‘धन’वाणी : न पडो आततायी पाऊल.. Print

श्रद्धा सावंत, सोमवार, ८ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

विमा, किराणा दुकाने, निवृत्ती वेतन, हवाई वाहतूक या क्षेत्रात थेट परकीय गुंतवणुकीला चालना देणारे निर्णय मनमोहन सिंग सरकारने जाहीर केले. डिझेल, गॅसच्या किंमती बाजारभावाच्या जवळ आणल्या..  या व अशा अनेक कारणांमुळे सध्या शेअर बाजार तेजीत आहे. बाजार २५,००० होणार की ३०,००० होणार अशी विचारणाही होत आहे. गुंतवणूकदारांच्या मनातील भीती नष्ट होऊन आशा आणि हाव या भावना प्रबळ होताना दिसून येत आहेत. अशावेळीच मग आततायी निर्णय घेतले जातात आणि आयुष्यभरासाठी हात चोळत बसण्याची पाळी येते..


गेल्या महिन्याभरात एकाहून एक धडाकेबाज निर्णय घेण्याची मालिकाच केंद्रातील संपुआ सरकारने (किंवा मनमोहन सिंग यांनी म्हणा हवे तर) लावली आहे. एकूणच वातावरण बदलून गेले आहे. पूर्वी नकोसे वाटणारे मनमोहन आता पुन्हा एकदा २० वर्षांनी तरुण झाल्याचा भास अनेकांना होत आहे. काही जण २०१२ ची तुलना १९९१ शी करीत आहेत. शेअर बाजारात तर एक नवीच जान आली आहे. एका महिन्यात काही शेअरच्या किंमती डबल झाल्या आहेत. निफ्टीसुद्धा महिन्याभरात १०% वधारला आहे. वाचकांच्या पत्रव्यवहारातून देखील तसेच संकेत मिळत आहेत. अगदी गेल्या  महिन्यापर्यंत शेअर बाजार किंवा इक्विटी म्युच्युअल फंडांबाबत लिहिले की, वाचकांची काळजीने भरलेली पत्रे येत असत. बहुतांश पत्रांमध्ये शेअर बाजार परत वर येईल का असा काळजीचा सूर असे. शेअर्स व शेअर्समध्ये पसे गुंतविणारे फंड विकून हे पसे सुरक्षित कर्जरोख्यांमध्ये (नॉन-कन्व्हर्टिबल डिबेंचर व इतर बाँडमध्ये) गुंतवावेत काय, अशीही विचारणा होत असे. पण आता अचानक चित्र बदलले आहे. गेल्या एक-दोन आठवड्यात अमूक शेअर घेतला तर चालेल का? तमका इकॉनॉमिक रिफॉर्म फंड चांगला आहे का? बाजार २५,००० होणार की ३०,००० होणार अशी विचारणा देखील होत आहे. घड्याळाचा लंबक जसा एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे येतो तसा गुंतवणूकदारांच्या मनातील भीती नष्ट होऊन आशा आणि हाव या दोन्ही भावना कमी अधिक प्रमाणात दिसून येत आहेत. आणि हीच वेळ आहे थोडा सावध पवित्रा घेण्याची.
यापूर्वी या स्तंभातून अनेकदा लिहिले गेले आहे की, प्रत्येक गुंतवणूकदाराने आपल्या अ‍ॅसेट अ‍ॅलोकेशनप्रमाणे गुंतवणूक करावी. ६०% शेअर्स व ४०% कर्जरोखे असे प्रमाण ठरविले तर गेल्या वर्षी शेअर बाजाराने काही दिले नाही म्हणून सगळे शेअर्स विकून पसा कर्जरोख्यात आणणे जसे चुकीचे आहे तसेच गेल्या महिन्यात शेअर बाजाराने जबरदस्त कामगिरी केली म्हणून सर्व कर्जरोखे विकून पसा शेअरमध्ये गुंतविणे हेही चुकीचेच आहे. शेअर बाजार पडत असताना तुम्ही तुमच्या अ‍ॅसेट अ‍ॅलोकेशनशी प्रामाणिक राहून चांगले शेअर्स किंवा चांगल्या इक्विटी फंडात पसे गुंतविले असतील तर आता तुम्हाला चांगला फायदा जरूर मिळाला असेल. थोडक्यात सांगायचे झाले तर तुमची आíथक व गुंतवणूक शिस्त बिघडवू नका.
