संवादाला अवकाश देणारं घर Print

मिलिंद मुळीक , शनिवार , २२ सप्टेंबर २०१२

घर आणि भवताल, भोवतालचा निसर्ग यातले अडसर मला नको असतात. घराच्या भिंती कुठे संपतात आणि बाहेरची झाडं कुठे सुरू होतात, हे कळता कामा नये. आत आणि बाहेर-सगळं आपलंच तर आहे; मग कशाला हवंय कुंपणबिंपण? आणि कुंपण नसेल तर पलीकडेही नाही आणि अलीकडेही नाही!
घ र! आपण सर्वात कम्फर्टेबल असतो, अशी ही जागा. आपलं घर ते आपलं घर. पसरलेलं असो किंवा नीटनेटकं; घरात असताना मिळणारं समाधान निराळंच. तिथल्या कोपऱ्यान् कोपऱ्याशी आपले बंध जोडलेले असतात.
चित्रकाराच्या, लँडस्केप आर्टिस्टच्या दृष्टिकोनातून सांगायचं, तर मला दगड, माती, विटा, लाकूड अशा नैसर्गिक साहित्यातून बांधलेलं घर विलक्षण आवडतं. कोकण मला पुन:पुन्हा भुरळ घालतं, ते याच कारणानं. काँक्रीट, काच, स्टील वापरून बांधलेल्या घरातली कृत्रिमता माझ्या नजरेला बोचत राहते.
लाल विटांनी बांधलेलं, उतरत्या छपरांचं कौलारू घर माझ्या मनात नेहमी घर करून असतं. अर्थात, असं घरही मला एखाद्या निर्मनुष्य ठिकाणी एकाकी असलेलं चालणार नाही, रूचणार नाही. चार-सहा घरांच्या सोबतीनं एखाद्या डोंगरवस्तीत माझं घर उभं असावं, असं मला नेहमी वाटतं. माझ्यासाठी घर हा समूहाचा एक भाग आहे. म्हणूनच मला लहानसं, बाहेरच्या अवकाशाशी, इतर माणसांशी सहज संवाद साधायला सोयीचं असं घर आवडतं. महालवजा प्रशस्त, श्रीमंती घरांपेक्षा छोटय़ा, परस्परांत गुंतलेल्या घरांशी, अशा घरांना जोडणाऱ्या, संवादाची भरघोस संधी देणाऱ्या गल्ल्यांशी मी स्वत:ला अधिक चांगलं, अधिक घट्ट जोडू शकतो.
घरासमोरचं अंगण, चार-सहा घरं भोवती घेऊन संवादाला आमंत्रण देणारी चावडी या माझ्या आवडत्या जागा. तशीच घराची गच्चीही! गच्चीत- टेरेसवर डोळे मिटून बसावं किंवा पुस्तक वाचावं किंवा बाहेरचं, इकडचं-तिकडचं जग पाहात बसावं. आला-गेला, धोबी, वॉचमन, भाजीवाली, झाडं, पानं, पक्षी, गाडय़ा, स्कूटर्स, तरुण-तरुणी, त्यांचं मोबाइलवरचं बोलणं! जगण्याचा प्रवाह आपल्यासमोर वाहतो आहे आणि हातात गरम चहाचा कप!
घर आणि भवताल, भोवतालचा निसर्ग यातले अडसर मला नको असतात. घराच्या भिंती कुठे संपतात आणि बाहेरची झाडं कुठे सुरू होतात, हे कळता कामा नये. आत आणि बाहेर-सगळं आपलंच तर आहे; मग कशाला हवंय कुंपणबिंपण? आणि कुंपण नसेल तर पलीकडेही नाही आणि अलीकडेही नाही! पाँडिचरीच्या एका भागात तशी घरं आहेत. मोठी प्लिंथ, फक्त बेडरूम आणि बाथरूम भिंतींमध्ये बंद, बाकी स्पेस खुल्या आकाशाला झेलणारी, झाडांतून येणारा वारा इकडून-तिकडे खेळवणारी.
