नेबरहूड वॉच Print

alt

डॉ मुकुंद नवरे , शनिवार , १० नोव्हेंबर २०१२
अमेरिकेत ‘नेबरहूड वॉच’ ही एक गुन्हे-प्रतिबंधक व्यवस्था आहे. यात घरी किंवा इतर कुठेही आपल्याला लक्ष्य केले जाऊ नये, यासाठी स्थानिक नागरिकांना शिक्षित केले जाते. तसेच कुठेही संशयास्पद कृत्य होत असल्यास त्याची सूचना नागरिकांनी पोलिसांना देणे महत्त्वाचे आहे.
शेजाऱ्याने तुमच्या घरात लक्ष घालणे म्हणजे तुमच्या खासगी आयुष्यात नाक खुपसण्याचा एक प्रकार, असंच कुणीही म्हणेल. असं असतानाही ‘नेबरहूड वॉच’ या विषयावर असोसिएशननं एक मीटिंग ठेवली आहे, तर आपण जाऊ या का?’ असं माझ्या मुलानं विचारलं तेव्हा मला आश्चर्य वाटलं आणि त्याच वेळी मनात उत्सुकता निर्माण झाली.
जुलै महिन्यात आम्ही अमेरिकेत न्यू जर्सीमधील पार्सिपनी या गावी मुलाकडे राहायला गेलो तेव्हाची ही गोष्ट!  तेथील हंटिंग रिज नावाच्या वसाहतीत त्यानं काही महिन्यांपूर्वी घर घेतलं. या वसाहतीत एकूण दोनशे दहा घरं आणि तिथल्या सर्व रहिवाशांची असोसिएशन आहे. बहुतेक घरं एकमेकांना रो -हाऊसप्रमाणे लागून तर काही स्वतंत्र, पण दोन मजली. शिवाय गराज, बेसमेंट (तळघर) असलेली ऐसपस. छान रस्ते, नीटनेटकी झाडे, सर्वत्र हिरवळ, पोहण्याचा सामूहिक तलाव शिवाय रहिवाशांनी आपापल्या घरासमोर लावलेली किंवा कुंडय़ांमध्ये ठेवलेली फुलझाडे, असा नीटनेटका परिसर.

सर्वच रहिवासी सुखवस्तू म्हणता येतील असे. वेगवेगळ्या वंश - धर्म - देशाचे, पण भारतीयांची संख्या जाणवेल एवढी जास्त. अशा या लोकांच्या असोसिएशननं ‘नेबरहूड वॉच’ ही संकल्पना राबविण्यासाठी मीटिंग ठेवली होती आणि सरजट क्रिस्तियानो ही महिला पोलीस अधिकारी तेथे येणार आहे, अशी लेखी सूचना आमच्या घरी आली होती.
आम्ही अर्थातच मीटिंगला जाण्याचा निर्णय घेतला. ठरलेल्या दिवशी संध्याकाळी मी आणि माझा मुलगा असे दोघे मीटिंगला गेलो. या वसाहतीच्या जमिनीचे जे मूळ मालक त्यांच्या सुनसान पण नीटनेटक्या बंगल्यात असोसिएशनचं कार्यालय आहे, तिथंच ही मीटिंग झाली. सरजट क्रिस्तियानो या आधीच येऊन खुर्चीत विराजमान झाल्या होत्या. पीळदार शरीरयष्टी असलेली ही गोरी महिला तडफदार वाटली. ती तिशीतील वाटत होती पण आपण पार्सपिनीत चाळीस वर्षांहून अधिक काळ आहोत आणि आपले वडीलही इथे पोलीस अधिकारी होते, असं तिनं सहजपणे सांगितलं तेव्हा तिच्या वयाचा अंदाज आला. असोसिएशनच्या सदस्यांपकी वीस-बावीस जणांची उपस्थिती होती. पण याबद्दल कोणीही नाराजी किंवा काळजी व्यक्त केली नाही. ही अगदी सुरुवातीची सभा आहे आणि इथूनच पुढे संकल्पनेला हळूहळू मूर्त स्वरूप येईल, असा विश्वास क्रिस्तियानोच्या बोलण्यातून व्यक्त झाला. या मीटिंगमध्ये बरीच माहिती देण्यात आली.
