कल्पक आरास Print

संज्योत दुदवडकर ,शनिवार ’ १५ सप्टेंबर २०१२
alt

गणराय म्हणजे आपल्या सर्वाचं लाडकं दैवत! श्रींचं आगमन आता तर अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपलंय. साऱ्या आसमंतात बाप्पा येणार याचा आनंद निनादू लागलाय. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांप्रमाणेच घराघरांमधूनही गणरायाच्या स्वागताची लगबग सुरू आहे. घराची झाडलोट तर कधीच झालीय. श्रींचं आसन आणि एकूणच बाप्पा विराजमान असलेली खोली कशी सजवायची ही चर्चा आता मस्त रंगू लागली असेल.

गणेशाची बठक आणि ती सगळी खोली छान, आकर्षक व इतरांपेक्षा वेगळी दिसावी असं वाटत असेल तर हा लेख खास तुमच्यासाठी आहे.सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाजारात उपलब्ध असलेल्या आणि अतिशय आकर्षक दिसणाऱ्या थर्माकोलच्या मखरांना यावर्षीपासूनच रजा द्या. अगदी मनाशी निश्चयच करा की, गणेशाची आरास करण्यासाठी पर्यावरणाला हानिकारक असलेल्या थर्माकोलच्या मखरांचा वापर करणार नाही. गेल्या काही वर्षांपासून अनेक जणं शाडूच्या, इको फ्रेंडली गणेशमूर्त्यांना पसंती देत आहेत किंवा तांबा-पितळेच्या मूर्त्यांची प्राणप्रतिष्ठा करतात. मग आपण सजावटसुद्धा इको फ्रेंडली करायला काय हरकत आहे? घरातल्याच काही वस्तूंचा वापर व जरा डोकं चालवलं तर हे सहजशक्य आहे.
अनेकांकडे चौरंग असतोच आणि या चौरंगावरच बाप्पा विराजमान होतात. या चौरंगावर सुरेख झालर असलेला मोठा रुमाल अंथरून त्यावर श्रींची मूर्ती आसनस्थ करावी. तयार देव्हारे विकणाऱ्या दुकानांमधून लाकडामध्ये सिंहासनासारखी दिसणारी खुर्ची तयार करून घ्यावी (हे आसन उंचीने कमी असावे.) ही आसनव्यवस्था मग कायमस्वरूपी होते. अशा सिंहासनावर छोटी गादी, लोड, कुशन यांना छान सजवून त्यावर बाप्पांना आसनस्थ करावे. पण आता असं आसन बनवून घेण्यासाठी पुरेसा वेळ नाहीये. म्हणून मग चौरंगाची रचना करावी. त्यामागे आरसा ठेवावा. या दिवसांत नाना रंगांची फुलं, सुमधूर फळं यांची बाजारात रेलचेल असते. त्यांचा वापर करता येतो. गणपतीच्या मागच्या बाजूला ताज्या फुलांच्या माळा सोडता येतील. रोज ताजी फुलं आणणं थोडंसं त्रासाचं होत असेल तर प्लॅस्टिकच्या फुलांच्या माळा हा एक चांगला पर्याय आहे. अशा माळा बाजारात सहजी उपलब्ध असल्याने त्या आपल्या पसंतीने घेता येतील. अशा माळा फक्त गणेशोत्सवासाठीच नव्हे तर इतर सणसमारंभासाठीसुद्धा उपयोगी पडू शकतात. मण्यांच्या माळा, तोरणं यांचा वापर करूनसुद्धा छान आरास तयार होईल. पण हा पर्यायसुद्धा नको असेल तर कागदी फुलांच्या, क्रेपच्या माळा मागच्या बाजूला सोडता येतील. बाप्पांच्या आजूबाजूला फळं, सुगंधी ताजी फुलं ठेवावीत. जुन्या तांबा-पितळेच्या समया, लामणदिवा यांना लख्खं करून त्यात सतत दिवा तेवत ठेवा. श्रींच्या मुखकमलावर जेव्हा समयीच्या ज्योतीचा प्रकाश पडेल तेव्हा बघा वातावरण एकदम मंगलमय होऊन जाईल. छोटय़ा आकारातली, नक्षीकाम असलेली पितळेची पसरट, खोलगट ताह्मणासारखी भांडी बाजारात, हस्तकलेच्या प्रदर्शनात विकत मिळतात. ती आणून बाप्पाच्या शेजारी ठेवावीत. त्यात पाणी घालून ताजी फुलं टाकावीत. खूप सुरेख दिसतं. फुलं नको असतील तर दिवाळीसाठी पाण्यावर तरंगणारे दिवे मिळतात, ते त्यात सोडावेत. मातीच्या कंदिलांचा देखील वापर करता येतो.
अनेकांना फुलांच्या माळा, तोरणं, लाकडी आसन यात तोचतोपणा वाटत असेल आणि थर्माकोलसारख्या मखरांची सुंदरता हवी असेल तर पुठ्ठय़ाचा वापर करावा. चांगल्या जाडीच्या पुठ्ठय़ा (कार्डबोर्ड)पासून आपल्याला हवे तसे आणि हव्या त्या आकारात मखर बनवू शकतो. चौरंगाच्या बाजूने पुठ्ठय़ाचं मखर तुम्ही करू शकता. उदा. तळपत्या सूर्याचं चित्र पुठ्ठय़ावर रेखाटून त्या आकारानुसार तो कापून घ्यावा. त्यावर छान सोनेरी, चंदेरी चकाकता कागद चिकटवावा. श्रींच्या मागे अशी रचना करावी. खूप सुरेख दिसतं. याच्या मागे लाईटस्ची रचना करता येईल. या गोष्टी एक-दोन दिवसांत सहज होऊ शकतात. अनेकदा उंची साडय़ा विरतात पण त्यांचे पदर खूप छान असतात. असे पदर कापून ते गणपतीच्या मागे पडद्यासारखे लावता येतील. यासाठी पठणीच्या पदराचा उपयोग करावा. अतिशय सुरेख दिसतं. अशा पद्धतीने चटयांचा उपयोगही करता येतो. रंगीत, चारी बाजूने जरीची झालर असलेल्या चटया आज सहज उपलब्ध आहेत. तसेच अशा रचना आपण आलटून पालटूनही करू शकतो, त्यामुळे सजावटीत वैविध्य राहातं. हे झालं श्रींच्या आसनव्यवस्थेच्या सजावटीसंदर्भात. पण ज्या खोलीत बाप्पा विराजमान असतात ती खोली म्हणजेच दिवाणखानासुद्धा तितकाच आकर्षक पद्धतीने सजवलेला असला पाहिजे. श्री जिथे विराजमान आहेत त्याच्या आजूबाजूला भारतीय बठक मांडावी. विविध दुकानं, मॉल्समध्ये सुंदर कुशन्स, लोड कव्हर्स मिळतात. त्यांनी ही जागा अधिक आकर्षक करता येईल. यामुळे खोलीला एक प्रकारचं पारंपरिक रूप प्राप्त होतं. याशिवाय गालिचे, दरीज यासुद्धा जमिनीवर अंथरता येतील. प्रवेशद्वाराशी आपण रांगोळी रेखाटतोच. इथे छोटय़ा स्टुलावर एखादं मातीचं पसरट मडकं ठेवून त्यात पाणी व ताजी फुलं घालता येतील. अशाप्रकारे आपण आपल्या कल्पनाशक्तीला चालना देऊन नव्याजुन्या वस्तूंचा मेळ साधून सुरेख सजावट करू शकतो.