गुंतवणूकभान : ‘स्मॉलकॅप’चे चांदणे.. Print

वसंत माधव कुळकर्णी, सोमवार, १७ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

उंबरठय़ावर आलेले गणराय आपल्याबरोबर बाजारासाठी आनंद घेऊन आले आहेत. तेजीचा वारू चौखूर उधळला गेला आहे. आज जाहीर होणारे रिझव्‍‌र्ह बँकेचे पतधोरण या तेजीला खतपाणी घालेल काय?
डुमडुमत डमरू ये, खणखणत शूल ये,
शंख फुंकत ये, येई रुद्रा!
प्रलयघनभरवा, करीत कर्कश खा
क्रूर विक्राळ घे क्रुद्ध मुद्रा!
कडकडा फोड नभ, उडव उडुमक्षिका,
खडबडवि दिग्गजां, तुडव रविमालिका,
मांड वादळ, उधळ गिरी जशी मृत्तिका
खवळवीं चहुंकडे या समुद्रां! रुद्रास आवाहन
- भा. रा. तांबे
शुक्रवारची शेअर बाजाराची वाटचाल बघून भा. रा. तांब्यांची ‘रुद्रास आवाहन’ ही कविता आठवली. बेन बर्नान्केच्या रूपाने तेजीला केलेले आवाहन सफल झाले. उंबरठय़ावर आलेले गणराय आपल्याबरोबर बाजारासाठी आनंद घेऊन आले आहेत. तेजीचा वारू चौखूर उधळला गेला आहे. सोमवारी जाहीर होत असलेले भारतीय रिझव्‍‌र्ह बँकेच्या मध्य तिमाही पतधोरण या तेजीला खतपाणी घालेल. दुष्काळाचे टळलेले संकट, अमेरिकन अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी केलेली उपाययोजना याचा परिणाम या पतधोरणात निश्चितच दिसेल. अध्र्या टक्क्याची व्याजदर कपात व अध्र्या टक्क्याने रोख राखीव प्रमाणात (सीआरआर) घट झाली तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.

* उडिशा मिनरल डेव्हलपमेंट कंपनी :
काळे सोने
मागील बंद भाव     : रु. ४७,८८७
वर्षांतील उच्चांक     :  रु. ६०,३९२
वर्षांतील नीचांक    :  रु. २५,५५०
वर्षांनंतर अपेक्षित भाव    : रु. ९८,०००
उडिशा मिनरल डेव्हलपमेंट कंपनी ही भारत सरकारच्या पोलाद मंत्रालयाच्या अखत्यारीत असणाऱ्या राष्ट्रीय इस्पात निगम या प्रमुख पोलाद उत्पादकाची उपकंपनी. सध्या मुंबई शेअर बाजारात सर्वात मोठय़ा आकडय़ात भाव असलेली कंपनी, अशी तिची ख्याती आहे. या कंपनीने आतापर्यंतचा रु. ९२,२२० हा उच्चांक १५ नोव्हेंबर २०११ रोजी, तर रु. २०,४७५ हा नीचांक ४ ऑगस्ट २०१० रोजी नोंदवला आहे. बिसरा स्टोन लाईम कंपनीचे या कंपनीबरोबर विलीनीकरण खाण उद्योगातील एक सशक्त कंपनी म्हणून उदयाला होऊ घातले आहे. या कंपनीच्या मालकीच्या सहा खाणी असून त्यात अंदाजे २०६ दशलक्ष टन उच्च प्रतीचे लोह खनिज असून ४४ दशलक्ष टन मँगनीज खनिज आहे. बिसरा स्टोन लाईम कंपनीच्या खाणीत ३०० दशलक्ष टन सिमेंटयोग्य चुनखडी याव्यतिरिक्त रु. १० दर्शनी मूल्य असलेल्या एका समभागाचे रु. १ दर्शनी मूल्य असलेल्या समभागात विभाजन होणार असून याव्यतिरिक्त बक्षीस समभागासाठी गुणोत्तर ठरविण्यास संचालक मंडळाची बठक होणार आहे. राष्ट्रीय इस्पात निगमकडे ५०% समभाग असून १५% आयुर्वमिा महामंडळाकडे आहे. अवघे ६० लाख भागभांडवल असलेल्या या कंपनीने केलेल्या गुंतवणुकीची किंमत ही ६.८८ कोटी रुपये आहे. गेल्या बारा महिन्यांची प्रतिसमभाग मिळकत रु. २५७.४९ असून पुस्तकी मूल्य रु. १३,३२५ आहे. या सहाही खाणी सध्या भाडेपट्टा संपल्याने बंद असून पहिली खाण पावसाळ्यातनंतर, ऑक्टोबरमध्ये सुरू होईल, तर पाच खाणी मार्च २०१३ पर्यंत सुरू होणे अपेक्षित आहे. २०१४ साली प्रतिसमभाग मिळकत रु. २४,००० असायला हवी आणि म्हणूनच किमतीचे प्रतिसमभाग मिळकतीशी गुणोत्तर ४ धरले तरी रु. ९८,००० चा भाव दिसेल. सध्या सट्टेबाजांची लाडकी असलेली ही कंपनी वर्षभरात दणदणीत फायदा मिळवून देऊ शकेल. परंतु यात सट्टेबाज रस घेत असल्यामुळे सतत चढ-उताराचा सामनाही करावा लागेल.

