वास्तुमार्गदर्शन Print

शनिवार , २९ सप्टेंबर २०१२

संस्थेने आपल्या एका सदस्याला त्याची सदनिका विकण्यासाठी ना-हरकत प्रमाणपत्र सप्टेंबर २००४ साली दिले. त्यानंतर संस्थेच्या असे लक्षात आले की, त्या सदस्याकडून संस्थेचे काही पैसे येणे बाकी आहेत. सदर येणे संस्था आता वसूल करू शकते का?
- र. श. धुरी, वांद्रे, मुंबई-५०.

या प्रश्नाचे उत्तर होय असे आहे. नवीन सदस्य जेव्हा त्याच्या नावे सदनिका हस्तांतरित करण्यासाठी आपल्याकडे येईल त्या वेळी आपण पहिली थकबाकी वसूल करावी. आपण सदनिका विकत घेणाऱ्या व्यक्तीच्या नावे केली किंवा नाही याचा खुलास आपल्या पत्रात नाही; परंतु आपण सदनिका जर अगोदरच हस्तांतरित केली असल्यास त्या व्यक्तीच्या देयकांमध्ये सदर थकबाकी दाखवावी. देयक न भरल्यास कलम १०१ अंतर्गतप्रमाणे वसुली करण्यास सुरुवात करावी.

संस्थेचे सन १९७६ पासूनचे दप्तर / कागदपत्रे बरीच जमली आहेत, ते सांभाळणे कठीण आहे. याबाबत काय उपाययोजना करावी?
- र. श. धुरी, वांद्रे (प.), मुंबई-५०

आपण संस्थेच्या दप्तरातील महत्त्वाची कागदपत्रे उदा. नोंदणीसंबंधीची कागदपत्रे, न्यायालयीन आदेश, इ. वेगळी करावीत. इतर कागदपत्रे ही साधारणपणे मागील ८ वर्षांचे दप्तर वगळून बाकीचे नष्ट करण्यास हरकत नाही. प्राप्तिकर खाते साधारणपणे ८ वर्षे इतकी मागील चौकशी करू शकते, म्हणून आपण मागील ८ वर्षांपर्यंतचे दप्तर ठेवावे. दप्तर व्यवस्थितरीत्या नष्ट करावे. याबाबत आणखी शंका असल्यास आपण सहकारी खात्याकडून / अथवा निबंधक कार्यालयाकडून खात्री करून घ्यावी.

आम्ही फ्लॅट विकत घेताना एक वर्षांचा मेन्टेनन्स भरला आहे. त्यानंतर सहा महिन्यांनी सोसायटीची स्थापना झाली. सोसायटीने स्थापनेपासून मेन्टेनन्स लावायला सुरुवात केली. आम्ही तो भरला असल्याचे सांगितले; परंतु सोसायटीने आता आमच्या थकित बिलावर चक्रवाढदराने व्याज आकारणी करण्यास सुरुवात केली आहे? तर आम्हाला पुन्हा मेन्टेनन्स भरावा लागेल का? त्यावर व्याज द्यावे लागेल का?
- योगेश रेळे, जोगेश्वरी (पूर्व), मुंबई.

आपला प्रश्न हा असंख्य खरेदीदारांचा प्रश्न आहे. बिल्डर सोसायटीची स्थापना करून देतो. मात्र आपण भरलेली रक्कम तो सोसायटीकडे वर्ग करत नाही. म्हणून सोसायटी पुन्हा मेन्टेनन्स आकारते व तो न भरल्यास व्याज आकारणी सुरू करते. हे दुष्टचक्र चालू राहते. आपण पुढील गोष्टी कराव्यात त्या
अशा :
१) सोसायटीचा मेन्टेनन्स अंडरप्रोटेस्ट म्हणून भरावा. यासंबंधीचे सविस्तर पत्र संस्थेला द्यावे व वस्तुस्थिती निदर्शनास आणून द्यावी.
२) बिल्डरला कायदेशीर नोटीस पाठवावी व त्याने तो वठणीवर न आल्यास को-ऑप. कोर्टात दावा दाखल करावा. यासाठी थोडी चिकाटी धरावी लागेल. आपणासारख्या अन्य फसवणूक झालेल्या सदस्यांना बरोबर घेऊनदेखील आपण बिल्डरविरुद्ध संयुक्तपणे दावा दाखल करावा. आपणास यश निश्चित मिळेल. (या ठिकाणी आपणाजवळ पैसे दिल्याच्या पोचपावत्या आहेत हे गृहीत धरलेले आहे.)
३) सोसायटीलादेखील चक्रवाढदराने व्याज आकारणी करत असल्यास त्याचा परतावा मागवा. सोसायटी चक्रवाढदराने व्याज आकारणी करू शकत नाही.
४) तरीदेखील सोसायटी न बधल्यास संस्था निबंधक कार्यालयाकडे तक्रार करावी.
५) त्या उपायानेदेखील संस्था बधली नाही, तर मात्र सरळ संस्थेविरुद्ध सहकारी न्यायालयात वा दिवाणी न्यायालयात दावा दाखल करावा.

