ऐतिहासिक शहराचा कॉपरेरेट लुक Print

alt

भगवान मंडलिक , शनिवार , १० नोव्हेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
मुंबईपासून तीस ते चाळीस किलोमीटर अंतरावर असलेली कल्याण-डोंबिवली शहरं, ही राहण्यासाठी मुंबईकरांची नेहमीच पसंतीची ठिकाणं राहिली आहेत. कारण इथून मुंबईत जाणं अन्य शहरांच्या तुलनेत सोपं आहे. तसेच या शहरांनी आपला सांस्कृतिक वारसाही जीवापाड जपला असल्याने अनेक मुंबईकर जेव्हा येथे राहायला गेले, तेव्हा त्यांना या शहरांमध्ये उपरेपण जाणवलं नाही.
कल्याण हे एक ऐतिहासिक खाणाखुणा जपणारं शहर. कला-संस्कृतीचं हे माहेरघर. या शहराने अनेक कलावंत दिले. आपलं पारंपरिक रूप मोठय़ा आनंदानं मिरवणाऱ्या या शहराने हळूहळू कात टाकायला सुरुवात केली आहे. काळाच्या ओघात जुन्या वाडय़ांच्या जागी टोलेजंग इमारती उभ्या राहत आहेत.
मुंबई-ठाण्यातील जागांचे वाढते दर यामुळे अनेक जण कल्याणचा पर्याय निवडत आहेत. एकीकडे या शहराने आपला ऐतिहासिक-चेहरा जपला आहे. दुसरीकडे लोकांचा राहण्यासाठी या शहराकडे कल वाढत असल्याने आधुनिक सुनियोजित इमारतींच्या गृहप्रकल्पांची संख्याही येथे वाढत आहे. मुंबईतील सरकारी कार्यालये, खासगी कंपन्या, उपक्रमांमध्ये काम करणारा मोठा नोकरदार कल्याणमध्ये राहतो. आधुनिक शहराला साजेसे मॉल्स, मोठमोठी हॉटेल्स, फ्रॅन्चायजी आता कल्याणात दिसू लागल्या आहेत. कल्याणमध्ये होत असलेल्या आधुनिक सुविधांमुळे अनेक विकासकही कल्याणमध्ये गृहप्रकल्प उभारण्यास उत्सुक आहेत. त्यामुळे इथल्या जमिनीचे भावही वाढले आहेत.
आकर्षक गृहरचना, मोकळी हवा, वाहनाने मुंबईत पाऊण तासात प्रवास, आंतरराष्ट्रीय विमानतळापासून ३५ किलोमीटर, नवी मुंबईच्या प्रस्तावित विमानतळापासून ३० किलोमीटर, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेपासून २८ किलोमीटर, मुंबई नाशिक महामार्गापासून ८ किलोमीटरवर, याशिवाय मुंबई, नाशिक, पुणे या शहरांच्या केंद्रस्थानी कल्याण शहर असल्याने भविष्याचा विचार करून बहुतांशी नागरिक या शहरात कायम वास्तव्याला विशेष प्राधान्य देत आहेत.
शहराचा लुक केवळ बांधकाम क्षेत्रच बदलत नाही, तर शिक्षण क्षेत्रातील सर्वोत्तम संधी या शहरात उपलब्ध झाल्या आहेत. मोठमोठय़ा शिक्षण संस्था बालवर्गापासून ते महाविद्यालय, पदव्युत्तर शिक्षणापर्यंतच्या सर्व संधी या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अन्य शिक्षणासाठी बाहेर जायचं असेल तर स्वत:च्या दुचाकीने नवी मुंबई, मुंबईपर्यंत पोहोचता येईल असे रस्ते असल्याने कल्याण हे रेल्वेचंच नव्हे तर कायमस्वरूपी निवासस्थानांचं जंक्शन होत आहे.
कल्याण-डोंबिवली शहरांच्या ६७ चौरस किलोमीटर क्षेत्रात टिटवाळा, आधारवाडी, गंधारे, मलंगपट्टी ते डोंबिवलीतील कोपर, रेतीबंदर पट्टय़ात मोठय़ा प्रमाणात गृहबांधणी प्रकल्प आकाराला येत आहेत. विशेष म्हणजे उभा राहणारा प्रत्येक प्रकल्प हा उभा राहत असतानाच नागरिकांकडून त्या प्रकल्पातील घरांची नोंदणी केलेली असते. अनेक गृहनिर्माण प्रकल्पांत नागरिकांना आहे त्या जागीच शाळा, मॉल, करमणुकीची साधने, प्रकल्पाची बस व्यवस्था अशा सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. त्यामुळे कोणताही विचार न करता या मोकळ्या वातावरणात, चोहोबाजूंनी डोंगरांनी वेढलेल्या भागाला नागरिक प्राधान्य देत आहेत. कल्याण रेल्वे स्टेशन आंतरराष्ट्रीय दर्जाचं करण्याची घोषणा रेल्वे मंत्रालयाने केली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात या रेल्वे स्थानकाचं महत्त्व अधिक वाढणार आहे. अनेक लांब पल्ल्याच्या न थांबणाऱ्या गाडय़ांना या ठिकाणी थांबा मिळणार आहे. उत्तर, दक्षिणकडे जाण्यासाठी मध्यवर्ती ठिकाण म्हणून कल्याणचा उल्लेख केला जातो. विरार ते अलिबाग हा प्रस्तावित अतिजलद द्रुतगती मार्ग कल्याणजवळून जात आहे. कल्याण-नगर रेल्वे मार्ग प्रस्तावित आहे.
कल्याण-डोंबिवली पालिकेतर्फे शहरांच्या विकासासाठी शहरात सुमारे १६०० कोटीचे प्रकल्प सुरू केले आहेत. या सर्व प्रकल्पांचा येणाऱ्या काळात निश्चित या परिसरातील नागरिकांना लाभ होणार आहे. नवीन रस्ते, दुर्गाडी ते खंबाळपाडा उड्डाण पूल, डोंबिवली रेतीबंदर ते भिवंडी माणकोली उड्डाण पूल, काही पूल रेल्वे मार्गावर प्रस्तावित आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात या शहरातील वाहतूककोंडीतून मुक्तता होणार आहे. अडीच हजार कोटींचा वाहतूक आराखडा प्रशासनाच्या विचाराधीन आहे. जागोजागी बाग-बगीचे, उद्याने विकसित होत आहेत. शहरात माहिती आणि तंत्रज्ञान केंद्र उभारण्याच्या हालचाली सुरू आहेत. मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र या ठिकाणी सुरू होणार आहे. अशा दर्जेदार सुविधा येणाऱ्या काळात या शहरातील नागरिकांना मिळतील. नेमका हाच विचार करून दूरदृष्टी असलेला शहरी, ग्रामीण भागातील माणूस राहण्यासाठी कल्याण शहराला प्राधान्य देत आहे.