मृत समुद्र, कुमरान स्क्रोल्स आणि मसादा Print

alt

सुनीत पोतनीस , रविवार  , ३० सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
चेन्नईच्या एका संघटनेबरोबर इस्रायल, जॉर्डन व इजिप्त येथील धार्मिक स्थळे पाहण्यासाठी जायचे ठरले तेव्हा स्थळदर्शनांमध्ये मृत समुद्र व परिसराचा अंतर्भाव होता. या भागाबद्दल मला विशेष माहिती नसल्याने फारसे औत्सुक्य नव्हते.  प्रत्यक्षात तेथे पोहोचल्यावर आपण एका वेगळ्याच विश्वात आल्याची प्रचीती येत होती. मृत समुद्र व त्याच्या परिसरातली जमीन ही पृथ्वीवरील सर्वात खोलवरची म्हणजे समुद्रसपाटीपेक्षा १३३८ फूट खोल जमीन आहे. ‘लोएस्ट लॅण्ड ऑन दि अर्थ’ असे बोर्ड येथे लावलेले आहेत. मृत समुद्र हे एक खाऱ्या पाण्याचे ६७ कि. मी. लांब व १८ कि. मी. रुंदीचे तळे आहे. उत्तरेकडून वाहत येणारी जॉर्डन नदी या समुद्रास मिळते.

पाण्याचा निचरा फक्त बाष्पीभवन होऊन होतो व त्यातले क्षार तसेच शिल्लक राहून त्यांचे प्रमाण ३४ टक्क्यांपर्यंत वाढते. समुद्राच्या तळाशी अर्धा मीटर जाडीचा क्षारांचा थर जमलेला आहे. त्यामुळे समुद्राच्या पाण्याहून हे पाणी आठ पट क्षारयुक्त व जड आहे. मृत समुद्रात पोहणे हा एक मजेदार अनुभव आहे.  काही लोक त्यावर पालथे पडून वर्तमानपत्रे, मासिके वाचताना दिसतात. मृत सुमद्रात डुंबल्यावर बाहेर शॉवर्स घेऊन स्नान करण्याची उत्तम सोय येथे केलेली आहे. बऱ्याच ठिकाणी पाण्यातल्या क्षारांचे स्फटिक तयार होऊन त्याचे रंगीबेरंगी खांब व आकृत्या तयार झालेल्या दिसतात. इथल्या मातीत त्वचारोग बरे होऊन त्वचा सतेज करण्याचे गुणधर्म आहेत. लहान मोठय़ा पाकिटात ही माती भरून पाच ते पन्नास डॉलर्सपर्यंत हा ‘डेड सी मड’ विकणारी अनेक दुकाने येथे थाटली आहेत. प्राचीन काळी इजिप्तमध्ये मृत शरीराची ममी तयार करताना जी रसायने वापरीत, त्यातले प्रमुख रसायन हा ‘डेड सी मड’ असे. राणी क्लिओपात्रा व राणी शिबा या त्यांच्या सौंदर्य प्रसाधनासाठी मृत समुद्रातून ही माती मागवून घेत. क्षारांच्या इतक्या मोठय़ा प्रमाणामुळे इथल्या पाण्यात जलचर जिवंत राहू शकत नसल्याने त्या तळ्याचे नाव ‘डेड सी’ पडले आहे. जॉर्डन व इस्रायलच्या मध्यभागात या मृत समुद्राचे स्थान आहे. इस्रायलच्या बाजूने जेरुसलेमहून मृत समुद्राचा किनारा जवळ आहे. मृत समुद्राच्या भोवतालचा प्रदेश हा ज्युदियन वाळवंटाचा भाग आहे. तेथून अर्धा कि.मी. अंतरावर कुमरान हा टेकडय़ांचा प्रदेश आहे. त्या टेकडय़ांवरील गुहांमध्ये इ.स.पूर्व दुसऱ्या शतकापर्यंत ‘एसिन’ या ज्यूंच्या पंथांचे अत्यंत कर्मठ, व्रतस्थ संन्यासी रहात असत. इ.