बाजाराचे तालतंत्र : निफ्टीचे लक्ष्य @ ५९०० Print

सी. एम. पाटील, सोमवार, १ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

चार आठवडय़ांपूर्वी निफ्टी निर्देशांकाने जेव्हा ५२०० च्या पातळीवर भक्कम आधार मिळविला, त्याच वेळी बाजारात तेजीचे संकेत असल्याचे सर्वप्रथम याच स्तंभात  स्पष्टपणे सूचित केले गेले होते. तेव्हापासून ‘अर्थ वृत्तान्त’च्या वाचकांना काही दगा-फटक्याची चाहूल येईपर्यंत मनमुराद तेजी उपभोगण्याचा सल्ला या स्तंभानेच दिला आहे. बाजार तेजीच्या या ताज्या प्रवाहात उत्तरोत्तर नवीन कळस टप्पा गाठत जाणार या भाकीतावर आजही आम्ही ठाम आहोत आणि पाहा ना चार आठवडय़ांपूर्वीच्या पहिल्या शुभसंकेतानंतर निफ्टी निर्देशांकाने तब्बल ५०० अंशांची कमाई करून ५७०० ची पातळीही कमावलीही आहे. उल्लेखनीय हेच की यापुढेही वाढीला अजून बराच वाव असल्याचेच हे द्योतक आहे. या सरलेल्या आठवडय़ातही निफ्टी निर्देशांकाने पुन्हा एकदा ५७३५ हा नवीन साप्ताहिक उच्चांक दाखविला आणि  सप्ताहअखेर तो ५७०० वर स्थिरावला. अंदाज असा होता की, गुरुवारी वायदा व्यवहाराच्या सौदापूर्तीच्या दिवशी निफ्टी ही ५७०० ची पातळी पार करेल. प्रत्यक्षात एक दिवस उशिरा म्हणजे शुक्रवारी निफ्टी निर्देशांक ५७०० पल्याड बंद झाला. आता सरकारच्या ‘रिफॉम्र्स’ सक्रियतेने निर्माण केलेला उल्हास थंडावला असून, बाजाराने सावधगिरीचा पवित्रा धारण केला आहे.  
गेल्या आठवडय़ात ‘फिबोनाची रिट्रेसमेंट’चा म्हणजे निफ्टी निर्देशांकाच्या ६३३९ ते ४५३१ पातळीपर्यंतच्या निसरडय़ा प्रवाहाच्या ६१.८% पातळीचा उल्लेख आला होता. निफ्टीने हा पहिला टप्पा पार करून, तो त्यावर गेला आहे. आता या निसरडय़ा प्रवाहाची ७६.४% म्हणजे ५९०० ची पातळी हे निफ्टीचे आगामी लक्ष्य असेल याची खातरजमाच झाली आहे. या लक्ष्याच्या आता आपण अगदी समीप पोहचलो आहोत आणि म्हणूनच पुढच्या प्रवासात थोडी सावधगिरी आवश्यक ठरेल.  चालू आठवडय़ाचा कल काहीसा संमिश्र धाटणीचा आहे. शुक्रवारचा तांत्रिक आलेख पाहिल्यास, ‘शूटिंग स्टार’ मेणबत्ती रचना बनलेली दिसते, ज्यातून ५७४० च्या पातळीवर ताबडतोबीचा अडथळा असल्याचा संकेत मिळतो. म्हणूनच सोमवारच्या दिवशी निफ्टी निर्देशांक कोणत्या पातळीवर खुला होईल  आणि दिवसअखेर बंद होईल हे महत्त्वाचे ठरते. त्या दिवशी ५६४० हा अत्यंत महत्त्वाचा आधार स्तर असेल. तेजीचा हा प्रवाह अव्याहत राहायचा झाल्यास ही पातळी सोमवारी सांभाळली गेली पाहिजे.
डेरिव्हेटिव्हज्च्या नव्या ऑक्टोबर मालिकेचा पुट/ कॉल रेशियो शुक्रवारअखेर १.२४ वर होता, जो निफ्टी निर्देशांकाने जरी ५०० हून अधिक अंशांची चढण घेतली असली तरी तो अद्याप धडधाकट स्थितीत असल्याचे स्पष्टपणे सुचवितो.  ऑक्टोबर मालिकेचे व्यवहार आताशी सुरू झाले असल्याने ऑप्शन राइटर्सच्या कलावरून नेमका कयास करणे धाडसाचे ठरेल. पण तरी सकारात्मक संकेत कायम आहेत एवढे मात्र नक्की सांगता येईल.
निर्देशांक पायरी पायरीने नव्या कळसाकडे अग्रेसर असल्याचे तांत्रिक आलेख दर्शवित आहे. पुढचा महत्त्वाचा टप्पा हा ५७४०चा आहे. गेल्या आठवडय़ात तसा प्रयत्नही त्याने जरूर केला. ५७४० च्या पुढे तेजीवाल्यांचा मंदीवाल्यांवर जोरदार प्रहार निफ्टीला थेट ५९०० वर नेऊन ठेवेल.  पण हेही लक्षात असू द्या की, ५९४० ही फिबोनाची रिट्रेसमेंटची ७६.४% पातळी असून, हा स्तरावरून निर्देशांकाला कलाटणी मिळाली असल्याचे आजवरचा इतिहास सांगतो. म्हणून निर्देशांकाच्या या पातळीपर्यंतच्या प्रवास पाहण्याची आणि तोवर नव्याने काही दृढ संकेत मिळेपर्यंत वाट पाहा, एवढेच तूर्तास वाचकांना सूचित करता येईल.                      

सप्ताहासाठी शिफारस
*    केर्न इंडिया : (सद्य दर ३३१ रु.)     
    खरेदी: रु. ३२६ वर;  लक्ष्य: रु. ३१८-३१२
*    रिलायन्स कम्यु. : (सद्य दर ६४.८० रु.)     
    खरेदी: रु. ६६ वर;  लक्ष्य: रु.  ७०
*    कर्नाटक बँक : (सद्य दर १०९.१५ रु.)     
    खरेदी: रु. १११ वर;  लक्ष्य: रु. ११६-११८

गेल्या आठवडय़ातील खरेदी शिफारशीप्रमाणे,  रिलायन्स इन्फा, लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो आणि रिलायन्स पॉवर या तिन्ही समभागांनी आपले लक्ष्य गाठून अनुक्रमे ५७१, १६२०आणि १००.५० असे उच्चांक दाखविले.