गणराय येता घरा.. Print

सुचित्रा साठे ,शनिवार ’ १५ सप्टेंबर २०१२

गणेशाविषयी मनात भक्तीभाव असो वा नसो, सर्व लहानथोर त्याच्या आगमनाची आतुरतेने वाट पहात असतात. सारं घर गणेशाच्या स्वागतासाठी सज्ज होतं आणि साऱ्या घरात एकप्रकारची सकारात्मक ऊर्जा भरून राहाते.
वाटेवरच्या गणपतीच्या कारखान्यातले गणपती रंगू लागले की, घरालाही त्या मंगलमूर्तीच्या आगमनाचे वेध लागतात. ‘पुढच्या वर्षी लौकर या’ असं आग्रहाचं आमंत्रण बाप्पांना दिलेलंच असतं. पण अधिक महिना येतो आणि या पाहुण्याचं येणं चांगलं महिनाभर लांबतं. एरवी दहीहंडी फुटली की घर गणपतीच्या वाटेकडे डोळे लावून बसतं. ‘आमच्या घरी गणपती बघायला या हं,’ भावभक्तीने केलेल्या या आमंत्रणाची आवर्तनं वातावरणात सातत्याने उमटतच असतात. सर्वसाधारणपणे वेळेची सबब पुढे करणारी व्यक्ती वेळात वेळ काढून विघ्नहर्त्यांच्या दर्शनाला मात्र येतेच. ‘आपण मोठा गणपती आणू या नं,’ हा बालहट्ट विचारात घेतला जातो. एरवी टंगळमंगळ करणारी तरुणाई बाप्पाचं ओझं आपल्या खांद्यावर घेण्यात ‘हात’भार लावायला मात्र उत्साहाने पुढे असते. गणपतीच्या दुकानांत जाऊन सर्वानुमते मूर्तीची निवड करून तिच्या गळ्यात आपल्या नावाचं लेबल अडकवलं की, यजमानासकट सगळ्यांनाच ‘आता तो आपला झाला’ याचा मनस्वी आनंद होतो. न कळत्या वयातही लहानगी तर ‘आपण त्याला घरी कधी न्यायचं, तो तयार होऊन बसला आहे, मग आत्ताच नेऊया नं’ हा प्रश्न विचारून भंडावून सोडतात. ‘चिंतिलेले देई क्षणी, असा तो चिंतामणी’ अशा त्या गणरायाचे स्वागत करण्यासाठी सगळं घरदार चैतन्याने भरून जातं.
बच्चेकंपनीच्या युनिट टेस्टच्या ‘पाटय़ा टाकून’ झाल्या की तयारीला खरा रंग चढतो. कॅसेट लावून पूजा करण्यात मजा वाटत नसल्यामुळे आपल्याला हवी ती वेळ मिळवण्यासाठी गुरुजींना फोन करून पुजेची वेळ निश्चित करण्याचे काम अगदी युद्धपातळीवर केले जाते. नंतर मात्र सगळं लक्ष ‘घरात’ दिले जाते. ‘अतिथी देवो भव’ ही आपली संस्कृती असल्यामुळे कोणीही येणार म्हटलं की, त्याच्या आदरातिथ्याचं नियोजन करावंच लागतं. इथे तर प्रत्यक्ष  ‘सिद्धिविनायक’ येणार, मग काहीतरी ‘स्पेशल’ हवंच. बाप्पाची घरातली जागा निश्चित करून या जागेवरची सगळी अतिक्रमणं अगदी आनंदाने हटवली जातात. छोटे-मोठे चार हात एकत्र येतात आणि साफसफाईची मोहीम फत्ते केली जाते. चिमणी पावलं थोडा ‘भाव’ खात पायात पायात येणारी आपली ‘वाहन संपत्ती’ काही क्षणांपुरती तरी खेळण्याच्या खणांत कोंबून टाकतात. चार-सहा दिवसांसाठी ‘नो पार्किंग’ जाहीर केलं जातं. अर्थात प्रत्यक्षात किती आचरणात येतं ही गोष्ट अलाहिदा. रिकामी जागा डोळ्यात साठवत आरास करण्याचे बेत रंगू लागतात. पर्यावरण रक्षण हा कळीचा मुद्दा लक्षात घेऊनच खलबतं होतात. मूर्तीच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कीचनमधून आवश्यक सूचना तरुणाईच्या अतिउत्साहावर काबू ठेवतच असतात. ‘होऽऽऽ गं’ क्रिया तशीच प्रतिक्रिया उमटत असते. ‘नेपथ्याचे आऊटसोर्सिग करायचे का?’ हा ‘आयटी’वाल्यांचा विचार आल्या पावली परत पाठवला जातो आणि झटपट एकमुखाने अंतिम निर्णय होत सजावटीचा प्रश्न सुटतो. कामाचं वाटप होतं आणि हौशी ‘लोक’सभा बरखास्त होते.
