सहज स्वरात.. मनातलं! Print

alt

रविवार  , ३० सप्टेंबर २०१२
दूरचित्रवाहिन्यांवरील रिअ‍ॅलिटी शोमुळे लहान वयातच मुलांना आज नको इतकी प्रसिद्धी आणि पैसा मिळत आहे. या रिअ‍ॅलिटी शोज्बद्दल कलाकारांमध्ये अनेक मत-मतांतरे असली तरी एका रात्रीत तरुणाईला मिळणारे हे यश अल्पजीवी ठरते आहे. या पाश्र्वभूमीवर आघाडीचे संतूरवादक उल्हास बापट यांनी कलाकार व संगीतप्रेमींसाठी केलेले हे मुक्त चिंतन..
आपल्या शास्त्रीय वाद्यसंगीतात बरीच वाद्यं आपापलं वेगळेपण टिकवून आहेत. पण तरीसुद्धा ज्याच्या नुसत्या झंकाराने आकाशातून असंख्य चांदण्यांचा सडा पडल्याचा भास होतो किंवा ज्यामधून निघणाऱ्या स्वरलहरी क्षणभरातच आपल्याला निसर्गाच्या समीप घेऊन जातात, असे एकमेव वाद्य म्हणजे ‘संतूर’.

अशा या वाद्याने मला नुसतेच आपलेसे केले असे नसून माझ्यातील ‘सत्त्व’ आणि ‘स्वत्व’ विकसित करून मूलत: माझ्यात असलेल्या संशोधक प्रवृत्तीला प्रोत्साहन देऊन अवघड, पण तात्त्विकदृष्टय़ा योग्य अशी ‘क्रोमॅटिक’ टय़ुनिंग पद्धती आणि संतूरवर ‘मींड’चा यशस्वी प्रयोग, या दोन्ही गोष्टी श्रोत्यांपुढे सादर करण्याचे भाग्य मला मिळाले.
माझ्या सांगीतिक आयुष्याची सुरुवात ‘तालातच’ झाली! वयाच्या पाचव्या वर्षांपासून तबल्याचे शिक्षण सुरू झाले. पुढे गाणे, व्हायोलिन, हार्मोनियम वगैरे सर्वागीण दृष्टिकोन वाढत गेला. संगीताचे प्राथमिक शिक्षण वडिलांकडे झाले. पण तांत्रिकदृष्टय़ा Selftanght असल्याने संतूर टय़ुनिंगची, सादरीकरणाची स्वतंत्र पद्धत विकसित झाली. रेकॉर्डिगसाठीसुद्धा बोलावणी यायला लागली. स्वत:च्या आनंदासाठी आणि अभ्यासासाठी माझ्या तबल्याच्या गुरुजींना- पं. रमाकांत म्हापसेकरांना विनंती करून ताडदेवच्या शशांक लालचंद यांच्या स्टुडिओत एका कॅसेटचे ध्वनिमुद्रण करून पाहिले. त्यावेळचा एक विलक्षण अनुभव सांगण्यासारखा. या संस्थेचे सचिव आमच्या कौटुंबिक परिवारापैकी एक होते. त्यांना ती ध्वनिमुद्रित कॅसेट ऐकवली. त्यात ‘रागेश्री वाचस्पती’ आणि ‘पहाडी’ धून होती. त्यांना अतिशय आवडली. ऐकल्या ऐकल्या लगेचच त्यांनी विचारले, ‘आमच्या संस्थेच्या Young Artist Festival मध्ये कार्यक्रम करशील का?’ मी आनंदाने ‘हो’ म्हटले. त्यांचा पुढचा प्रश्न व माझ्या उत्तरावरील त्यांची प्रतिक्रिया धक्कादायक होती. ‘संतूर कोणाकडे शिकलास?’
‘नाही, मी कोणाकडे शिकलो नाही.’
