घराभोवती जागरूकतेचे सुरक्षाकवच Print

alt

प्राजक्ता कदम , शनिवार , २९ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
सध्या गुन्हेगारीच्या वाढत्या प्रमाणामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढीस लागली आहे. अशावेळी आपल्या संरक्षणासाठी केवळ पोलिसांवर अवलंबून न राहता आपणही समाजात जागरूकतेने वावरायला हवे. आणि त्याची सुरुवात आपल्या घरापासूनच करायला हवी.
मुंबई हे देशातील सर्वाधिक सुरक्षित शहर मानलं जातं. इतर शहरांच्या तुलनेत महिलांसाठीही मुंबईनगरी ही कैकपटीने सुरक्षित मानण्यात येते. परंतु गेल्या काही वर्षांमधील मुंबईतील गुन्हेगारी पाश्र्वभूमीच्या वाढत्या घटना पाहाता मुंबईत नागरीकांच्या विशेषत: महिला, ज्येष्ठनागरीक व लहानग्यांसाठी इथलं वातावरण अधिक असुरक्षित होत चालल्याचं दिसून येत आहे.
काही महिन्यांपूर्वी वडाळा येथील एका उच्चभ्रू सोसायटीत राहणाऱ्या पल्लवी पूरकायस्थची सोसायटीच्या सुरक्षारक्षकानेच केलेली हत्या यांसारख्या अनेक गुन्हेपाश्र्वभूमी असलेल्या घटानांनी मुंबईला अक्षरश: हादरवून सोडले आहे. तसेच मुंबईत नोकरीच्या निमित्ताने एकटय़ा राहणाऱ्या तरुणी, स्त्रिया, मुलं परदेशी असल्याने एकाकी जीवन जगणारे ज्येष्ठ नागरिक यांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. पल्लवीची हत्या म्हणजे धोक्याची घंटाच आहे. महिलांविरुद्धचे अपराध, ज्येष्ठ नागरिकांच्या हत्या यांच्या दररोजच्या आकडेवारीवरून या समस्येने किती गंभीर रूप धारण केले आहे, हे अधोरेखित होते.
या समस्येला थोडय़ाफार प्रमाणात आपणही जबाबदार आहोत. लोकांनी पूर्णपणे पोलिसांवर अवलंबून राहण्यापेक्षा थोडी जागरूकता दाखवून स्वत:चे रक्षण करणे, हे आपल्याही हाती आहे.
घरात एकटय़ा राहणाऱ्या महिला किंवा ज्येष्ठ नागरिकच असुरक्षित आहेत असे नाही. कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्या महिलाही तेवढय़ाच असुरक्षित आहेत. महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी आजघडीला सर्वाधिक धोका असतो तो घरचे नोकर, चालक वा सुरक्षारक्षक यांच्याकडून. चोरीच्या उद्देशाने नोकरांकडून हत्या केल्याच्या अनेक घटना गेल्या काही वर्षांत मुंबईत घडलेल्या आहेत. दुर्दैवाची बाब म्हणजे या घटना कमी होण्याऐवजी वाढतानाच दिसत आहेत.  घर हे सर्वात सुरक्षित जागा मानली जाते; परंतु सध्या तशीही परिस्थिती राहिलेली नाही. घरात घुसून स्त्रियांना, वृद्धांना लुबाडण्याचे, त्यांच्या हत्येचे प्रकार वाढले आहेत.
या घटना कमी होण्याऐवजी वाढण्याचे आणि आरोपी पोलिसांच्या हाती न लागण्याचे कारण हे मुंबईकरांच्या निष्काळजीपणातच दडले आहे. या घटनांचा आलेख वाढतच असल्याने गेल्या काही वर्षांपासून पोलिसांकडून विशेष जागरूकता मोहीम राबविण्यात येत आहे. महिला-ज्येष्ठ नागरिकांसाठी अनुक्रमे १०३ व १०९८ अशा हेल्पलाइन चालविण्यात येत आहेत. एवढेच नव्हे, तर अशा घटनांनंतर पोलिसांकडून नोकर, चालक, सुरक्षारक्षक वा कुणालाही नोकरीवर ठेवत असाल तर त्याची माहिती स्थानिक पोलिसांकडे नोंदवा असे वारंवार आवाहन करण्यात येते. परंतु त्यांना म्हणावा तसा प्रतिसादच मिळत नाही. परिणामी या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढच होत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. सुरक्षेच्या मुद्दय़ामुळे आजघडीला सुरक्षा एजन्सी वा नोकरवर्ग पुरविणाऱ्यांची चलती असल्याने लोक त्यांची शहानिशा न करताच त्यांना नोकरीवर ठेवतात. ज्या एजन्सीमधून एखादा नोकर कामावर ठेवला जातो, ती एजन्सी नोंदणीकृत आहे का, याची शहानिशा करण्याची साधी तसदीही घेतली जात नाही. केवळ हाताच्या बोटांवर मोजणाऱ्या सोसायटय़ा वा लोकं याबाबत शहानिशा करतात. एवढेच नव्हे, तर नोकरवर्गाची माहिती देण्याच्या कारणासाठी पोलीस ठाण्याची पायरी का चढावी म्हणून त्यापासून दूरच राहणे अनेकजण पसंत करतात. शहरातील अनेक सोसायटींमधील सुरक्षारक्षक हे बेकायदा सुरक्षा एजन्सींकडून पुरविले जातात.
ज्यांच्या हाती आपण सोसायटीची सुरक्षा देतो किंवा घर सोपवितो त्यांनीच मुंबईची सुरक्षा वेठीवर टांगली आहे, हे पल्लवीच्या खूनप्रकरणाने पुन्हा एकदा अनुभवास आले. या घटनेपासून नागरीकांनी धडा घ्यायला हवा. पोलिसांवर पूर्णपणे अवलंबून राहण्याऐवजी स्वत:ची व स्वत:च्या घराची काळजी घेण्यासाठी पावले उचलण्याची वेळ आली आहे.  
