गुंतवणूक, गुंतवणूक आणि गुंतवणूकच! Print

सोमवार, १७ सप्टेंबर २०१२
केवल तीन चीजों से देश चलता है -
गुंतवणूक, गुंतवणूक आणि गुंतवणूकच..
देशाची अर्थव्यवस्था केवळ या तीन गोष्टींवरच चालते, हेच ‘विकासोन्मुख भारता’चे दिग्दर्शक डॉ. सिंग यांनी दाखवून दिले आहे.
रिटेल, हवाई, प्रसारमाध्यम आणि ऊर्जा वायदे बाजार यांमधील विदेशी गुंतवणूक मर्यादा वाढविण्यात आल्याने देशात आता सर्वत्र केवळ गुंतवणुकीचे वातावरण ‘प्रदर्शित’ होणार आहे. सार्वजनिक उपक्रमातील कंपन्यांच्या निर्गुतवणूक धोरणानेही आपला ‘कर्टन रेजर’ शुक्रवारी भांडवली बाजारात दाखवून दिलाच आहे. तेव्हा येती दोन ते तीन वर्षे ही सरकारच्या चालू खात्यातील वित्तीय तूट भरून काढण्यास निश्चितच हातभार देणारी ठरतील. शिवाय विदेशी गुंतवणुकीचे क्षितिज विस्तारल्याने विविध क्षेत्रांमध्ये पसरणारा सुबत्तेचा सूर्यप्रकाश असा असेल -
रिटेल
एका अंदाजानुसार सध्या ६ % असणारे संघटित विक्री क्षेत्र येत्या तीन वर्षांत १,५०० कोटी डॉलरचे होऊ शकेल. विदेशी गुंतवणूक खुली झाल्यामुळे नवनव्या आंतरराष्ट्रीय कंपन्या भारतात येतील. यामुळे खाद्यान्नसह अन्य वस्तूंचा दर्जा सुधारून स्पर्धेपायी त्यांच्या किमतीही कमी होतील. शिवाय अर्थव्यवस्थेला वाढीव रोजगाराची जोडही मिळेल. पुरवठा व्यवस्थेत मोठी गुंतवणूक, शेतक ऱ्यांना मध्यस्थाविना शेतमालाचा योग्य भाव, वाणिज्य बांधकाम करणारे विकासक ही उद्योगक्षेत्रेही उजळून निघतील.

मल्टी ब्रॅण्ड वॉलमार्ट
मूळ देश : अमेरिका
दालनांची संख्या : ९,८००
कर्मचारी संख्या : २० लाख

टेस्को
मूळ देश : ब्रिटन
दालनांची संख्या : ५,३८०
कर्मचारी संख्या : ४.७ लाख

सिंगल ब्रॅण्ड एच अ‍ॅण्ड एम
मूळ देश : स्वीडन
दालनांची संख्या : २,३००
कर्मचारी संख्या : ८७,०००
विविध ४१ देशांमध्ये वस्त्र आदी तयार उत्पादनांची विस्तारित शृंखला.

आयकिया
मूळ देश : स्वीडन
फर्निचर आणि होम फर्निचरमध्ये अस्तित्व असलेल्या कंपनीची जानेवारीपासूनच भारतात धडपड.

हवाई वाहतूक
आर्थिक चणचण भासणारी किंगफिशर तर छोटय़ा चणीच्या स्पाइस जेट, गोएअर यांना विदेशी गुंतवणूकदारांचा हात मिळेल. आर्थिकदृष्टय़ा सशक्त विमान वाहतूक कंपन्यांमुळे प्रवाशांना माफक दरात अधिक पर्याय उपलब्ध होतील. इथिहाद, एमिरेट्स, ब्रिटिश एअरवेज, लुफ्तान्सा, सिंगापूर एअरलाइन्स या विदेशी हवाई कंपन्यांना भारताच्या आसमंतात ठोस हिस्सा घेता येईल.
विदेशी गुंतवणूक यांना हवी :
किंगफिशर एअरलाइन्स, स्पाइसजेट, गोएअर.
डॉलर ओतण्यास हे तय्यार :
कतार एअरवेज, इथिहाद इंट.

निर्गुतवणूक
ऑइल इंडिया, नाल्को, हिंदुस्थान कॉपर, एमएमटीसीतील हिस्सा कमी होत असल्यामुळे सरकारच्या तिजोरीत १५,००० कोटी रुपयांची भर तर पडेल. शिवाय ‘सेन्सेक्स’ पुन्हा एकदा त्याच्या २१ हजारांच्या ऐतिहासिक शिखराची उंची अनुभवण्याची स्वप्ने पाहू शकेल.

प्रसारण माध्यम
सध्या केवळ मोठय़ा आकारातील डिशसाठी लागू असलेली ७४ टक्क्यांपर्यंतची विदेशी गुंतवणूक मर्यादा आता डीटीएचसह केबल टीव्ही, मोबाइल टीव्हीसाठीही अमलात येणार आहे. याचा लाभ टाटा स्काय, बिग (रिलायन्स), व्हिडिओकॉन या कंपन्यांना होईल. वृत्तवाहिन्या, एफएम रेडियोसाठीची २६ टक्के मर्यादा कायम आहे.

ऊर्जा वायदे बाजार
भारतात सध्या दोनच ऊर्जा वायदे बाजार आहेत,  ते म्हणजे, पॉवर एक्स्चेंज इंडिया आणि इंडियन एनर्जी एक्स्चेंज. या दोहोंमध्ये ४९ % पर्यंत विदेशी संस्थागत गुंतवणूक वाढविण्यास परवानगी देण्यात आली आहे. यामुळे येथील व्यवहारातील स्पर्धा अधिक तीव्र होईल. शिवाय ऊर्जा इंधन दर कमी होण्यास त्यामुळे मदत होईल.