‘अर्थ’पूर्ण : गुंतवणूक जरा हटके Print

जयंत विद्वांस, सोमवार, २९ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

सर्व गुंतवणूक पर्यायांचा विचार करण्यापूर्वी आपल्याला त्या क्षेत्रातील संपूर्ण ज्ञान असणे आवश्यक आहे. तरच खरेदी, सांभाळणे, विक्री या व्यवहारांच्या प्रत्येक टप्प्यावर आनंद मिळेल / फायदा होईल. यासाठी नवीन माहिती सतत गोळा करीत राहावी लागेल. जाणकारांच्या संपर्कात राहावे लागेल. या क्षेत्रांतील विविध संस्थांचे सभासदत्व घेऊन अद्ययावत ज्ञान प्राप्त करावे लागेल.-
गुं तवणूक म्हटल्यावर आपल्याला पारंपरिक योजना म्हणजे सोने-चांदी, जमीन-जुमला, सरकारी कर्ज रोखे, बँक ठेवी, कंपन्यांच्या ठेवी, रोखे, शेअर्स, आयुर्विमा इ. योजना डोळ्यांसमोर येतात. सध्याच्या काळात नवीन पर्याय म्हणून कलाकृती (Art), उंची मद्य, दुर्मिळ वस्तू, नाणी, तांबे-पितळ यांसारखे धातू, पशुधन (Livestock) या योजना उपलब्ध होऊ लागल्या आहेत. पारंपरिक योजनांपेक्षा या नवीन पर्यायांमध्ये धोके जास्त आणि भरपूर नफा होऊ शकतो. या पर्यायांची थोडक्यात माहिती करून घेऊ.
उंची मद्य (Wine) : याची योग्य प्रकारे साठवणूक करणे गरजेचे असते. जितके दिवस साठवणूक जास्त तितकी किंमत जास्त मिळते. पुढारलेल्या राष्ट्रांत प्रामुख्याने युरोपमध्ये म्युच्युअल फंडासारख्या यात गुंतवणूक करणाऱ्या संस्था उपलब्ध आहेत. यांच्यामार्फत गुंतवणूक करणे आपल्याला सोयीचे असते. साठविण्यासाठी गोदामे, उत्तम दर्जा, इ. बाबी या संस्था पाहतात. उत्तम दर्जाची वाइन बाटल्यांत भरण्यापूर्वी मोठय़ा लाकडी पिंपामधून तळघरात १० ते १५ वर्षे साठवली जाते व नंतर विक्रीस उपलब्ध केली जाते. वाइन फंड हे गुंतवणूकदारांचे दलालासारखे काम करतात. भारतात या प्रकारच्या गुंतवणुकीच्या संधी सध्यातरी अस्तित्वात नाहीत.
दुर्मिळ वस्तू, नाणी : दुर्मिळ वस्तू, जसे जुन्या मोटारी, जुनी वाद्ये, जुनी घडय़ाळे, जुन्या काळातील घरातील वस्तू, जसे फर्निचर, भांडी (या वस्तूंना सिनेमात शूटिंगसाठी मागणी असते.) जुनी नाणी; यांना दुर्मिळतेमुळे कायमच चढे भाव मिळतात. हस्तांतरण सहज शक्य व सोपे असते; परंतु यासाठी नियमन संस्था (Market Regulator) अस्तित्वात नसल्याने दलाल ठरवतील त्यानुसार व्यवहार केले जातात. दुर्मिळ वस्तूंची एक विनोदी व्याख्या आहे, जी वस्तू तुमच्या आजोबांनी खरेदी केली, वडिलांनी जुनी झाली म्हणून विकली आणि तीच वस्तू तुम्ही पुन्हा खरेदी केली तर दुर्मिळ.
पशुधन : प्रगत राष्ट्रांमध्ये कमोडिटी एक्स्चेंजमार्फत घोडे, गायी, शेळ्या-मेंढय़ा इ. पशुधन यांचे व्यवहार होतात. यामध्ये गुंतवणूकदार म्हणून कमोडिटी एक्स्चेंजमध्ये व्यवहार करता येतात. भारतात ही सोय सध्यातरी नाही. लवकरच येण्याची शक्यता नाकारता येत नाही. यातील जोखीम, इन्शुरन्स इ. बाबींची माहिती असणे आवश्यक आहे.