त्यावर त्यांची प्रतिक्रिया, ‘मग कसा कार्यक्रम ठेवणार? आम्हाला कोणाचा शिष्य ते लिहावे लागते.’ त्या सद्गृहस्थांनी माझा कार्यक्रम नाही ठेवला. वास्तविक माझे वादन ऐकून त्यांनी कार्यक्रमाची विचारणा केली होती. मी कसा वाजवितो यापेक्षा माझ्यामागे कोठल्यातरी ‘खाँ’ साहेबांचं नाव हवं होतं. वाजवणे ‘सुमार’ असले तरी चालेल! पुढे तीन वर्षांंनंतर  झरीन दारुवाला (सरोद) यांचे शिष्यत्व पत्करल्यानंतर त्या संस्थेत कार्यक्रम झाला, हे वास्तव आहे.
त्याच सुरुवातीच्या काळात आणखी एक भाग्याचा काळ असा, की प्रसिद्ध संगीतकार,गझल गायक व शिक्षक पं. के. महावीर यांच्या संगीत संयोजनाखाली ‘कुमार संभव’ या नृत्यनाटय़ाच्या ध्वनिमुद्रणात वाजविण्याची संधी मिळाली. संपूर्ण शास्त्रीय संगीतावर आधारित या नृत्यनाटिकेत ९, ११, १५ असे अवघड ताल वेगवेगळ्या रागांत वाजवायला मिळाले. ती एक मोठी परीक्षाच होती.
सुरुवातीपासूनच शास्त्रीय संगीत हे मुख्य ध्येय आणि रेकॉर्डिगमध्ये वाजविणे ही आवड. म्हणूनच दोन्ही क्षेत्रांतला समतोल राखून मी माझ्या अनुभवात भर टाकत गेलो. एकदा एका महाशयांनी विचारले, ‘तुम्ही सिनेसंगीत आणि शास्त्रीय संगीत दोन्ही वाजविता. दोन्हीमधील कोठले क्षेत्र श्रेष्ठ आहे?’ आपल्याकडे साधारणपणे सिनेसंगीताला कमी लेखण्याची पद्धत आहे. माझे मत प्रत्यक्ष दोन्ही क्षेत्रांत काम करीत असल्यामुळे वेगळे आहे.
शास्त्रीय संगीताचा तुम्ही सदैव ‘रियाझ’ करीत असता. तुम्ही सादर करीत असलेला राग तुम्ही उत्तमच सादर केला पाहिजे. निदान तुमचा प्रयत्न तसा पाहिजे. ‘सिनेसंगीतात’ या विरुद्ध आहे. संगीतकाराच्या रचनेप्रमाणे अत्यंत कमी वेळात जास्तीत जास्त परिणामकतेने  तो संगीताचा समूह आपल्याला वाजवावा लागतो. त्यात हल्लीच्या मागणी प्रमाणे Tonal Quality सांभाळावी लागते. योग्य ठिकाणी, योग्य वजनाने तालाला चिकटून, सुरांत तो पीस वाजवावा लागतो. माझे वैयक्तिक मत.. सिनेसंगीताच्या ध्वनिमुद्रणात वाजविणे काकणभर अवघडच आहे!
या सिनेसंगीतात वाजविण्याचा एक मोठा फायदा झाला. मला ‘समयाचे’ बंधन पाळता येऊ लागले. मला जर कोणी साडेबावीस मिनिटे आलाप करायला सांगितले, तर २३ व्या मिनिटाला माझे वादन संपलेले असेल!
