‘अर्थ’पूर्ण - वित्तीय नियोजन : काय करावे, करू नये! Print

मुकुंद शेषाद्री ,सोमवार, २४ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

आपल्या खर्चाचे गणित हे नेहमी उत्पन्न वजा खर्च = गुंतवणूक असे न ठेवता, उत्पन्न वजा गुंतवणूक = खर्च असेच ठेवावे..
समीर जोशी, वय वर्षे ३५. विवाहीत असून त्यांना एक मुलगा आहे. मुलगा झाल्यानंतर कमावत्या पत्नीने नोकरीला रामराम ठोकला. त्यामुळे कुटुंबाचा आर्थिक भार सर्वस्वी समीर यांच्याकडूनच उचलला जात आहे. त्याचवेळी त्यांनी मोक्याची एक जागा ८०% बँकेचे गृहकर्ज  घेऊन घेतली. त्यांची ही कर्ज परतफेडीची रक्कम  आहे ४० लाख  रुपये. तसेच नव्या घराच्या इंटिरिअरसाठी त्यांनी सात लाखांचे पर्सनल लोन सुध्दा घेतले. पुढे पत्नीच्या ‘इच्छे’पोटी त्यांनी महागडी कार देखील खरेदी केली.

अशाप्रकारे वरकरणी सुरेख दिसणारे असे त्यांचे त्रिकोणी कुटुंब, आर्थिक विवंचनेने ग्रासू लागले. सधन भासणाऱ्या समीरपुढे आर्थिक अडचणी उभ्या ठाकल्या. कारण काय . ही सगळी स्वप्ने साकार करण्याचे पूर्वनियोजन नव्हतेच आणि म्हणावी तशी कुठे गुंतवणूकही नाही!
    आधी म्हटल्याप्रमाणे कुटुंब तिघांचेच, पण पत्नी व मुलाची जबाबदारी एकटय़ाच्या खांद्यावर. शिवाय गरजा आणि खर्च वाढतच गेले. गुंतवणूक काहीच नाही, पण दायित्व, हप्ते (ईएमआय) मात्र         वाढतच गेले. कर्जाचे हप्ते ते भरले जायलाच हवेत. नोकरीत मन रमेनासे झाले आहे. पण कर्जाचे हप्ते दुसऱ्या कोणत्या रिस्क/अपॉच्र्युनिटीच्या विचारही मनाला शिवूही देत नाहीत. आहे त्या स्थितीत नोकरी करणे मग भागच आहे. वित्तीय नियोजनाच्या अभावी समीर जोशींसारखी परिस्थितीचा अनुभव बहुतांशांना आलेला दिसून येईल.
म्हणूनच वित्तीय नियोजन करताना काही प्रमुख मुद्दे लक्षात घेणे जरूरीचे आहे.
वित्तीय नियोजन  करताना मग काय करावे .........................
*  गरज तसेच स्वप्न यातला फरक सर्वप्रथम समजून घ्यावा व त्यानुसार निर्णय घ्यावा.
*  कुठल्याही मोठया गोष्टीची खरेदी करताना आपण मालमत्ता (अॅसेट्स) बनवतोय की दायित्व (लाएबिलिटी) अंगावर घेतोय, हे लक्षात घ्यावे.
उदाहरणार्थ, जर आपण एखादी कार खरेदी करून तिचा वापर ‘टूरिस्ट कार’ असा केल्यास आपला फायदा होऊ शकतो. पण तेच तिचा वापर घरापुरता, (तोही सुट्टीत व क्वचितप्रसंगीच) केल्यास आपला खर्च वाढतो. वरील उदाहरणात जेव्हा कारचा वापर आपण टूरिस्ट कार म्हणून करतो तेव्हा ती आपली मालमत्ता ठरते. पण जेव्हा त्याच कारचा वापर आपण घरगुती कार म्हणून करतो तेव्हा ती आपली दायित्व ठरते.
*  गुंतवणुकीची सुरुवात जितक्या लवकर जमेल तितक्या लवकर करावी. चक्रवाढ परताव्यानुसार अगदी दरमहा ५०० रुपयांच्या गुंतवणुकीचाही दीर्घकाळात फार मोठा फायदा दिसून येतो.
*  आपल्याकडे पुरेसा टर्म इन्श्युरन्स तसेच आरोग्य विमा आहे का नाही याची नोंद घ्यावी नसल्यास तो त्वरीत घेणे आवश्यक आहे.
वित्तीय नियोजन  करताना काय करू नये ..........................
* शक्यतो कर्ज घेणे टाळावे तसचे ते घेतले असल्यास वस्तूच्या रकमेच्या २५% ते ३०% असावे.
*  कर्ज घेताना ते घेणे गरजेचे आहे की नाही याचा विचार शांतपणे करावा. कारण तात्कालिक हौस भागविण्यासाठी घेतलेले कर्जच पुढे आयुष्यात अनेक स्वप्नांच्या आड येऊ शकते.
*  आपल्या खर्चाचे गणित हे नेहमी उत्त्पन्न वजा खर्च = गुंतवणूक असे न ठेवता, उत्त्पन्न वजा गुंतवणूक = खर्च असेच ठेवावे.
*  वित्तीय नियोजनासंबधी निर्णय घेताना तो एकटय़ाने न घेता, कुंटुबातील सगळया व्यक्तींचा समावेश करून घ्यावा.
*  कुठल्याही गोष्टीची खरेदी, आर्थिक निर्णय करताना भावना बाजूला ठेवाव्यात आणि मागचा-पुढचा विचार करूनच निर्णय घ्यावा.    
लेखक सर्टीफाइड फायनानशियल प्लानर- सीएफपी असून, एमएस व्हेंचर फायनान्शिय प्लॅनर्सचे (www.msvfp.com) संचालक आहेत.