गुंतवणूकभान : एखाद्याचे नशीब Print

वसंत माधव कुळकर्णी, सोमवार, १५ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

शुक्रवार, ५ऑक्टोबरला भारतातील दोन्ही शेअर बाजारात नेहमीप्रमाणे ९.१५ वाजता सौद्यास प्रारंभ झाला. ९ वाजून ४९ मिनिटांनी राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक ९०० अंशांनी (१६%) गडगडून गुंतवणूकदारांचे तीन लाख कोटींचे नुकसान झाले. एम्के ग्लोबल फायनान्स नावाच्या दलाल पेढीने स्टेट बँक, आयटीसी, इन्फोसिस, एचडीएफसी आदी कंपन्यांच्या समभागांची  ६५० कोटी रुपये किमतीची विक्री केली. ही विक्री ५९ सौद्यांमध्ये करून निफ्टी ५,७७३ वरून ४,८८८ पर्यंत खाली आणला गेला. राष्ट्रीय शेअर बाजार (एनएसई)ने आणि सेबीने आपापल्या स्वतंत्र चौकशींची घोषणा केली आहे. जे लहान  गुंतवणूकदारांचे नुकसान झाले त्याची नुकसान भरपाई कोणीही देणार नाही. व्यवस्थापनामध्ये zero sum game अशी संज्ञा आहे. याचा अर्थ म्हणजे त्या दिवशीच्या सर्व गुंतवणूक दारांच्या नफ्यांची आणि नुकसानाची बेरीज शून्य येते म्हणजे एकाचा फायदा ते दुसऱ्याचे नुकसान. खोलात जाऊन पाहिल्यास लहान गुंतवणूकदारांचे जे नुकसान झाले तो मोठ्या गुंतवणूकदारांचा फायदा झाला.  या घटनेतील काही प्रश्न अनुत्तरीत रहातात. खरे तर नियमाप्रमाणे जेव्हा सकाळी बाजार सुरु असताना दुपारी एक वाजेपर्यंत जर १०% हून अधिक निफ्टीमध्ये वाढ किंवा घट झाल्यास सौदे एका तासासाठी बंद व्हायला हवे होते. तसा नियम आहे. पण तसे झाले नाही ९.४९ ते ९.५१ या वेळेत ही घटना घडल्यावर १०.०४ मिनिटांनी सौद्यास पुन्हा प्रारंभ झाला. ६५० कोटींची विक्री झालेल्या समभागांची नंतर पुन्हा खरेदी केली. त्यामुळे क्षणार्धात ९०० अंशाची बहुतांश घसरण भरून निघाली.
 एकाच्या चुकीमुळे अन्य सर्वाची गरसोय होऊ नये म्हणून सौद्यास १५ मिनिटात प्रारंभ झाला, असे राष्ट्रीय शेअर बाजाराने म्हटले आहे.  बाजारात दोन प्रकारच्या मागण्या असतात. पहिली ‘मार्केट ऑर्डर’ या प्रकारात प्रचलित दरांवर सौदा होतो. म्हणजे निफ्टी फ्युचरचा भाव ५,६०८ आहे आणि ‘मार्केट ऑर्डर’मध्ये एक लॉट म्हणजे ५० निफ्टी फ्युचर ५,६०८ या भावातच विकले जातात. दुसऱ्या प्रकारच्या मागणीत ५,६०८ भाव चालू असताना, ५६१६ ला ५० निफ्टी विकण्याची मागणी नोंदवली जाते त्याला ‘प्राईस ऑर्डर’ असे म्हटले जाते. ती मागणी सौदा पुस्तकात नोंदली जाते व हा भाव येताच सौदा होतो.  ‘बास्केट ट्रेडिंग’ ही बाजारातील एक नेहमी घडणारी गोष्ट आहे. ही ऑर्डर राष्ट्रीय शेअर बाजारात व्यवहाराच्या दोन प्रणाली म्हणजे कॅश आणि डेरीव्हेटीव्ह यापकी ही गोष्ट कॅश प्रणालीत घडली. पहिली गोष्ट हा सौदा पंच झाल्यानंतर सौद्याची पूर्तता त्वरित झाली. साधारण दीड-दोन टक्के खालच्या भावापर्यंत सौदे पंच झालेले असतात. हे सौदे मुख्यत्वे २३स्र् ’२२ असतात. कोणी प्रचलित भावाच्या ६-७% खाली शेअर घेण्यास उभे राहात नाही. त्या शुक्रवारी ज्यांना हे शेअर ८-१० % खाली मिळाले त्यांना या गटांगळीची कल्पना नक्कीच असेल. हे सौदे जे शेअर फ्युचर्स अ‍ॅण्ड ऑप्शन्समध्ये आहेत त्यांच्यातच झाले. कारण या शेअराना खालचे किंवा वरचे सíकट नसते. दुसरी गोष्ट निफ्टीमध्ये पहिल्या पाच शेअरचा वाटा ४२% आहे. आयटीसी (८.४६%), रिलायन्स (८.०८%), इन्फोसिस (६.७५%), आयसीआयसीआय बँक (६.६१%), एचडीएफसी बँक (६.४३%), एचडीएफसी (६.३९%). उदाहरण म्हणून एक सौदा पाहू. समजा ज्या वेळेला ही ऑर्डर अथवा सौदा पंच करण्याच्या वेळेला स्टेट बँकेचा भाव २,३५५ आहे आणि समजा दोन लाख शेअर विकण्यासाठी मार्केट ऑर्डर पंच झाली. याचा अर्थ स्टेट बँकेचे दोन लाख शेअर विकले जाईपर्यंत भाव खाली जाईल. समजा वर म्हटल्याप्रमाणे १ लाख ९० हजार शेअर भाव ७% खाली येईपर्यंत विकले गेल्यावर स्टेट बँकेच्या शेअरवर सौदा थांबायला हवा होता.  म्हणजे स्टेट बँक बाजाराच्या भाषेत ‘ओन्ली सेलर’ दिसायला हवा होता- १० हजार शेअरसाठी! पण तसे झाले नाही. म्हणजे कोणी तरी एवढय़ा खालच्या भावात शेअर घेण्यासाठी उभे होते त्यांना हे शेअर मिळाले.
दुसरी गोष्ट अशी दर १५ सेकंदाला निर्देशांकाचे गणन होऊन तो दर्शविला जातो. आपल्या शेअर बाजारात शेअर हातात नसताना विक्री करायला (Short Sale) करायला बंदी नाही. त्यामुळे चुकून झालेला सौदा शेअर उसने घेऊन सौदा पूर्ती करता आली असती किंवा बाजार बंद झाला असता तर  लगेचच शेअर खरेदी करून सौदा त्याच भावात पूर्ती करता आली नसती. परंतु बाजार बंद न झाल्यामुळे चुकीची ऑर्डर परत शेअर खरेदी करून चुकीची दुरुस्ती करण्यात आली. म्हणजे समजा ९%पर्यंत निफ्टी खाली गेला असता तर हा प्रश्न उपस्थित झाला नसता. परंतु निर्देशांक १४% पडून सुद्धा एक तास बाजार का बंद झाला नाही, हा प्रश्न अनुत्तरीत राहतो. १० ऑक्टोबर २००८ रोजी अशीच घटना घडली. मोठी विक्री झाली आणि एका तासासाठी बाजार बंद झाला. पुन्हा उघडल्यावर बाजार वर आला तरी सेन्सेक्समध्ये दिवसअखेर ८०० अंशांची घट झालीच. गेल्या शुक्रवारच्या आणि या आधीच्या घटनेतील फरक म्हणजे २००८ मध्ये अनेक दलाल पेढय़ांनी विक्री केल्यामुळे निफ्टी व सेन्सेक्समध्ये विक्री केली होती तर गेल्या शुक्रवारी ही विक्री एकाच दलाल पेढीकडून झाली. दुसरी गोष्ट अशी की, ज्यांनी निफ्टी फ्युचर किंवा स्टॉक फ्युचर विकले होते त्यांना बाजार वर गेल्यामुळे मोठय़ा नुकसानीला सामोरे जावे लागले. त्यांना निफ्टीच्या वाढीला पायबंद घालणे आवश्यक होते. नाही तर याहून मोठे नुकसान झाले असते. तेव्हा आततायीपणे निफ्टीच्या वाढीला पायबंद घालण्यासाठी ही गोष्ट झाली असण्याची शक्यता अधिक आहे.