धातू - उंची लाकूड - धान्य इ. : तांबे, पितळ, जस्त यांसारखे उद्योगधंद्यात लागणारे धातू, अन्न-धान्याच्या वस्तू, उंची लाकूड, नैसर्गिक वायू- यांचे व्यवहार कमोडिटी एक्स्चेंजवर होतात. भारतात टउ आणि नॅशनल कमोडिटी एक्स्चेंज ही दोन मोठी एक्स्चेंज आहेत. एकूण व्यवहारांच्या ९० ते ९५ टक्के भारतातील व्यवहार या दोन एक्स्चेंजवर होतात. गुंतवणूकदार म्हणून आपण येथे व्यवहार करू शकतो.
१०-१५ वर्षांपूर्वी भारतात टीकवूड प्लॅण्टेशन व व गोट फार्मिग कंपन्यांची लाट आली होती. भरपूर नफ्याचे आमिष व एजंटांना भरपूर कमिशन देऊन या योजना लोकांच्या गळ्यात अडकविल्या गेल्या. सेबीने अशा संस्थांना ‘कलेक्टिव्ह इन्व्हेस्टमेंट स्कीम्स’ म्हणून नोंदणी करणे बंधनकारक केल्यावर या संस्था बंद झाल्या. सध्यातरी म्युच्युअल फंडाप्रमाणे (सोने वगळता) यात गुंतवणूक करण्याची सोय नाही.
फिल्म फंड : सिनेमानिर्मिती व वितरण कंपन्यांच्या विशिष्ट प्रोजेक्टमध्ये या फंडांतून गुंतवणूक केली जाते. म्युच्युअल फंडाच्या ‘मीडिया व एण्टरटेंन्मेंट फंड’पेक्षा ही गुंतवणूक वेगळ्या प्रकारची असते. एखादा सिनेमा तयार करण्यासाठी पैसे गुंतविले जातात. नफा प्रचंड होतो, तसेच सिनेमा फ्लॉप झाल्यास किंवा रिलीज न झाल्यास पैसे बुडतात. भारतात अशी गुंतवणूक वैयक्तिक स्वरूपात केली जाते. म्युच्युअल फंडासारखे, फंड, सर्वसामान्यांना गुंतवणुकीसाठी खुले नाहीत.
सध्या भारतात एक-दोन संस्थांनी कलेक्टिव्ह इन्व्हेस्टमेंट स्कीम्सच्या धर्तीवर फिल्म फंड चालू केला आहे. कमीत कमी करावयाची गुंतवणूक सध्या खूप मोठी आहे. सिनेमा फंडात गुंतवणूक करणारे खूपदा भावनात्मक गुंतवणूक करतात. म्हणजे त्या क्षेत्रातील माहिती असतेच असे नाही; परंतु मी ‘क्ष’ सिनेमानिर्मितीत होतो, असे (गावभर) सांगता येते.
चित्र कलाकृती :
आपली आवड किंवा कला गुंतवणुकीचे साधन होऊ शकते व भरपूर नफा मिळवून देऊ शकते. एम. एफ. हुसेन एकदा म्हणाले होते, ‘माझी चित्रकलाकृती मलाच विकत घेणे परवडत नाही.’ इतक्या भरमसाट किमतींना कलाकृती विकल्या जातात. जगभर यासाठी प्रचंड मोठी बाजारपेठ आहे. भारतात याची वार्षिक उलाढाल रु. २०००/- कोटींच्या वर आहे. भारतातील काही औद्योगिक घराणी यामध्ये मोठय़ा प्रमाणांत उलाढाल करतात. मोठय़ा चित्रकारांच्या कलाकृती बाळगणे हे मानाचे मानले जाते.
