‘अर्थ’पूर्ण : आर्थिक घडय़ाळ Print

जयंत विद्वांस, सोमवार, १७ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

सोबतचे घडय़ाळ कोणत्याही पक्षाचे नाही, तर ‘राष्ट्राचे’ आर्थिक टप्पे किंवा पायऱ्या दर्शविणारे आहे. अमेरिकन आर्थिक नियोजनकाराने बनविलेले आहे. यावरून शेअर बाजारातील तेजी-मंदीचा ढोबळ अंदाज येऊ शकतो. तेजीतून मंदीत जाताना व मंदीतून तेजीमध्ये येतानाच्या पायऱ्या दिसू शकतात. शेअर बाजारचा अभ्यास करताना तो फंडामेन्टल अ‍ॅनालिसिस आणि टेक्निकल अ‍ॅनालिसिस या दोन प्रकारचा असतो. दोन्ही प्रकारांत भरपूर माहिती गोळा करावी लागते. अशी  संकलित केलेली माझ्याजवळची माहिती देत आहे. मागील घटनांवरून पुढचे अंदाज बांधता येतात. अर्थातच हे अंदाज असतात म्हणून ते दर वेळेस आणि १०० टक्के बरोबर येतीलच, असे सांगता येत नाही.
तर घडय़ाळात १२ वाजताना तेजी पूर्ण बहरात असताना काहीतरी निमित्त होते. मग हर्षद मेहता किंवा केतन पारेख यांचे घोटाळे उघडकीस येतात किंवा अमेरिकेत सबप्राइमची माशी शिंकते (भारताचा त्या क्षणी जीडीपी वाढीचा दर ९ टक्के इतका असूनसुद्धा) व बाजार खाली जातो.
लगेचच पहिल्या पायरीवर रिझव्‍‌र्ह बँक जागी होते व व्याजाचे दर वाढविते. व्याजदर वाढले की उद्योगधंद्यासाठी कर्ज महाग होते. तेजी संपून मंदीची सुरुवात झालेली असते, पण कोणीही मान्य करायला तयार नसते. अर्थमंत्री, रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर; इतकेच काय अर्थतज्ज्ञ (इकॉनॉमिस्ट) सुद्धा आपली अर्थव्यवस्था कशी सुदृढ आहे अशी भाषणे देत असतात. त्याच्या भरीला इक्विटी फंड मॅनेजर्स डॉ. कलामांच्या स्वप्नातील भारत-२०२० मध्ये कसा असेल, त्या वेळी शेअर बाजार कुठे असेल, अशी स्वप्ने दाखवीत असतात. (२००८ सालातील जुनी वृत्तपत्रे तपासून बघा.) तरीसुद्धा शेअर बाजार खाली जातच राहतो.
तिसऱ्या पायरीवर वस्तू विनिमय बाजारात (कमोडिटी एक्स्चेंज) किमती कमी होऊ लागतात, कारण उद्योगधंद्यामधून तांबे, पितळ, पोलाद यांची मागणी कमी झालेली असते. सर्व अर्थव्यवस्था हळूहळू खाली येत असते. परिणामी, सरकारजवळील परकीय चलनाचा साठा कमी होऊ लागतो. पाचव्या पायरीवर स्थावर मालमत्तांच्या किमती खाली येऊ लागतात. भारतात या किमती मोठय़ा प्रमाणात कमी होत नाहीत याची कारणे वेगळी आहेत. किमती वर न जाता स्थिर होतात. २००८ साली अमेरिकेत स्थावर मालमत्तांच्या किमती ५० टक्क्य़ांनी खाली आल्या होत्या. भारतात १९९३ ते २००२ या काळात या किमती जवळपास स्थिर राहिल्या.
या क्षणी बाजार तळ गाठतो. या स्थितीत बाजार किती दिवस/ महिने राहील सांगता येत नाही. इथून तेजीला सुरुवात होते. alt
काय चांगले घडले म्हणून तेजीला सुरुवात झाली सांगता येत नाही. उलटपक्षी, याहून वाईट घडायचे काही शिल्लक राहिले नाही म्हणूनसुद्धा तेजी सुरू होते. जशी आजची परिस्थिती आहे. सातव्या पायरीवर रिझव्‍‌र्ह बँक उद्योगजगताची प्रलंबित मागणी मान्य करून व्याज दरात कपात करते. महागाईचा कितीही आगडोंब उसळला असेल, सर्वसामान्य माणसांचे, निवृत्त ज्येष्ठ नागरिकांचे जीवन कितीही कठीण होत असले तरी आत्ता व्याजदर कमी केले जातील. त्याग हा सर्वसामान्य जनतेने करायचा असतो. व्याजदर कमी झाले तर उद्योगधंद्याची भरभराट होणार, म्हणजेच देशाची प्रगती होणार आणि देशाची