आता शेअर बाजाराच्या सद्य स्थितीकडे वळूया. विमा, किराणा दुकाने, निवृत्ती वेतन, हवाई वाहतूक या क्षेत्रात थेट परकीय गुंतवणुकीला चालना देणारे निर्णय मनमोहन सिंग सरकारने जाहीर केले. डिझेल, गॅसच्या किंमती बाजारभावाच्या जवळ आणल्या.. या व अशा अनेक कारणांमुळे सध्या शेअर बाजार तेजीत आहे. पण येथे काही मुद्दे आपण लक्षात घेणे आवश्यक आहे. एखाद्या क्षेत्रात थेट परकीय गुंतवणुकीला परवानगी दिली म्हणजे दुसऱ्या दिवशी त्याचे परिणाम दिसत नाहीत. पँटलून कंपनीचा शेअर मात्र अल्पावधीत ६०% वाढला. शेअर बाजारात येणारा पसा हा तात्पुरत्या स्वरूपाचा असतो. तो जेवढ्या वेगाने येतो त्यापेक्षा जास्त वेगाने जाऊ शकतो. थेट परकीय गुंतवणूक मात्र अशी एका दिवसात येत नाही. परकीय कंपन्या साधकबाधक विचार करूनच निर्णय घेतात. या घोषणांचा प्रत्यक्ष परिणाम दिसायला कदाचित दोन-तीन वष्रे जावी लागतील. येथे या सर्व घोषणांची अंमलबजावणी करणे संपुआ सरकारला शक्य आहे असे गृहित धरले आहे. प्रत्यक्षात ते तसे होईलच असे नाही. आपल्या देशात घोषणा बऱ्याच होतात पण अंमलबजावणीच्या बाबतीत मात्र सगळा आनंदच असतो. काही शेअरच्या किंमती या शक्याशक्यतेच्या मर्यादा ओलांडून पुढे गेल्या आहेत. त्यामुळे डोळे झाकून एखाद्या शेअरवर पसे लावणे टाळावे.
शेअर बाजार वर गेल्यावर काही तज्ज्ञ मंडळी प्रॉफिट बुकिंगचा सल्ला देतात. पात्रतेपेक्षा जास्त वर गेलेले शेअर विकणे ठीक आहे. पण सगळे शेअर विकून घरी जाणेही अयोग्य आहे. ही वेळ आहे थोडी फार विक्री करण्याची जो पसा शेअरच्या गुंतवणुकीसाठी राखून ठेवला आहे तो चांगल्या शेअर्समध्ये राहिल याची खबरदारी घेणे आवश्यक आहे. म्युच्युअल फंडाच्या मार्गाने पेसे गुंतवावेत. शेअर बाजारातील ही तेजी आणखी काही काळ जरूर टिकेल, पैसा कमावण्याच्या संधीही मिळतील. त्यामुळे आततायीपणा करू नये.
लेखाच्या शेवटी एक वेगळा मुद्दा मांडायचा मोह मोडवत नाही. गेल्या एका महिन्यात निफ्टी साधारणत: १०% वर चढला. परदेशी गुंतवणूकदारांनी २८,००० कोटींची खरेदी भारतीय शेअर बाजारात केली. भारतात येणाऱ्या डॉलरच्या प्रवाहामुळे एक महिन्यांपूर्वी साधारणत ५५ रूपयांच्या आसपास असणारा अमेरिकी डॉलर आता ५२ रूपयांना मिळतो आहे. युरोपातील आíथक अराजक अजूनही संपले नाही. सर्वत्र चलन छपाई जोरात चालू आहे. या पाश्र्वभूमीवर सोन्याची किंमत महिन्याभरात अमेरिकी डॉलरमध्ये चढी राहिली आहे. पण डॉलरच्या तुलनेत रूपया सशक्त झाल्याने सोन्याच्या किंमती भारतीय रूपयात खाली आल्या आहेत. महिन्याभरात भारतीय गुंतवणूकदारांना सोन्यात साधारणत: १ टक्का नुकसान झाले आहे. पण ही परिस्थिती तात्पुरती ठरावी. जागतिक अर्थव्यवस्थेला कंबरतोड महागाईचा सामना आज ना उद्या करावा लागणार हे निश्चित आणि त्यावेळी सोने जोरदार उसळी घेणार हेही तितकेच खरे. भाज्यांचे भाव अचानक कडाडले तर सुगृहिणी कडधान्यांकडे वळते. ज्याचे भाव वाढताहेत त्याची जास्त खरेदी करून भाव आणखी वर जाण्याची प्राथना करण्यापेक्षा जेथे भाव वर जाण्याची शक्यता जास्त आहे पण सध्या भाव खाली येत आहेत अशा वस्तूंची खरेदी करणे केव्हाही रास्त.