आपणसुद्धा यामध्ये गुंतवणूक करू शकतो. त्यासाठी काही मुद्दे लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
विविध आर्ट गॅलरींना भेटी देऊन या क्षेत्रातील माहिती करून घेणे आवश्यक आहे. आर्ट मासिके पाहा. प्रदर्शने पाहा. मोठय़ा चित्रकारांच्या मागे न जाता एखाद्या नवोदित कलाकारांची चांगली कृती खरेदी करा. मोठय़ा कलाकारांच्या सर्वच चित्राकृती चांगल्या असतातच असे नाही. नवोदित कलाकार- नावारूपाला आल्यावर त्या चित्राकृतीची किंमत खूप वाढते.
 नवीन उभरत्या चित्रकारांची व त्यांच्या कलाकृतींची माहिती जमा करीत राहा. सध्याच्या कलेच्या ट्रेंडची माहिती गोळा करा.
बनावट किंवा डुप्लिकेट चित्राकृतीपासून सावध राहण्यासाठी सर्व कागदपत्रे नीट तपासावीत. प्रामुख्याने दिवंगत कलाकाराची कलाकृती घेताना, अन्यथा खोटा हिरा खरा समजून गळ्यात पडण्याची शक्यता असते. म्हणून नामांकित आर्ट गॅलरीमार्फत व्यवहार करावेत.
सर्व कलाकृतींचा विमा आवश्यक आहे. गुंतवणूक दीर्घ मुदतीच्या उद्देशानेच करा.
पूर्वी या व्यवहारांतील फायद्यावर पर्सनल इफेक्ट म्हणून आयकर नव्हता; परंतु आता खरेदी आणि विक्री दोन्ही व्यवहार तीन वर्षांच्या आत झाल्यास अल्पमुदत भांडवलवृद्धी कर लागतो व विक्री तीन वर्षांनंतर झाल्यास दीर्घ मुदत भांडवल वृद्धी कर लागतो.
वर्ष २००६ नंतर काही संस्थांनी आर्ट फंड काढले होते. त्यामध्ये प्रथम एडलवाइझ कंपनीचा यात्रा आर्ट फंड, नंतर ओशियन आर्ट फंड, क्रेयॉन कॅपिटल आर्ट फंड व कोपल आर्ट फंड बाजारात उतरले. अशा पद्धतीतील फंड सांभाळण्यासाठी कल्पकता व आर्थिक ज्ञान दोन्ही पाहिजे. कारण चित्राकृतीला अंगभूत किंमत (Intrinsic Value) नाही तर कलात्मक मूल्य असते. ती नजर असल्याशिवाय त्याची योग्य किंमत ठरविता येत नाही. योग्य किंमत येण्यास काही काळ जावा लागतो. कमीत कमी गुंतवणूक रु. २० ते २५ लाख करावी लागते व तीन वर्षे रक्कम काढता येत नाही. (Lock in Period) २००८ साली आलेल्या जागतिक मंदीमुळे या आर्ट फंडांपैकी काहींच्या कलाकृती विकल्या गेल्या नाहीत किंवा कमी किमतीत विकाव्या लागल्या. गुंतवणूदारांना खूप मोठे नुकसान सोसावे लागले. यानंतर नवीन आर्ट फंड बाजारात आले नाहीत.
वरील सर्व गुंतवणूक पर्यायांचा विचार करण्यापूर्वी आपल्याला त्या क्षेत्रातील संपूर्ण ज्ञान असणे आवश्यक आहे. तरच खरेदी, सांभाळणे, विक्री या व्यवहारांच्या प्रत्येक टप्प्यावर आनंद मिळेल/ फायदा होईल. यासाठी नवीन माहिती सतत गोळा करीत राहावी लागेल. जाणकारांच्या संपर्कात राहावे लागेल. या क्षेत्रांतील विविध संस्थांचे सभासदत्व घेऊन अद्ययावत ज्ञान प्राप्त करावे लागेल.
आर्थिक नियोजनकार म्हणून आम्ही हे सर्व पर्याय सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी नाहीत, असे सुचवितो. गर्भश्रीमंत लोकांसाठी (Ultra HNI)
गुंतवणुकीचे सर्व पर्याय निवडून झाल्यावर एकूण संपत्तीच्या एक ते दोन टक्के रक्कम या योजनांमध्ये गुंतविण्यास हरकत नसावी.