बाजाराचे तालतंत्र : !1 मोरया !! Print

सी. एम. पाटील ,सोमवार, २४ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

गेल्या आठवडय़ात बाजार कळसाला असतानाही तेजीवाल्यांच्या उत्साहाला आवर घालणे कठीण असल्याचे स्पष्टपणे दिसून आले. तेजीचा धडाका हा असाच असतो. वास्तविक तांत्रिकदृष्टय़ा ५६३० अंशांवर सूक्ष्मसा अडथळा दिसून येतो असे जरूर सांगण्यात आले, पण तो अगदीच तकलादू होता हेही स्पष्ट झाले. निफ्टी निर्देशांकाची सर्व अडसर दूर सारून नव्या उच्चांकाच्या दिशेने कूच ही केंद्रातील सरकारकडून आकस्मिक दिसून आलेल्या निग्रहाप्रमाणे पक्की असल्याचा प्रत्यय सरलेल्या आठवडय़ाने चपखल दिला.
गेलेल्या आठवडय़ाची महत्त्वाची कमाई हीच की, सरकारने आर्थिक सुधारणांवरील राजकीय अंगाने होत असलेल्या विरोधाच्या दबावाला समर्थपणे हाताळले आणि किराणा क्षेत्र खुले करण्याबरोबरच, हवाई सेवा तसेच प्रसारण क्षेत्रात विदेशी गुंतवणुकीची मर्यादा शिथिल करण्याबाबत धाडसाने घेतलेल्या निर्णयांशी ते ठाम राहिले. बाजारात बुधवापर्यंत थोडी धाकधूक निश्चितच होती. ममतांच्या तृणमूलने केंद्रातील यूपीए सरकारचा टेकू काढला, पण मुलायमसिंग यादव यांच्या ‘ममत्वा’ने सरकारला आवश्यक आधार मिळवून दिला. या सर्व अनुकूल घडामोडींतून बाजारातील उत्साह दुणावला नसता तरच नवल ठरले असते. शुक्रवारी निफ्टीने आदल्या दिवसाच्या तुलनेत १६० हून अधिक अंशांनी उसळी घेत म्हणून ५७०० ची सव्वा वर्षांपासून दुर्लभ बनलेली पातळी दाखविली.
वीज वितरण कंपन्यांना तारण्यासाठी पॅकेजची घोषणा   हा येत्या मंगळवारी सरकारच्या अजेंडय़ावर असलेला विषय बाजारासाठी यापुढचा उत्साही ऊर्जेचा डोस निश्चितच असेल. या पॅकेजद्वारे या क्षेत्रात खासगी क्षेत्राची गुंतवणूक खुली होण्याबरोबरच, सराकारी बँकांच्या कर्ज-थकीताचा प्रश्नही बव्हंशी निकाली निघेल.
तांत्रिक आलेख पाहिल्यास सहज लक्षात येईल की, निफ्टी निर्देशांकाने आपला पहिला ५६३० चा अडथळा ओलांडला असून, तो ‘फिबोनाची रिट्रेसमेंट’च्या म्हणजे ६३३९ ते ४५३१ या निसरडय़ा प्रवाहाच्या ६१.८% पातळीच्या  वर गेला आहे. आता या निसरडय़ा प्रवाहाची ७६.४% म्हणजे ५९०० ची पातळी हे निफ्टीचे आगामी लक्ष्य असेल. एप्रिल २०११ मधील उच्चांकाशी बरोबरी साधणारी ही पातळी आहे. एनएसई डेरिव्हेटिव्हज् तपशील बघितल्यास बाजारात तेजीवाल्यांकडे ही पातळी सर करण्याइतकी मुबलक ऊर्जा असल्याची खातरजमा करतो.
सरलेल्या शुक्रवारी ऑप्शन राइटर्स  हे ५७०० च्या स्ट्राइक प्राइसवर घेतलेल्या  कॉल ऑप्शन्स पोझिशन्सही गुंडाळत असल्याचे आणि आणखी वरच्या दिशेने कल दाखवीत असल्याचे alt
आढळून आले.  त्यामुळे चालू आठवडय़ात सप्टेंबरच्या एफ अ‍ॅण्ड ओ मालिकेची सौदापूर्ती ही ५७०० ते ५८०० या पट्टय़ातील असेल असे आता स्पष्ट होते. तांत्रिक विश्लेषणाचे एक खास मार्गदर्शक तत्त्व हेच की- ‘Trend is my best freind, follow the trend until it bends’. अर्थात जोवर वाहती गंगा तोवर मनसोक्त न्हाऊन घ्या!     या गंगेच्या प्रवाहाला खंड पडत असल्याचे संकेत मिळताच इशारा दिला जाईल याची खात्री असू द्या!!     
सप्ताहासाठी शिफारस
*    रिलायन्स इन्फ्रा : (सद्य दर ५४४ रु.)     
    खरेदी: रु. ५५१ वर;  लक्ष्य: रु. ५६८-५७४
*    लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो : (सद्य दर १५८५ रु.)     
    खरेदी: रु. १६०० वर;  लक्ष्य: रु. १६६०-१७००
*    रिलायन्स पॉवर : (सद्य दर ९५.३० रु.)     
    खरेदी: रु. ९६.५० वर;  लक्ष्य: रु. १०३-१०९
गेल्या आठवडय़ातील खरेदी शिफारशीप्रमाणे,  रिलायन्स, लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो आणि डीएलएफ या तिन्ही समभागांनी आपले लक्ष्य गाठून अनुक्रमे ८८१, १५९७ आणि २३९ असे उच्चांक दाखविले.