घरात आतून-बाहेरून स्वत:चा एक वेगळा चेहरा मात्र असावा. घराची एक बाजू खाली, दुसरी थोडी वर उचललेली, चहूबाजूंनी बाल्कनी, उतरती छप्परं यातून कितीतरी भौमितिक आकार निर्माण होतात. हे आकार भवतालाला जास्त आपलंसं करतात. माणसांचं निसर्गाशी, माणसांचं परस्परांशी इंटरॅक्शन वाढविणारी घरं हवीत. म्हणून मला जुने वाडे, चाळीवजा घरं आकर्षित करतात. ती तऱ्हेतऱ्हेचे बंध निर्माण करतात. कौटुंबिक वातावरण तयार करतात. भारतीय वास्तुकलेत हा गुण आहे. आजची बहुसंख्य घरं मात्र पाश्चिमात्य वास्तुकलेला अनुसरणारी आहेत. मला ती परकी वाटतात.
घराच्या अंतर्भागाबद्दल बोलायचं, तर प्रकाशापेक्षाही सावली जास्त महत्त्वाची. आपला देश उष्ण कटिबंधातला. प्रकाश सगळीकडे भरपूर आहेच. घरात मात्र सावलीचं प्राधान्य हवं. ती विसावा देते. विटांची घरंही गारवा देतात आणि मातीशी-जमिनीशी असलेल्या नात्याची आठवण दाटून राहते अशा घरांमध्ये.
सुटी, एकाकी घरं जशी मला नकोशी वाटतात, तशा घरातल्या खोल्याही परस्परांपासून तुटलेल्या नकोतच. लॉबी, ट्रान्झिशन स्पेस किंवा दुसऱ्या खोलीत उघडणारं दार या सगळय़ा गोष्टी घरातल्या अवकाशाच्या तुकडय़ांना परस्परांशी जोडणाऱ्या, बंध निर्माण करणाऱ्या. एका खोलीत बसायचं, दुसऱ्या खोलीत डोकवायचं, ही माझी नेहमीची सवय.
लिव्हिंग रूम आणि किचनचा निदान व्हिज्युअल कनेक्ट शाबूत हवा. किचनमधले आवाज आणि वास लिव्हिंग रूममध्ये पोचलेले मला आवडतात. काहीतरी खमंग होत असल्याची कल्पनाही किती रम्य.. आशादायी!
घरातली मधली खोली, पूर्वीचं माजघर! कुठलंच लेबल नसलेली ही जागा. खरं तर सगळय़ा खोल्यांना आणि माणसांना जोडणारी. कपाट, एक टेबल, काही पुस्तकं.. मोजकंच फर्निचर आणि दोन खुच्र्या.. खुर्ची- कुठेही सामावून घेता येते. पलंग, कपाटं, साइड बोर्ड आणि टेबलं, या सगळय़ांपेक्षा खुर्ची माणसासारखी.
माझ्या राहत्या घराच्या एका कोपऱ्यात गिटार उभी आहे. जुन्या नायलॉन स्ट्रिंग गिटारची आठवण करून देणारी. मी लहान असताना कोण्या एका फ्रेंच पाहुण्यानं दिलेली. ही नसती तर कदाचित माझा संगीताशी संबंधही आला नसता. आता माझ्यासाठी घरातल्या विसाव्याचा संगीत एक आवश्यक भाग आहे. धून प्रत्यक्षात उमटो अथवा न उमटो, घरातल्या अवकाशात त्याचं अस्तित्व आहेच- अमूर्त निराकार!
घराभोवतीची जागा, घराकडे जाणारी वाट, व्हरांडा, जिना, पायऱ्या, बाल्कनी, खिडक्या, दारं, खिडकीतून आत डोकावणारं झाड- स्टिल लाईफ! तरीही रोज नवं; पाहणाऱ्याच्या नजरेत अन् मनातही सर्जनशीलता रूजविणारं!
अवकाश कुठेही असतंच, त्याची विभागणी आपण कशी करतो हे महत्त्वाचं! त्यातले परस्पर संबंध ओळखता आले की आपली आपल्यालाच गंमत वाटते. नवं काही सुचत जातं. कळत-नकळत एक नजर सभोवार फिरवायची.
फर्निचर.. वस्तू.. पडदे.. खिडक्या.. प्रकाश.. परावर्तित प्रकाश.. प्रतिबिंब.. सावल्या.. आकार.. रंग.. अवकाश! सगळे वेगवेगळे, तरीही परस्परांशी जोडलेले. वेळ वेगळी, त्यानुसार प्रकाश वेगळा, त्याचे भास-आभास वेगवेगळे. मूर्त-अमूर्ताच्या उंबरठय़ावर. जणू हेच एक सजीव चित्र! आपण फक्त माध्यम!
शब्दांकन : वर्षां गजेंद्रगडकर