याचा एक फटका म्हणजे बाजाराची मानसिकता या गोष्टीने बदलली. तेव्हापासून बाजारात घसरणीला सुरुवात झाली. जेव्हा बाजारात मोठी घटना घडते. तेव्हा सेबीशी सल्लामसलत करून दोन्ही बाजार बंद करण्याची सोय आहे. परंतु बीएसई वर सुरळीत व्यवहार सुरू राहिल्याने, विशेष काही घडले नाही असे भासविले गेले. हा एवढा मोठा सौदा कसा झाला ते पाहू या. बाजारात सौदा झाल्यावर व विकलेले शेअर बाजारात दिल्यावर बाजारातून (टी+ २) प्रणालीनुसार पैसे अदा केले जातात. हे शक्य होते कारण बाजाराकडे दलालांनी मोठय़ा प्रमाणात पैसे भरलेले असतात, याला ‘मार्जिन’ असे म्हटले जाते. हे मार्जिन दिवसभरात कमी-जास्त प्रमाणात वापरात येते. सकाळी बरेच मार्जिन असते आणि दिवसभरात सौदे होतात तसे ते कमी होत जाते. बहुतेकदा संध्याकाळपर्यंत साधारण ८०% मार्जिन वापरले जाते. जेव्हा दुपारी दीडपर्यंत दोन दिवसांपूर्वीच्या शेअर लाढालीचे पैसे बाजारात दिले जातात, तेव्हा तितक्या रकमेचे मार्जिन पुन्हा मोकळे होते. जेव्हा मोठे मार्जिन शिल्लक असते, म्हणजे सकाळीच हा सौदा झाल्यामुळे त्याला कुठेही आडकाठी झाली नाही. हा मोठा सौदा बेरोख झाला आणि निफ्टीची घसरगुंडी उडाली.
हे अपयश संगणकीय व्यवहारप्रणालीचे आहे का, हेही तपासून पाहू. ज्या भावाने सौदे होतात ते भाव व त्या शेअरला दिलेला भारांक (जो लेखात आधी कंसात दिला आहे) यावर निर्देशांकाचे एका मिनिटात चार वेळी गणित मांडले जाते. ज्या शेअरमध्ये हे सौदे झाले ते सर्व निर्देशांकातील तर शेअर होतेच, पण ज्यांचा भारांक जास्त आहे असेच शेअर विकले गेले. या शेअर्सना वर किंवा खाली सर्किट नसते आणि बाजार काही थांबतो किंवा बाजाराची वेळ संपते तेव्हा या शेअरमधील सौदे थांबतात. समजा निफ्टीमध्ये सामील ५० पैकी ४५ शेअर्स खाली गेले तर निफ्टी स्वाभाविकपणे खाली जाणारच. ताज्या घटनेत निफ्टी १४% खाली गेला आणि परिणामी बाजार बंद झाला. त्याच शेअर्सची परत खरेदी करून बाजार वरही आला. ही घटना कॅश प्रणालीऐवजी एफ अ‍ॅण्ड ओमध्ये झाली असती तर नुकसान प्रचंड मोठे असते. संध्याकाळपर्यंत या दलाल पेढीने सुमारे ७५ कोटी राष्ट्रीय शेअर बाजाराला नुकसानीपोटी दिले. हे नुकसान म्हणजे या पेढीचे मार्जिन कमी झाले आणि त्या मार्जिनची भरपाई केली गेली. या आणि अशा तऱ्हेच्या सौद्यांचे काय करायचे याची पूर्वसूचना बाजार नियंत्रकांनी द्यायला हवी. जे सामान्य गुंतवणूकदारांचे नुकसान झाले त्याची भरपाई कुणीही देणार नाही.
