श्रद्धास्थान श्रीसिद्धिविनायक Print

alt

अरुण मळेकर , शनिवार , २९ सप्टेंबर २०१२
मंदिरशिखरावर एकूण ४७ सुवर्णविलोपित कळस असून त्यांचे दर्शन दूरवरूनही घडते. शिखरावरील १५०० किलो वजनाचा सोनेरी कळस हे तर मंदिर-वैशिष्टय़ आहे.
ग तिमान मुंबई शहराला अनेक शतकांचा इतिहास आहे. या महानगरीतील अनेक धर्मीयांच्या वास्तव्यामुळे येथील विविध धार्मिक प्रार्थनास्थळांनी देशव्यापी लोकप्रियता मिळविली आहे. तर त्यातील काहींचा परदेशातही बोलबाला झाला आहे. वांद्रय़ाची मोतमाऊली, हाजीअलीचा दर्गा, महालक्ष्मी मंदिर, मुंबादेवी मंदिर, आर. सी. चर्च इत्यादी धार्मिक स्थळांमध्ये दादर विभागातील प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिराकडे भाविक-भक्तगणांचा ओघ दिवसेंदिवस वाढतोच आहे.
पश्चिम रेल्वेच्या दादर रेल्वे स्थानकापासून एक कि.मी. अंतराच्या आत वीर सावरकर मार्गावर हे मंदिर वसले आहे. भाविकांच्या वाढत्या संख्येमुळे काळानुरूप या मंदिर वास्तूने आता आधुनिक चेहरा जरी धारण केला असला, तरी या धार्मिक स्थळाला इतिहास आहे. उपलब्ध दस्तऐवजानुसार १९ नोव्हेंबर १८०१ रोजी या मंदिराचा प्रथम जीर्णोद्धार झाल्याची नोंद आहे. मुंबईचे मूळ रहिवासी लक्ष्मण वेडू पाटील या भाविक नागरिकाने जीर्णोद्धार करण्यात पुढाकार घेतला होता. मात्र जाणकारांच्या मते त्यापूर्वीही मंदिराचे अस्तित्व असल्याचे अनुमान काढता येते.
सुमारे २५ वर्षांपूर्वीपर्यंत या मंदिराची रचना ग्रामीण बाजाची होती. प्रमुख रस्त्यालगतच्या प्रवेशद्वारी फक्त तळमजला असलेली कौलारू इमारत होती. बाहेरून मंदिराचा घुमटही दिसायचा. या जुन्या इमारतीचे बांधकाम चुना-विटांचे होते. प्रवेशद्वारी दोन दीपमाळा असायच्या. प्रवेशद्वारी डावीकडे मंडपही उभारलेला होता. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे मंदिरासमोर एक छोटासा तलावही होता. या सर्व आठवणी सांगणाऱ्या पिढीने आता ऐंशीचे वय गाठले आहे. पूर्वी सिद्धिविनायक मंदिरात निवांतपणे कधीही प्रवेश मिळत असे. गर्दी नव्हती, आवाज-हवेचं प्रदूषण नव्हते आणि आजच्या इतकी ओसंडून जाणारी भाविकताही नव्हती.
मंदिराचे नूतनीकरण झाल्यावर मंदिरातील मूर्तीची प्रतिष्ठापना मूळ स्थानी होती त्याच स्वरूपात करण्याचा प्रघात सिद्धिविनायक मंदिरानेही पाळला आहे. येथील सिद्धिविनायकाची मूर्ती काळ्या पाषाणाची असून ती उंचीने अडीच फूट तर रुंदीने दोन फुटांची आहे. ही मूर्ती उजव्या सोंडेची आहे. तिच्या वरच्या हातात कमळ तर दुसऱ्या हाती परशू आहे. खालील उजव्या हातात जपमाळ तर डाव्या हाती मोदकाची वाटी असून गळ्यात सर्पाकृती जानवे आहे. सिद्धिविनायकाच्या बाजूला ऋद्धी या ऐश्वर्य, समृद्धी, मांगल्य यांच्या देवतांच्या मूर्तीच्या सादरीकरणातून औचित्यासह कलात्मकताही झकास साधली आहे. सर्वच मूर्तीतील भाव खूपच बोलके-सजीव वाटतात.
