बाजाराचे तालतंत्र : ‘करेक्शन’चा आठवडा! Print

‘रिफॉम्र्स’ हर्षोल्हास सरला आता..
सी. एम. पाटील, सोमवार, ८ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

निफ्टी निर्देशांकाने जेव्हा ५२०० च्या पातळीवर भक्कम आधार मिळवून कलाटणी घेतल्यापासून बाजारातील विद्यमान तेजीचा लाभ उठविण्याचे या स्तंभातून स्पष्टपणे सूचित केले गेले आहे. तेजीच्या या ताज्या प्रवाहात ५९०० चा निफ्टीचा नवीन कळस टप्पा आता नजीक येऊन ठेपला आहे आणि थोडी सावधगिरी जरूरच बाळगायला हवी. निफ्टी निर्देशांकाने ५८०० च्या पातळीवर काहीसा विसावा (इंटरिम टॉप बनविल्याचे)घेतल्याचे दिसून येत आहे. कारण सरलेल्या आठवडय़ात निफ्टीने ५८१४ चा उच्चांक दाखविल्यानंतर तो सप्ताहअखेर पुन्हा ५७४७ येऊन स्थिरावला आहे.


गेल्या आठवडय़ाच्या स्तंभातच, केंद्रातील सरकारच्या आर्थिक सुधारणांविषयक आकस्मिक धडाक्याने निर्माण केलेला प्रारंभिक उल्हास आता ओसरत चालला असल्याचे सांगण्यात आले होते आणि आठवडय़ाभरात बाजाराने ताज्या घोषणांना दिलेला थंडा-गरम प्रतिसाद याची प्रचीती देतो. गुरुवारी सायंकाळी बाजार बंद झाल्यावर सरकारकडून पुन्हा गरमागरम ‘रिफॉम्र्स’ घोषणांची बरसात झाली. केंद्रीय मंत्रिमंडळाने विमा क्षेत्रात ४९ टक्के थेट विदेशी गुंतवणुकीला मंजूरी देण्याबरोबरच, निवृत्ती वेतनाचे क्षेत्रही विदेशी गुंतवणुकीला खुले केले. परंतु या दोन्ही निर्णयांवर संसदेकडून शिक्कामोर्तब होणे आवश्यक असून आणि या प्रक्रियेला खूप मोठा कालावधीही लागू शकते, याची बाजारानेही दखल घेतली आहे.
तरी शुक्रवारी सकाळी बाजाराने ५८०० पुढे मोठी उसळी घेतली खरी, पण चाणाक्ष शेअर व्यापाऱ्यांनी तिचा नफा कमावण्याची संधी म्हणून नेमका लाभही घेतला. निर्देशांकावरही या नफा कमावण्याच्या संधीसाधूपणाचा परिणाम जाणवला आणि दिवसअखेर त्याने घसरणीसह ५७४७ च्या पातळीवर विश्राम घेतला. तांत्रिक आलेखावर त्यापायी ‘बेअरिश एन्गल्फिंग’ धाटणीची मंदीसदृश्य मेणबत्तीरचना तयार झाल्याचेही दिसून येते, जो अर्थात विद्यमान तेजीच्या प्रवाहाला धोक्याचा संकेत आहे.
पुढे काय?
डेरिव्हेटिव्हज्मध्ये ऑप्शन राइटर्सचा क्रियाकलाप पाहता, ऑक्टोबर मालिकेसाठी निफ्टीची कमाल पातळीला ५८०० अंशांचा बांध लागलेला दिसून येतो. विद्यमान तेजीला सुरुवात झाल्यापासून प्रथमच ऑप्शन्स राइटर्स हे बेधडकपणे ५८००/५९०० कॉल ऑप्शन्सकडे झुकलेले तर त्याच वेळी पुट ऑप्शन्सबाबत कोणताही पवित्रा घेण्याबाबत खूप सावधगिरी बाळगत असल्याचे दिसत आहेत. हा येत्या आठवडय़ासाठी निश्चितच एक नकारात्मक संकेत आहे. १.१३ वर रोडावलेले पुट/ कॉल गुणोत्तर (पीसीआर) हे देखील तेजीवाल्यांची पकड ढिली पडत असल्याचा इशारा आहे.
तांत्रिक आलेखही बाजाराने सावधगिरीचा पवित्रा धारण केल्याचे संकेत देत आहे. शुक्रवारची वाढलेल्या उलाढालीसह ‘बेअरिश एन्गल्फिंग’ धाटणीची मंदीसदृश्य मेणबत्ती रचना आणि आलेखात दिसते त्याप्रमाणे ‘मनी फ्लो इंडेक्स (एमएफआय)’मधील घसरण ही चालू आठवडा हा अधिक घसरणीचा राहील असा निर्देश देतो. त्यामुळे हा आठवडा हा ‘करेक्शन’ (दुरुस्ती)चा असल्याचा स्पष्टपणे निष्कर्ष काढता येईल. निफ्टी निर्देशांकासाठी या दृष्टीने ५६४० अंशांची पातळी ही महत्त्वपूर्ण ठरेल. ही या निर्देशांकाची महत्त्वाची आधारपातळी आहे. या पातळीखाली निफ्टी घसरल्यास ही निर्देशांकाची ही घसरण पुन्हा ५४५० पर्यंत रुंदावत जाऊ शकेल.          

सप्ताहासाठी शिफारस
*    कॅस्ट्रॉल : (सद्य दर ३२७ रु.)     
    खरेदी: रु.३२८ वर;  लक्ष्य: रु. ३४१
*    आयबुल्स रिअल :  (सद्य दर ६६.८० रु.)     
    खरेदी: रु. ६८ वर;  लक्ष्य: रु. ७२
*    आरईसी लि. : (सद्य दर २२८ रु.)     
    खरेदी: रु. २२९ वर;  लक्ष्य: रु. २३८

गेल्या आठवडय़ातील खरेदी शिफारशीप्रमाणे, कर्नाटक बँकेने आपले लक्ष्य गाठून ११५.८५चा उच्चांक दाखविला. केर्न इंडियाने ३२३चा नीचांक बनविला, तर रिलायन्स कॉमला सौद्यासाठी किंमत लक्ष्यच गाठता आले नाही.