वेगवेगळ्या संगीतकारांबरोबर काम करताना त्या प्रत्येकाचा दृष्टिकोन हाताळण्याची संधी मिळाली. शास्त्रीय संगीत सादरीकरणात याचा खूप उपयोग झाला. मन सदैव ताजे राहते. मी स्वत: पुनरावृत्ती टाळण्याचा नेहमीच प्रयत्न करतो. परदेश दौऱ्यावर साधारणपणे १८-२० कार्यक्रम होतात. सर्वसाधारणपणे कार्यक्रमाची वेळ सायं. ७-७।। ची असते. तुम्ही कितीवेळा तेचतेच राग वाजविणार? मी नेहमी कार्यक्रम झाल्यावर रागाची नोंद ठेवतो. जर राग पुन्हा वाजवायची वेळ आलीच तर ‘ताल’ बदलतो. पण हे सर्व माझ्यासाठी. वास्तविक कॅनडामध्ये ३००-४०० मैलांवर वेगळ्या गावात तोच राग वाजवला तर काय फरक पडतो? पण ही माझी वैयक्तिक सवय! एका खूप मोठय़ा कलाकाराच्या दौऱ्याचे त्यांच्या साथीदारांनी नाव ‘जयजयवंती दौरा’ असे ठेवले होते. कारण बहुतेक ठिकाणी त्यांनी ‘जयजयवंती’ च गायला होता. हे माझे सर्व निरीक्षण माझ्या स्वत:साठी, शिकण्यासाठी होते.  झरीन दारुवाला आणि पं. वामनराव सडोलीकर यांसारख्या मोठय़ा ‘दिग्गज’ कलाकारांकडेही शास्त्र शिकायला मिळाले. मी संतूरच्या दृष्टीने Instrumentation करून घेत होतो. पं. गिंडेसाहेबांनी मला ‘धानी’ राग एक वर्षभर शिकवला. मी कधीही तक्रार केली नाही. मागणीही केली नाही. मला त्या एकाच रागातून बरेच काही मिळत होते. गुरूने शिष्याला ‘दृष्टी’ द्यायची असते. शिष्याने गुरूचा ‘दृष्टिकोन’ घ्यायचा असतो. त्या एकाच रागाच्या आलापीमधून मला आलापी करण्याचे अनेक रस्ते सापडले. आरोह आणि अवरोहात रागाकडे बघण्याची त्यांची पद्धत मला भावली अन् मला सुचलं; ‘विद्या’ या शब्दाकडे प्रत्येकाने, दोन्हीकडून पाहावे अन् ‘विद्या’ द्यावी. हे व्रत घ्यावं! व्यासपीठावर ‘उस्ताद’ असावं, पण एरवी सदैव विद्यार्थी असावं. म्हणजे प्रगतीचे रस्ते स्वत:हून आपल्याला बोलवतील. ‘विद्यार्थिदशा’ जर आयुष्यभर सांभाळली तर ‘कलाकार’ म्हणून आपली ‘दशा’ कधीही होणार नाही यावर माझा विश्वास आहे.
ध्वनिक्षेपकाचा आवाज जास्तीत जास्त मोठा करणे हा बहुदा बऱ्याच कलाकारांना झालेला संसर्गजन्य रोग आहे. श्रोत्यांच्या ‘कानाचा’ विचार न करता आवाज जास्तीत जास्त मोठा करण्याची स्पर्धा मुख्य कलाकार व साथीदार यांच्यात सुरू असते. याचा अतिरेक एवढा होतो, की संगीत ‘कान देऊन ऐकण्यापेक्षा’ आपले कान कोणाला तरी देऊन (!) कार्यक्रम ऐकावेसे वाटते. रंगभवनमध्ये एका मोठय़ा सितारवादकाच्या कार्यक्रमात तबला साथीदाराचे अन सितारवादकाचे शिष्य किंवा हितचिंतक; सोप्या शब्दांत त्यांना ‘चमचे’ म्हणता येईल, त्या दिवशीच्या ध्वनिसंयोजकाला अक्षरश: दोन्हीकडून ‘साऊंड’  वाढविल्याबद्दल ‘छळत’ होते हे मी प्रत्यक्ष अनुभवले आहे. त्या दिवशी त्या माणसाला कंबरेला दोनही बाजूनी ‘खळ्या’ पडल्या असाव्यात!
हळूहळू आवाजाचे रुपांतर गोंगाटामध्ये किंवा Music चे Noise मध्ये व्हायला लागले आहे. आनंदाचे वेगवेगळे प्रकार असतात, चांगले काव्य किंवा वाङ्मय वाचायला मिळणे, क्रिकेटची मॅच पाहणे, सर्कस पाहणे, आवडते चित्रपट किंवा नाटक बघायला मिळणे, उत्तम कलाकाराचे वादन किंवा गायन ऐकणे हे सर्व आनंदाचे वेगवेगळे प्रकार असू शकतात. पण विशेष करून असे बऱ्याच वेळा अनुभवास येते की वादनाच्या कार्यक्रमात ‘सर्कशीचा’ आनंद मिळतो.