पूर्वी आणि आता ..
साधारण चाळीस वर्षांपूर्वी अमेरिकेत ही कल्पना पुढे आली तेव्हा इथल्या जीवनाला वेग येऊ लागला होता. आणि घराघरातून पती आणि पत्नी असे दोघेही कामावर जाऊ लागले होते. दिवसा कित्येक घरे मोकळी राहत असत. यामुळे स्वत:च्या घराची सर्वाना काळजी वाटत असे आणि तेवढीच शेजाऱ्यांच्या घराबद्दल अनास्था. यातून चोरांचे फावले आणि घरफोडय़ांचे प्रमाण वाढत गेले. इतके की, याचा बंदोबस्त करण्यासाठी पोलीस यंत्रणेला वेगवेगळे उपाय शोधणे आवश्यक होऊन बसले. यातूनच अमेरिकेच्या शेरीफ असोसिएशननं ‘नेबरहूड वॉच’ ही कल्पना पुढे आणली आणि अनेक वसाहतींमध्ये अंमलबजावणी झाल्यानंतर गेल्या वीस वर्षांत कित्येक ठिकाणी घरफोडय़ांचे प्रमाण पंचाहत्तर टक्क्यांनी घटले. ‘नेबरहूड वॉच’च्या माध्यमातून व्यक्तिगत सुरक्षा, प्रथमोपचार, आरोग्यासुरक्षा, अग्निप्रतिबंधक व्यवस्था, वसाहतीच्या परिसराची योजनापूर्वक आखणी, रस्तेदुरुस्ती आणि आकस्मिक संकटाला सामोरे जाण्याची तत्परता अशाही बाबी चांगल्या प्रकारे हाताळण्यास मदत झाली. इतकेच नव्हे तर व्यसनाधीनतेचे आकलन चांगले होऊन एखाद्या घरात बेकायदेशीर कृत्य होत असल्यास तशी माहिती पुढे येऊ लागली.
‘नेबरहूड वॉच’
ही एक गुन्हे-प्रतिबंधक व्यवस्था आहे. यात घरी किंवा इतर कुठेही आपल्याला लक्ष्य (victim) केले जाऊ नये यासाठी नागरिकांना शिक्षित केले जाते. तसेच कुठेही संशयास्पद कृत्य होत असल्यास त्याची सूचना पोलिसांना देणे कसे महत्त्वाचे आहे आणि ती सूचना कशी द्यावी, याचे प्रशिक्षण दिले जाते. घरांची आतून-बाहेरून सुरक्षा कशी ठेवावी हे सांगितले जाते. आपल्या शेजारी कोण राहतात याची नागरिकांना माहिती मिळते आणि त्यांचा साधारण दिनक्रम काय असतो हेही कळते. यामुळे कोणतीही अवचित, अनुचित किंवा निराळी घटना लगेच लक्षात येऊन त्याबद्दल नागरिक पोलीस यंत्रणेला कळवू शकतात. मात्र ‘नेबरहूड वॉच’मध्ये सामील झालेले नागरिक म्हणजे काही रक्षकदल नव्हे आणि कोणताही गुन्हा घडू नये म्हणून त्यांनी स्वत:चा जीव धोक्यात घालणेही नव्हे. तसेच शेजारच्या घरात गुन्हा होणारच नाही याची ती शंभर टक्के हमीही नाही. जागरूक नागरिक म्हणून आपल्या सभोवताल होणारी / शेजारच्या घरातील संशयास्पद हालचाल पोलिसांना लवकरात लवकर कळवणे एवढेच तिचे स्वरूप आहे.