आम्ही जुना फ्लॅट रिसेलमध्ये विकत घेतला. सदर इमारतीच्या रहिवाशांची गृहनिर्माण संस्था स्थापन झालेली नाही. त्यामुळे सर्व व्यवहार बिल्डरच बघतो. बिल्डरला आम्ही सदर फ्लॅट हस्तांतरणाचे पैसे देऊनसुद्धा त्याची पावती आम्हाला दिली नाही. आता आम्हाला महानगरपालिकेचे करदेयक आमच्या नावे करून घ्यायचे आहे. तसेच वीज कनेक्शनदेखील आमच्या नावे करून घ्यावयाचे आहे. याला उपाय काय?
- शु. भ. देशमुख, मुंबई.

सोसायटीला हस्तांतरण शुल्क घेण्याचा अधिकार आहे, तो बिल्डरला खचितच नाही. तरीसुद्धा बिल्डर लोक ते घेतात आणि आम्ही लोक ते चार्जेस देतो, हीच खरी शोकांतिका आहे. आपण सर्वात प्रथम बिल्डरला लेखी पत्र पाठवा. त्याची पोचपावती असणे मात्र महत्त्वाचे आहे. त्याला दाद न दिल्यास त्याला एक कायदेशीर नोटीस पाठवा आणि त्यानंतर त्यावर दिवाणी न्यायालयात दावा दाखल करावा.

सदर फ्लॅट आम्ही भाडय़ाने देऊ शकतो का? एनओसी न देता आम्ही भाडय़ाने आमची जागा दिली तर काय अडचणी येतील?
- शु. भ. देशमुख
आपण फ्लॅट भाडय़ाने देण्यापूर्वी बिल्डरला एका रजिस्टर ए.डी.ने पत्र पाठवून ना-हरकत प्रमाणपत्र मागवा. त्याची पोचपावती जपून ठेवा. १५ दिवसांत त्याच्याकडून उत्तर येण्याची वाट पाहा. त्याच्याकडून काही खुलासा आला तर त्याचा प्रत्यवाय आपण पुन्हा रजिस्टर ए.डी.ने पाठवून द्यावे. समजा, त्याने काहीच कळवले नाही तर ‘डीप कन्सेन्ट’ समजून आपण आपली जागा भाडेतत्त्वावर द्यावी. मात्र हे करताना त्यासाठीचा करारनामा नोंद करावा. संबंधित पोलीस ठाण्याला त्यांच्या विहित नमुन्यात अथवा लेखी पत्र देऊन याबाबतची सविस्तर माहिती द्यावी.

हाऊसिंग सोसायटीमधील संयुक्त नावावर असलेल्या सदनिकेच्या पहिले नाव असलेल्या मालकाचा मृत्यू झाला तर उर्वरित दुसऱ्या नावावर संपूर्ण सदनिका करण्यासाठी काय काय कागदपत्रे लागतील. यासंबंधी उपविधीत काही तरतुदी आहेत का? या ठिकाणी संयुक्त धारक हे मुलगा व वडील असे आहेत. नामांकन केलेले नाही.
- श्री. कारखानीस

सोसायटीला जर आपल्या सदस्यांना अडवायचे नसेल तर त्यासाठी अनेक मार्ग आहेत. सर्वप्रथम मृताच्या सर्व वारसांकडून आम्हीच फक्त मृत व्यक्तीचे वारस आहोत, अशा अर्थाचे प्रतिज्ञापत्र बनवावे. सोसायटीच्या उपविधीत नामांकन केलेले करताना जे क्षतिबंध पत्र (इन्डेमनिटी बाँड) बनवायचे आहे त्याचा नमुना दिला आहे. सदर नमुन्यात इन्डेमनिटी बाँड बनवावा. सोसायटी हस्तांतरणासाठीचे सर्व कागदपत्रे (डिक्लेरेशन इ.) बनवावेत व सोसायटीकडे हे सर्व पेपर्स द्यावेत. ही सर्व कागदपत्रे मिळाल्यावर संस्थेने हस्तांतरण करून द्यावे.
श्रीनिवास घैसास
द्वारा घैसास अ‍ॅण्ड असोसिएट्स,
टॅक्स कन्सलन्टंट अ‍ॅण्ड लीगल अ‍ॅडव्हायझर्स,
ब्लॉक नं. ए-२, तळमजला, चंदन सोसायटी,
कीर्तीकर कंपाऊंड, नुरीबाबा दर्गा रोड,
२५४००६५९, ६९५२०५१८.