जुगलबंदीचा अर्थ श्रोत्यांना कळेनासा झाला आहे. वास्तविक खऱ्या अर्थाने जुगलबंदी ही दोन प्रमुख वाद्यांची होऊ शकते. तबला हे साथीचे वाद्य आहे. मोठय़ा मोठय़ा कार्यक्रमांत श्रोत्यांची प्रतिक्रिया अशी असते, ‘संतूर - तबल्याची’ किंवा ‘सितार-तबल्याची’ जुगलबंदी काय रंगली होती! संतूर-बासरी, संतूर-सितार, संतूर-सरोद किंवा अगदी पाश्चात्त्य गिटार सुद्धा असेल; पण एकाच कुटुंबातील वाद्याची जुगलबंदी होऊ शकते तेव्हा तबला हे फक्त साथीचे वाद्य असते. याशिवाय प्रामुख्याने तबला- पखवाज, तबला - मृदंगम्, तबला - ढोलकी; फार काय, तबला-ड्रम्सची सुद्धा जुगलबंदी परिणामकारक आणि प्रबोधनात्मक होऊ शकते. पुन्हा तसेच, एकाच कुटुंबातील चर्मवाद्यांची जुगलबंदी आनंददायी असू शकते.
सध्या कार्यक्रमाची उंची वाढण्यापेक्षा ‘रुंदी’ वाढत आहे! म्हणजे व्यासपीठावर नुसत्याच तबल्याऐवजी पखवाज घेण्याची प्रथा रूढ होत चालली आहे. एकही कलाकार पखवाज घेऊन त्यायोग्य ताल वाजवत नाही. त्याचा उपयोग फक्त ‘साऊंड’ने श्रोत्यावर छाप पाडण्यापुरता होतो. अन् मग सगळ्यांची मिळून आदळ-आपट, एकमेकांशी झटापट; शेवटी एकदाची तिहाई, ती सुद्धा ३x३=९, ९x३=२७, २७x३=८१.. शांततेपूर्वीचे वादळ (!) अन मग श्रोत्यांचा अंत पाहिल्यावर आदळलेली- लादलेली सम! टाळ्यांच्या आवाजात सुस्कारा सोडल्याचे आवाज विरून जातात. काळजी एवढीच वाटते, की ‘शुद्ध कला’ सादरीकरणाच्या ऐवजी अनावश्यक गोष्टींचा (playing for the Gallarg) पगडा जर वाढत गेला तर आपल्या शास्त्रीय संगीताचा स्तर कोठे राहील? केस वाढल्याशिवाय कलाकार होता येत नाही. विशेष म्हणजे तबला वाजवता येणार नाही, ही बहुदा विद्यार्थाची समजूत झाली असेल.‘धीरधीर’ झकास  मान जोरात हलवून केस उडवण्याचा सुद्धा ‘रियाझ’ करावा लागतो अशी नक्की समजूत झाली असेल. त्यापेक्षा असे वाटते, की थोडा ‘धीर’ धरा, रियाझ करा, यशस्वी व्हा!
मला मुळीच आश्यर्च वाटणार नाही जर एखाद्या दिवशी एखादा पालक मुलाला घेऊन तबल्याच्या क्लासमध्ये प्रवेश घेण्यासाठी गेला अन् त्याने जर विचारणा केली, ‘माझ्या मुलाला प्रवासी बॅगेवर किंवा लाकडी बॉक्सवर वाजवायचे बोल शिकवाल का?’
श्रोते घडविणे किंवा बिघडविणे ही पूर्ण आम्हा कलाकारांची जबाबदारी आहे. केवळ ‘टाळ्यांच्या’ मागे धावणे प्रत्येकाने ‘टाळायला’ पाहिजे. श्रोत्यांनाही कळकळीची विनंती, चुकीच्या ठिकाणी दाद देऊ नका. ‘गीमिक्स’ला प्रोत्साहन देऊ नका. त्याने कलाकाराची दिशाभूल होते. खरे म्हणजे ही आपल्या सर्वाचीच जबाबदारी आहे. संयोजक, कलाकार, साथीदार आणि सर्वात महत्त्वाचे ‘श्रोते’, आपल्या संगीताचा स्तर खाली जाऊ न देण्याची...