भक्तगणांच्या वाढत्या संख्येला जुने मंदिर अपुरे पडू लागले. एका वेळी दाटीवाटीने १५-२० जणांचा प्रवेश शक्य होता. त्यामुळे श्रद्धेने येणाऱ्या भक्तगणांना निवांतपणे, पण जलद गतीने शिस्तबद्धपणाने दर्शनाचा लाभ मिळून समाधान प्राप्त व्हावं, पूजा, धार्मिक विधीसाठी सुविधा मिळाव्यात आणि हे साध्य करताना सिद्धिविनायक मंदिर न्यास एक सामाजिक-सांस्कृतिक आणि शैक्षणिक लोकोपयोगी व्यासपीठ व्हावं, या उदात्त हेतूने मंदिराचा विस्तार नूतनीकरणाचा प्रकल्प हाती घेण्यात आला. २७ एप्रिल १९९० रोजी नियोजित वास्तुप्रकल्प भूमिपूजन होऊन ४ जून १९९४ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या हस्ते वास्तू लोकार्पण करण्यात आली. तर प्रत्यक्ष कळस प्रतिष्ठापना सोहळा शृंगेरी शारदापीठाचे शंकराचार्य यांच्या हस्ते झाला.
या नवीन वास्तूचा आराखडा प्रख्यात वास्तुविशारद कामत आणि एस. के. आठले यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केला गेला. कमीतकमी जागेत जास्तीतजास्त सेवा-सुविधा पुरविण्याचे त्यांचे कसब-नैपुण्य नजरेत भरण्याजोगे आहे. या सिद्धिविनायक नवीन मंदिर वास्तूवर कोणत्याच वास्तुशैलीचा प्रभाव नाही. मात्र बांधकामातील चित्ताकर्षकपणा तसेच भक्कमपणा जागोजागी आढळतो. मर्यादित जागेच्या भूखंडावर जास्तीतजास्त बांधकामाद्वारे भक्तगणांची सोय साधण्याचाच हा प्रयत्न आहे.
आधुनिक चेहरा धारण केलेल्या या इमारतीला पाच सुसज्ज मजले असले तरी गाभाऱ्यावरील प्रत्येक मजल्यावर संरक्षित भिंती बांधून तेथे कुणाचा वावर होणार नाही, याची दक्षता घेऊन सुरक्षितताही सांभाळली आहे. मंदिरशिखरावर विविध आकारांचे एकूण ४७ सुवर्ण विलोपित कळस असून त्यांचे दर्शन दूरवरूनही घडते. शिखरावरील १५०० किलो वजनाचा सोनेरी कळस हे तर मंदिर-वैशिष्टय़ आहे. नवीन इमारतीतील अष्टकोनी गाभारा प्रशस्त असून त्याला एकूण पाच असे प्रत्येकी १३ फुटांच्या उंचीचे दरवाजे आहेत. सभामंडपातून तसेच पोटमाळ्यावरूनही ‘श्रीं’चे दर्शन सहजपणे घडते.
पश्चिमेकडील मंदिर प्रवेशद्वारी प्रांगणात पुरातन हनुमान मंदिर आहे. नवीन बांधकामात त्याचे स्वरूप बदलले असले तरी त्याची जागा बदललेली नाही. दर्शनासाठी येणाऱ्या भक्तगणांच्या आगमन-निर्गमनासाठी वेगवेगळ्या प्रवेशद्वारांची सोय वाखाणण्यासारखी आहे. दर्शनस्थानी येण्यासाठी लोखंडी कठडय़ाची व्यवस्था उत्तम आहे. मंगळवार, चतुर्थी, अंगारकीच्या दिवशी भक्तगणांची वाढती संख्या लक्षात घेऊन मंदिराच्या पाठीमागे आता मंडप व्यवस्थाही केली गेली आहे. वस्तू तथा पैशाच्या स्वरूपात देणगी देणाऱ्यांसाठी उभारलेली प्रचंड हुंडी लक्ष वेधून घेते. प्रवेशद्वार क्र. ५ मधून प्रवेश करून पोटमाळ्यावर जाताना काचेतील भव्य चित्रमय गणेशदर्शनाचे  उत्तम सादरीकरण आहे.
याच पोटमाळ्यावर आधी आरक्षण करून होम तसेच अन्य धार्मिक व्रतवैकल्य विधी आयोजित केले जातात. दुसऱ्या मजल्यावर महानैवेद्य तयार करण्यासाठी स्वयंपाकगृह तसेच पौरोहित्य करणाऱ्यांसाठी विश्रांतिगृहाची सोय आहे. वैद्यकीय मदत कार्यकक्षही याच मजल्यावर आहे.
मंदिरवास्तूचा तिसरा मजला हा सिद्धिविनायक न्यास प्रशासकीय कामकाजासाठी आहे. त्यात केंद्रीय कार्यालय, अध्यक्षांचे सुसज्ज कक्ष, लेखा विभाग कर्मचारी-व्यवस्थापन सभा समिती कक्ष असून जोडीला संगणक विभागही आहेच.