संशयास्पद  हालचालींची माहिती
एखादा गुन्हा किंवा संशयास्पद हालचाल पाहिल्यास कोणती माहिती बारकाईने टिपावी याबाबत सरजट क्रिस्तियानो यांनी एक फॉर्म दिला. त्यात कोणत्या रस्त्यावर, कोणत्या पत्त्यावर कोणती घटना पाहिली ते लिहिल्यावर गुन्हा करणारी व्यक्ती - तिचे वय, वर्ण, केसांची ठेवण, दाढी-मिशी, चष्मा-गॉगल, अंगावरील खुणा, घातलेला शर्ट-पँट, जोडे, टाय, बोटातील अंगठी, मनगटातील कडे, नेकलेस, हातातील शस्त्र -चाकू , पिस्तुल, बंदुकीचा प्रकार, गुन्हेगाराच्या वाहनाचा प्रकार, नंबर प्लेट, वाहनाचा रंग, त्यावरील ओरखडे, पोचे, किती जण होते, काय बोलत होते आणि त्यांच्या त्यांच्या येण्याची आणि जाण्याची वेळ लिहिल्यावर शेवटी आपले नाव आणि टेलिफोन नंबर लिहावा. आणि हे सर्व शांतपणे आणि मुद्देसूदपणे पोलिसांना फोनवर सांगावे आणि त्यांच्या प्रश्नांची नीट उत्तरे द्यावीत, असे सांगितले. असा सर्व तपशील दिल्यावर पोलीस यंत्रणेकडून हुकूम सुटतो आणि त्या वेळेपासून गुन्हा होत असल्या ठिकाणी पोहोचण्यासाठी लागलेला वेळ (reaction time) मोजला जातो. पार्सिपनी जिल्ह्यात लागणारा वेळ दोन ते चार मिनिटांचा असून दोन मिनिटांच्या जवळ आणण्याचा प्रयत्न केला जातो, असं क्रिस्तियानो यांनी अभिमानानं सांगितलं. पोलीस आणि त्यांची वाहनं यासाठी दिवसरात्र तत्पर असतात.
‘नेबरहूड वॉच’ची सुरुवात
नेबरहूड वॉचची सुरुवात नागरिकापासून होते. यासाठी आपण शेजारच्या घरी जाऊन ही कल्पना मांडून त्यांचा प्रतिसाद मिळवायचा असतो. पुढची पायरी म्हणून वसाहतीतील सर्वाना या योजनेची माहिती लेखी स्वरूपात घरोघरी पाठवली जाते. आणि सर्वाच्या सोयीच्या दिवशी सभेचे आयोजन केले जाते. या सभेला पोलीस खात्याच्या अधिकाऱ्यास मार्गदर्शनासाठी आमंत्रित केले जाते. सभेला आलेले सभासद आपल्या घराची / कुटुंबाची माहिती विशिष्ट नमुन्यात भरून देतात (आणि अशी माहिती इतर सभासदांकडून नंतरही गोळा केली जाते.) या माहितीच्या आधारे सभासदांची नावे, घरातील सदस्यांची नावे, आठ ते दहा घरांच्या समूहाचा नकाशा (ब्लॉक मॅप), प्रत्येक घराचा टेलिफोन आणि घरातील सर्वाचे कार्यालयातील फोन आणि मोबाइल फोन इ. संपूर्ण माहिती ब्लॉकनिहाय भरून त्या माहितीच्या कागदाच्या प्रती ब्लॉकमधील प्रत्येक सभासदाला दिल्या जातात. (हे काम पूर्ण होईल तोवर चालवले जाते.) ‘नेबरहूड वॉच’च्या सभेत प्रत्येक ब्लॉकसाठी दोन असे ब्लॉक कप्तान निवडले जातात. कुणा एकावरच सर्व जबाबदारी येऊ नये म्हणून दोघांची व्यवस्था असते. निवडलेले हे ब्लॉक कप्तान आपल्या ब्लॉकमधील लोकांशी संपर्क ठेवतात. तसेच जिल्ह्यातील नियामक समिती (steering committe)वर प्रतिनिधित्व करतात. प्रत्येक जिल्हय़ासाठी एक समन्वयक असतो आणि तो गुन्हे-प्रतिबंधक प्रशासकीय व्यवस्थेशी निगडित असतो.