ढगाळ वातावरणाचा अंदाज घेत गृहलक्ष्मीने खडखडीत वाळण्यासाठी आंबेमोहोर तांदूळ धुऊन वाळत घातलेलेच असतात. त्याच्यावर अधूनमधून घरातला पोक्त हात फिरत असतो. ‘आपण हात घातला की मात्र तांदळात खेळू नको असे म्हणत आपल्या पाठीवर धम्मक लाडू का मिळतो,’ हे कोडं शेंडेफळाला सुटत नसतं. चेहऱ्यावर तो भाव खेळवत ते तिथंच घुटमळत राहतं. दर्शनाला येणाऱ्या लोकांना प्रसाद म्हणून देण्यासाठी ‘पंचखाद्य’ करण्यात गृहिणीचे कल्पक नियोजन असते. त्यासाठी मग खारीक, खोबरं, खसखस, खडीसाखर व खिसमिसच्या पिशव्या फ्रीजवरती दाटीवाटीने विसावलेल्या असतात. ‘जड झाले ओझे’ म्हणत फ्रीज ‘थंड’ बसलेला असतो. प्रसादाबरोबर येणाऱ्या-जाणाऱ्यांना खाऊ काय द्यावा याचे विचारचक्र गतिमान झालेले असते. पुजेची कोरडी तयारी करण्यासाठी आजीने लहान नातवंडांना हाताशी धरलेले असते. समईच्या लांब वाती, निरांजनाच्या फुलवाती, कापसाची वस्त्रे करण्याचे धडे गिरवले जातात. तुपात भिजलेल्या फुलवातीची बैठक ठीकठाक करत प्लॅस्टिकच्या कागदावर तिला उभी करण्यात छोटय़ांना गंमतच वाटते. कापसाच्या वस्त्राचे मणी मोजताना अंकाशी होणारी त्यांची झटपट आजी तिरप्या डोळ्याने कौतुकाने न्याहाळते. आपली ‘पाच नाजूक बोटे’ हळदकुंकवात अक्षरश: बुचकळून वस्त्रांना लावताना ती वस्त्रे सौभाग्यवती होतात.