मोलकरीण-चालक-सुरक्षारक्षक वा अन्य कुणाला नोकरीवर ठेवताना ही काळजी नक्की घ्या:
एजन्सीद्वारे यापकी कुणाला नोकरीवर ठेवताना मुंबई पोलिसांनी या संस्थेला परवाना दिलेला आहे की नाही, हे तपासून पाहा. ज्या कुणाला नोकरीवर ठेवणार असाल त्याच्याविषयीचा सर्व आवश्यक तपशील संबंधित संस्थेकडे आहे की नाही, याची पडताळणी करा. असल्यास त्याची प्रत घेऊन ती शहानिशेसाठी पोलिसांकडे सुपूर्द करा. जेणेकरून नोकरीवर ठेवण्याआधी पोलीस त्याची चौकशी करतील आणि त्याची नोंद ठेवतील. नोकरवर्गाच्या शिफारशीवरून मोलकरीण-चालक-सुरक्षारक्षक वा अन्य कुणाला नोकरीवर ठेवणार असाल, तर शहरात त्याच्या ओळखीचे कुणी आहे की नाही, याबाबत विचारणा करा. तसेच त्याच्याकडून त्याच्या ओळखीबाबतची सर्व वैध कागदपत्रे, गावाचे नाव, संपर्क क्रमांक आवर्जून मागावा. नंतर त्या व्यक्तीस नोकरीवर ठेवून घेतल्यावर ही माहिती स्थानिक पोलीस ठाण्यात कळवावी. शक्य असल्यास घरात वा इमारतीच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवा, जेणेकरून प्रत्येक हालचालींवर नजर ठेवणे शक्य होईल. स्थानिक पोलिसांना विनंती करून आठवडय़ातून एकदा तरी सोसायटीला भेट द्यायला व नोकरवर्ग तसेच सुरक्षारक्षकांशी बोलायला सांगा. यापकी कुणी अन्य ठिकाणीही काम करीत नाही ना हे तपासून पाहा.  
हे आवर्जून टाळा:
कुठल्याही नोकराच्या हाती घराची, कपाटाची व महत्त्वाचे सामान असलेल्या वस्तूची चावी सोपवू नका. नोकर, सुरक्षारक्षक वा चालक यांपकी कुणाशी विनाकारण बोलू नका व त्यांना महत्त्वपूर्ण माहिती देऊ नका.
महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी या गोष्टींचे आवर्जून पालन करावे, की दार उघडण्याआधी दारावरील पीपहोलमधून कोण आहे याची विचारणा आणि खातरजमा करावी. खातरजमा केल्याशिवाय कुणालाही घरात प्रवेश देऊ नका. वस्तू विकण्याच्या वा अन्य कामासाठी आलेल्या कुणाही व्यक्तीशी उगाचच बोलत किंवा गप्पा मारू नका. सोसायटीने येणाऱ्या-जाणाऱ्यांची संपूर्ण माहिती संकलित करणारी नोंदवही ठेवली आहे की नाही, हे आवर्जून पाहा. सोसायटीचा सुरक्षारक्षक तुमच्याकडे एखाद्याला पाठविण्यापूर्वी तुम्हाला त्याची कल्पना देतो की नाही, याची त्याच्याकडे वारंवार चौकशी करा. दरवाजा, खिडक्या, टाळे आणि ग्रिल सुरक्षित आहेत की नाही हे सतत तपासून पाहा. सोसायटी व्यवस्थापनाकडून सुरक्षारक्षकाचे नाव, पत्ता, छायाचित्र आणि त्याच्या हातांचे ठसे यांची सर्व माहिती नोंद करण्यात आली आहे की नाही हे तपासून घ्या. हाऊसिंग सोसायटीमधील भाडेकरूंची स्थानिक पोलिसांना माहिती देण्यात आली आहे वा त्यांची तेथे नोंदणी करण्यात आली आहे, हेही तपासा. पालिकेच्या मदतीने सोसायटीच्या परिसरात चांगल्या प्रतीचे दिवे बसवून घेण्याची खबरदारी बाळगा.
घरगुती नोकरवर्गासाठी गेल्या वर्षी ‘राज्य घरगुती नोकरवर्ग कल्याण मंडळा’ची स्थापना करण्यात आली आहे. नुकतीच या मंडळाने नोकरांची बायोमेट्रिट पद्धतीने नोंद करणे सुरू केले आहे. या मंडळाकडे तुमच्याकडे काम करीत असलेल्या प्रत्येक नोकराची माहिती जमा करणे आवश्यक आहे. मालक या नात्याने अमूक एक नोकर वा मोलकरीण वा सुरक्षारक्षक आपल्याकडे काम करीत असल्याचे प्रमाणपत्र किंवा प्रतिज्ञापत्राद्वारे मंडळाला कळविणे आवश्यक आहे. सोबत त्यांची छायाचित्रे, घरचा संपूर्ण पत्ताही जोडावा. राज्यभरातून मंडळाकडे आतापर्यंत केवळ दीड लाख घरगुती नोकरांचीच नोंदणी करण्यात आली आहे.
प्रत्येक नागरीकांचे संरक्षण करण्याची जबाबदारी पोलिसांची असली तरी, आपणही त्याबाबत सजग असणे गरजेचे आहे. समाजातला आपला जागरूक वावर आपण व समाजाच्या सुरक्षितेत महत्त्वाची भूमिका बजावतो, हे प्रत्येक नागरीकाने लक्षात ठेवायला हवे.