स. ७० मध्ये रोमन लोकांनी या प्रदेशावर कब्जा केल्यावर हे एसिन लोक आपले धर्मग्रंथ (चर्मपत्रांवर लिहिलेले व त्याच्या गुंडाळ्या म्हणजेच स्क्रोल्स) घेऊन मृत समुद्राच्या जवळच असलेल्या मसादा या डोंगरी प्रदेशात रहावयास गेले. या कुमरान प्रदेशातील मोठय़ा टेकडय़ांवरील गुहा या अलीकडे पर्यटकांचे मोठे आकर्षण झाले आहे. त्याचे कारण म्हणजे या कुमरान गुहांमध्ये सापडलेल्या चर्मपत्रांच्या गुंडाळ्या. या गुंडाळ्यांमुळे बायबलच्या जुन्या करारातील बहुतेक घटनांची सत्यता पडताळून पहाता आली. या गुंडाळ्या पुढे डेड सी स्क्रोल्स किंवा कुमरान स्क्रोल्स म्हणून प्रसिद्ध झाल्या. हल्ली हे स्क्रोल्स जेरुसलेम व न्यूयॉर्क येथील म्युझियममध्ये ठेवलेले आहेत.  या भागात पूर्वी बेदवीन या भटक्या मेंढपाळ जमातीची वसती होती. १९४७ साली एक मेंढपाळ आपल्या हरवलेल्या मेंढराचा शोध घेत घेत या कुमरान गुहांमध्ये पोहोचला. एका गुहेत त्याला ते मेंढरू एका मोठय़ा माठाशेजारी उभे असलेले दिसले. त्या माठात काही चामडय़ांच्या गुंडाळ्या होत्या. मेंढपाळ तो माठ घेऊन घरी आला व त्याच्या वडिलांना त्याने alt

दाखविला.  त्यांनी शेजारच्या बेथलहॅम शहरात जुन्या भंगार वस्तूंच्या दुकानात माठासहित ते विकून चार पसे मिळविले. प्रा. सुकेविक व सॅम्युएल यांना हे कळल्यावर त्यांनी त्या दुकानातून ते स्वस्तात विकत घेतले. त्या माठात एकूण सात स्क्रोल्स होते. सॅम्युएल यांनी चार स्क्रोल्स १९४९ साली अमेरिकेतले धनाढय़ ज्यू गोटस्मन यांना अडीच लाख डॉलर्सना विकले. नंतर गोटस्मन व प्रा. सुकेविकचा मुलगा यादीन यांनी ते सात स्क्रोल्स इस्त्रायल सरकारला भेट म्हणून दिले. आता ते जेरुसलेम म्युझियममध्ये आहेत. या स्क्रोल्समधले लिखाण व बायबलची संहिता मिळती जुळती असल्याने बायबलच्या खरेपणावर शिक्कामोर्तब झाले. यानंतर कुमरानच्या इतर अकरा गुहांमध्ये लहान मोठे १५,००० स्क्रोल्स मिळाले. त्यापकी २९ फूट लांबीचा ‘टेम्पल स्क्रोल’ सर्वात मोठा आहे. काही गुहांमध्ये सापडलेले रिकामे माठ इथे ठेवलेले आहेत. कुमरान टेकडय़ांच्या पायथ्याला लागून मृत समुद्राला समांतर रस्त्यावरून थोडे पुढे गेल्यास डोंगर पठारावर मसादा हे स्थान आहे. इथे दोन हजार वर्षांपूर्वीच्या राजा हेरॉड याच्या राजवाडय़ाचे अवशेष सापडले आहेत. मसादाला जाण्यासाठी डोंगराच्या पायथ्यापासूनच वर रोपवेची व्यवस्था केली आहे. शेवटचा टप्पा लोखंडी जिन्याने चढावा लागतो. दोन हजार वर्षांपूर्वी स्वातंत्र्यासाठी ९६० ज्यू लोकांनी केलेल्या बलिदानामुळे मसादा हे स्थळ साऱ्या इस्त्रायलसाठी एक स्फूíतस्थान बनून राहिले आहे. ख्रिस्ताचा समकालीन व रोमनांचा मांडलिक राजा हेरॉड याने स्वत:साठी अभेद्य असा किल्ला व त्यात राजवाडा बांधून तो नऊ पत्नींसोबत तिथे रहात असे. हेरॉडच्या मृत्यूनंतर रोमन सन्याने जेरुसलेम येथील ज्यूंचे प्रसिद्ध मंदिर उद्ध्वस्त करून टाकले. ज्यूंची अतिरेकी संघटना ‘झिलट’च्या लोकांनी इ.