ब्लॉक कप्तान
एकाच रस्त्यावरील किंवा समूहातील आठ-दहा घरांची जबाबदारी ब्लॉक कप्तानावर असते. जिल्हा समन्वयकाकडून आलेली वार्तापत्रे तो सभासदांकडे पोचवतो. आपल्या ब्लॉकमध्ये रहायला आलेल्या नवीन सभासदांची - त्यांच्या कुटुंबीयांची नावे, पत्ते, फोन नंबर, कोणी आजारी असल्यास ती माहिती इ. तपशील तो वेळोवेळी ब्लॉक मॅपमध्ये भरत असतो आणि इतर सभासदांना देत असतो. त्यांच्या सभा घेतो. त्याला कळलेल्या गुन्हेगारी स्वरूपाच्या घटनेचे वृत्त तो पोलिसांना देतो तसेच इतर सभासदांना कळवतो. नव्याने राहायला आलेल्यांचे स्वागत करणे आणि त्यांना ‘नेबरहूड वॉच’ची माहिती देणे, हे त्याचे काम असते. त्याला जिल्हा पातळीवरील प्रशिक्षण कार्यक्रमासाठी जावे लागते आणि तो गुन्हेप्रतिबंधक विभागाकडून आलेले संदेश सभासदांना देतो. एखाद्या सामूहिक वस्तूसाठी रकमा गोळा करणे, रिकाम्या अथवा बाहेरगावी गेलेल्या सभासदाच्या घरावर नजर ठेवणे, ज्येष्ठ नागरिकांची विचारपूस करणे, अशी कामे ब्लॉक कप्तानास करावी लागतात.
सभासदांची जबाबदारी
नि:संकोचपणे आपल्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तींना नावानिशी ओळखणे, त्यांची वाहने ओळखणे, वाहनांचे क्रमांक लक्षात ठेवणे ही सभासदाकडून अपेक्षा असते. ब्लॉक कप्तानाकडून मिळालेला ब्लॉकचा मॅप आणि त्यात वेळोवेळी होत असलेले बदल नोंदवणे आणि सदरचा ब्लॉक मॅप घरातील सर्वाना सापडेल अशा विशिष्ट ठिकाणी ठेवणे, ही त्याची जबाबदारी असते. सभासदाला शेजारच्या घरांवर नजर ठेवायची असते आणि संशयास्पद हालचाल दिसल्यास त्याची सूचना इतर शेजाऱ्यांना आणि पोलिसांना द्यायची असते. तसेच संशयास्पद व्यक्ती, त्यांची वाहने इ. बाबत जास्तीत जास्त माहिती लिहून ती पोलिसांना द्यायची असते. याबाबत सर्वात महत्त्वाची सूचना म्हणजे सभासदाला कोणताही गुन्हा घडत असताना स्वत:चा जीव धोक्यात घालायचा नसतो किंवा गुन्हेगाराला पकडण्याचा प्रयत्नही करायचा नसतो. या ऐवजी चांगला साक्षीदार म्हणून पुढे येण्याचे कर्तव्य त्याने पार पाडावे, अशी अपेक्षा ठेवली जाते. तसेच स्वत: बाहेरगावी जाताना शेजाऱ्यांना कल्पना देणे आणि आपल्या अनुपस्थितीत येणारे टपाल, वर्तमानपत्रे यांची व्यवस्था करणे किंवा ती खंडित करणे एवढी किमान अपेक्षा असते. ‘नेबरहूड वॉच’ कार्यक्रमाचा उपयोग अमेरिकेत पोलिसांची मदत, अग्निशमनदलाची मदत आणि वैद्यकीय मदत मिळविण्यासाठी केला जातो. यासाठी ९११ हा टेलिफोन क्रमांक देशभर वापरला जातो. पण त्याऐवजी पार्सपिनी येथील पोलीस केंद्राचा टेलिफोन क्रमांक थेट वापरल्यास आमची कुमक दोन-तीन मिनिटांत घटनेच्या ठिकाणी येईल, असं सरजट क्रिस्तियानो यांनी ठामपणे सांगितलं. मात्र घटनेची माहिती देण्यास तुम्ही जितका वेळ लावाल त्याच प्रमाणात गुन्हेगारांना सुटण्याची संधी मिळेल आणि पोलीस यंत्रणा कमी प्रभावी ठरेल, असंही त्यांनी नमूद केलं. या सभेत हंटिंग रिजच्या हजर सभासदांनी ‘नेबरहूड वॉच’चा कार्यक्रम स्वीकारण्याचं ठरवलं आणि मी काही तरी नवीन ऐकायला मिळाल्याच्या आनंदात परत आलो.