* कमर्शियल इंजिनीअर्स अ‍ॅण्ड बॉडीबिल्डर्स :
उद्याचा ऐरावत
मागील बंद भाव     : रु. ९३.५५
वर्षांतील उच्चांक     : रु. १००.४०
वर्षांतील नीचांक    : रु. २९.७०
वर्षांनंतर अपेक्षित भाव    : रु. १३५
खास प्रकारचे ट्रक व खास प्रकारची वाहतूक करण्यासाठी वापरतात त्या रेल्वेच्या बोगी बनविण्याच्या व्यवसायात ही कंपनी आहे. उदाहरणार्थ, दोन चाकी किंवा मोटारी वाहतूक करणारे ट्रक. ही कंपनी आपले उत्पादन मध्य प्रदेशातील चार व झारखंडमधील एका कारखान्यातून घेते. गेल्या वर्षीच्या पहिल्या तिमाहीशी तुलना करता विक्री १०५% वाढून रु. ८२.२४ कोटी झाली; तर नफ्यात १६४% वाढ झाली असून रु. ६.९ कोटींच्या तुलनेत रु. १८.२ कोटी नफा झाला आहे. तिमाहीची प्रतिसमभाग मिळकत रु. १.२७ वरून
रु. ३.३२ झाली आहे. येत्या वर्षभरात ६०-७५% परतावा मिळणे शक्य आहे.

* सिंगर इंडिया :
जरा जपून चाल पोरी
मागील बंद भाव     : रु. ९८.६०
वर्षांतील उच्चांक     : रु. ९३.९५
वर्षांतील नीचांक    : रु. २६.५०
वर्षांनंतर अपेक्षित भाव    : रु. १५०
सिंगर इंडिया लिमिटेड ही अमेरिकेतील सिंगर या कंपनीची भारतातील उपकंपनी. पूर्वी घराघरात जेव्हा पायाने चालविण्याचे शिलाई यंत्र असे तेव्हा ते अधिकतर याच कंपनीचे. बहुतेक घराघरात एक तरी शिलाईयंत्र दिसत असे. घरांच्या किमती वाढल्या आणि इंच इंच जागा वाचवण्याचे प्रयत्न झाले तेव्हा साहजिकच शिलाई यंत्र दिसेनासे झाले. या बदलत्या मानसिकतेचा फटका या कंपनीलाही बसला. आता ही कंपनी घरगुती वापराची उत्पादनांची मालिकाच घेऊन आली आहे. यात मिक्सर, टोस्टर, ज्यूसर, विजेवर चालणारी किटली यांचा समावेश आहे. अवघे १०.७४ कोटी रुपये भागभांडवल असलेली ही कंपनी कोणाच्या खिसगणतीतही नव्हती. गेल्या महिनाभरात तिच्या शेअरमध्ये मोठी उलाढाल नोंदली जात आहे. आलेला सणांचा मोसम, नवीन उत्पादनांची मालिका पाहता हा शेअर वर्षभरासाठी तरी घ्यावा. ज्यांची थोडी जोखीम घेण्याची तयारी आहे त्यांनीच तो घ्यावा. बाजारात ‘जेवढी जोखीम अधिक तेवढा परतावाही अधिक’ हा नियम लक्षात ठेवून हा शेअर घ्यायचा आहे.

* हॉकिन्स कूकर
अजून एक शिट्टी बाकी
मागील बंद भाव     : रु. १७२८
वर्षांतील उच्चांक     : रु. १७५९
वर्षांतील नीचांक    : रु. १२१५
वर्षांनंतर अपेक्षित भाव    : रु. २२२०
शिवण यंत्राप्रमाणे घराघरात वापरल्या जाणाऱ्या प्रेशर कूकरमुळे माहिती असलेली ही कंपनी. ही कंपनी एकूण ५७ प्रकारचे कूकर बनविते. फ्युचर या नावाने आणलेल्या प्रेशर कूकरची मालिका यशस्वी ठरली आहे. यात टेफ्लेटॉनची थर लावलेली स्वयंपाकाची भांडी, तवे, कढया, शिजविण्याची भांडी यांचा समावेश होतो. देशभरात चार कारखाने आहेत. या वर्षांत एप्रिल ते जून या तिमाहीत रु. ८२.५४ कोटींच्या विक्रीवर रु. ५.२४ कोटींचा नफा मिळविला आहे.