याज्ञसेनीच्या व्यक्तित्वाचे नवे आयाम Print

प्रा. ललिता गादगे , रविवार, २३ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

मराठवाडय़ातील तरुण लेखक देवीदास फुलारी यांच्या ‘पाच आऱ्यांचं चाक’ या नव्या कादंबरीचे प्रकाशन दिलीपराज प्रकाशनातर्फे अलीकडेच झाले. त्यानिमित्ताने त्यांच्या लेखकीय वाटचालीचा हा वेध..
महाभारत या महाकाव्याचा आधुनिक मराठी वाङ्मयावर प्रचंड प्रभाव आहे. अनादि काळापासून असलेला हा प्रभाव उत्तरोत्तर वाढतच आहे. महाकवी व्यास, वैशंपायनपासून विमलबोध, अर्जुनमित्र, नीलकंठ आवृत्तीपर्यंतच्या प्रवासानंतरही ललित वाङ्मयात प्रतिभासापेक्ष उत्तरोत्तर भर पडतेच आहे. नांदेड येथील तरुण लेखक देवीदास फुलारी यांची ‘पाच आऱ्यांचं चाक’ ही याज्ञसेनीच्या व्यक्तिमत्त्वावर आधारित कादंबरी नुकतीच दिलीपराज प्रकाशनतर्फे प्रकाशित झाली आहे. जाणीव-नेणिवेच्या पातळीवर लेखकाच्या मनात रुंजी  घालणारी याज्ञसेनी वाचकाच्या मनपटलावर देवी म्हणून नव्हे, तर एक आधुनिक स्त्री म्हणून उभी राहते. स्त्रीवादाला अधोरेखित करणारी ही कलाकृती आहे.
परंपरेने चालत आलेली याज्ञसेनीच्या चरित्रातील काही अद्भुतं बाजूला काढून जे घडण्याची शक्यता आहे अन् जे तर्कसंगत आहे, असे घटना-प्रसंग लेखकाने तीत आविष्कृत केले आहेत. या कादंबरीकडे वाचकांनी ललित कलाकृती म्हणूनच पाहावे असा लेखकाचा आग्रह आहे. याज्ञसेनीला तिच्या पाच पतींवरून लेखकाने ‘पाच आऱ्यांचं चाक’ हा संबोध दिला आहे. या पाच आर्याना सोबत घेऊन याज्ञसेनी नावाचे चाक नियती नेईल तिकडे धावू लागले. याज्ञसेनीच्या व्यक्तिमत्त्वाचे निरनिराळे विभ्रम या कादंबरीत आढळतात.
लेखक म्हणून देवीदास फुलारी यांनी सर्वच वाङ्मयप्रकारांत सहभाग नोंदवला आहे. कविता, कथा, कादंबरी, समीक्षा, संपादन आणि बालसाहित्य असे विविधांगी लेखन त्यांनी केले आहे.  ‘अक्षरनारायणी’ आणि ‘वेधांच्या प्रदेशात’ ही त्यांची समीक्षेची दोन पुस्तकं आहेत. ‘अक्षरनारायणी’मध्ये त्यांनी १९८० नंतरच्या काही महत्त्वाच्या आणि विविध प्रकृतीच्या कवयित्रींच्या कवितेविषयी लेखन केले आहे. त्या- त्या कवयित्रीचा संवेदन-स्वभाव नेमकेपणाने ओळखून त्यांच्या कवितेची आस्वादक समीक्षा केली आहे. कवयित्रींची अनुभव घेण्याची पद्धती, त्याला काव्यरूप देण्याची प्रक्रिया आणि अभिव्यक्तीची वेगवेगळी रूपं देवीदास फुलारी यांनी साक्षेपाने उलगडून दाखवली आहेत. कवितेतील सौंदर्याचा स्वत: आस्वाद घेत घेत वाचकांनाही त्यात सहभागी होता येईल असे भावोत्कट विवेचन करणे हे फुलारींच्या लेखनाचे विशेष आहेत. रसिकतेला अभ्यस्तपणाची जोड दिल्याने देवीदास फुलारींचे हे लेखन मोलाचे झाले असून, ते १९८० नंतरच्या मराठी कवितेच्या अभ्यासकांच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त ठरले आहे. ज्येष्ठ समीक्षक रा. ग. जाधव यांनी या पुस्तकावर भाष्य करताना- ‘रसिक मनाने मानुषी कवितेला दिलेला उत्कट प्रतिसाद म्हणजे अक्षरनारायणी होय,’ असे केलेले विधान म्हणूनच महत्त्वाचे ठरते. ‘अक्षरनारायणी’ या पुस्तकात अरुणा ढेरे, प्रज्ञा लोखंडे, अनुराधा पाटील, आसावरी काकडे, संगीता बर्वे, वृषाली किन्हाळकर, मीरा शंकर इ. विविध काव्यप्रकृतीच्या कवयित्रींच्या कवितासंग्रहांवर त्यांनी भाष्य केले आहे.
