दसरा: वास्तुप्रवेशाचा शुभमुहूर्त Print

मेधा सोमण ,शनिवार २० ऑक्टोबर २०१२
alt

दसरा हा भारतातील सार्वत्रिक-सांस्कृतिक सण आहे. दसरा हा पराक्रमाचा, विजयाचा, यशाचा मंगल दिवस असल्याने या दिवशी वास्तुप्रवेश करण्याची प्राचीन परंपरा आहे. आश्विन शुक्ल प्रतिपदेला नवरात्राचा पहिला म्हणजे घटस्थापनेचा दिवस असतो. घटस्थापनेच्या दिवशी मातीच्या घटामध्ये नऊ धान्याची पेरणी करतात. मातीमध्ये पाणी घालतात आणि घटाची पूजा करतात. घटावर झेंडूच्या फुलांची माळ बांधतात. भारत हा कृषिप्रधान देश आहे. आश्विन महिन्यात म्हणजे ऑक्टोबरच्या दरम्यान शेतातील पिके तयार होऊन कापणीस योग्य होतात. त्यामुळेच प्राचीन काळी नवरात्र उत्सव हा शेतकऱ्यांचा लोकोत्सव बनला होता. नऊ दिवसांपूर्वी पेरलेल्या धान्यांची रोपे दसऱ्याच्या दिवशी देवीवर वाहतात. नंतर तो प्रसाद म्हणून भक्षण करतात. शेतातील तयार झालेल्या पिकाच्या लोंब्याही घरी आणून देवाला वाहून ‘तोरण’ म्हणून घराच्या प्रवेशद्वारावर लावतात. या सर्व प्रथा कृषीविषयक देशामधील भूमी आणि अन्नधान्य यांचे महत्त्व व्यक्त करणाऱ्या आहेत.
विजयादशमीच्या या दिवशी पांडवांनी शमीच्या वृक्षाच्या ढोलीमध्ये वनवासात जाण्यापूर्वी ठेवलेली शस्त्रे काढली आणि विराटाच्या गाई पळविणाऱ्या कौरवसेनेवर स्वारी करून विराटाच्या गाई परत मिळविल्या. प्रभु रामचंद्रानेही आश्विन शुक्ल दशमीच्या दिवशी रावणाचा वध करून विजय मिळविला. शक्तिदेवतेनेही शुंभ आणि निशुंभ, महिषासुर आणि चण्ड-मुण्ड राक्षसांचा याच दिवशी वध करून, त्यांच्यावर विजय मिळविला म्हणून या दिवसाला ‘विजयादशमी’ म्हणजे विजयाचा दिवस म्हटले जाऊ लागले.
पूर्वी राजे लोक याच दिवशी सीमोल्लंघन करून युद्धाला निघत असत. या दिवशी शमीपूजन किंवा आपटय़ाच्या झाडाचे पूजन करतात. याच दिवशी शस्त्रपूजन करतात. अपराजिता देवीचे पूजन करतात. हा दिवस साडेतीन मुहूर्तातील एक शुभ दिवस मानला जातो. हा दिवस श्रवण नक्षत्राने युक्त असेल तर ‘अतिशुभ’ मानला जातो.
दसरा हा कृषीविषयक सण असल्याने या दिवशी ‘कृत्तिकेची’ पूजा केली जाते. अंकुरलेले धान्य असलेला घट हा फलप्राप्तीचा, संपन्नतेचा प्रतीक मानला जातो. विजयादशमीचा दिवस हा वास्तूबाबतही महत्त्वाचा, मंगलमय, शुभकारक मानला जातो. रुद्रप्रजापती आणि उषा यांना विवाहानंतर चार पुत्र झाले. त्यापैकी चौथ्या म्हणजे धाकटय़ा मुलाचे नाव ‘वास्तोष्पत्ती’ होते. यालाच यज्ञवास्तुस्वामी असेही म्हटले जाते. हा यज्ञकर्माचा रक्षक आणि यज्ञवेदीचा अधिनायक मानला जातो. नवीन वास्तूचा प्रारंभ करताना वास्तुयज्ञ करतात. म्हणजे वास्तूच्या आखणीच्या प्रारंभाच्या वेळी पहिला खांब उभारताना पहिले द्वार करताना, गृहप्रवेश करताना आणि वास्तुशांतीच्या वेळी असे पाच वेळा वास्तुयज्ञ करण्याची प्रथा आहे.
कृषिप्रधान देश असल्याने पृथ्वीमातेला-भूमातेला प्रथम वंदन करण्याची प्रथा आहे. यामध्येही ज्या जमिनीवर ‘वास्तू’ उभी राहणार त्या जमिनीविषयी, भूमीविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची आणि आधार देण्याची प्रार्थना भूमीला केली जाते.
वास्तुशांतीच्या वेळी वास्तुपुरुषाच्या प्रसन्नतेसाठी आणि नवीन वास्तू ज्या ठिकाणी राहावयाचे ती राहणाऱ्या यजमानाला आणि त्याच्या कुटुंबीयांना आयुष्य, आरोग्य, संपन्नता, समृद्धी आणि निर्विघ्नता वगैरे गोष्टींनी शुभप्रद व्हावी यासाठी वास्तूची प्रार्थना, पूजाविधी करतात. विजयादशमीचा हा मुहूर्त यासाठी शुभ मानला जातो.
आपली संस्कृती यज्ञसंस्कृती आहे. महर्षी व्यासांनी लिहिलेल्या भगवान कृष्णांनी अर्जुनाला उपदेशिलेल्या भगवद्गीतेमध्ये व्यास महर्षीनी यज्ञाचा व्यापक अर्थ सांगितलेला आहे. ‘सधर्म-कर्तव्यपालनाचा कर्मयज्ञ तितकाच महत्त्वाचा आहे. विजयादशमीच्या सुमुहूर्तावर आपण ज्या मंगल वास्तूमध्ये प्रवेश करणार, त्या वास्तूतही हा ‘कर्मयज्ञ’ सातत्याने चालू राहील असा संकल्प करावयाचा असतो. सत्कर्मे प्रामाणिकपणे करून संपत्ती, यश, कीर्ती, सन्मान मिळवेन अशी प्रतिज्ञा करावयाची असते. ग्रहप्रवेशाच्या वेळी समाजकार्याला मदत करण्याची शपथही घ्यावयाची असते. अशा पद्धतीने दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर गृहप्रवेश करावयाचा असतो. गृहप्रवेश केल्यानंतर देवीची प्रार्थना करावयाची असते.
या देवी सर्वभूतेषु।
शक्तिरूपेण संस्थिता।।
नमस्तस्यै नमस्तस्यै।
नमस्तस्यै नमो नम:।।
सर्व प्राणिमात्रांमध्ये शक्तीच्या रूपात वास करणाऱ्या देवीला मी पुन:पुन्हा वंदन करतो.