देणाऱ्या आणि वंचितांच्या दु:खावर मायेची फुंकर घालणाऱ्या आणि कलेच्या साहाय्याने जीवन फुलवणाऱ्या अशा या दहा संस्था! त्यांना त्यांच्या वाटचालीसाठी बळ हवे आहे, ज्यामुळे त्यांचे काम अधिक जोम धरेल. आपल्यालाही अनेकदा अशा लोकोपयोगी गोष्टी कराव्याशा वाटतात; परंतु काही कारणांनी त्या करायच्या राहून जातात आणि केवळ आपल्या मनाच्या कोपऱ्यातच उरतात! ‘लोकसत्ता’च्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’ या उपक्रमाच्या निमित्ताने ती संधी आपल्या समोर आली आहे. तुम्ही पुढे केलेल्या मदतीच्या हातामुळे या संस्थांचे काम अधिक उजळून निघेल.. आणि इतरांच्या आयुष्यात ऊर्जा आणि प्रकाश आणणारे तुम्ही सूर्य व्हाल! सर्वकार्येषु सर्वदा!