हरितालिकेचा दिवस उजाडतो. आजीचा कडक उपासाचा संयम बघून नातीला साबुदाण्याची खिचडी खाऊन उपास करण्याचा मोह पडतो. ‘हे चालतं का गं उपासाला?’ तिला सारखा प्रश्न पडतो. थोडा वेळ ती कळ काढते पण घरातले ‘दादा’ लोक मुद्दाम समोर बसून, चिवडा, चकली खात चिडवतात. संयमाचे बांध धडाधड कोसळतात. ‘मी मोठी झाले की उपवास करीन हं,’ ती आजीचं समाधान करते. पंचामृती पुजेची तयारी करण्यासाठी चांदीचं ताट, कचोळं, कापुरआरती, ताम्हन-पळी भांडं ही उपकरणी कपाटातून  बाहेर येतात. भातुकलीत ‘भाजी भाजी’ खेळताना पानं तोडायची छोटे कंपनीला सवय असते. त्यामुळे पत्री काढायला ‘ताई’बरोबर ती धावतेच. पानांची नावानिशी ओळख करून ‘अभ्यास’ घडवून आणण्याची ‘ताई’गिरी होतेच. तगर, जास्वंद, मधुमालती, मोगरा, आंबा, गुलाब, माका कधी ‘काटा’ टोचत, तर कधी ‘चीक’ लावत सलगी करत आपले गुणधर्म दाखवत राहातात. दुर्वा निवडून त्याच्या जुडय़ा करण्यात वेळ कुठे जातो कळत नाही. आंब्याच्या दुमडलेल्या पानांना खराटय़ाच्या काडीचा तुकडा टोचून, सुतळीत ओवून तयार झालेलं तोरण दरवाजा अलंकृत करतं. बाजारातून हार, फुलं, नैवेद्यासाठी साखरफुटाणे, पेढे, फळं यांच्या पिशव्या हजर होतात. स्वयंपाकघरातून मोदकाच्या सारणाचा खमंग वास दरवळतो.
संध्याकाळी गणपती बाप्पांना आणण्यासाठी धामधूम सुरू होते. यजमान किंवा मोठे चिरंजीव डोक्यावर टोपी घालून ताम्हन किंवा पाट घेऊन आनंदमूर्ती आणायला जातात. सगळी चिल्लीपिल्ली नवीन कपडे घालून झांजा वाजवत नाचत राहतात. ‘मंगलमूर्ती मोरया’ म्हणत बाप्पांना घेऊन आनंदात, उत्साहात ‘कपाळी केशरी गंध, गणेशा तुझा मला छंद’ असे गात सगळी मिरवणूक वाजतगाजत घरी येते. आईने सर्वाच्या पायावर दूधपाणी घालून औक्षण केल्यावर सगळे घरात येतात. बाप्पाच्या लोभस रूपाकडे सगळे बघतच राहतात. त्याच्या ‘दर्शनमात्रे’ डोळ्यांच्या कडा ओलसर होतात. आरास पूर्ण करण्यासाठी ‘रात्र जागवावी असे आज वाटे’ हा तरुणांचा मनसुबा असे.
गणेशचतुर्थीचा दिवस उजाडतो. मनोभावे पूजा होते. आरतीचा गजर होतो. पंचखाद्याचा प्रसाद तोंडात विरघळतो. मग स्वयंपाकघरात महानैवेद्याची धांदल चालू होते. मोदकाची उकड केली जाते. तोंडाचा चंबू करून आवळ्याएवढय़ा गोळ्याची मस्त खोलगट पारी केली जाते. चार बोटं बाहेर व अंगठा आत घालून पारी करताना प्रत्येकाचं लक्ष दुसऱ्याच्या मोदकावर असते. पारीला बाहेरून चिमटे काढून सारण भरले जाते. कळीदार मोदक जमला की आनंदाच्या उकळ्या फुटतात. नकटय़ा व हसणाऱ्या मोदकांची जबाबदारी आईकडे असते. सर्वाचे हात भरभर चालतात. २१ मोदकांचा नैवेद्य बाप्पाला दाखवला जातो. लुसलुशीत, खमंग मोदकांनी आकंठ जेवणं होतात. सकाळ-संध्याकाळ आरती, प्रसाद, नातेवाईक, मित्रपरिवार यात दिवस कुठे पळतात कळतही नाही. बाप्पांचा निरोप घेणे अगदी जिवावर येते. ‘पुढच्या वर्षी लौकर या’ म्हणत मंगलमूर्तीच्या हातावर दही घालून बरोबर शिदोरी दिली जाते. ‘गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला’ म्हणताना डोळ्यांत पाऊस दाटून येतो.