विमा विश्लेषण : विमा पॉलिसीचे पुनरूज्जीवन Print

दिलीप सामंत, सोमवार, ८ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

प्रकाश हा सर्वसाधारण मध्यमवर्गीय कुटुंबामधील एक होतकरू मुलगा. आजचे वय वर्ष २९. उच्च शिक्षण पूर्ण करून वयाच्या २५ व्या वर्षांपासून भल्या मोठय़ा पगाराची नोकरी असलेला. मित्रपरिवार भरपूर. त्यापैकी एक विमा विक्रेता. प्रकाश नोकरीवर रुजू होताच त्या मित्राने एक अतिशय मोलाचा सल्ला दिलेला असतो. ‘अरे तुझ्यासाठी एक सही विमा पॉलिसी आहे. ती घेतलीस तर तुझा आयकर वाचेल, विमाछत्र मिळेल आणि पॉलिसीचा कालावधी संपल्यावर प्रीमियमपोटी जमा केलेली रक्कम दामदुपटीने परतसुद्धा मिळेल. प्रकाश खूश. नाहीतरी घरी वडीलधाऱ्यांनी प्रकाशच्या मागे ‘काहीतरी गुंतवणूक कर, सगळे पैसे उधळू नकोस’ असा ससेमिरा लावलेलाच असतो. प्रकाश त्वरित निर्णय घेतो आणि विमा विक्रेता मित्र तत्परतेने पुढील कार्यवाही पूर्ण करतो. एक-दीड महिन्यात प्रकाशला पॉलिसीचे कागद मिळतात आणि ते तो कपाटात बंद करून ठेवतो.
* पॉलिसीचा प्रकार : एंडाऊमेंट
* विमाछत्र    :  २५ लाख रु.
* वार्षिक प्रीमियम : ९२२४२ रु.
* टर्म    : २५ वर्षे
आज प्रकाश कपाटात काहीतरी शोधत असताना त्याला चार वर्षांपूर्वी काढलेल्या पॉलिसीचे कागद मिळतात आणि त्याला धक्काच बसतो. ही पॉलिसी तो पूर्णपणे विसरून गेलेला असतो. त्याने त्यानंतरचे तीन वर्षांचे हप्ते भरलेलेच नसतात. पहिल्या वर्षी प्रीमियमपोटी भरलेले ९२२४२ रु. चक्क वाया गेले म्हणून तो स्वत:वरच चरफडू लागतो. त्याला पॉलिसी रिव्हायव्हल हा प्रकार माहीत नसतो.
प्रत्येक विमा पॉलिसीची प्रीमियम जमा करण्याची एक ठराविक तारीख असते. त्या तारखेला विमाधारकाने प्रीमियमचा भरणा करणे आवश्यक असते. काही कारणास्तव हा भरणा होऊ शकला नाही तर त्यासाठी एक महिन्याची सवलतीची मुदत असते. ती मुदत संपली की पॉलिसी स्खलित (’ंस्र्२ी) होते. त्या पॉलिसीसंदर्भातील कोणतेही क्लेम कंपनी मान्य करीत नाही.
प्रकाशच्या पॉलिसीच्या बाबतीत त्याने तीन वर्षे प्रीमियमचा भरणा न केल्याने त्याची पॉलिसी स्खलित झाली होती. अशा परिस्थितीमध्ये एक आशेचा किरण दिसत होता. आणि तो म्हणजे प्रकाश ती पॉलिसी पुन्हा जिवंत करू शकत होता. विमाक्षेत्रातील कायद्यानुसार शेवटचा हप्ता भरल्यानंतरच्या पाच वर्षांच्या कालावधीमध्ये विमाधारक स्खलित झालेली पॉलिसी ऊर्जितावस्थेत आणू शकतो. त्यासाठी त्याला काय करावे लागते?
१) विमा कंपनीने निर्धारित केलेल्या डॉक्टरकडून आरोग्य तपासणी करून त्याने दिलेले प्रमाणपत्र विमा कंपनीला सादर करावे लागते.
२) बाकी राहिलेल्या प्रीमियमचे हप्ते आणि त्यावरील व्याजाची रक्कम कंपनीकडे भरणा करावी लागते.
प्रकाश हे सर्व सोपस्कार पूर्ण करतो. स्वास्थ्य प्रमाणपत्र कंपनीकडे जमा करतो. तीन वर्षांच्या बाकी राहिलेल्या हप्त्यांची रक्कम (२,७६,७२६ रु.) आणि त्यावरील व्याज (वार्षिक १५ टक्केप्रमाणे ८३०१६ रु.) असे  एकूण ३,५९,७४२ रु. कंपनीकडे जमा करतो. प्रकाशची पॉलिसी सुरू होते. भविष्यात पुन्हा असला गलथानपणा होऊ नये म्हणून प्रकाश आपल्या बँकेच्या खात्यामधून ईसीएसने भरणा करण्याची सुविधा अंगीकारतो.
हे सर्व सोपस्कार करून प्रकाशने काय मिळविले?
१) त्याची पॉलिसी जुन्या प्रीमियममध्येच चालू राहिली. (त्याने २९ व्या वर्षी नवीन पॉलिसी काढली असती तर वार्षिक प्रीमियमची रक्कम वाढली असती.)
२) कंपनीने चार वर्षांपूर्वी त्याला हमी दिलेले सर्व अबाधित राहिले.
३) भरणा केलेल्या प्रीमियमच्या रकमेवर आयकराच्या ८०क कलमानुसार सूट मिळाली.
पॉलिसीचे लाभ :
प्रकाशच्या वयाच्या ५० वर्षांपर्यंत त्याचा मृत्यू झाला तर त्याच्या नामनिर्देशकाला २५ लाख रु. आणि त्या वर्षांपर्यंत त्याच्या खात्यामध्ये जमा झालेला बोनस इतकी रक्कम मिळणार.
प्रकाश पॉलिसीची टर्म तरून गेला तर वयाच्या ५१व्या वर्षी त्याला विम्याची रक्कम (२५ लाख रु.) मिळणार. कंपनीकडून बोनसच्या रकमेची हमी दिलेली नाही. परंतु या पॉलिसीसाठी कंपनीने यापूर्वी ४.८ टक्केच्या दराने बोनस दिलेला आहे, तो जर ग्राह्य़ धरला तर प्रकाशच्या पॉलिसीची बोनसची एकूण रक्कम होते ३० लाख रु. म्हणजे त्याला एकूण ५५ लाख रु.ची प्राप्ती होणार.

