‘अर्थ’पूर्ण : निवृत्तीचे नियोजन Print

जयंत विद्वांस, सोमवार, ८ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

निवृत्तीचे नियोजन करताना साठाव्या वर्षी निवृत्त असे न करता तब्येत चांगली असेपर्यंत अर्धवेळ किंवा पूर्णवेळ नोकरी किंवा व्यवसाय करीत राहाणे आवश्यक ठरणार आहे आणि हे नियोजन निवृत्तीच्या आधी पाच-सहा वर्षे सुरू करावे लागेल..
केदार जोशी, पनवेल यांनी प्रश्न विचारला आहे की, निवृत्तीसाठी गुंतवणूक नोकरीला लागल्यापासून करणे गरजेचे आहे का? आणि १००० रुपये दरमहा रळढ केल्यास १३ टक्के परतावा अपेक्षित धरून ३६ वर्षांनी ९६ लाख होतील, परंतु महागाई विचारात घेतल्यास ९६ लाख रुपये कमी पडणार नाहीत का?
केदारजी, मराठीत ‘थेंबे थेंबे तळेसाचे’ अशी म्हण आहे. ती येथे तंतोतंत लागू आहे. रक्कम दरमहा १००० रुपये आजच्या उत्पन्नाच्या हिशेबात लहान आहे. रक्कम जास्त गुंतवल्यास जमा रकमेतून दुसऱ्या कामासाठी रक्कम काढून घेण्याचा मोह होतो. म्हणजे घर घेणे, लग्न या कारणांसाठी अत्ता जमलेल्या रकमेतले थोडे काढू, नंतर जमल्यावर पुन्हा त्यात भर घालू असा विचार करतो. परंतु नंतर सबबी सांगून भर घातली जात नाही. म्हणून नियम सोपा असेल तर तोडला जात नाही. पुढे पगार वाढत गेल्यावर हजार रुपये खूप कमी वाटू लागतात. त्यावेळेस आपल्या इतर गरजा विचारात घेऊन जास्त रक्कम रळढ मध्ये गुंतवता येते. याला पर्याय काही जण आपल्या दरमहा पगारातून जास्त रक्कम प्रॉव्हिडंट फंडात कापून जाईल असे ठरवतात. हेसुद्धा एक रळढच आहे. पण इथे व्याज  ८ ते ९ टक्के मिळते. ९ टक्के व्याज ३६ वर्षांसाठी मिळाल्यास हीच रक्कम ३२,३०,००० रुपये होते. आपण इथे मागील काही वर्षांचा व्याजदर लक्षात घेऊन जास्तीत जास्त व्याज ३६ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीसाठी ९ टक्के विचारात घेत आहोत. इक्विटी म्युच्युअल फंडांच्या रळढचा ३६ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीसाठी परतावा १३ टक्के मिळणे शक्य आहे. कदाचित हा परतावा (व्याज नव्हे) १६-१८ टक्केसुद्धा होऊ शकतो. तसे झाल्यास रळढ ची मुदतीनंतर रक्कम रु. ९६ लाखापेक्षा जास्त मिळू शकते. यात प्रॉव्हिडंट फंडापेक्षा जोखीम जास्त आहे, म्हणूनच परतावा जास्त आहे. म्हणूनच मी आधीच्या लेखात फक्त १००० रुपयांचे रळढ चालू करा असे सुचवले होते. ही रक्कम कंपनीच्या प्रॉव्हिडंट फंड किंवा इतर सुविधांव्यतिरिक्त आपण आपल्यासाठी करावयाची आहे. फक्त प्रॉव्हिडंट फंड किंवा निवृत्तिवेतन योजनांचा विचार करीत राहिल्यास ही रक्कम फारच तुटपुंजी असेल.
आमचे एक क्लायंट १९८२ साली एका मोठय़ा कंपनीतून निवृत्त झाले. त्यावेळेस त्यांना दरमहा पगार ८२५ रुपये होता. प्रॉव्हिडंट फंड व इतर योजनांचे मिळून एकत्रित एक लाख २० हजार रुपये मिळाले. ते सर्व त्यांनी बँकेत ठेव स्वरूपात गुंतवले. दरमहा व्याज  १००० रुपये. ते त्या वेळेस खूश होते. सर्व जबाबदाऱ्या संपल्या होत्या. मुले मार्गी लागली होती. दरमहा पगारापेक्षा काम न करता जास्त व्याज मिळणार होते. आज त्यांचे वय ९० आहे. पती-पत्नी दोघांचा फक्त औषधांचा खर्च दरमहा ६००० रुपये आहे. मुले सर्व काही सांभाळतात. पण त्यांना आपण मुलांवर अवलंबून आहोत याची आत बोच राहाते.
