बाजाराचे तालतंत्र : तेजीचे भरते आनंदोत्सवाची पर्वणी Print

सी. एम. पाटील, सोमवार, १७ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

जसे अंदाजण्यात आले होते तसे गेल्या आठवडय़ात निफ्टी निर्देशांकाने ५६०० च्या दिशेने धडाक्याने कूच केली. आठवडाभर तेजीवाल्यांनी बाजारावर अधिराज्य गाजविले आणि त्यापायी निफ्टीने आठवडय़ात तब्बल २०० हून अधिक अंशांची तेजतर्रार कमाई केली. आठवडय़ाच्या शेवटी म्हणजे शुक्रवारी निफ्टीने ५५८७ म्हणजे आपण निर्धारित केलेल्या ५६०० च्या अगदी समीप साप्ताहिक उच्चांक दाखविला.
गेल्या सप्ताहात या स्तंभात निफ्टीने आपल्या महत्त्वाच्या जीवनमरण रेषेवरून ‘बुलिश मारूबोझू’ मेणबत्ती रचनेतून टुणकन उसळी घेतली आणि हा तेजीवाल्यांच्या सरशीचा संकेत असल्याचे सांगितले होते. एनएसई डेरिव्हेटिव्हज्चा तपशीलही ऑप्शन राइटर्सकडूनही ५६०० लक्ष्याप्रती तेजीची कूच पक्की असल्याचा सुस्पष्ट कल दिसत असल्याचे सांगण्यात आले होते. या आठवडय़ाने हे सारे कयास नेमके खरे केले. या दमदार उसळीची सुरुवात ही आंतरराष्ट्रीय सकारात्मक घडामोडीपायी झाली, तर तिला पुढे देशांतर्गत यूपीए सरकारने धोरण लकवा झटकत गुरुवार आणि शुक्रवारी धडाडीने घेतलेल्या निर्णयांची साथ लाभली.
सरलेला आठवडा हा जगभरच्या भांडवली बाजारांसाठी तेजीचा उत्साह परतविणारा होता. गुरुवारी मध्यरात्री अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझव्‍‌र्हने बाजार अपेक्षा करीत होता त्या ‘क्वांटिटेटिव्ह इझिंग’ अर्थात अर्थउभारीचा तिसरा हप्ता जाहीर केला. आधीच न्यूनतम स्तरावर असलेल्या व्याजदरांना २०१५ सालच्या मध्यापर्यंत त्याच स्तरावर गोठवून ठेवण्याचे फेडने alt
जाहीर केले. यातून अर्थव्यवस्थेत पैशाची द्रवता वाढून, गुंतवणूकदारांकडील पैशाचा ओघ व्याजापेक्षा चांगला परतावा देणाऱ्या भांडवली समभागांकडे वळणे मग स्वाभाविकच आहे. भारतीय बाजाराने या जागतिक तेजीच्या भावनेवर स्वार होत उसळी घेतली नसती तरच नवल ठरले असते. अगदी महागाई निर्देशांकाच्या शुक्रवारीच जाहीर झालेल्या निराशाजनक आकडय़ांकडेही बाजाराने दुर्लक्ष करीत वरच्या दिशेने दौड कायम ठेवली. सोमवार हा स्थानिक भांडवली बाजाराच्या दृष्टीने आणखी एक महत्त्वाचा दिवस आहे. रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर डी. सुब्बराव हे आज जेव्हा पतधोरणाचा मध्य तिमाही आढावा जाहीर करतील तेव्हा यांच्यापुढे मोठी आव्हानात्मक स्थिती निश्चितच आहे. सरलेल्या आठवडय़ात प्रामुख्याने बँकिंग आणि अन्य संलग्न निर्देशांकांनी मुसंडी मारली त्यामागे ज्याप्रमाणे सरकारने डिझेल दरवाढ केली ते पाहता रिझव्‍‌र्ह बँकेला व्याजदर कपातीचा निर्णय करण्याला चालना मिळेल असा आशावाद होता. मात्र शुक्रवारी पुन्हा माशी शिंकली आणि महागाई निर्देशांकांचा (इन्फ्लेशन) ऑगस्टअखेर ७.५५ टक्के हा अपेक्षेपेक्षा जास्त दर रिझव्‍‌र्ह बँकेचे हात पुन्हा बांधून ठेवेल आणि व्याजदर कपातीची शक्यता नसल्याचेच स्पष्ट करतो.
पण तरीही तांत्रिक आलेख पाहिल्यास तसेच एनएसई डेरिव्हेटिव्ह्ज तपशील बघितल्यास बाजारात तेजीवाल्यांच्या उत्साहाला बांध लागेल असे आढळून येत नाही. वास्तविक तांत्रिकदृष्टय़ा ५६३० अंशांवर सूक्ष्मसा अडथळा जरूर दिसून येतो. परंतु ऑप्शन राइटर्स ज्या गतीने ओटीएम कॉल्समधून आपल्या पोझिशन्स गुंडाळत वरच्या दिशेने कल दाखवीत आहेत ते पाहता हा अडसर अगदीच तकलादू असेल. तेजीच्या सपाटय़ातून तो सहजी वाहून जाईल. आता लक्ष सोमवारवर! रिझव्‍‌र्ह बँकेकडून आश्चर्यकारक नजराणा बाजाराला पेश होतो काय ते पाहाच!! तसे जर झालेच तर तेजीवाल्यांमध्ये उधाण भरेल हे सांगणे न लागे. सारांशात, बाजारातील उत्साही भरते आहे तोवर त्यात मनमुराद डुंबण्याचा आनंद लुटा. पुढचा थांबा कुठे ते सांगायला आम्ही आहोतच!  

