विमा विश्लेषण : कोटक अ‍ॅश्युअर्ड प्रोटेक्शन प्लॅन Print

दिलीप सामंत ,सोमवार, २४ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

बँक, प्रायव्हेट इक्विटी, शेअर ब्रोकिंग, म्युच्युअल फंड, रिअल इस्टेट अशा अनेक आर्थिक क्षेत्रांमध्ये कार्यरत असणाऱ्या कोटक महिंद्र या भारतातील एक प्रमुख वित्तीय सेवा समूहाची विमा कंपनी कोटक लाइफ इन्श्युरन्सची ही पॉलिसी. या पॉलिसीत विमाधारकाच्या जीवनामधील संभाव्य धोक्यांबाबत व्यापक प्रमाणात काळजी घेतली जाते.
ठळक वैशिष्टय़े :
१) १८ ते ५० वर्षे वयापर्यंतच्या व्यक्तीला ही पॉलिसी घेता येते.
२) विमाधारकाच्या वयाच्या ७५ वर्षांपर्यंत अशा निश्चित स्वरूपाचा कालावधी या पॉलिसीमध्ये आहे. त्यामुळे पॉलिसीची टर्म ही ७५ वजा विमाइच्छुकाचे वय अशी असते.
३) प्रीमियम भरावयाचा कालावधी-
    अ) विमाधारकाच्या वयाच्या ६० वर्षांपर्यंत किंवा
    ब) १५ वर्षे.
४) विमा छत्र : कमीत कमी ३ लाख रुपये
५) या पॉलिसीमध्ये नैसर्गिक मृत्यूबरोबर, अपघाती मृत्यू, विकलांगता गंभीर आजारपण वगैरे सर्व संभाव्य धोक्यांची काळजी घेतली जाते.
उदाहरण :
*     विमाधारकाचे वय    :                        ३१ वर्षे
*     पॉलिसीची टर्म     :                            ४४ वर्षे (७५ - ३१)
*  प्रीमियम भरायची  टर्म (पीपीटी)     :    १५ वर्षे
*       विम्याचे छत्र    :                            ६,१३,३८३ रु.
*     प्रीमियम रक्कम    :                         ३०,००० रु.
पॉलिसीचे लाभ :
१) विमाधारकाचा ७० वर्षे वयापर्यंत त्याचा मृत्यू झाला तर त्याच्या नामनिर्देशकाला ६,१३,३८३ रु.ची प्राप्ती होणार. जर मृत्यू अपघाती असल्यास दुप्पट रक्कम (१२,२६,७६६ रु.) प्राप्त होतील.
२) वयाच्या ७० ते ७५ वर्षांदरम्यान कोणत्याही प्रकारे मृत्यू झाला तर ६,१३,३८३ रु.ची प्राप्ती होणार.
३) विमाधारकाच्या वयाच्या ७० वर्षांपर्यंत कर्करोग, हृदयविकार, अर्धागवायू वगैरेसारख्या १२ गंभीर व्याधींपैकी कशाचेही निदान झाले तर त्याला ताबडतोबीने मूळ विमा रकमेच्या २० टक्के म्हणजे १,२२,६७६ रु. इतकी रक्कम दिली जाईल. त्याचबरोबर पॉलिसी चालू राहील आणि इतर कोणत्याही लाभांना कात्री लावली जाणार नाही.  
४) विमाधारकाच्या प्रीमियम भरायच्या कालावधीमध्ये म्हणजे वयाच्या ४६ वर्षरयत अपघातामध्ये त्याला विकलांगता आली तर त्याचे बाकी राहिलेले हप्ते माफ होतील. पॉलिसीचे लाभ मात्र कायम राहतील.
५) पॉलिसीच्या परिपक्वतेनंतर म्हणजे विमाधारकाच्या वयाच्या ७५ व्या वर्षी त्याला मॅच्युरिटी बेनिफिट्स म्हणून विमाछत्राची रक्कम ६,१३,३८३ रु.ची प्राप्त होतील.
विश्लेषण :
विमाधारक वयाच्या ३१ वर्षांपासून ४६ व्या वयापर्यंत दरवर्षी ३०,००० रुपयांची रक्कम कंपनीकडे जमा करीत राहणार. एकूण हप्त्यांची रक्कम होत ४,५०,००० रुपये. तो वयाच्या ७५ व्या वर्षांपर्यंत जिवंत राहिला तर विमा कंपनी त्याला ६,१३,३८३ रुपये देणार. गुंतवणुकीच्या दृष्टीकोनातून विचार केला तर परताव्याचा दर होतो द.सा.द.शे. ०.८५ टक्के. त्यामुळे एक गुंतवणूक म्हणून पाहिले तर हा परताव्याचा दर अगदीच क्षुल्लक ठरतो.