स. ६६ च्या ऑक्टोबर महिन्यात मसादा किल्ल्याचा आश्रय घेतला. जेरुसलेममध्ये रोमन सेनापतीने हजारो ज्यूंनाच गुलाम करून टाकल्याने ज्यूंच्या स्वातंत्र्यलढय़ाचा वणवा चांगलाच पेटला होता. झिलट संघटनेचे एकूण ९६० स्त्री-पुरुष मसादावर राहून संघटनेचे काम करीत आहेत, हे कळल्यावर रोमन सुभेदाराने इ.स. ७० मध्ये मसादाला वेढा घातला. वरून होणाऱ्या दगडांच्या वर्षांवामुळे त्यांना डोंगरावर चढता येईना. मग रोमन सुभेदाराने किल्ल्याच्या पश्चिमेला ३०० फूट उंचीचा लाकडी फलाट उभा केला व त्यावर दगडाचा चौथरा बांधला. तेथून शिखर आता जवळ म्हणजे दोनशे फुटांवर होते. चौथऱ्यावर उभे राहून रोमन सन्याने गोफणीने दगड व बाण मारून व जळते पलिते मारून सायंकाळपर्यंत िभतीला मोठी भगदाडे पाडली. रात्री युद्धविराम होता. किल्ल्यातल्या ९६० झिलट सदस्यांच्या लक्षात आले की, आता काही आपला निभाव लागत नाही. सकाळी रोमन सन्य किल्ल्यात प्रवेश करून एकतर आपले शिरकाण करतील किंवा आपल्याला गुलाम करतील. सर्वाशी विचारविनिमय करून त्यांचा नेता एलझार याने आपण व आपल्या कुटुंबीयांची विटंबना करून घेण्यापेक्षा सर्वानी बलिदान करण्याचा निर्णय घेतला. प्रथम एलझारने अखेरचे अत्यंत ओजस्वी भाषण केले.  नंतर त्यांनी चिठ्ठय़ा टाकून दहा जणांची नावे काढली. त्या दहा जणांनी उरलेल्या सर्वाचा शिरच्छेद केला. त्यानंतर उरलेल्या दहामधून परत चिठ्ठय़ा टाकून एकाची निवड केली. त्याने बाकीच्यांचे शिर धडावेगळे करून मग स्वत:ची तलवार आपल्या पोटात खुपसून बलिदान केले. रोमन सनिक सकाळी किल्ल्यात आले तेव्हा सर्वत्र प्रेतांचा खच व राख पाहून परत गेले. रोमन अधिकाऱ्यांनी फ्लावियस या इतिहासकाराला ही घटना सांगितली व त्याने तसे लिहून ठेवलेले आहे. हे स्थळ आता सर्व इस्त्रायलसाठी स्वाभिमानाचे प्रतीक बनले आहे. मसादा म्हणजे स्वातंत्र्यासाठी बलिदानाची गाथा बनली आहे. ‘मसादा श्ॉल नॉट फॉल अगेन’ हे आता एक घोषवाक्य तयार झाले आहे. आता सध्या मसादाच्या पठारावर किल्ल्याची तटबंदी, स्नानगृहे, सिनगॉग, पाण्याचे कुंड, राजवाडय़ाच्या िभती शिल्लक आहेत. इथे झालेल्या उत्खननात कवटय़ा, प्रार्थनेचे स्क्रोल्स, पहिल्या शतकातली नाणी व सर्वात महत्त्वाचे म्हणजे बायबलच्या चर्मपत्रांचे तुकडे सापडले आहेत. मृत समुद्र, कुमरान व मसादाच्या परिसरात िहडताना काहीतरी विचित्र गूढता जाणवत होती. जणू काही कुमरानच्या गुहा, मसादाचे अवशेष साद देऊन बोलवत होते व सांगत होते की यापेक्षाही इथे आणखी काही बरेच घडले आहे!