सध्याच्या काळात महागाई वेगाने वाढते आहे. त्यासमोर निवृत्ती योजना तोकडय़ा पडत आहेत. कारण या निवृत्ती योजना बनवताना माणसाचे आयुर्मान ७०-७२ वर्षेपर्यंत अपेक्षित धरले होते. आज भारतात सरासरी आयुर्मान ७०च्या जवळपास आहे. तांत्रिक आणि वैद्यकीय सुविधांमुळे आज निवृत्त होणाऱ्याचे आयुर्मान १००च्या जवळपास असेल व ४० ते ५० दरम्यान ज्यांचे वय असेल असे सर्व जण शंभरी ओलांडतील. या सर्वासाठी आरोग्यसुविधा स्वस्तात पुरवणे सरकारला शक्य नाही. (केवळ म्हणूनच येत्या दहा वर्षांत सरकार स्वेच्छामरणाचा अधिकार देणारा कायदा पास करण्याची शक्यता आहे.) आपली सोय सरकार करणार नसेल तर आपले अपेक्षित आयुर्मान विचारात घेऊन निवृत्तीनंतरच्या अपेक्षित खर्चाची तरतूद कमवत्या काळात करणे आवश्यक ठरते.
केदारजी आपल्या दुसऱ्या प्रश्नात म्हटल्याप्रमाणे ९६ लाख रुपये ही रक्कम कमी पडणार नाही का? होय कदाचित कमी पडेल. महागाईमुळे ९६ लाख रकमेची क्रयशक्ती ९ लाख किंवा ६ लाखच शिल्लक राहील, परंतु हातात काहीच नसण्यापेक्षा ही रक्कम पेन्शन किंवा प्रॉव्हिडंट फंडाव्यतिरिक्त जास्तीची असेल. नोकरीला लागल्यावर १००० रुपयांनी सुरू केलेले रळढ नंतर आपल्या आयुष्यातील टप्प्यांवर परिस्थिती अनुरूप वाढवावे.
निवृत्तीचे नियोजन करताना साठाव्या वर्षी निवृत्त असे न करता तब्येत चांगली असेपर्यंत अर्धवेळ किंवा पूर्णवेळ नोकरी किंवा व्यवसाय करीत राहाणे आवश्यक ठरणार आहे. याचे नियोजन निवृत्तीच्या आधी पाच-सहा वर्षे सुरू करावे लागते.
आर्थिक नियोजन करताना अशिलांच्या निवृत्तीबाबत भ्रामक कल्पना नजरेस येतात. खूप जण सांगतात, ५०व्या वर्षी स्वेच्छानिवृत्ती घेऊन सामाजिक कार्य करावयाचे आहे. म्हणजे नक्की काय काम करणार माहीत नसते. म्हणजे खेडय़ात स्वत: जाऊन काही काम करणार का शहरात राहून त्याच संस्थेसाठी निधी संकलन, इतर कामे करणार हे ठरवलेले नसते. काही जण निवृत्तीनंतर आपले अपुरे छंद नव्याने जोपासणार असे सांगतात. म्हणजे वाचनाची आवड असणाऱ्यांनी वेळे अभावी १५-२० वर्षांत एकही पुस्तक हातात धरलेले नसते आणि चित्रकलेची आवड असणाऱ्यांनी रंगाचा ब्रश हातात धरलेला नसतो. या आवडी नव्याने हळूहळू जोपासाव्या लागतात. आर्थिक नियोजनाबरोबरच वेळेचे नियोजन फार महत्त्वाचे असते.
स्वेच्छानिवृत्ती (जबरदस्तीने निवृत्ती) स्वीकारणाऱ्यांमध्ये वेळेचे नियोजन हा भाग आर्थिक नियोजनापेक्षा फार महत्त्वाचा असतो. कालपर्यंत १२ तास रोज काम करणारी व्यक्ती आज आरामात असते. नंतर हा आराम नकोसा वाटू लागतो. याच सुमारास स्त्रिया मेनॉपॉज व पुरुष अ‍ॅन्ड्रोपॉजमुळे चिडचिडे झालेले असतात. त्यात व्ही.आर.एस.मुळे आर्थिक गणिते बदलू लागतात. पतीची नोकरी जाऊन पत्नी नोकरी करीत असेल तर तणाव वाढतात. आज शहरातून अशा विसंवादातून घटस्फोटाचे प्रमाण वाढले आहे. आर्थिक नियोजनकार म्हणून कंपन्यांमध्ये व्ही.आर.एस. घेणाऱ्या लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी बोलवतात. त्या वेळेस आवर्जून मानसोपचारतज्ज्ञ किंवा समुपदेशकास आम्ही बरोबर घेऊन जातो. आपण दहावीनंतर कोणता अभ्यासक्रम निवडावा यासाठी मुलांची चाचणी घेतो. त्या स्वरूपात परीक्षा घेतली नाही तरी आपल्या आवडी-निवडीनुसार, आपल्या क्षमतांनुसार आपण पुढील काळात काय काम करू शकतो याचे मार्गदर्शन करता येते.
पुढील काळात ज्येष्ठ नागरिकांची संख्या खूप वाढणार आहे. त्यांच्या समस्या वेगळ्या स्वरूपात समोर येणार आहेत. यावेळी आर्थिक स्वावलंबनाने निदान काही प्रश्न सुटू शकतील. आर्थिक नियोजनकाराची यासाठी चांगली मदत होऊ शकते.