सहकारी गृहनिर्माण संस्थेत ‘सहयोगी’ सभासदाचे स्थान Print

alt

नंदकुमार रेगे , शनिवार , २९ सप्टेंबर २०१२
सहकारी गृहनिर्माण संस्थेत ‘सहयोगी’ सभासदाचे स्थान काय, या प्रश्नावर सध्या जोरदार विचारमंथन चालू आहे. कारण अनेक सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या बाबतीत महिलांच्या नावे खरेदी खत असते. कित्येक वेळा असे खरेदी खत एकाच व्यक्तीच्या नावे असते, तर काही वेळा एकापेक्षा अधिक व्यक्तींच्या नावे असते; परंतु खरेदी खतात ज्या व्यक्तीचे नाव प्रथम क्रमांकावर असते, अशी व्यक्ती गृहनिर्माण संस्थेची सभासद म्हणून गणली जाते आणि अन्य व्यक्ती ‘सहयोगी’ सभासद म्हणून गणल्या जातात. अशा व्यक्ती मूळ सभासदाच्या अनुपस्थितीत वार्षिक सर्वसाधारण सभेला एकमेकांच्या अनुपस्थितीत उपस्थित राहू शकतात, अशी तरतूद सहकार कायद्याचे कलम २७(२) मध्ये आहे.
अशा व्यक्तींपैकी (एकापेक्षा अधिक ‘सहयोगी’ सभासद असतील तर) कोणीही मूळ सभासदाचे अधिकारपत्र फॉर्म क्रमांक ७ भरून आणि मूळ सभासदाचे अधिकारपत्र घेऊन वार्षिक सर्वसाधारण सभेस उपस्थित राहू शकतो, एवढेच नव्हे तर ती मूळ सभासदाऐवजी व्यवस्थापक कमिटीची निवडणूक लढवू शकतो आणि निवडून आल्यास पदाधिकारीही होऊ शकतो. मात्र अशी व्यक्ती ही मूळ  शेअरहोल्डरची जॉइंट शेअरहोल्डर असावी लागते.
सहकार कायद्याप्रमाणे रु. १५०/- भरून ‘सहयोगी’ सभासद होता येते; परंतु असे ‘सहयोगी सभासद’ नाममात्र असतात. म्हणजे त्यांना मताचा अधिकार नसतो. म्हणून त्यामुळे ते कमिटीची निवडणूक लढवू शकत नाहीत आणि त्यामुळे ते पदाधिकारीही होऊ शकत नाहीत.
सहकार कायद्याचा २२ कलमात सहकारी संस्थेचा कोण सभासद होऊ शकतो ते नमूद केले आहे. ते पुढीलप्रमाणे कलम २२ ज्यामध्ये सदस्य होता येईल अशी व्यक्ती कलम २४ च्या तरतुदीस अधीन राहून पुढील व्यक्तीव्यतिरिक्त कोणत्याही व्यक्तीस संस्थेचा सदस्य म्हणून दाखल करण्यात येऊ नये.
(अ)    भारतीय संविदा अधिनियम १८७२ अन्वये संविदा करण्यात सक्षम असेल अशी व्यक्ती.
(ब)    भागीदारी संस्था, कंपनी किंवा त्या वेळी अमलात असलेल्या कोणत्याही कायद्यान्वये रचना केलेला कोणताही इतर निगम निकाय किंवा संस्था नोंदणी अधिनियम १८६० या अन्वये नोंदलेली संस्था.
(क)    या अधिनियमान्वये नोंद केलेली किंवा नोंदण्यात आल्याचे समजण्यात येणारी संस्था.
(ड)    राज्य शासन आणि केंद्र शासन.
(ई)    स्थानिक प्राधिकरण.
(फ)    सार्वजनिक विश्वस्त व्यवस्थांची नोंदणी करण्यासंबंधात त्या त्या वेळी अमलात असलेल्या कोणत्याही कायद्यान्वये नोंदवलेली सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था.
(छ)    ठेवीदार किंवा वित्तीय सेवा उपभोक्ता.
कलम २४ मधील तरतूद: कलम २४ मध्ये नाममात्र सदस्य, सहयोगी सदस्य व हितैशी सभासद यांच्या पुढीलप्रमाणे व्याख्या देण्यात आल्या आहेत. त्या अशा :
(१)    कलम २२ मध्ये काहीही नमूद असले तरी संस्थेस कोणत्याही व्यक्तीस नाममात्र सदस्य, सहयोगी सदस्य व हितैशी सभासद म्हणून दाखल करून घेता येईल.