विश्लेषण :
प्रकाश २५ व्या वर्षी प्रीमियमपोटी ९२२४२ रु. भरू शकतो. म्हणजे त्याची वार्षिक कमाई सुमारे ३ लाख रु.तरी असावयास हवी. आणि तो पुढील ३५ वर्षे नोकरी alt
करणार आहे या वस्तुस्थितीचा विचार केला तर २५ लाख. रु.ची विमारक्कम फारच क्षुल्लक वाटते. विमा क्षेत्रातील परिभाषेमध्ये तो ‘अंडर इन्शुअर्ड’ आहे.
गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून गणित मांडले तर त्याने वार्षिक ९२२४२ रु.प्रमाणे २५ वर्षांमध्ये कंपनीकडे जमा केलेल्या प्रीमियमच्या मोबदल्यात कंपनी त्याला ५५ लाख रु. देते. परताव्याचा दर होतो द. सा. द. शे. ६.२ टक्के (यामध्ये ८३०१६ रु.च्या व्याजाचा विचार केलेला नाही.)
प्रकाशच्या २९ व्या वर्षी त्याने जेव्हा स्खलित झालेल्या पॉलिसीचे पुनरुत्थान केले त्या वेळी त्याच्यासमोर आणखी एक पर्याय होता, आणि तो म्हणजे त्या पॉलिसीचे पुनरुत्थान न करणे. तसे केले असते तर प्रकाशने पहिल्या वर्षी भरलेल्या प्रीमियमचे ९२२४२ रु. अक्कलखाती जमा झाले असते. परंतु त्याने कंपनीकडे जमा केलेल्या एकूण २२९६८२४ रु. (२४ वर्षांचे प्रीमियम २२१३८०८ रु. + व्याजापोटी भरलेले ८३०१६ रु.) या रकमेचे काय करता आले असते त्याचा विचार करूया.
त्याने भारतातील पहिल्या दोन क्रमांकांच्या विमा कंपन्यांपैकी एका कंपनीची बिननफ्याची एक कोटी रुपयांची २५ वर्षांची प्युअर टर्म पॉलिसी घेतली असती तर-
*  कंपनी क्र. १ : क्लेम सेटलमेंट रेशिओ ९७.१ टक्के
वार्षिक प्रीमियम २७८०० रु. पंचवीस वर्षांच्या प्रीमियमची एकूण रक्कम ६,९५,००० रु. त्याने पॉलिसी लॅप्स करून बचत केलेल्या रकमेच्या (२२९६८२४ रु.) तुलनेत बचत १६,०१,८२४ रु. ही रक्कम २५ वर्षांमध्ये विभागली तर वार्षिक रक्कम होते ६४०७२ रु. समजा ६४,१०० रु. ही रक्कम ज्यामध्ये आयकरामध्ये सूट आहे आणि परतावाही आयकरमुक्त आहे अशा गुंतवणुकीच्या ‘सेफ’ पर्यायामध्ये गुंतविली तर २५ वर्षांनी त्याच्याकडे ५७,३४,६८६ रु.ची गंगाजळी तयार होते.
*  कंपनी क्र. २ :क्लेम सेटलमेंट रेशिओ ९५.४ टक्के
वार्षिक प्रीमियम ९५०० रुपये. २५ वर्षांच्या एकूण प्रीमियमची रक्कम २,३७,५०० रु. एकूण बचत २०,५९,३२४ रु. (२२९६८२४- २,३७,५००) वार्षिक बचत ८२३७२ रुपये. ही रक्कम दरवर्षी वरील ‘सेफ’ पर्यायामध्ये गुंतविली तर २५ वर्षांनी आयकरमुक्त अशी ७३,०१,८९० रु. इतकी गंगाजळी तयार होते.
वरील दोन पर्यायांचा अभ्यास केल्यावर असे लक्षात येते की प्रकाशने पंचविसाव्या वर्षी काढलेली पॉलिसी रिव्हाइव्ह करण्यापेक्षा ती लॅप्स करून (९२२४२ रु.चे नुकसान भोगून) नवीन पॉलिसी घेतली असती तर त्याचे विमाछत्रही चौपट झाले असते आणि परतावाही जास्त मिळाला असता.