देवीदास फुलारी यांनी अनेक कवितासंग्रहांना प्रस्तावना लिहिल्या आहेत. ‘वेधांच्या प्रदेशात’ या पुस्तकात त्यांनी मराठवाडय़ातील ५० नवोदितांच्या कविता निवडून त्यांच्या कवितांचा अन्वय लावला आहे. ‘वेध’ या शब्दाचा अर्थ विद्वान करणारा, नवनिर्माण करणारा असा आहे. एका विशिष्ट वळणावर जाणत्या कवीने नवीन कवींची पाठराखण करणे आवश्यक असते. नवोदितांना प्रोत्साहन देणे, दिशा दाखवणे, तसेच प्रसंगी त्याने आगामी धोक्यांचीही पूर्वकल्पना त्यांना द्यावी लागते. त्यामुळे वाङ्मयीन पर्यावरण स्वच्छ, नितळ आणि पारदर्शी राहते. ते तसे असणे समाज आणि साहित्य दोघांच्याही निकोप वाढीसाठी गरजेचे असते.  फुलारी यांच्या ‘अंधांचा   प्रदेश’ या पुस्तकाकडे  या दृष्टीने पाहावे लागेल.
‘राधा’ आणि ‘कविता क्रांतीच्या’ हे त्यांचे दोन कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत. ‘राधा’ या कवितासंग्रहाला डॉ. सुधीर रसाळ यांची अभ्यासपूर्ण प्रस्तावना आहे. या संग्रहातील अधिकाधिक कविता या भावकविता आहेत. एखाद्या संस्कृतीत शतकानुशतके मुरल्यामुळे अनेकांगी, अनेकार्थी बनलेल्या प्रतिमेवरच अशा प्रकारची काव्यनिर्मिती होऊ शकते. ‘राधा’ ही या प्रकारची प्रतिमा आहे. राधा या वैश्विक प्रेमाच्या अमूर्त प्रतीकाचे, विविध पातळींवर व भाववृत्तींच्या सरगमवर उमटणारे तरल, उदासरम्य, अपाíथव सूर फुलारींच्या कवितेत आढळतात. या आविष्काराद्वारे रसिकांच्याही मर्मबंधाचा ते ठाव घेतात. त्यांच्या ‘कविता क्रांतीच्या’ या कवितासंग्रहातील कविता मात्र येथील सामाजिक वास्तव सांगून जातात. परिवर्तनाच्या विचाराला बांधलेल्या या कविता वास्तवदर्शी आहेत. कोणत्याही परिवर्तनाचा प्रदेश मनातून सुरू होतो आणि विचारांइतकाच तो नंतर विस्तृत पावत जातो. एखादी राज्यक्रांती राष्ट्रातच होत असते असे नाही, तर ती एखाद्या गावातही घडू शकते. सरंजामीची स्वरूपं सगळीकडे सारखीच असतात. उलटपक्षी अवतीभवतीच्या अन्यायाशी निकराची झुंज देणं फार अवघड असते. अशा सर्व प्रकारच्या अटळतेला कवी जेव्हा सामोरा जातो तेव्हा तो सुखाच्या साम्राज्याची प्रतीक्षा करणाऱ्या साधारण माणसाला हाक देऊन जागं करण्याचा, धीर देण्याचा परोपरीने प्रयत्न करतो. हा कवी त्याच वाटेने जात आहे.
कवितेबरोबरच त्यांनी किशोरवयीन मुलांसाठीही विपुल लेखन केले आहे. ‘देश जोडण्याचा खेळ’, ‘दुधावरची साय’ आणि ‘वसंतडोह’ या त्यांच्या किशोर कादंबऱ्या प्रकाशित असून, त्यांचा ‘फुलपाखरांचा गाव’ हा बालकवितासंग्रहही आनंदवनात बाबा आमटे यांच्या हस्ते प्रकाशित झालेला आहे.