(२)    नाममात्र सदस्यास किंवा हितैशी सदस्यास असा सदस्य म्हणून संस्थेच्या नफ्यात किंवा मत्तेत कोणत्याही स्वरूपाचा कोणताही भाग मिळण्याचा हक्क असणार नाही.
नाममात्र सदस्यास किंवा हितैशी सदस्यास सर्वसाधारण सदस्यांच्या विशेषाधिकाऱ्यांपैकी व हक्कांपैकी कोणताही विशेषाधिकार व हक्क असणार नाही; परंतु अशा सदस्यास किंवा सहयोगी सभासदास कलम २७, पोटकलम (८)च्या तरतुदींच्या अधीनतेने संस्थेच्या उपविधी विनिर्दिष्ट करण्यात येतील, असे सदस्याचे विशेषाधिकार व हक्क असतील आणि तो अशा दायित्वांच्या अधीन राहील. कलम २२ अन्वये अज्ञानास सदस्य म्हणून दाखल करता येते.
नाममात्र सदस्य सभेमध्ये मतदान करू शकत नाही किंवा सदस्यासारखे हक्क बजावू शकत नाही.
हितैशी सदस्य: जो सदस्य संस्थेच्या ध्येय व धोरणाविषयी सहानुभूती बाळगतो आणि ज्यास असा सदस्य म्हणून दाखल करून घेण्यात असेल असा सदस्य नाममात्र सदस्य संस्थेच्या कार्यवाहीत भाग घेऊ शकतो काय, असा प्रश्न रणजितसिंह व्ही. पाटील विरुद्ध कलेक्टर, कोल्हापूर-२००४ या दाव्यात उपस्थित झाला होता. या बाबतीत उच्च न्यायालयाने असे स्पष्ट केले की, जरी कलमातील दुरुस्तीअन्वये नाममात्र सदस्याला संस्थेच्या समितीच्या निवडणुकीत मतदान करता येत नाही तरी समान मते पडल्यास अशा सदस्यांचे मत लक्षात घेतले पाहिजे, कारण हे सदस्य व्यवस्थापन समिती स्थापन करण्यामागील एक भाग असतात. त्यामुळे त्यांना सभेला हजर राहण्याचा अधिकार आहे आणि कार्यवाहीमध्ये भाग घेण्याचाही अधिकार आहे.
‘सहयोगी’ या शब्दामुळे गोंधळ: सहकारी गृहनिर्माण संस्थांत सदनिकेच्या खरेदी खतात एकापेक्षा अधिक व्यक्तींनी खरेदीची किंमत अदा केल्यावर त्याला मालकी हक्क प्राप्त होतात.
सभासदाच्या संमतीने खरेदी खतात मालक म्हणून नाव नसले तरी केवळ प्रवेश फी भरूनसुद्धा सहयोगी सहसभासद होता येते.
या दोन्ही प्रकारच्या सभासदांना ‘सहयोगी’ सभासद म्हटले जात असल्यामुळे सभासदांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे रु. १५०/- प्रवेश भरणारेसुद्धा आपण समिती निवडणुकीस उभे राहू शकतो आणि निवडून आल्यास संस्थेचे पदाधिकारी होऊ शकतो अशा समजुतीत असतात; परंतु त्यांची ही समजूत चुकीची आहे. फक्त ज्या व्यक्ती मूळ सदनिका खरेदीदाराबरोबर भाग खरेदी करतात, असे संयुक्त भागधारकच मूळ सभासदाच्या संमतीने ७ क्रमांकाचा फॉर्म भरून आणि त्याच्याकडून अधिकारपत्र घेऊन संस्थेची निवडणूक लढवू शकतात आणि निवडून आल्यास पदाधिकारी होऊ शकतात, अशी कायद्यात तरतूद आहे.
थोडक्यात, संयुक्तपणे भाग धारण करण्यासाठी सहयोगी/ सहसभासदांस मालमत्तेच्या मालकीत हिस्सा/ नाव असणे आवश्यक आहे. फक्त प्रवेश फीने सहयोगी/ सहसभासद झालेल्या व्यक्तीला त्या सभासदांच्या वतीने मतदान अथवा निवडणुकीचे कोणतेही अधिकार प्राप्त होणार नाहीत, असे महाराष्ट्र शासनाने तयार केलेल्या ‘हौसिंग मॅन्युअल’मध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.