विमाछत्राच्या दृष्टीकोनातून विचार केला तर पॉलिसीधारक वयाच्या ४६ व्या वर्षांपर्यंत एकूण विमाछत्राच्या सुमारे ७० टक्क्यांपेक्षा जास्त रक्कम हप्त्यांच्या स्वरूपात कंपनीकडे जमा करतो. या रकमेवर निव्वळ हिशेबापुरता द.सा.द.शे. ४ टक्के परतावा जमेस धरला तर ही रक्कम होते ६,२४,७३५ रुपये. म्हणजे वयाच्या ४६ व्या वर्षांनंतरच्या मृत्यूच्या शक्यतेमध्ये नामनिर्देशकाला प्रत्यक्षात जमा रकमेपेक्षा कमी रक्कमच प्राप्त होते. या पॉलिसीमध्ये अपघाती मृत्यू, गंभीर आजारपण, अपंगत्व वगैरे जे इतर लाभ आहेत त्यासाठी ‘मेडिक्लेम’मधील सुविधा कमी पैशांमध्ये प्राप्त होऊ शकतात.
थोडक्यात ही पॉलिसी सर्व काही देते. परंतु वार्षिक प्रीमियमच्या तुलनेत ठोस असे काहीच देत नाही.
सर्वसाधारणपणे प्रत्येकजण ६० व्या वर्षांपर्यंत अर्थार्जन करीत असते. त्यानंतर त्या व्यक्तीची ‘इकॉनॉमिक व्हॅल्यू’ शून्य झालेली असते. त्यामुळे आयुर्विम्याच्या मूलभूत तत्त्वानुसार तिला विमाछत्राची गरज नसते.
* आता आपल्या उदाहरणामधील व्यक्तीने भारतातील दोन टॉपच्या विमा कंपन्यांच्या प्युअर टर्म पॉलिसी घेतल्या तर काय होऊ शकते त्याचा विचार करूया.
१. कंपनी क्रमांक १
(क्लेम सेटलेमेंट रेशियो ९७.१%)
विमा छत्र १५ लाख रुपये, टर्म २५ वर्षे (यापेक्षा अधिक कालावधीसाठी ही कंपनी प्युअर टर्म पॉलिसी देत नाही), वार्षिक प्रीमियम ६,८९१ रुपये, २५ वर्षांचे एकूण प्रीमियम १,७२,२७५ रुपये.
कोटक अ‍ॅश्युअर्ड प्रोटेक्शन प्लॅनच्या एकूण प्रीमियमच्या तुलनेत बचत २,७७,७२५ रुपये (४,५०,००० - १,७२,२७५).
ही रक्कम २५ वर्षांमध्ये विभागली तर वार्षिक रक्कम होते ११,१०९ रुपये. (११,१०० रुपये गृहीत धरू या.) समजा ज्यामध्ये प्राप्तिकरात सूट मिळेल आणि परतावाही करमुक्त असेल अशा सुरक्षित गुंतवणुकीच्या पर्यायामध्ये दरवर्षी  ११,१०० रुपये गुंतविल्यास २५ वर्षांनंतर ९,९३,०५८ रुपये इतकी गंगाजळी तयार होईल. गुंतवणूकदारांचे वय असेल ५६ वर्षे आणि जमा पूंजी असेल पूर्णत: करमुक्त.
२. कंपनी क्रमांक २
(क्लेम सेटलेमेंट रेशियो ९५.४%)
alt
विमाछत्र १५ लाख, टर्म ३० वर्ष, वार्षिक प्रीमियम ३,८७३ रुपये. एकूण प्रीमियमची रक्कम १,१६,१९० रुपये. कोटक अ‍ॅश्युअर्ड प्लॅनच्या तुलनेत बचत ३,३८,८१० रुपये. ही रक्कम २५ वर्षांमध्ये विभागली तर वार्षिक रक्कम होते १३,३५२ रुपये. (१३,३०० रुपये गृहीत धरू या) समजा ही रक्कम दरवर्षी वरील सुरक्षित पर्यायामध्ये गुंतविली तर २५ वर्षांमध्ये ११,८९,८८० रुपयांची गंगाजळी तयार होते. पुढील चार वर्षे ही रक्कम प्राप्तिकर वजा जाता निव्वळ ६ टक्के परताव्याच्या गुंतवणुकीच्या पर्यायामध्ये गुंतविली तर त्या व्यक्तीच्या ६० व्या वर्षी त्याच्याकडे करमुक्त अशी १५,९२,३२७ रुपये इतकी रक्कम जमा होईल.         
(लेखाचा उद्देश पूर्णत: समीक्षात्मक असून, कंपन्यांचे वेबस्थळ हा माहितीचा स्रोत आहे)
तुलनात्मक कोष्टक : गुंतवणुकीची एकूण रक्कम रु.  ४,५०,०००/-
विवरण                कोटक अ‍ॅश्युअर्ड                 कंपनी क्र. १               कंपनी क्र. २       
                            प्रोटेक्शन प्लॅन        
पॉलिसीची टर्म            ४४ वर्षे                        २५ वर्षे                          ३० वर्षे
विमाछत्र                ६.१३ लाख रु.                  १५ लाख रु.                  १५ लाख रु.    
अपघाती मृत्यू            १२.२६ लाख रु.           १५ लाख रु.                  १५ लाखरु.    
मॅच्युरिटी (वय)         ६.१३ लाख रु. (७५)              -                             -
इतर आवक (वय)              -                      ९.९३ लाख (५६)          १५.९२ लाख (६०)