या घटनेतून काही प्रश्न अनुत्तरीत राहतात. सकाळी बाजार उघडल्यापासून दहा वाजेपर्यंत मोठय़ा संख्येने सौदे होतात. त्या काळात हा सौदा होऊन बाजार का बंद झाला म्हणजे ज्याला market depth म्हटले जाते ती एवढी उथळ आहे की, एकावेळी मोठे सौदे बाजार झेलू शकला नाही? बाजाराची रोजची उलाढाला १००,००० कोटींची आहे, मग ६५० कोटींचा सौद्याने बाजार बंद पाडण्याइतके परिणाम का दिसावा? याचे उत्तर शोधताना आणखी एक प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे कमी किमतीची व्यवहारक्षमता असलेले परंतु संख्येने मोठय़ा प्रमाणात असलेल्या किरकोळ गुंतवणूकदारांची ताकद सरकारकडून का जोखली जात नाही? हा वर्ग बाजारात द्रवता आणत असतो. हे गुंतवणूकदार संस्थात्मक गुंतवणूकदारांसारखे कधीच एका दिशेने जात नाहीत. तरीही एनडीए किंवा यूपीए कोणत्याच सरकारने किरकोळ गुंतवणूकदार वर्गाच्या हिताचे कधीच रक्षण केले नाही. परिणामी हा वर्ग बाजारापासून दुरावलेलाच राहिला. खुल्या विक्रीत यांना अतिशय कमी वाटा मिळतो. तो वाटा वाढवून या वर्गाला बाजारात पुन्हा सक्रिय करावे लागेल. जगाच्या अन्य भागात संस्थात्मक गुंतवणूकदारांना कमी वाटा असतो, त्यामुळे तेथे हा वर्ग बाजारात टिकून आहे. सगळ्या सरकारांचे या वर्गाने बाजाराबाहेर जावे आणि म्युच्युअल फंडांचाच आसरा घ्यावा असेच धोरण राहिले आहे. हा वर्ग बाजारात परत आणणे अतिशय गरजेचे भासते.
ही चूक संगणक प्रणालीची की बाजार नियंत्रकांच्या अपुऱ्या चौकटीची त्रुटी हे चौकशीतून बाहेर येईल. परंतु दिवसाढवळ्या लुटल्या गेलेल्या लहान गुंतवणूकदाराचे त्यामुळे झालेले नुकसान भरून येणार नाही. किंबहुना नेहमीप्रमाणे चौकशी होऊन कुणाला शिक्षा होईल असेही वाटत नाही आणि झालीच तरी गुंतवणूकदारांचे नुकसान कोण भरून देणार हा प्रश्न अनुत्तरीत राहतोच.
हे सगळे विवेचन केल्यानंतर स्मरण होते ते गोविंदाग्रजांच्या ‘एखाद्याचे  नशीब’ या कवितेचे..

काही गोड फुले सदा विहरती स्वगागनांच्या शिरी,
काही ठेवितसे कुणी रसिकही स्वच्छंद हृदमंदिरी;
काही जाऊनी बैसती प्रभुपदीं पापापदा वारि ते;
एकादें फुटके नशीब म्हणुनी न प्रेतास शृंगारिते!

चढ-उतारातील प्रमुख टप्पे:
   तारीख                       वेळ           निफ्टी
गुरुवार, ४ ऑक्टोबर            बंद           ५,७८७
शुक्रवार, ५ ऑक्टोबर          ९.१५          ५,८११
    (सौद्यास प्रारंभ )    
    --,,--                    ९.४९          ५,७७३
    --,,--                    ९.५०          ४,९९७
    (७७५ अंशांची घसरण)
    --,,--                    ९.५१          ५,६२५
    (६२८ अंशांची वाढ)
    --,,--                   १०.०४         ५,६२५
    (१२ मिनिटांसाठी बाजार बंद)
    --,,--                   १०.०५         ५,७५१
    --,,--                   १०.१४         ५,८०१
    --,,--                     ३.३०         ५,७४७
    बाजार बंद (४० अंशांची घसरण)

हल्लीच्या काळातील चुकीचे सौदे
*  १ जून २०१० : सौदा पंच करण्यात चूक झाल्यामुळे रिलायन्सचा भाव २०%ने आणि सेन्सेक्स ६०० अंशांनी घसरला.
*  २० एप्रिल २०१२ : निफ्टी फ्युचरमध्ये ३०० अंशांची घसरण इन्फोसिसची क्षणभरासाठी २०% घसरण.
* ५ ऑक्टोबर २०१२ : रु. ६५० कोटीची चुकून विक्री निफ्टीमध्ये १४%नी घसरण