मंदिराचा चौथा मजला म्हणजे अभ्यासू, जिज्ञासू भक्तगणांसाठी ज्ञानभांडार आहे. सुसज्ज ग्रंथालय, वाचनालय आणि अभ्यासिकेने हा सर्व मजला व्यापला आहे. या ग्रंथालयातील धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक, ऐतिहासिक, शास्त्रीय, तंत्रज्ञानवर आधारित सुमारे आठ हजारांची ग्रंथसंपदा म्हणजे सिद्धिविनायक न्यासाची शान आहे. गणपती म्हणजे ज्ञानासह विविध कलांचा देव आहे, तेव्हा त्याचे अधिष्ठान असलेली वास्तू ज्ञानदानाचे पवित्र काम करणाऱ्यांसाठी सुसज्ज असावी, ही संकल्पना या ग्रंथालय उभारण्यामागे आहे. ग्रंथालयाशी संलग्न असलेल्या सुसज्ज अभ्यासिकेचा सुमारे ५०० विद्यार्थी लाभ घेत आहेत. आता अद्ययावत डिजिटल लायब्ररीची सुविधाही सुरू झाली आहे,
मंदिरवास्तूचा पाचवा मजला ‘मधुर-सुग्रास’ मजला म्हणायला हरकत नाही. येथे प्रवेश करताच साजूक तुपासह गोड बुंदी लाडूंचा घमघमाट कुणाचीही भूक चाळवणारच. प्रसाद म्हणून लागणाऱ्या लाडवांचे उत्पादन येथे होत असते. रमेश सावंत या व्यवस्थापकांच्या मार्गदर्शनाखाली २२ कर्मचाऱ्यांचा ताफा येथे दिवसभर राबत असतो. मानवी श्रमाला यंत्राची जोड देऊन दररोज सुमारे ३५-४० हजार बुंदी लाडूंचे उत्पादन या मजल्यावर होत असते. गणेशोत्सवासह संकष्टी चतुर्थीप्रसंगी सुमारे ५० हजार; तर अंगारकीच्या दिवशी सुमारे अडीच लाख लाडूंचे उत्पादन होत असते. लाडू उत्पादनाची सारी यंत्रणा व त्यासाठी कर्मचाऱ्यांनी साधलेला समन्वय प्रत्यक्ष पाहण्यासारखा आहे.
मंदिरव्यवस्थापनाच्या नियंत्रणाखाली चैत्र ते फाल्गुन महिन्यातील प्रमुख उत्सव साजरे केले जातात, तर भाविकांच्या इच्छेनुसार अभिषेक, पूजा, सहस्रावर्तन पूजा, गणेशयाग यांचे आयोजन केले जाते. त्यांचे दर-दक्षिणा निश्चित आहेत.
आजमितीस मंदिराची सुमारे ५५ कोटींची उलाढाल आहे. भक्तगणांच्या देणग्या, दक्षिणांच्या पाठबळावर २५० कर्मचाऱ्यांच्या मदतीने आस्थापनाचे कामकाज शिस्तबद्धपणे चाललेले आहे. सामाजिक जाणिवेने काही निकषांच्या आधारे गरजू रुग्णांना  मंदिर व्यवस्थापनातर्फे आर्थिक साह्य़ही केले जाते. देणगीसाठी मोबाइल बँकिंग तसेच ऑनलाइन देणगी ही सुविधा आहेच. या सुनियोजित यंत्रणेच्या पाठीमागे विद्यमान अध्यक्ष सुभाष मयेकर यांचे नेतृत्व आणि कल्पकताही आहेच.
मंदिर इमारतीच्या पाठीमागे अद्ययावत प्रतीक्षालय इमारतीचे बंधकाम पूर्णत्वास येत आहे. ६४२ चौ. मीटर जागेवरील या सुसज्ज इमारतीच्या तळमजल्यावर रांगेतील भक्तगणांची सोय करण्यात येणार आहे. जोडीला अभ्यासिकेसह ग्रंथालयालाही जागा उपलब्ध केली जाणार आहे. सवलतीच्या दरात डायलेसिस सेंटर आणि भिन्नमती मुलांच्या शिक्षणाचा प्रकल्प हाती घेतला जात आहे.
तिरुपती बालाजी मंदिराखालोखाल या मंदिराकडे भक्तगणांचा अखंड ओघ आहे. देशातील स्वयंपूर्ण मंदिर व्यवस्थापनात श्रीसिद्धिविनायक न्यासाचा लौकिक आहेच. धार्मिक अधिष्ठानाच्या या मंदिर न्यासाला सामाजिक, शैक्षणिक कामाची पाश्र्वभूमीही लाभलीय.
‘फेथ कॅन मूव्ह दि माउन्टेन्स’ या वचनावर श्रद्धा असलेल्या समाजातील सर्वच स्तरांतील स्त्री-पुरुषांना एका मंगलमय-पवित्र व्यासपीठावर आणून श्रीसिद्धिविनायक न्यास राष्ट्रीय एकात्मतेचे अनोखे दर्शनही घडवतेय.