प्रगती झाली तर शेअर बाजार वर जाणार. शेवटी काही झाले तरी शेअर बाजार हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा ‘संकेतदर्शक’ (बॅरोमीटर) असतो. समजा, एखाद्या उद्योगाचे रु. १०० कोटींचे कर्ज आहे. एक टक्का व्याजदर कपात म्हणजे कंपनीची नफा क्षमता एक कोटीने वाढणार. असे प्रत्येक कंपनीच्या बाबतीत होणार म्हणून शेअर बाजार वर जातो. कदाचित हा लेख तुमच्यापर्यंत येईपर्यंत व्याजदर कपात घोषित झाली असेल व बाजार वर जायला सुरुवात झाली असेल. सध्या तर व्याजदर कमी होण्याच्या शक्यतेवर (तर्कावरच) बाजार वर जाऊ लागला आहे.
बाजार वर जाऊ लागल्यावर नवीन कंपन्या स्थापनेच्या घोषणा होऊ लागतात. जुन्या कंपन्या आपल्या उत्पादन क्षमता वाढवितात व बाजारास अजून गती प्राप्त होते. उद्योगधंद्यांची मागणी वाढल्याने वस्तू विनिमय बाजारात तेजी येते. अर्थव्यवस्था वर जात असल्याने परकीय चलनाचा साठा वाढू लागतो. व्याजाचे दर पुन्हा कमी होत राहतात, कर्जे स्वस्त होतात व स्थावर मालमत्तांच्या किमती वाढू लागतात. तेजी पूर्णत्वाला जाते.
तेजी-मंदीची (एका उच्चांकापासून दुसरा नवीन उच्चांक) ही आवर्त (सायकल्स) शेअर बाजारात आठ वर्षांची असतात. १९९२ पासूनचा मुंबई शेअर बाजारचा निर्देशांकाचा वर दिलेला तक्ता पाहा :
मागील २० वर्षांतील निर्देशांकातील उच्चांक व नंतरचे नीचांक नमूद केले आहेत. १९९२ पूर्वी आठ वर्षांचे आवर्त असेच होते. १९८४ मध्ये नवीन उच्चांक ८२५ च्या आसपास होता व तेथून खाली आल्यावर ३५० च्या जवळ तळ गाठला होता. दोन उच्चांकांमधील काळ सात वर्षे ११ महिन्यांचा आहे. दोन उच्चांकांच्या (न्यू टॉप्स) मधील काळात शेअर बाजार वर-खाली होण्यात एक पद्धत (पॅटर्न) आहे. या पद्धतीचा अभ्यास करून कर्जरोखे व शेअर्स यांचा समतोल (रिबॅलेन्सिंग) साधल्यास मोठय़ा प्रमाणात फायदा होऊ शकतो. यासाठी सोपा मार्ग म्युच्युअल फंडांच्या डेट योजना व इक्विटी योजनांमधून गुंतवणूक अदलाबदल करणे हा आहे. बाजार वर गेल्यावर रक्कम लिक्विड फंडात वर्ग करणे व खाली गेल्यावर इक्विटी फंडात वर्ग करणे. हे म्हणजे सोपे असले तरी बाजार वर गेल्यावर अजून वर जाईल आणि खाली गेल्यावर अजून खाली जाईल, असे सारखे वाटत राहते.
या पद्धतीने अभ्यास केल्यावर पुढच्या मोठय़ा तेजीचा उच्चांक कधी असेल? कदाचित डिसेंबर २०१५ म्हणजे आजपासून सव्वातीन वर्षे आणि निर्देशांकाचा सर्वोच्च बिंदू कदाचित ३१ हजार किंवा त्याहूनही जास्त. सध्याचा निर्देशांक १८५०० च्या जवळपास आहे. समझदारों को इशारा काफी है..
फंडामेन्टल अ‍ॅनालिसिस व टेक्निकल अ‍ॅनालिसिस याव्यतिरिक्त भारतीय बाजारात एक मोठ्ठा घटक परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार हा आहे. त्यांच्यासमोर तोंड देऊन उभ्या राहू शकतील इतक्या मोठय़ा संस्था भारतात नाहीत. म्हणून त्यांच्या मनात आले तर ते सर्व प्रकारचे अ‍ॅनालिसिस गुंडाळून ठेवू शकतात.
या स्तंभात शेअर बाजारावर लिहिणे हा माझा हेतू नाही; परंतु होम पिचवर खेळताना खेळाडू शतक ठोकतो तसे RICH शब्दावर लिहिताना मूळचा शेअर ब्रोकर जागा झाला.        

पुढच्या मोठय़ा तेजीचा उच्चांक कधी असेल? कदाचित डिसेंबर २०१५. म्हणजे आजपासून सव्वातीन वर्षे आणि निर्देशांकाचा सर्वोच्च बिंदू कदाचित ३१ हजार किंवा त्याहूनही जास्त..