अखेर लकवा सरला
धोरण लकव्याच्या रुग्णशय्येवरून बरे होत केंद्रातील कॉँग्रेस आघाडी सरकार गुंतवणुकीचे ‘मसाज’ घेत एकदम धावत सुटले आहे. सहयोगी पक्षांची काठी मिळो न मिळो, मनमोहन सिंग सरकारने आता बेधडक सुधारणांची धूम ठोकली आहे. अर्थखाते नव्याने हाती घेताच ‘गार’ आणि पूर्वलक्ष्यी कर बासनात बांधून ठेवण्याचे जाहीर करणाऱ्या पी. चिदंबरम यांनी गुंतवणूकदारांच्या ओठावर हसू आणले होते. अबोल पंतप्रधानांनी तर आता कणखर पवित्रा घेत विदेशी गुंतवणूक मर्यादा विस्तारताना एकूणच अर्थव्यवस्थेला खळखळून हसायला लावले आहे.

कणखर आणि आश्वासक :
* वादग्रस्त ‘गार’कराची अंमलबजावणी तीन वर्षांसाठी पेटाऱ्यात बंद.
* व्होडाफोनप्रकरणी पूर्वलक्ष्यी प्रभावाने लागू होणाऱ्या शेखचिल्ली कराला अर्धविराम.
* डॉ. विजय केळकर समितीने केलेल्या शिफारशींना अनुसरून डिझेल दरवाढीचे धाडसी पाऊल.
* विविध चार क्षेत्रांतील विदेशी गुंतवणूक मर्यादा वाढविण्यासह पाच सार्वजनिक कंपन्यांमधील र्निगुतवणुकीचे धोरण जाहीर.

सप्ताहासाठी शिफारस
*    रिलायन्स : (सद्य दर ८४२.७५ रु.)     
    खरेदी: रु. ८४५ वर;  लक्ष्य: रु. ८६५-८९२
*    लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो : (सद्य दर १४९० रु.)     
    खरेदी: रु. १४९३ वर;  लक्ष्य: रु. १५३१-१५८८
*    डीएलएफ : (सद्य दर २१६.६० रु.)     
    खरेदी: रु. २२० वर;  लक्ष्य: रु. २२८
गेल्या आठवडय़ातील खरेदी शिफारशीप्रमाणे,  हेक्झावेअर आणि टाटा स्टील यांनी अनुक्रमे १४० व ४०७चे लक्ष्य सर केले. हॅवेल्स लक्ष्यासमीप ५९१ पर्यंत उंचावला, तर रॅनबॅक्सीची विक्री शिफारस दिलेल्या नीचांकांपर्यंत घसरण न दाखवल्याने गैरलागू ठरली.